सर सलामत तो पगडी पचास (आश्र्विनी देशपांडे)

सर सलामत तो पगडी पचास (आश्र्विनी देशपांडे)

भारतात शंभराहून अधिक उत्पादक ISI चिन्हाचं हेल्मेट तयार करतात. इतकंच नव्हे तर, सर्व दुचाकींबरोबर हेल्मेट देणं सक्तीचंही आहे; पण मुद्दा असा आहे, की आपल्या जिवाची काळजी घेण्यासाठी सरकारी कायदे कशाला हवे आहेत? हेल्मेटचा वापर उत्स्फूर्तपणे सरसकट का होत नाही?

शहरी भागातली वाढती लोकसंख्या, उपनगरांचा सतत विस्तारत जाणारा आवाका, गतिमान आयुष्य आणि यामुळं होणारा सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांचा तुटवडा या सगळ्या कारणांमुळं दुचाकी हा भारतीय दैनंदिन जीवनसरणीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. मुंबईसारख्या महानगरातसुद्धा गेल्या दहा वर्षांत दुचाकींची संख्या दुप्पट झाली आहे. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या शहरांतही दुचाकींचं प्रमाण सतत वाढतंच आहे. आरटीओच्या आकडेवारीनुसार पुण्यात तर रोज ७०० पेक्षा जास्त नव्या दुचाकींची नोंदणी होते. एकीकडं हा आकडा प्रगतीचा आणि समृद्धीचा निदर्शक असला तरी या वाढत्या रहदारीमुळं रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडी, प्रवासाला लागणारा वाढता वेळ आणि त्यामुळं वाहनचालकांचा राग, निराशा, वेळेत पोचण्यासाठी रहदारीच्या नियमांचं उल्लंघन करून केलेली धडपड आणि वाढते अपघात हे चित्र आपल्या सगळ्यांसमोर आहे.

वाहनांची संख्या वाढणार, रहदारी वाढणार आणि गतीही जास्त हवी अशा परिस्थितीत वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न स्वाभाविकच कळीचा बनतो. मात्र, दुचाकींच्या संख्येच्या तुलनेत नाममात्र संख्येनं हेल्मेट विकत घेतली जातात. घेतली तरी ती वापरली जातातच असंही नाही. ट्रॅफिक सिग्नलजवळ उभं राहून निरीक्षण केलं तर लक्षात येईल, की दहा-बारा दुचाकीस्वारांत एखादीच व्यक्ती हेल्मेट घातलेली असते. दुर्दैवानं हेच चित्र मोटारचालक आणि सीटबेल्ट यासंदर्भातही आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी एका सहजसोप्या नियमाचं पालनही बहुतेक लोक आवश्‍यक समजत नाहीत. केवळ हेल्मेट न घातल्यामुळं भारतात रोज सुमारे ७० दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू होतो. महाराष्ट्रातच दरवर्षी १५०० हून अधिक दुचाकीस्वार या निष्काळजीपणामुळं मृत्युमुखी पडतात.
***

हेल्मेट मुळात कसं आणि कुठं अस्तित्वात आलं, याबद्दल थोडं जाणून घेऊ या. सन १८९४ ते १९०१ यादरम्यान मोटारसायकलच्या निर्मितीची सुरवात झाली. या वेगवान दुचाकींचा वापर इंग्लंडमध्ये पोस्टासारखी सरकारी कामं, तसंच लष्करी दळणवळणासाठी सुरू झाला. त्यातच मोटरसायकल रेसिंग हा खेळ पुढं आला. सन १९१४ मध्ये इंग्लंडमधल्या ब्रूकलंड इथं रेसिंगसाठी एक कायमस्वरूपी ट्रॅकही उभारण्यात आला होता. जेव्हा ब्रूकलंडस्थित डॉक्‍टर एरिक गार्डनर यांच्याकडं मोटारसायकलच्या अपघातात सापडून डोक्‍याला दुखापत झालेले रुग्ण उपचारांसाठी वारंवार यायला लागले, तेव्हा त्यांना या समस्येचं गंभीर स्वरूप लक्षात आलं. डॉक्‍टरांनी श्री मॉस या त्यांच्या स्नेह्याकडून कॅनव्हास आणि लाख यांपासून एक भक्कम अशी टोपी बनवून घेतली. बरेच प्रयोग करून त्या दोघांनी शंभर सुरक्षित टोप्या म्हणजेच हेल्मेट तयार केली आणि एका मोठ्या रेसमध्ये सगळ्या स्पर्धकांना ती वाटली. थोडी कुरकुर करत का होईना; पण ९४ स्पर्धक या प्रयोगात सहभागी झाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक छोटे-मोठे अपघात झाले तरी सगळ्या स्पर्धकांची डोकी सुरक्षित राहिली. त्यांना बाह्य दुखापती झाल्या नाहीत की चक्कर वगैरेही आली नाही. यामुळं हेल्मेटची उपयुक्तता सिद्ध झाली. तरीही सुरक्षित हेल्मेटचा विकास होऊन त्यांचं उत्पादन सुरू व्हायला आणखी २० वर्षं जावी लागली. सन १९३५ मध्ये टी. ई. लॉरेन्स ऊर्फ लॉरेन्स ऑफ अरेबिया यांचा मोटारसायकलच्या अपघातात डोक्‍यावर मोठा आघात होऊन मृत्यू झाला, तेव्हा त्यांचे न्यूरोसर्जन डॉक्‍टर केर्न्स यांनी पुष्कळ संशोधन करून इंजिनिअर्स आणि डिझायनर्स यांच्या मदतीनं हेल्मेटचा पहिला अवतार उत्पादनासाठी तयार केला. हेल्मेटचा मुख्य हेतू आणि उपयोग  दुखापत होण्यापासून मेंदू वाचवणं हा आहे. कारण, मेंदूची हानी भरून निघत नाही. काही अपवाद सोडले तर आज  हेल्मेट घालून दुचाकी चालवण्याची सक्ती जगभर आहे.
***

आपल्या देशातही १९८८ च्या ‘भारतीय मोटार वाहन नियमा’नुसार हेल्मेट घालून दुचाकी चालवणं अनिवार्य आहे. ‘इंडियन स्टॅंडर्डस इन्स्टिट्यूट प्रमाणित, म्हणजेच ISI हे चिन्ह असलेलं हेल्मेट वापरावं,’ असा सरकारचा सल्ला आहे. त्यानुसार चांगलं हेल्मेट कसं असावं, याची काही परिमाणं आहेत. ती अशी : १) हेल्मेटमुळं दिसण्यात अडथळा येऊ नये, २) हेल्मेट घातल्यावरही व्यवस्थित ऐकू यावं, ३) हेल्मेट जड नसावं, ४) हेल्मेटची रचना अशी असावी की ज्यामुळं मानही सुरक्षित राहील, ५) हेल्मेटचं अस्तर त्वचेसाठी सुरक्षित असावं, ६) हेल्मेट डोक्‍याला नीट बसणारं असावं; सैल नसावं. भारतात शंभराहून अधिक उत्पादक ISI चिन्हाचं हेल्मेट तयार करतात. इतकंच नव्हे तर, सगळ्या दुचाकींबरोबर हेल्मेट देणं सक्तीचंही आहे; पण मुद्दा असा आहे, की आपल्या जिवाची काळजी घेण्यासाठी सरकारी कायदे कशाला हवे आहेत? हेल्मेटचा वापर सरसकट का होत नाही? काही वर्षांपूर्वी आमच्या टीमनं या विषयावर बरंच संशोधन केलं, तेव्हा काही मुद्दे ठळकपणे पुढं आले : चांगल्या हेल्मेटचे मुख्यत्वेकरून तीन भाग असतात.

१) टणक बाह्य आवरण. हे मजबूत थर्मोप्लास्टिकचं बनवलेलं असतं. गोलसर आकारामुळं ते रस्त्यावर सहजपणे घसरून संभाव्य अपघाताच्या आघाताचा परिणाम थोडा कमी करू शकतं. अपघातात हे टणक आवरण चिरडलं जात नाही आणि त्यामुळं डोक्‍यावर थेट आघात होण्याचं टळतं व कवटी फुटण्याची शक्‍यता कमी होते. मात्र, हे खूप वेगवान आघातासाठी डिझाईन केलेलं असल्यामुळं थोडं अवजड वाटतं. शिवाय, हवेशीरही नसतं,
२) फोमचं अस्तर. हे डोक्‍याभोवती घट्ट उशीसारखं बसतं आणि आघाताच्या वेळी दाबलं जाऊन कवटीला बसणारा धक्का कमी करतं. हे अस्तर पॉलिस्टायरिनपासून बनवलेलं असतं. या मटेरिअलचे बाकीचे गुणधर्म उपयुक्त असले, तरी हे मटेरिअल पर्यावरणाला हानिकारक आहे. हजारो वर्षांनंतरही ते बायोडिग्रेड होत नाही.
३) हनुवटीखाली व्यवस्थित बसणारा पट्टा आणि चाप. सुरक्षिततेसाठी या बाबीही महत्त्वाच्या आहेत आणि अपघाताच्या वेळी डोकं हेल्मेटच्या आत सुरक्षितपणे अडकवून ठेवण्याची मोठी कामगिरी त्या बजावू शकतात. हेल्मेटबाबत बरेच गैरसमज आहेत. आमच्या टीमनं या गैरसमजांबाबत खोलात जाऊन शोध घेतला आणि जी माहिती मिळवली ती मी इथं मांडत आहे. गैरसमज (आणि त्यांच्याविषयीचा खुलासा कंसात) असे आहेत ः
१) हेल्मेट घातल्यामुळं केस गळतात. (मात्र, या सिद्धान्ताला वैज्ञानिक पुरावा नाही.)
२) हेल्मेट घातल्यामुळं ऐकू कमी येतं. (हेल्मेटमुळे कदाचित वाऱ्याचा घोंघावणारा आवाज कमी होत असेल; पण एकंदरीत कमी ऐकू येण्याबद्दल कोणतीही माहिती सिद्ध झालेली नाही.)
३) हेल्मेटमुळं अपघातात मानेला दुखापत होते. (काही अपघातांमध्ये मानेला इजा पोचते हे जरी खरं असलं तरी डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन मेंदूवर कायमचा परिणाम होण्याच्या शक्‍यतेपेक्षा मानेची दुखापत कमी हानिकारक असू शकते).
४) रस्त्यावर स्वस्तात विकलं जाणारं हेल्मेट आणि ISI चिन्ह असलेलं ब्रॅंडेड हेल्मेट यांच्यात विशेष फरक नसतो. (या दोन्ही हेल्मेटची तुलना केली तर ISI चिन्ह नसलेली हेल्मेट खराब दर्जाचं फोम वापरून आणि कमकुवत प्लास्टिकची बनवलेली आढळली. त्यांच्यात आघात पेलण्याची शक्ती खूपच कमी होती. त्यांचे चापही कमकुवत होते).
***

या संशोधनानंतर आमच्या टीमनं खास स्थानिक समस्या सोडवू शकणाऱ्या भारतीय हेल्मेटचा विकास करायचा चंग बांधला.
१) भारतासारख्या उष्ण हवामानातही आरामदायी असेल,
२) शहरी वाहतुकीनुसार २५-३० किलोमीटर/प्रतितास अशा वेगानं चालणाऱ्या वाहनांसाठी सुरक्षित असेल,
३) पर्यावरणासाठी हानिकारक नसेल अशा हेल्मेटचं डिझाईन विकसित करण्याचा स्वयंप्रायोजित
प्रकल्प ‘एलिफंट’मध्ये काही वर्षांपासून सुरू आहे. कमी शक्तीच्या, कमी वेगाच्या मोपेडचालकांना आणि स्कूटरचालकांना (स्त्री व पुरुष) छोट्या आघातांपासून, उन्हापासून वाचवणारं, कमी वजनाचं, हवेशीर सुरक्षाकवच डिझाईन करणं आणि ते उत्पादनयोग्य बनवणं असं या प्रकल्पाचं एकूण स्वरूप आहे. काथ्या आणि वर्तमानपत्राच्या कागदाच्या लगद्यापासून कोरुगेटेड प्रोफाइल वापरून केलेला मजबूत सांगाडा, त्यावर बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आणि कापडी आवरण अशी या कवचाची साधारण रचना आहे. यात पुढं इलेक्‍ट्रॉनिक्‍सद्वारे GPS, हेडफोन, सेन्सर्स वगैरेही जोडता येऊ शकतील. समस्या सोडवण्याची तीव्र तळमळ, पुरेसा वेळ, सातत्य आणि आर्थिक गुंतवणूक यांचा संगम अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये व्हावा लागतो. शिवाय, सुरक्षिततेच्या अनेक चाचण्यांमधून गेल्यावरच ही कवचं बाजारात येऊ शकतील. तसं लवकरच होईल अशी आशा आहे. हे भारतीय कवच आज बाजारात नसलं तरी ISI चिन्ह असलेली अनेक चांगली हेल्मेट आज उपलब्ध आहेत. तेव्हा कोणतंही पोकळ कारण न सांगता तुम्ही स्वतः हेल्मेट वापरा व तुमच्या जवळच्या सगळ्यांना हेल्मेट घालायला प्रवृत्त करा आणि सुरक्षित राहा.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com