‘नावे’त सर्व काही...! (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे ashwini@elephantdesign.com
रविवार, 19 मार्च 2017

‘पेपरबोट’ हा शीतपेयाचा ब्रॅंड मुळातच साधा, निरागस आणि निखळ आनंद वाटण्याच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारा आहे. साहजिकच डिझाइन करताना त्यासाठीचे रंगही अगदी काळजीपूर्वक निवडले गेले. कुठलेही कृत्रिम स्वाद, रंग किंवा चव न घालता तयार केलेली ही पेयं कृत्रिम किंवा अवास्तव दिसू नयेत, असाच आमचा प्रयत्न राहिला. केवळ तीन वर्षांतच या ब्रॅंडची गणना राष्ट्रीय पातळीवरच्या लाडक्‍या ब्रॅंडमध्ये होऊ लागली आहे.

‘पेपरबोट’ हा शीतपेयाचा ब्रॅंड मुळातच साधा, निरागस आणि निखळ आनंद वाटण्याच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारा आहे. साहजिकच डिझाइन करताना त्यासाठीचे रंगही अगदी काळजीपूर्वक निवडले गेले. कुठलेही कृत्रिम स्वाद, रंग किंवा चव न घालता तयार केलेली ही पेयं कृत्रिम किंवा अवास्तव दिसू नयेत, असाच आमचा प्रयत्न राहिला. केवळ तीन वर्षांतच या ब्रॅंडची गणना राष्ट्रीय पातळीवरच्या लाडक्‍या ब्रॅंडमध्ये होऊ लागली आहे.

लहान मुलांचं बालपण बालमजुरीमुळं हिरावलं जाऊ नये, यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘रगमार्क’ या ब्रॅंडबद्दलची माहिती गेल्या वेळच्या लेखात तुम्हाला मिळाली.
बालपण हा शब्द वाचून मन जरा भूतकाळाच्या आठवणींकडं गेलं, तर ते स्वच्छंद, निरागस दिवस डोळ्यांसमोर उभे राहतात. छोट्या छोट्या गोष्टींत केवढा आनंद, केवढी मजा असायची त्या वयात. मित्र-मैत्रिणींबरोबरचे खेळ, शाळेतल्या खोड्या, रम्य परिकथा, दिवस दिवस घराबाहेर केलेल्या उनाडक्‍या, उन्हाळ्यात घरातच बसून खेळलेले पत्ते, कॅरम, सापशिडी... आणि मग चवीनं प्यायलेलं थंडगार पन्हं, आजी किंवा आईनं बनवलेलं कोकम सरबत किंवा कैरीचं पन्हं. दाट केशरी आमरस ही तर उन्हाळ्यातली खास मेजवानीच असायची. या आमिषांपुढं वार्षिक परीक्षासुद्धा सोपी वाटायची आणि सुरळीत पार पडायची.
बालपणचे ते जादूई दिवस आठवून कुठं गेली ती साधी-सरळ मजा, तो निर्मळ, निखळ आनंद, असं वाटतंय ना?
लहान मुलांचं बालपण जोपासलं जावं हे तर खरंच; पण मोठं झाल्यावरही कधीतरी त्या दिवसांत परत जाऊन लहान होता आलं पाहिजे, असं नाही वाटत?

तीन-चार वर्षांपूर्वी अशा प्रकारची एक संधी आमच्याकडं चालून आली. वेगवेगळी पारंपरिक पेयं तयार करून विकावीत, अशी कल्पना एका स्टार्टअप कंपनीला त्या वेळी सुचली होती. नुसतीच पेयं कशी बनवावीत, एवढाच विचार त्या कंपनीनं केलेला नव्हता, तर मेंदूत उपस्थित असलेले आवाज, रंग, पोत, चव आणि वास या सगळ्याच संवेदनांना आकर्षित करायचं असेल, तर कशा पद्धतीनं संवाद साधावा, याचाही विचार त्यांच्याकडं होता. खाद्यपदार्थ आणि पेयं ही संस्कृतीशी घट्टपणे बांधलेली असतात. अगदी लहानपणी ज्या चवींशी आपली ओळख होते, त्या चवींचा अमिट ठसा आपल्या मनावर असतो. मग तशीच चव किंवा त्या चवीची नुसती आठवण जरी आली, तरी मनात एक सुखद, सकारात्मक लहर पसरते. या पेयांचा ब्रॅंड आणि पॅकेजिंग तयार करताना हे सगळं आम्ही आत्मसात करून मगच कल्पनाशक्ती लढवावी, असं अगदी आगळंवेगळं ब्रीफ आमच्या टीमला मिळालं होतं.

शंभर प्रकारची ब्रीफ स्वीकारण्याची सवय असली, तरी व्यावसायिकतेचं भान, स्पर्धकांशी तुलना, शेल्फवरती ठसठशीत दिसण्याचा हट्ट हे मुद्दे प्रत्येक वेळी महत्त्वाचे असतात. मात्र, ही स्टार्टअप टीम फारच वेगळी होती. त्यांची उत्पादनं आणि विचार करण्याची खोली एका वेगळ्याच पातळीवरची होती.

आपण नवीन काहीतरी करतो आहोत, असा त्यांना विश्वास होता आणि आपल्याला अशा जागी पोचायचं आहे, की जिथं स्पर्धेला वावच नसेल, असंही त्यांना वाटत होतं.  
कुठलाही ब्रॅंड उभा करायचा, तर आधी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करावा लागतो. तिथपासूनच सुरवात झाली. हा ब्रॅंड ‘बालपणातली निरागसता आणि कुठल्याही प्रकारची देवाण-घेवाण न होता वाटला गेलेला निखळ आनंद’ या मुद्द्यांवर उभा करायचा, असं साहजिकच ठरलं. पुढचा टप्पा म्हणजे नाव. जेव्हा कोका कोला, किटकॅट किंवा ओरिओ यांसारखे उच्चरायला मजेशीर; पण अर्थ नसलेले ब्रॅंड समोर येतात, तेव्हा एक विचार असाही असतो, की पुढं वेगवेगळे अर्थ भरायचे ठरले, तर नावाची अडचण होणार नाही. मात्र, आमच्या टीमला ‘नाव’ हीच एक गोष्ट सांगायची मोठी संधी वाटत होती. फारशी जाहिरात होण्याची शक्‍यता छोट्या बजेटमुळं नव्हती. तेव्हा नाव आणि पॅकेजिंग डिझाइनवरच वेगळेपणा दाखवून संपूर्ण ब्रॅंडची गोष्ट सांगण्याची मोठी जबाबदारी होती.

बालपणीच्या आठवणींवरच हा ब्रॅंड उभा करायचा होता. विचार करता करता कवी-गझलकार सुदर्शन ‘फाकिर’ यांची जगजितसिंग यांनी गायलेली एक सुंदर गझल आठवली ः ‘वो कागज की कश्‍ती, वो बारिश का पानी...’ बस. हाच धागा घेऊन ‘पेपरबोट’ हे नाव आम्ही सुचवलं. लहानपणी घराशेजारच्या पावसाच्या डबक्‍यात कागदी नावा सोडल्याची आठवण बाळगून नसलेली व्यक्ती अगदी विरळाच. प्रत्येकाची बोट वेगळी असेल, कुणाची रंगीत कागदाची, तर कुणाची वर्तमानपत्राच्या कागदाची बनवलेली... कुणाच्या घराशेजारी ओढा असेल, तर कुणाच्या डबकं... कुणाबरोबर एक खास मैत्रीण असेल, तर कुणाबरोबर मोठ्ठी गॅंग... पण एकतरी नाव आठवणींत असतंच. त्या वेळी ‘हीच नाव आपल्याला साता समुद्रांपलीकडच्या स्वप्नातल्या गावाला घेऊन गेली असेल आणि त्याच सुखद आठवणींसोबतची चव पेपरबोट drinks & memories आता घेऊन येणार,’ अशी कल्पना होती. ब्रॅंडच्या पुढच्या टप्प्यात ही पेयं नेमकी कशी सादर होणार, हा विचार सुरू झाला. पॅकेजिंगचा आकार कसा असावा, बाटली की बॉक्‍स, की वेगळंच काही?

तेव्हा आठवलं की लहानपणी आंबा चोखून खायची जी मजा होती, ती या पॅकमध्ये देता आली तर...? डॉय पाऊच म्हणजे शेल्फवर उभा राहील असा आणि सहजपणे छोटंसं झाकण उघडून चोखता येईल असा पाऊच डिझाइन केला गेला. याचा आकार तो हातात धरायला अगदी सोपा होईल असा आणि त्याची कॅप जणू छोटीशी नावच असेल अशी... तीही सहज उघडता येईल अशा आकाराची डिझाइन केली गेली.

पॅकेजिंग ही ब्रॅंडची पहिलीवहिली ओळख असते. पहिली छाप महत्त्वाची असते. त्यामुळं रंग, रूप, संवाद याबरोबरच पॅकेजिंगचा आकार खूपच परिणामकारक समजला जातो. तो नुसता आकर्षक असणं पुरेसं नाही, तर तो हाताच्या बांधणीनुसार, वजन उचलण्याच्या पद्धतीनुसार, बोटांनी झाकण उघडण्याच्या सोईनुसार डिझाइन करणं आवश्‍यक असतं. पेपरबोटच्या डॉय पाऊचनं या सगळ्या कसोट्या उत्तमरीत्या पार पाडल्या आणि त्यांनी केवळ दोन-तीन वर्षांत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या प्रॉडक्‍ट डिझाइनला ‘इंडिया डिझाइन मार्क’तर्फे नावीन्यपूर्णतेची पावतीही मिळाली आहे. आकारानंतर डिझाइनचा पुढचा टप्पा म्हणजे रंग, रूप, ब्रॅंड-लोगो. नावातच ‘पेपर’ असल्यामुळं हे पॅकेजिंग जणू कागदाचं बनलं आहे, असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. छोटीशी रंगीत होडी ब्रॅंडचा एक भागच बनून गेली. फळांचे किंवा बाकी घटकांचे फोटो दाखवण्याऐवजी अगदी साधी-सोपी, हातानं काढता येतील अशी चित्रं वापरण्याचा निर्णय डिझाइन टीमनं घेतला. कारण हा ब्रॅंड मुळातच साधा, निरागस आणि निखळ आनंद वाटण्याच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारा आहे. रंगही अगदी काळजीपूर्वक निवडले गेले. कुठलेही कृत्रिम स्वाद, रंग किंवा चव न घालता तयार केलेली ही पेयं कृत्रिम किंवा अवास्तव दिसू नयेत, हाच प्रयत्न राहिला. अशा तऱ्हेनं पपेरबोट तरंगायला, एवढंच नव्हे तर डौलात, दिमाखात प्रवासाला निघाली.

अजून दोन उदाहरणं म्हणजे, डिलिव्हरी व्हॅन आणि छोट्या; पण खचाखच भरलेल्या किराणा मालाच्या दुकानांमधलं चमकदार आणि मजेशीर अस्तित्व. व्हॅन डिझाइन करताना डिझाइन टीम पुन्हा एकदा लहानपणच्या आठवणींत बुडाली. कुल्फी आणि रंगीबेरंगी बर्फाचे गोळे विकणारी गाडी आणि ती आल्याची वार्ता देणारी टणटण वाजणारी घंटा... त्या गाडीवरच्या रंगीत बाटल्या... या सगळ्यांना पुन्हा एकदा सजीव करून ही व्हॅन बनवण्यात आली. तसंच छोट्या आणि गजबजलेल्या दुकानांमध्ये पेपरबोटचं अस्तित्व उठून दिसावं म्हणून झाडावर लटकलेली फळं डोळ्यांसमोर ठेवून एक मजेशीर ‘टांगणी डिझाइन’ करण्यात आलं. त्यातून पॅक बाहेर काढणं म्हणजे जणू फळ तोडल्याचाच भास व्हावा, अशी ही योजना आहे.

केवळ तीन वर्षांत ‘पेपरबोट’ची गणना राष्ट्रीय पातळीवरच्या लाडक्‍या ब्रॅंडमध्ये होऊ लागली आहे. अर्थात, पुढचा प्रवासही खूप मोठा आहे; पण या पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ ब्रॅंडला डिझाइनची खूप मोठी आणि महत्त्वाची साथ आहे. केवळ पॅकेजिंगमध्येच नव्हे, तर इतरही क्षेत्रांत!

Web Title: ashwini deshpande's article in saptarang