कळत-नकळत DIY (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे ashwini@elephantdesign.com
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

खरं तर DIY ही एक विचारसरणी आहे. ‘ऐकलं तर विसरून जाईल, पाहिलं तर लक्षात राहील; पण स्वतः केलं तर उमजेल’ असं म्हटलं जातं. स्वनिर्मितीचा आनंद काही असाच उमजून देणारा असतो. चौकट दिली असली तरी मनपसंत रंग भरण्यातही एक प्रकारचं समाधान असतं. प्रत्येक वेळी तो रंग डिझायनरनं भरला तर काय मजा?

खरं तर DIY ही एक विचारसरणी आहे. ‘ऐकलं तर विसरून जाईल, पाहिलं तर लक्षात राहील; पण स्वतः केलं तर उमजेल’ असं म्हटलं जातं. स्वनिर्मितीचा आनंद काही असाच उमजून देणारा असतो. चौकट दिली असली तरी मनपसंत रंग भरण्यातही एक प्रकारचं समाधान असतं. प्रत्येक वेळी तो रंग डिझायनरनं भरला तर काय मजा?

‘आयकिया’ या जगप्रसिद्ध स्वीडिश कंपनीचे संस्थापक इंग्वार काम्प्रद यांचं नुकतंच निधन झाल्याची बातमी वाचली, तेव्हाच ठरवलं की या आठवड्यात‘आयकिया’ आणि‘DIY’ म्हणजेच ‘स्वतः तयार करा’ (Do it yourself) या श्रेणीत बसणाऱ्या कल्पनांचा आढावा घ्यायचा. आयकिया ही कसली आयडिया आहे? सुमारे ६० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. इंग्वार काम्प्रद हे एल्महुल्ट या स्वीडनमधल्या छोट्याशा गावात फर्निचरचा व्यवसाय करत असत. गिलिस लुंदग्रेन या तरुण डिझायनरला त्यांनी नुकतंच नोकरीवर घेतलं होतं. भरपूर झटापट करूनही एक अवजड टेबल गाडीच्या डिकीत जेव्हा मावेना तेव्हा गिलिस शेवटी हैराण होऊन म्हणाला ः
‘अरे देवा! आता या टेबलचे पाय कापून खाली ठेवायचे की काय...?’
त्या वेळी जरी हे शब्द केवळ वैतागून उच्चारले गेले असले, तरी यावर विचार करून काम्प्रद हे गिलिसला म्हणाले ः ‘‘खरंच, करून पाहू या का असं टेबल?’’
-मुक्कामाच्या जागी पोचवल्यावर मगच जुळवाजुळवी करून तयार होणाऱ्या फर्निचरची ही सुरवात होती. नंतरच्या काळात गिलिस यांनी एक टेबलच नव्हे, तर सर्वसामान्यतः घरासाठी लागणाऱ्या हजारो गोष्टी डिझाईन करणारी अतिशय सक्षम टीम उभी केली. सपाट बॉक्‍समध्ये सुटे भाग आणि जुळवणी करण्याच्या सविस्तर रेखाचित्रांसहित सूचना पॅक करून ग्राहकांना फर्निचरची स्वतःच जुळणी करण्यास उत्तेजन देणं ही ‘आयकिया’ची खासियतच बनली. जुळणी करणारी सर्वसामान्य व्यक्ती अशा कामात कुशल नसणार, हे लक्षात घेऊन फर्निचरची जुळवणी सोप्यात सोपी कशी होईल, भाग हलके, टिकाऊ आणि स्वस्त कसे असतील यावर ‘आयकिया डिझाईन टीम’ सतत भर देत असते. घरी जाऊन स्वतःचं फर्निचर स्वतःच तयार करू शकणारी आधुनिक विचारसरणीची व्यक्ती केंद्रस्थानी ठेवूनच आयकियाची सगळी उत्पादनं योजली जातात. स्टोअरमध्ये घरातल्या वेगवेगळ्या खोल्यांचे संपूर्ण सेट उभे करून सुंदर आणि सुबक राहणीमानाचं स्वप्न सहजपणे सत्यात आणता येईल, याची हमी देणारी आयकिया कंपनी हळूहळू युरोप, अमेरिका, कॅनडा, पुढं कोरिया, चीन अशा देशांत लोकप्रिय झाली ती याच कारणांनी.

गिलिस लुंदग्रेन यांनी ५० वर्षांहून अधिक काळ आयकियात घालवला आणि  ६० वर्षांपूर्वी अशक्‍य वाटणाऱ्या DIY Furniture या कल्पनेचा क्रांतिकारक विस्तार करण्यात यश मिळवलं. गिलिस यांनी डिझाईन केलेली ‘बिली’ नावाच्या मॉडेलची चार कोटी बुकशेल्फ जगातल्या कित्येक देशांमधल्या घरांची शान वाढवत आहेत, असं म्हणतात. कमी बजेटमध्ये घराची सजावट करू इच्छिणारी तरुण जोडपी असोत किंवा छोट्याशा खोलीतली जागा वेगवेगळ्या कामांसाठी अधिकाधिक वापरली जावी अशी गरज असलेले विद्यार्थी असोत किंवा चक्क इंग्लंडच्या डचेस केट यांच्या राजपुत्राची नर्सरी असो...आयकियाकडं प्रत्येकासाठीचं चपखल फर्निचर आहेच. गेल्या वर्षी आयकियाची उलाढाल तब्बल ३५ अब्ज युरो होती. या आकड्यावरूनच एकंदरीत आवाका लक्षात येऊ शकेल.

भारतात घराचं फर्निचर बनवणं, रंगकाम, पडदे, कार्पेट बसवणं किंवा इतर सजावट करण्यासाठी त्या त्या कामांत कुशल असणारे लोक घरी येऊन काम करून जातात. मोठं फर्निचर असेल तर ते शोरूममधून किंवा गोदामातून ट्रकमध्ये चढवून घरी पाठवलं जातं आणि तसंच तयारच्या तयार घरात मांडलं जातं. मात्र, असे कारागीर आणि कामगार मिळणं दिवसेंदिवस अवघड आणि महाग होत चाललं आहे. लवकरच भारतातही आयकिया स्टोअर्स उघडली जाणार आहेत आणि कुणी सांगावं...कदाचित आपलीही राहण्याची, जगण्याची पद्धत बदलून जाईल. आपणही आळस झटकून DIY आपलंसं करू. आई-बाबा आपल्या मुलांना सांगू शकतील, की तुम्ही ज्या पलंगावर मस्ती करताय ना, तो आम्ही आमच्या हातांनी तयार केला आहे बरं का! आजच्या काळातला दुसरा संदर्भ घेतला तर ‘फेसबुक’, ‘ट्‌विटर’, ‘इन्स्टाग्राम’ ही वैयक्तिक विचार, फोटो, मतं यांचा प्रसार करणारी माध्यमं किंवा व्यावसायिक नेटवर्किंगचं ‘लिंक्‍ड्‌ इन’ म्हणजे एका प्रकारची DIY media च आहेत. वापरणाऱ्या व्यक्तींच्या भावनिक गरजा, त्यांना उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आणि कायम वैविध्य राहील अशा प्रकारचे तयार सांगाडे पेश करण्यासाठी ही माध्यमं विकसित करणारे डिझायनर्स आणि तंत्रज्ञ सतत झटत असतात. त्यांनी चौकट किंवा सैलसर आराखडा योजलेला असतो; पण तो आराखडा आपल्या आयुष्याचे रंग भरून सुशोभित, जिवंत करण्याची मुभा आणि स्वातंत्र्य ही माध्यमं आपल्याला देतात. सोशल नेटवर्किंगची कोणतीही साईट स्वतःचा मजकूर अथवा चित्र आपल्यावर लादत नाही. त्यामुळं प्रत्येकाला मतप्रदर्शनाचं स्वातंत्र्य उपलब्ध झालेलं आहे.

खरं तर DIY ही एक विचारसरणी आहे. ‘ऐकलं तर विसरून जाईल, पाहिलं तर लक्षात राहील; पण स्वतः केलं तर उमजेल’ असं म्हटलं जातं. स्वनिर्मितीचा आनंदही असंच काहीतरी ‘उमजून’ देणारा असतो. चौकट दिली असली तरी मनपसंत रंग भरण्यातही एक प्रकारचं समाधान असतं. प्रत्येक वेळी तो रंग डिझायनरनं भरला तर काय मजा?

Web Title: ashwini deshpande write article in saptarang