मितव्ययी (आश्र्विनी देशपांडे)

आश्र्विनी देशपांडे
रविवार, 8 जुलै 2018

‘मितभाषी, जेवढं आवश्‍यक आणि अनिवार्य आहे तेवढंच सांगणारं, गरजेपुरतं सुरक्षित कवच पुरवणारं पॅकेजिंग’ असा कल सध्या पुढं येताना दिसतो आहे. यात अनावश्‍यक आश्वासनं, विश्वास बसणार नाही अशी विशेषणं, गरजेपेक्षा जास्त मटेरिअल आणि एकावर एक चढवलेले थर या बाबींना फाटा दिला जातो.

‘कमीत कमी पुरवठ्यापासून जास्तीत जास्त उपयुक्तता’ ही विचारसरणी भारतीय जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. दुधाच्या पिशवीतला शेवटचा थेंब, वेफर्सच्या पाकिटातला उरलेला मसाला, फणसाच्या बिया उकडून केलेला नाश्‍ता, जुन्या टॉवेलची फडकी ही एखाद्या वस्तूपासून शक्‍य तेवढा फायदा मिळवण्याची रोजचीच उदाहरणं झाली. मात्र, भांडवलशाहीच्या काळात इतक्‍या प्रकारची आणि वैशिष्ट्यांची रेलचेल असलेली इतकी अगणित उत्पादनं बाजारात आली आहेत की त्यातून सुटका मिळवण्यासाठी ‘कमीत कमी आणि पुरेसं’ हा एक प्रकारचा वेगळा ‘न्यूनतावाद’ पुढं येऊ लागला आहे. डिझाईनच्याच बाबतीत; विशेषतः पॅकेजिंगसाठी ही विचारसरणी अतिशय चपखलपणे लागू होते.

‘पॅकेजिंग ही प्रॉडक्‍ट्‌ची पहिलीवहिली ओळख असते,’ असं म्हणतात. ज्याप्रमाणे पुस्तकाच्या कव्हरवरून त्याच्या परीक्षणाला सुरवात होते, त्याचप्रमाणे पॅकेजिंगवरून प्रॉडक्‍ट कसं असेल, याचा अंदाज बांधून ते हवं की नको याबाबत निर्णय घेतले जातात. यात बाह्य रूप, रंग, आकार आणि रचना या सगळ्याच घटकांचा समावेश आहे.

केवळ पॅकेजिंग डिझाईनचा आढावा घेतला तर असं दिसतं, की वर्षानुवर्षं स्पर्धात्मक चढाओढ केल्यामुळं एका श्रेणीतल्या सगळ्याच ब्रॅंड्‌सचं पॅकेजिंग डोळ्यात जास्तीत जास्त भरणारं, दिखाऊ, भपकेदार व्हायला लागलं. ठसठशीत संदेश, मोठ्या सवलती, भडक रंगसंगती, चमकदार पोत हे सगळं भरमसाट प्रमाणात व्हायला लागलं. प्रत्येकानंच जोरजोरात आवाज केला तर तो गोंगाट वाटायला लागतो आणि त्यातून कुणाचाही संदेश कुणालाही पोचत नाही. नेमकं हेच घडल्यामुळं मितभाषी, जेवढं आवश्‍यक आणि अनिवार्य आहे तेवढंच सांगणारं, गरजेपुरतं सुरक्षित कवच पुरवणारं पॅकेजिंग असा कल सध्या पुढं येताना दिसतो आहे. यात अनावश्‍यक आश्वासनं, विश्वास बसणार नाही एवढी विशेषणं, गरजेपेक्षा जास्त मटेरिअल आणि एकावर एक चढवलेले थर या बाबींना पार सुट्टी दिली जाते. नेमकं काय ठेवायचं आणि कशाला काट मारायची हे डिझायनर्स कसं ठरवणार?

अगदी अलीकडची गोष्ट आहे. काड्यापेट्यांचं उत्पादन करणाऱ्या एका छोट्या कंपनीला मागणी घटल्यामुळं आणि वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळं व्यावसायिक काटकसर करण्याची गरज वाटायला लागली. मुळात काड्या, गंधक, डबी यांची किंमत कमीच असते. काड्यांची लांबी आणि डबीचा आकारही योग्य तेवढाच असतो. शिवाय मजुरीही जेवढ्यास तेवढीच. मग खर्च कुठं कमी करणार?

ग्राहकाची कुठल्याही प्रकारची गैरसोय न करता एक सोपा उपाय डिझाईन टीमच्या चर्चेत पुढं आला. काड्यापेटीच्या दोन्ही बाजूंना काडी पेटवण्यासाठी जी रेड फॉस्फरसची पट्टी असते, त्यातली एक वजा केली तरीही पेटीची कार्यक्षमता कुठंही कमी होत नाही. त्या उत्पादकांनी मग हीच कल्पना अवलंबली. हे Essentialism चं किंवा मितव्ययी डिझाईनचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.‘एखाद्या गोष्टीत कोणतीही अधिक भर घालणं शक्‍य नसेल तर ती परिपूर्ण, असं म्हणता येणार नाही. याउलट त्या गोष्टीतून काहीही वजा करता येणार नाही अशी जी स्थिती असते, तिला परिपूर्ण म्हणावं’ या अर्थाची फ्रेंच म्हण आहे, ती इथं बरोबर लागू होते.

पॅकेजिंगसंदर्भात या विचारसरणीचा अवलंब केल्यास आपला ब्रॅंड इतर भपकेदार पॅक्‍समध्ये उठून दिसेल का, अशी भीती बहुतेक मोठ्या कंपन्यांना असते. त्यामुळं त्यांच्याद्वारे अशा प्रकारची पॅकेजिंग क्वचित कधीतरी लहान प्रमाणात केली जातात. मात्र, उदयोन्मुख कंपन्या असे प्रयोग करायला अतिशय उत्सुक असतात. एक तर त्यांना मार्केट शेअर नसल्यामुळं तो गमावण्याची भीती नसते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांना ग्राहकांसमोर काहीतरी नवीन सादर करण्याची तीव्र इच्छा असते.

वेगळेपणातच संधी निर्माण होऊ शकते, याची त्यांना जाणीव असते. अतिशय साधी पॅकेजिंग नीरस दिसतील हा एक मोठ्ठा गैरसमज आहे.

लहान मुलं आजारी पडल्यावर त्यांना औषध पाजणं हा अवघड कार्यक्रम असतो. शिवाय, कोणत्या छोट्या दुखण्यावर पटकन काय औषध द्यायचं हा प्रश्नही असतोच. या समस्यांमधून पालकांची सुटका व्हावी म्हणून ‘टायलिनॉल’ या जगप्रसिद्ध वेदनानिवारक औषधाच्या ब्रॅंडनं लहान मुलांसाठी अतिशय सुंदर आवरणात एक औषधांची श्रेणी प्रस्तुत केली आहे. मुलाला नेमकं काय झाल्यावर ते औषध द्यायचं हे प्रत्येक बाटलीवर स्पष्टपणे साध्या वाक्‍यात लिहिलेलं आहे. या पॅकेजिंगमुळं औषध देताना मुलांशी संवाद साधणं सोपं होऊन जाईल अशी या डिझाईनमागची भूमिका आहे, तसंच ‘न्यूट्रिलिंक्‍स’ या कंपनीनं कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी इत्यादी बाटल्यांवर नेमकी तेवढीच माहिती ठळकपणे दिली आहे. दुरून पाहिलं अथवा चष्मा न लावता पाहिलं तरी ती बाटली कशाची आहे हे निःसंदिग्धपणे कळावं अशी या डिझाईनची योजना आहे. 

‘बेसिक प्रॉडक्‍ट्‌स’ या कंपनीनं त्याही पुढं जाऊन स्वतःचं नावच साधं करून ठेवलं आहे. पॅकेजिंगही अर्थातच तेवढंच मूलभूत आणि सरळ. सगळं जंजाळ टाळून नेमका संवाद साधणारी, मितभाषी पॅकेजिंग दिसायला अतिशय मोहक बनवता येतात. ‘मौनं सर्वार्थ साधनम्‌’ असं त्यांच्या बाबतीत वेगळ्या अर्थानं नक्कीच म्हणता येईल. बाजारातल्या पुढच्या फेरीत अशी मितव्ययी-मितभाषी उदाहरणं शोधण्याचा प्रयत्न करून पाहा.

(छायाचित्रं : निर्मात्यांच्या मालकीची)

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Ashwini Deshpande writes about designs