समस्या सोडवा अभिनव पद्धतीनं! (आश्र्विनी देशपांडे)

आश्र्विनी देशपांडे ashwini@elephantdesign.com
रविवार, 21 जानेवारी 2018

डिझाइनच्या क्षेत्रात बाकी अनेक कौशल्यांबरोबरच मनःपूर्वक संवाद साधणं, लक्ष देऊन ऐकणं, निरीक्षणातून अनुमान काढणं आणि कल्पनेला गोष्टीचं स्वरूप देऊन ती पेश करू शकणं हे अत्यंत मोलाचं समजलं जातं. एखादं प्रॉडक्‍ट वापरताना ग्राहकाला येणाऱ्या अडचणी अशा प्रकारे नीट समजून घेतल्या, तर त्या अडचणी दूर करण्याच्या अभिनव पद्धतीही आपोआपच सुचत जातात...

‘आ  पल्याला नेमकं काय हवंय हे बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसतं. ते प्रत्यक्ष करून दाखवल्यावरच त्यांना कळतं,’ असं ‘ॲपल’चे संस्थापक स्टीव जॉब्ज्‌ एकदा म्हणाले होते.

डिझाइनच्या क्षेत्रात बाकी अनेक कौशल्यांबरोबरच मनःपूर्वक संवाद साधणं, लक्ष देऊन ऐकणं, निरीक्षणातून अनुमान काढणं आणि कल्पनेला गोष्टीचं स्वरूप देऊन ती पेश करू शकणं हे अत्यंत मोलाचं समजलं जातं. एखादं प्रॉडक्‍ट वापरताना ग्राहकाला येणाऱ्या अडचणी अशा प्रकारे नीट समजून घेतल्या, तर त्या अडचणी दूर करण्याच्या अभिनव पद्धतीही आपोआपच सुचत जातात...

‘आ  पल्याला नेमकं काय हवंय हे बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसतं. ते प्रत्यक्ष करून दाखवल्यावरच त्यांना कळतं,’ असं ‘ॲपल’चे संस्थापक स्टीव जॉब्ज्‌ एकदा म्हणाले होते.

अर्थात, त्यांच्यासारखी असामान्य दूरदृष्टी असणारे लोक या जगात फारच थोडे असल्यामुळं बहुतेक व्यवसायांना त्यांच्या प्रॉडक्‍ट्‌सविषयी किंवा सेवांविषयी गरज, मागणी, किंमत देण्याची तयारी, तंत्रज्ञानाची व्यवहार्यता, विक्रीनंतर लागू शकणारी सेवा, प्रतिस्पर्धी, पर्यावरण या सगळ्या बाबींचा विचार करूनच नवीन कल्पना प्रत्यक्षात आणता येतात, आणाव्या लागतात. यातल्या काही गोष्टी केवळ योग्य ती माहिती उपलब्ध झाल्यास समजू शकतात; पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जे ग्राहक डोळ्यासमोर ठेवून ते प्रॉडक्‍ट अथवा सेवा योजली जात असते, त्या  ग्राहकांना काय हवं आहे आणि काय आवडेल, याचा शक्‍यतो अचूक अंदाज येण्यासाठी त्या ग्राहकगटाचा अभ्यास करणं आवश्‍यक असतं. डिझाईनच्या क्षेत्रात बाकी अनेक कौशल्यांबरोबरच मनःपूर्वक संवाद साधणं, लक्ष देऊन ऐकणं, निरीक्षणातून अनुमान काढणं आणि कल्पनेला गोष्टीचं स्वरूप देऊन ती पेश करू शकणं हे अत्यंत मोलाचं समजलं जातं. डिझायनर्स संभाव्य ग्राहकांशी संवाद साधून, त्यांच्या राहणीमानाचं, सवयींचं, प्रतिक्रियांचं निरीक्षण करून काही खास निष्कर्ष गवसतात का याच्या मागं नेहमीच असतात. हे निष्कर्ष वापरून ज्या नव्या गरजा किंवा इच्छा पुढं येतात, त्यातच नवीन कल्पनांचं बीज सापडू शकतं. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांसाठी उपयुक्त, नावीन्यपूर्ण आणि डॉक्‍टरांना सोईचे शोध/कल्पना पुढं याव्यात यासाठी लक्षपूर्वक ऐकणं, समजून घेणं आणि बारकाईनं निरीक्षण करून समस्यांवर सहानुभूतीनं उपाय शोधणं या गोष्टी अतिशय उपयुक्त ठरतात. याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे जीई कंपनीनं खास लहान मुलांसाठी डिझाईन केलेलं एमआरआय मशिन. जीई कंपनीत काम करणाऱ्या डग डिएझ या इंडस्ट्रिअल डिझायनरनं अतिशय सुबक आणि कार्यक्षम अशा एमआरआय मशिन्सची श्रेणी विकसित केली होती.  आपण डिझाईन केलेली मशिन व्यवस्थित चालत आहेत ना, त्यांचा योजल्याप्रमाणे वापर केला जात आहे ना, डॉक्‍टर- रुग्ण-नातेवाईक यांना काही समस्या तर नाहीत ना, हे पाहायला डग नेहमीच उत्सुक असायचा. त्यामुळं निरीक्षणासाठी तो वारंवार रुग्णालयांच्या वाऱ्या करायचा. मशिनचं वैद्यकीय कार्य सुरळीत होतं; पण एके दिवशी एक छोटी मुलगी एमआरआय मशिनसमोर मोठ्यानं रडताना त्याला दिसली. कारण सहजच लक्षात येत होतं. तिला त्या आ वासलेल्या बोगद्यासारख्या मशिनमध्ये जायची खूप भीती वाटत होती. ती भेदरून गेल्यानं रडत होती. त्यातून ते निळे-जांभळे दिवे तिला जास्तच घाबरवून टाकत होते. डॉक्‍टरांशी चर्चा केल्यावर डग याला समजलं, की स्कॅन करण्याआधी सुमारे ८० टक्के  लहान मुलांना गुंगीचं औषध देऊन शांत करावं लागतं. ही समस्या खूपच गंभीर होती.

वैद्यकीयदृष्ट्या मशिन्स जरी उत्तम चालत होती, तरी रुग्णाच्या मानसिक स्थितीवर त्यांचा नकारात्मक परिणाम होणं ही बाब स्वीकारता येण्याजोगी नव्हती. मग डग यानं यावर उपाय शोधायचा चंग बांधला. मुलांच्या शाळा, पाळणाघरं, वस्तुसंग्रहालयं इथं अनेक फेऱ्या मारून मुलांच्या आवडी-निवडी, त्यांच्या शंका, त्यांची वर्तणूक यांबद्दल डग माहिती मिळवू लागला. इतकंच नव्हे तर, त्यानं मुलांनाच कल्पनाशक्ती लढवून काय आवडेल याविषयीची चित्रं काढायला उद्युक्त केलं. यातूनच Adventure series म्हणजेच, मुलांच्या आवडत्या साहसकथांवर आधारित अशी खास लहान मुलांसाठी डिझाईन केलेली एमआरआय मशिन्स विकसित झाली. मुलांसाठी आणि पालकांसाठी तर हे वरदानच होतं; शिवाय गुंगीचं औषध देण्याचे प्रसंगही झपाट्यानं कमी होऊन अखेर नगण्यच झाले.
***

वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात फिलिप्स कंपनीही उत्कृष्ट कार्य करते. त्यांच्या डिझाईन टीमनंही या समस्येवर लक्षवेधक काम केलेलं आहे. लहान मुलांना वाटणारी स्कॅनिंगची भीती घालवण्यासाठी त्यांनी चक्क एक लुटूपुटीचं म्हणावं असं लहान आकाराचं; पण हुबेहूब मोठ्या मशिनसारखा दिसणारं Kitten machine तयार केलं आहे. स्कॅनिंगसाठी जाण्याआधीच्या वेटिंग रूममध्ये हे मशिन आणि काही प्राण्यांच्या आकाराची मऊशार खेळणी ठेवलेली असतात. मुलांनी त्यांच्या आवडीचं खेळणं स्कॅनरमध्ये ठेवलं की दिवे आणि आवाज सुरू होतो आणि शेजारच्या डिस्प्लेवर त्या खेळण्याची प्रतिमा त्याच्या अंतर्गत रचनेसकट दिसायला लागते. या सोप्या कृतीमुळं, स्कॅनरचं काम केवळ ‘चित्र काढणं’ हेच असतं आणि त्यात कुठलाही धोका नसतो हे लहान मुलांना समजायला मदत होते. या दोन्ही उदाहरणांत मनःपूर्वक ऐकलं, निरीक्षण केलं तर समस्या किती नावीन्यपूर्णतेनं सोडवली जाऊ शकते हे स्पष्ट होतं.
***

असाच बदल अमेरिकेत सन २०१० मध्ये शेव्हरोले कंपनीनं प्रस्तुत केलेल्या एका गाडीमध्ये आढळतो. आज जगात पुरुषांच्या बरोबरीनं महिलाही दुचाकी आणि मोटारी चालवतात. परंपरागत आराखड्यात पुरुषांची उंची, आकार, कपडे, बूट लक्षात घेतलेले असतात; पण महिलांच्या विशिष्ट सवयी, कपड्यांच्या पद्धती, उंची, हात-पायाचे आकार लक्षात घेऊन या गाड्यांचं डिझाईन होत नाही. डिझायनर जेव्हा महिलाचालकांचं निरीक्षण करायला लागले, तेव्हा अनेक गैरसोई पुढं आल्या. टाचांचे बूट घालून ॲक्‍सिलरेटर दाबणं अवघड जातं असं लक्षात आल्यावर निदान हा एक मुद्दा तरी सोडवला जावा म्हणून ‘शेव्हरोले इक्विनॉक्‍स’ या गाडीत खास वर्तुळाकार आणि सहज दाबला जाईल असा ॲक्‍सिलरेटर बसवण्यात आला होता; पण बाकी मोठ्या अडचणी अजूनही सोडवल्या गेलेल्या नाहीत. भारतात तर सैल घेर असलेले कपडे घालून किंवा साडी नेसूनही सहज चढता-उतरता किंवा चालवता याव्यात, अशा दुचाकी आणि मोटारी अस्तित्वातच नाहीत. लवकरच यावर एखादी अग्रगण्य मोटर कंपनी काम करेल अशी आशा करू या...

Web Title: ashwini deshpande write article in saptarang