पाच हजार एकशे सत्तावीस वेळा...! (आश्र्विनी देशपांडे)

पाच हजार एकशे सत्तावीस वेळा...! (आश्र्विनी देशपांडे)

व्यावसायिक कौशल्य असलेल्या व्यक्ती व्यावहारिक यश मिळवतीलच अशी हमी देता येत नाही. सर जेम्स डायसन यांच्याबाबत मात्र हे विधान लागू होत नाही. ‘फोर्ब्स’ मासिकाच्या  सन २०१८ च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, त्यांची वैयक्तिक मालमत्ता ५४० कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. सन १९७० मध्ये रॉयल कॉलेज ऑफ आर्टसमध्ये फर्निचर आणि इंटिरिअर डिझाइनची पदवी प्राप्त केलेल्या एका डिझायनरनं इतकं प्रचंड आर्थिक यश मिळवलं हे कौतुकास्पद आहेच; पण त्यामागचा अत्यंत जिकिरीचा प्रवास त्याहूनही कित्येक पटींनी जास्त प्रेरणादायी आहे.

कोण आहेत हे डायसन? कुठं झाली होती त्यांच्या प्रवासाची सुरवात? सन १९४७ मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेले जेम्स डायसन शाळेत असताना लांब पल्ल्याच्या पळण्याच्या स्पर्धेत नेहमी पहिला नंबर पटकवायचे. यावर मोठेपणी भाष्य करताना ते म्हणतात : ‘‘माझं पळण्यातलं वर्चस्व हे मी शारीरिकदृष्ट्या बळकट होतो म्हणून नव्हे, तर मी मनानं खंबीर होतो म्हणून राखणं मला शक्‍य झालं.’’ हाच खंबीरपणा आज एक्काहत्तराव्या वर्षीही त्यांना सोबत देतो आहे. डिझाइनचं शिक्षण सुरू असतानाच जेम्स यांना एका अतिशय वेगळ्या बोटीच्या डिझाईनवर मदतनीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून वेग, इंजिन, चाकं या गोष्टींचं आकर्षण कायम राहिलं. डिझायनर म्हणून आणि एक सामान्य वापरकर्ता म्हणून त्यांची कुठल्याही वस्तूकडून ‘त्या योग्यरीत्या चालाव्यात’ एवढीच अपेक्षा असायची. वस्तूंची ज्या कामासाठी निर्मिती झालेली आहे त्या कामासाठी त्या योग्य, सहज आणि सातत्यानं चालणाऱ्या असाव्यात ही अपेक्षा वरकरणी माफक वाटत असली तरी वापरताना कुठं ना कुठं खटकतं, कमतरता जाणवते आणि तरीही सर्वसामान्यपणे त्या उणिवाही ‘चालवून’ घेतल्या जातात; पण जेम्स यांना हे असं ‘चालवून घेणं’ मान्य नाही. 

व्हीलबॅरो म्हणजेच लहान ओझी वाहून नेण्याकरता असलेली एकचाकी ढकलगाडी चिखलात, गवतात रुतून बसते म्हणून त्या चाकाच्या जागी मोठा बॉल बसवून अगदी तरुणपणीच जेम्स यांनी नवनिर्मितीची सुरवात केली. याच बॉलबॅरोच्या फॅक्‍टरीत पेंट चेंबरमध्ये रंगाचे कण उडून सगळी यंत्रणा बुजून जायची. या समस्येवर उपाय म्हणून जेम्स यांनी हवेचा चक्रवर्ती प्रवाह होईल अशी रचना केलेला ब्लोअर तयार केला. त्यामुळे रंगाचे सूक्ष्म कण ब्लोअरच्या कोनाच्या आतल्या भिंतींवर जमायचे, जे नंतर सहजपणे पुसून टाकता यायचे. ही केवळ सुरवात होती. इंग्लंडमध्ये सन १९७० च्या सुमारास घराची साफसफाई करायला व्हॅक्‍युम क्‍लीनरचा वापर सर्रासपणे व्हायला लागला होता. शक्तिशाली मोटरद्वारे हवेबरोबर धूळ आणि कचरा शोषून तो कापडी पिशवीत जमा व्हावा अशी ती यंत्रणा होती. मात्र, धुळीचे कण अडकून त्या पिशवीची सूक्ष्म छिद्रं लवकरच बुजून जायची आणि त्यामुळे व्हॅक्‍युम क्‍लीनरची क्षमता कमी होत जायची. मग ती पिशवी वारंवार बदलावी लागायची. जेम्स यांच्या वापरात असे अकार्यक्षम व्हॅक्‍युम क्‍लीनर आले की ‘वस्तू योग्यरीत्या चालावी’ या त्यांच्या व्याख्येत ते बसत नसत. यावर उपाय म्हणून त्यांनी फॅक्‍टरीत लावलेल्या चक्रवर्ती प्रवाहाच्या ब्लोअरच्या शोधाच्या तत्त्वावर अधारित लहान आकाराचा प्रयोग करून पाहायचं ठरवलं आणि पटकन एक छोटीशी यंत्रणा बांधून पहिली. ती यंत्रणा चालू शकेल अशी खात्री होताच त्यांनी जास्त संशोधन सुरू करून सुधारित आवृत्ती तयार केली. यात कापडी पिशवीला काट मारून धूळ आणि कचरा गोळा करणारा, सहजपणे उघडून साफ करता येईल असा कप्पा होता. इंजिनिअरिंगची समज आणि गोडी असलेल्या डिझायनरनं रोजच्या आयुष्यातली समस्या नावीन्यपूर्ण पद्धतीनं सोडवली, यात विशेष आश्‍चर्य वाटू नये. मात्र, त्यापुढे तो व्हॅक्‍युम क्‍लीनर एक परिपूर्ण प्रॉडक्‍ट व्हावा यासाठी जेम्स डायसन यांनी सलग बारा वर्षं अथक्‌ परिश्रम, जिद्द आणि चिकाटीनं त्या व्हॅक्‍युम क्‍लीनरच्या तब्बल पाच हजार १२७ आवृत्त्या विकसित केल्या. कल्पना करा, पाच हजार १२६ वेळा अपयश येऊनही हार न मानता, हात-पाय न गाळता त्यांनी  पाच हजार १२७ वा  प्रोटोटाइप उमेदीनं तयार केला. शिक्षिका असलेल्या पत्नीच्या वेतनावर आणि प्रसंगी दागिने आणि इतर वस्तू विकून या प्रोटोटाईप्सचा, सुधारित आवृत्त्यांचा निधी उभा केला गेला. यात त्या दोघांचाही जेम्स यांच्या शोधावर आणि एकमेकांवर असलेला असीम विश्वासही अत्यंत कौतुकास्पद आहे. शेवटी सन १९८३ मध्ये स्वतःची निर्मिती समाधानकारक आहे, याची खात्री पटल्यावर जेम्स ते प्रॉडक्‍ट, ती टेक्‍नॉलॉजी त्या वेळच्या आघाडीच्या निर्मात्यांना विकण्यास उत्सुक होते; पण तो अपारंपरिक दिसणारा व्हॅक्‍युम क्‍लीनर स्वीकारायची तयारी आणि दूरदृष्टी कुणीही दाखवली नाही.

त्यामुळे जेम्स यांनी वेगवेगळी व्यावसायिक मॉडेल्स पडताळत शेवटी सन १९९१ मध्ये स्वतःच व्हॅक्‍युम क्‍लीनरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून आजतागायत जेम्स डायसन आणि त्यांच्या कंपनीनं मागं वळून पाहिलेलं नाही. ‘डायसन व्हॅक्‍युम क्‍लीनर’ जागतिक पातळीवर अग्रगण्य मानले जातात. डायसन प्रॉडक्‍ट्‌स स्पर्धकांच्या तुलनेत खूपच जास्त किमतीची असतात. कारण, तंत्रज्ञान आणि निर्मितिमूल्यांत ती अतिशय उच्च दर्जा राखून असतात. ‘स्वस्त आणि मस्त’ हे गणित जेम्स डायसन यांच्या तत्त्वात बसत नाही. शोधावर आणि नवनिर्मितीवर सगळा भर आणि मोठं बजेट खर्च करणारी डायसन यांची कंपनी, चांगल्या डिझाइन केलेल्या उपकरणांना जास्त किंमत मोजायची ग्राहकाची तयारी असते, हेच सिद्ध करते. 

केवळ एका प्रॉडक्‍टवर न थांबता चक्रवर्ती प्रवाहाच्या शोधावर आधारित हॅंड ड्रायर, ब्लेडरहित टेबल फॅन, हेअर ड्रायर अशी उपकरणं डायसन कंपनीनं विकसित केली आहेत. प्रचलित उपकरणांना आवाहन देणारी, थक्क करून टाकेल अशा नव्या टेक्‍नॉलॉजीचा आधार घेणारी ही उपकरणं जगभर लोकप्रिय झालेली आहेत. इतकंच नव्हे तर, सर जेम्स डायसन यांनी सन २०२० मध्ये इलेक्‍ट्रिक कार सादर करण्याची घोषणाही केलेली आहे. त्यांच्याइतकी जिद्द आणि चिकाटी असलेला डिझायनरच काय; पण कोणताही व्यावसायिक यशस्वी झाला तर नवल नाही.

(छायाचित्रे : निर्मात्याच्या मालकीची)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com