औषध हवेच मजला...पण सुलभतेने! (आश्विनी देशपांडे)

औषध हवेच मजला...पण सुलभतेने! (आश्विनी देशपांडे)

‘रोज गोळ्या-औषधं घेणं’ हा ज्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेलेला असतो, त्यांना या रोजच्या परिपाठाचा कंटाळा कधी ना कधी येतोच...मग कधी या कंटाळ्याच्या वृत्तीमुळं, कधी आळसामुळं, कधी विसराळूपणामुळं किंवा कधी आणखी कुठल्या तरी कारणामुळं ही औषधं घेण्यात चालढकल केली जाते. मात्र, असं करून अजिबात चालणार नसतं. कारण, त्या गोळ्या-औषधांवरच तर रोजचं जगणं ठीकठाक चाललेलं असतं. औषधं वेळच्या वेळी घेण्याला प्रोत्साहन कसं मिळेल? त्यात डिझायनर्स कुठली भूमिका बजावू शकतात, ते सांगणारा हा लेख...

नियमांचं किंवा सूचनांचं पालन करणं आवश्‍यक आहे, याची पूर्ण जाणीव असूनही त्याप्रमाणे वागलं जातंच, अशी खात्री देता येत नाही. कधी विसराळू वृत्तीमुळं, कधी आळस म्हणून, तर कधी बचत होईल अशा गैरसमजुतीतून छोट्या आणि साध्या सूचनांचीही अंमलबजावणी केली जात नाही. ‘दीड कप पाणी वापरा’ अशी सूचना ‘नूडल्स’च्या पाकिटावर असेल, तर थोडंसं जास्त पाणी टाकलं जातं...(तेवढेच जास्त नूडल्स होतील!), ‘एका बादलीसाठी दोन चमचे टाकावेत,’ अशी सूचना कपडे धुण्याच्या पावडरच्या पाकिटावर किंवा डब्यावर असेल, तर जेमतेम एक चमचा टाकला जातो (काय करायचाय जास्त फेस?), ब्रेडच्या पाकिटावर - तो वापरण्यासंबंधीची - तीन दिवसांची मुदत असेल तरी चौथ्या दिवशीही तो व्यवस्थित टिकावा, या अपेक्षेनं खाल्ला जातो (एवढं चालतं...!)...ही
उदाहरणं साधारणपणे अपायकारक नसल्यामुळं सूचना न पाळण्याची वृत्ती तयार होत जाते. ही झाली निरुपद्रवी उदाहरणं; पण याच प्रकारे डॉक्‍टरांच्या सल्ल्याचं, त्यांनी दिलेल्या औषधविषयक सूचनांचंही पालन होत नसेल, तर ते अतिशय धोकादायक ठरू शकतं.

औषधविषयक पॅकेजिंगबाबतचे कायदे कडक असल्यामुळं त्यातले घटकपदार्थ, त्यांच्यामुळं होऊ शकणारे दुष्परिणाम, मुदत, वजन, ठेवण्याच्या जागा याबाबत सगळी माहिती पॅकवर व्यवस्थित दिलेली असते; पण औषधं योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीनं आणि सांगितलेल्या वेळांना घेणं ही जबाबदारी रुग्णाचीच असते. अनेक देशी-विदेशी फार्मास्युटिकल कंपन्यांबरोबर काम करत असताना एक बाब निरीक्षणात आली व ती म्हणजे औषधं सांगितल्याप्रमाणे न घेण्याची रुग्णांची वृत्ती आणि त्यामुळं त्यांचा आजार बरा न होण्याची समस्या. हे असं वारंवार घडून येत असल्याचं दिसून आलं. म्हणजे, ही स्थिती फक्त आपल्याच देशात नसून जगभर हेच चित्र आहे!
डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्या औषधांतली केवळ ५० ते ६० टक्के औषधं खरेदी केली जातात आणि फक्त २५ ते ३० टक्के योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात घेतली जातात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्येही (WHO) या समस्येची दखल मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली असून त्यानुसार काम सुरू आहे, असं खोलात जाऊन शोध घेतला तर दिसून येतं.

वृत्ती किंवा सवय सकारात्मक परिणामांसाठी बदलायची तर त्यामागची कारणं जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. डिझाइन-विचारसरणीनुसार रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून ही कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या संशोधनानुसार काही कारणं वारंवार पुढं आली.

भारतासारख्या प्रगतीच्या मार्गावर असलेल्या देशात औषधांची किंमत जास्त असण्यामुळं, शिवाय आरोग्याचा विमा नसल्यामुळं औषधं विकत घेणंच अनेक रुग्णांना परवडत नाही. हा प्रश्न देशाच्या आर्थिक धोरणांशी निगडित आहे. प्रत्यक्ष डिझाइनद्वारे तो सोडवता येणार नाही. औषधं योग्य पद्धतीनं, योग्य तेवढा काळ न घेण्याची बाकी मोठी कारणं म्हणजे औषधांचे इतर दुष्परिणाम किंवा आजाराची लक्षणं संपल्यामुळं स्वतःच निर्णय घेऊन थांबवलेले डोस आणि एकंदरीत वैद्यकीय व्यवस्थेवरचा अविश्वास. जर डॉक्‍टरांनी पुढाकार घेऊन रुग्णाला विश्वासात घेऊन या तीन कारणांवर चर्चा केली तर ती अंशतः तरी दूर होऊ शकतात. याव्यतिरिक्तची कारणं म्हणजे अनेक औषधं वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पद्धतीनं आणि भिन्न मात्रांमध्ये घेताना होणारा गोंधळ, विसरभोळी वृत्ती किंवा कोणतीही कृती शिस्तबद्धपणे करण्याचा आळस. या कारणांवर डिझायनर्सनी बरंच काम केलेलं आहे. WHO च्या संशोधनानुसार डिझाइनद्वारे पॅकेजिंगवर लक्ष केंद्रित केलं तर बराच फरक होऊ शकतो.

औषधाचं पॅकेजिंग वापरायला, उघडायला-बंद करायला सोपं; मात्र नक्कल करायला प्रतिबंध करणारं असावं. वारंवार उघडावे लागणारे पॅक रुग्णाच्या शारीरिक कुवतीनुसारच डिझाइन झाले पाहिजेत. त्यांचं वजन, आकार, उघडण्याची रचना विचारपूर्वक झाली असली तर रुग्ण औषधाचा कंटाळा करण्याची शक्‍यता कमी होते.
विशिष्ट तापमानानुसार किंवा आर्द्रतेनुसार औषधांचे परिणाम कमी-जास्त होऊ शकतात. पॅकेजिंग डिझाइन आणि मटेरिअल ही परिणामकारकता टिकवून ठेवणारी असावी लागते. शिवाय, उत्पादकाकडून व्यापाऱ्याकडं आणि पुढं रुग्णापर्यंत पोचण्याच्या प्रवासातही औषधं सुरक्षित राहतील, अशी काळजी पॅकेजिंगद्वारे घेतली जाणं अपेक्षित असतं. सूचना व्यवस्थित लक्षात ठेवून डॉक्‍टरी सल्ल्यानुसार औषधोपचार झाले, तर आजार बरा होण्याची शक्‍यता अर्थातच वाढते. पॅकेजिंग डिझाइनचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे सुलभरीत्या, परिणामकारक संदेश रुग्णापर्यंत पोचवणं. यात औषध कशा वातावरणात जपून ठेवावं, कशा प्रकारे त्याच प्राशन करावं, कोणते परिणाम अथवा दुष्परिणाम अपेक्षित आहेत, डॉक्‍टरी सल्ला कोणत्या लक्षणांसाठी घ्यावा या अतिशय आवश्‍यक सूचना रुग्णापर्यंत पूर्णपणे, निःसंदिग्धपणे पोचवणं हे पॅकेजिंग डिझाइनचं ध्येय ठरतं.

डॉक्‍टरांनी एक गोळी रोज विशिष्ट वेळेला घ्यायला सांगितली तरीही विसराळू वृत्तीनुसार किंवा आळशी वृत्तीनुसार ती अनियमितपणे घेतली जाते.
जर घरातल्या एकापेक्षा जास्त व्यक्तींना बरीच औषधं दिवसातल्या वेगवेगळ्या वेळांना घेण्याची वेळ आली तर किती प्रकारचा गोंधळ होऊ शकतो, याची कल्पना करण्याचीही गरज नाही. कारण, आपल्या सगळ्यांच्याच घरात कुणी ना कुणी दीर्घकालीन आजार असलेल्या किंवा वृद्ध व्यक्ती असतीलच. मग हा गोंधळ अधू झालेल्या नजरेमुळं जास्तच गुंतागुंतीचा होऊ शकतो. डेबोरा ॲडलर या अमेरिकी डिझायनरनं असाच मोठा घोटाळा प्रत्यक्ष अनुभवला. आजीचं नाव हेलन ॲडलर आणि आजोबांचं नाव हर्मन ॲडलर. वयोमानानुसार दोघानांही बरीच औषधं घ्यावी लागायची, डॉक्‍टरही एकच आणि औषधं विकत घेण्याची जागाही तीच. वेगवेगळ्या गोळ्या एकाच्या प्रकारच्या बाटलीत गोळा करून तीवर नावाची चिट्ठी चिकटवलेली; मग काय ढोबळपणे Hxxx Adler असं वाचून आजीबाईंनी आजोबांच्या गोळ्या खाऊन टाकल्या. हा गोंधळ जेव्हा डेबोराच्या लक्षात आला, तेव्हा तिनं वैयक्तिक वापराच्या खास गोळ्या ठेवण्यासाठीच डिझाइन केलेल्या बाटल्यांची कल्पना विकसित केली. पकडायला, उघडायला, उभ्या करायला सोप्या असलेल्या आकाराबरोबरच काढता-घालता येणारी रंगीत कडी या बाटलीबरोबर मिळतात. प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळ्या रंगाचं कडं बाटलीला घातलं, तर नाव वाचण्याचा प्रयास आणि गोंधळ टळतो; तसंच औषधाचं नाव, घेण्याच्या वेळा, डॉक्‍टरांचं नाव व नंबर, मुदतीची तारीख यांचं केमिस्टकडे लावण्याचं स्टिकर आणि रुग्णाची प्राथमिक माहिती छापलेलं छोटंसं कार्ड खोचता येण्याची जागा अशा महत्त्वाच्या सुविधा या बाटलीबरोबरच योजल्या गेल्या. मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्येच असलेल्या औषधविक्रीच्या सुमारे दोन हजार काउंटरद्वारे ‘टार्गेट’ या मोठ्या अमेरिकी शृंखलेनं हे डिझाइन संपूर्णपणे स्वीकारलेलं आहे. गंभीर आजाराच्या रुग्णांनी औषधाची एकही वेळ चुकवून चालणार नसते. यात विसराळूपणामुळं किंवा कामात व्यग्र असल्यामुळं वेळ चुकणं या बाबींवर उपाय म्हणून गजर लावण्याची सोय असलेल्या औषधाच्या डब्याही आता डिझाइन केल्या जात आहेत. वार, वेळ आणि प्रकार अशा कप्प्यांशिवाय आता ब्रेल लिपीत लिहिलेल्या सूचनाही औषधाच्या डब्यांवर अनिवार्य होऊ लागल्या आहेत. रंगाचा उपयोग करून वेगवेगळ्या आजारांचं वर्गीकरण केलेल्या औषधाच्या डब्याही विकसित झाल्या आहेत. जी औषधं गंभीर रोगांसाठी नसतात, त्याबद्दल सोप्या भाषेत माहिती दिली तर तीही रुग्णांसाठी मोठी सोय म्हणता येईल. या सगळ्या डिझाइन्सचा एकच उद्देश आहे व तो म्हणजे रुग्णांना डॉक्‍टरी सल्ल्यानुसार औषधं घ्यायला प्रोत्साहन मिळावं, औषधं घेण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि केवळ सूचनांचं पालन न केल्यामुळं जे रुग्ण जास्त गंभीर आजारांना बळी पडतात ते रोगमुक्त व्हावेत. डिझाइनच्या मदतीनं अनेक व्यावसायिक आपलं काम जास्त परिणामकारकरीत्या बजावू शकतात. त्यातला हा एक छोटा पैलू!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com