हसरा गालिचा (आश्विनी देशपांडे)

हसरा गालिचा (आश्विनी देशपांडे)

डिझाइनच्या माध्यमातून काही अनिष्ट सवयी बदलता येऊ शकतात का, या मुद्द्यावर गेल्या वेळच्या लेखातून चर्चा सुरू केली होती. त्यानुसार रोजच्या जीवनातल्या ‘अंगवळणी’ पडलेल्या सवयींची बरीच मोठी यादी वाचकांच्या मदतीनं तयार झाली. दैनंदिन जगण्यातल्या छोट्या-मोठ्या सवयी बदलण्याला हातभार लावण्याबरोबरच काही गंभीर समस्यांविषयीही - उदाहरणार्थ ः बालमजुरी, कुपोषण- डिझाइनद्वारे काही जनजागृती करता येऊ शकते, असा विचार संधी मिळेल तेव्हा ‘डिझाइन टीम’कडून केला जातो. त्याविषयी...

‘तुम्हाला समाजातल्या कोणत्या सवयी बदलायला आवडेल,’ असा प्रश्‍न गेल्या लेखाद्वारे विचारून मी वाचकांना एक आवाहन केलं होतं. या आवाहनाला वाचकांनी उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला. दिवे आणि नळ उगाचच सुरू ठेवणं, रहदारीचे नियम न पाळणं, वाट्टेल तिथं कचरा टाकणं, जोरजोरात हॉर्न वाजवणं, रांगा मोडणं, प्रत्येक ठिकाणी उशिरा पोचणं, हाताखाली काम करणाऱ्या मदतनिसांवर ऊठसूट आरडाओरडा करणं, मुलांना मार देणं अशा कित्येक सवयी ‘डिझाइन’च्या मदतीनं बदलता येतील का, अशा प्रकारची चर्चा त्यानिमित्तानं सुरू झाली आहे.
लहान मुलांशी कशा प्रकारची वागणूक असावी आणि याबाबतचा एकूणच दृष्टिकोन, हा बराच मोठा विषय आहे. डिझाइन- प्रक्रियेमध्ये जेव्हा लहान मुलांसाठी कल्पनाशक्ती वापरली जाते, तेव्हा त्यांची आकलनशक्ती, वाढतं मन आणि चण, आवड-निवड, जिज्ञासू प्रवृत्ती, क्षमता या सगळ्याच मुद्द्यांचा विचार केला जातो.
खास मुलांसाठी तयार केलेली खेळणी, पुस्तकं, मोबाईल गेम, फर्निचर, दप्तरं, डबे, पाण्याच्या बाटल्या, टूथब्रश अशा कित्येक गोष्टी खूप काळजीपूर्वक विचार करून डिझाइन केल्या जातात; पण या सगळ्या वस्तू समाजातल्या एका विशिष्ट गटापर्यंतच पोचू शकतात.

दुर्दैवानं आजही लाखो लहान मुलं पौष्टिक अन्न आणि प्राथमिक शिक्षण यांच्यापासून वंचित आहेत. इतकंच नव्हे, तर कित्येकांना अगदी लहान वयापासून काबाडकष्ट करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावावा लागतो.
बालमजुरी हे एक अतिशय दुर्दैवी असं घटनाचक्र आहे. अगदी लहान वयात मजुरी केल्यामुळं त्यांचं ना व्यवस्थित पोषण होतं ना शिक्षण. परिणामी, त्यांची शारीरिक किंवा मानसिक वाढ नीट होत नाही आणि त्यांची पुढची पिढीही याच चक्रात अडकते.
सन १९९० च्या दशकात या समस्येबद्दल चर्चा किंवा संवेदनशीलता अगदीच कमी होती. या काळात भारताची निर्यातक्षमताही सध्याच्या एवढी व्यापक नव्हती. तेव्हा चालून आलेली एक संधी आणि डिझाइनच्या जोडीनं घडून आलेला मोठा बदल याची ही गोष्ट.

एखाद्या कंपनीचा लोगो (चिन्ह) काय काम करू शकतो किंवा विचारपूर्वक करण्यासारखं त्यात काय असतं, असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. त्याचंही उत्तर या गोष्टीत थोड्याफार प्रमाणात पुढं येईल.
१९९२-९३ मध्ये काही जागतिक पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, बहुराष्ट्रीय निर्यातसंवर्धक संस्था आणि UNICEF यांची नजर गालिचे विणणाऱ्या बालमजुरांकडं गेली होती. केवळ भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये तब्बल तीन लाख ते पाच लाख बालमजूर या व्यवसायात अडकवले गेले असावेत, असा त्यांचा अंदाज होता. या संस्था आणि सकारात्मक, प्रगत विचार जोपासणारे जर्मनीतले काही सरकारी घटक यांच्या पुढाकारानं गालिच्यांच्या व्यवसायातली बालमजुरी थोपवण्यासाठी १९९४ मध्ये एक संस्था सुरू करण्यात आली.

बालमजुरांना गालिचे विणण्यापासून मुक्त कसं करता येईल, हा केवळ डिझाइनच्या पलीकडचा विषय होता. या संस्थेला मदत करण्याची संधी योगायोगानं आमच्या टीमला मिळाली. या मुलांचे पालक कोणता विचार करून त्यांना या व्यवसायात आणतात, या मजुरीविना ही मुलं नेमकं काय करतील, त्यांना शिक्षण देण्यासाठी पुरेशा सुविधा आहेत का, मोठे निर्यातदार या बदलाला तयार व्हावेत म्हणून कशा प्रकारचं प्रोत्साहन त्यांना द्यावं किंवा कोणतं आमिष त्यांच्यापुढं ठेवावं, आयात करणाऱ्या संस्था अशा प्रकारच्या संकल्पनेला कसा पाठिंबा देतील अशा अनेक प्रश्नांवर डिझाइन टीमनं ऊहापोह केला. प्रश्नांची उत्तरं या सगळ्या घटकांच्या मदतीनं शोधली गेली. एक लक्षणीय प्रस्ताव असाही होता, की एक ‘संबोधचिन्ह’ तयार करण्यात यावं. बालमजुरीचा वापर न करता तयार केलेल्या गालिच्यांना प्रमाणपत्र म्हणून किंवा प्रशस्तिपत्र म्हणून हे चिन्ह वापरता यावं. या चिन्हात त्या मुक्त झालेल्या मुलांचं बालपण असावं आणि चांगल्या पद्धती आत्मसात करून तयार झालेला गालिचाही असावा.

तेव्हा जन्म झाला ‘रगमार्क’चा. सन १९९५ मध्ये ‘रगमार्क’ प्राप्त झालेला पहिला गालिचा जर्मनीला निर्यात करण्यात आला. बालमजुरीनिर्मूलनाच्या चळवळीतला हा एक अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा होता.
सन २०१४ मध्ये नोबेल शांतता पुरस्कार ज्यांना मिळाला, ते कैलाश सत्यार्थी यांचा या चळवळीत पुढाकार होता. आज ही चळवळ अनेक देशांत पसरली असून, नंतर तिचंच रूपांतर ‘गुडवीव्ह’ या संस्थेत झालेलं आढळतं. आजही ‘रगमार्क फाउंडेशन’ या संस्थेचं काम सुरू आहे आणि ‘रगमार्क’चा ‘हसरा गालिचा’ कित्येक देशांत उडतो आहे!
***

बालमजुरीपाठोपाठची दुसरी मोठी समस्या म्हणजे कुपोषण. एका सर्वेक्षणानुसार भारतातलं प्रत्येक चौथं मूल हे कुपोषित असतं. कित्येक व्यावसायिक खाद्यपदार्थांच्या ब्रॅंड / पॅकेजिंगवर काम करतानाच कधीतरी अशा समस्यांवरही उपाय सुचवावेत, असं वाटणं साहजिकच. अशीच एक संधी Nutrition Foundation च्या निमित्तानं मिळाली. नेमका काय बदल घडावा, तो कुणी घडवून आणावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कुणासाठी फायदेशीर किंवा परिणामकारक व्हावा, हा सगळा विचार करण्यात डिझाइन टीमनं मोठा वाटा उचलला.

Right 2 Nutrition म्हणजेच ‘प्रत्येक बालकाला पोषणहक्क मिळावा,’ असा उद्देश ठेवून हे बोधचिन्ह आणि संपूर्ण उपक्रम तयार केला गेला. या कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिला आणि लहान मुलं यांच्यासाठी ‘ब्रिटानिया’तर्फे खास पौष्टिक बिस्किटं तयार करून ती कर्नाटक राज्यातल्या कुपोषित गटांमध्ये नियमित प्रमाणात उपलब्ध केली गेली. त्याचे चांगले परिणाम आढळून आले. त्यापासून इतर राज्यांसाठी एक मॉडेल तयार झालं.
काही कठीण, व्यापक समस्यांवर बोधचिन्हापासून सुरवात करून संपूर्ण कार्यक्रम योजण्यात डिझाइनचा असाही हातभार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com