गतकालीन लोकसंस्कृतीचं स्मरणरंजन (अश्‍विनी धोंगडे)

book review
book review

ग्रामीण जीवनावर लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये प्रा. व. बा. बोधे हे एक महत्त्वाचं नाव. "लोकसंस्कृतीचे अंतरंग' या त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये आता विलोप पावू लागलेल्या ग्रामीण संस्कृतीचं भावस्पर्शी स्मरणरंजन त्यांनी चित्रित केलं आहे. उभा जन्मच खेड्यात घालवलेल्या त्यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला एक निरागस, निर्भेळ संस्कृती लयाला गेली आणि त्याच्या जागी संकुचित मनाची, आत्मकेंद्री चंगळवादी संस्कृती जन्माला आली याचं मनस्वी दु:ख होतं. आजच्या पिढीला माहीत नसलेल्या या संपन्न संस्कृतीच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत ते हा सामाजिक दस्तऐवज जिवंत ठेवण्याच्या पोटतिडिकेनं हे लेखन करताना दिसतात. प्रा. बोधे इतक्‍या तपशीलवार चित्रमय शैलीत ग्रामीण जीवनाचं सारसर्वस्व आपल्यापुढे उभं करतात, की या जीवनाचे आपण काळाचं भान विसरून प्रत्यक्ष साक्षीदार होतो. लोकजीवनाबद्दलची इतकी आत्मीयता आणि प्रेम वाटल्याशिवाय असं लेखन करता येणं शक्‍य नाही.

कुटुंबजीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे आई. आपल्या आईची व्यक्तिरेखा त्यांच्या अनेक लेखांमधून वेगळ्या आयामातून आकार घेत राहते. कधी शाळेचं तोंडही न पाहिलेली आई 24 तास कशी प्रतिमांच्या भाषेत बोलायची, याची अतिशय सुंदर उदाहरणं लेखकानं दिली आहेत. ग्रामीण भाषेतला ठसका आणि रोखठोकपणा आईच्या प्रत्येक बोलण्यात असायचा, तसंच शब्दसौंदर्यही. एका तरुण मुलीला पाहून आई म्हणाली : ""काय गोड हाय. गोरीगोरीपान. दुधातनं वैरून काढल्यावाणी. हासली मंजी मोतीचुऱ्याचं कणीस वाऱ्यावर हेंदकळल्यागत वाटतंय.'' प्रा. बोधे यांच्या लेखनामध्ये असलेला कवितेचा लहेजा ही त्यांना आईकडून मिळालेली देणगी असावी. सहकार हा जुन्या शेतीसंस्कृतीतला कळीचा शब्द होता. शेतात नांगरणी सुरू झाली, की एक बैलवाले शेतकरी इर्जिकीनं रानं नांगरायचं. साताठ शेतकरी एकत्र एकेकाकडं रान नांगरायचे. ज्याचं रान नांगरायचं, त्यानं चहापाण्याची, दुपारच्या जेवणाची, रात्रीच्या मटणाची सोय करायची. आंब्याच्या सावलीखाली रंगणारी ही अंगतपंगत एका अवीट गोडीची असायची. त्या माहौलाची चव चाखलेल्या लेखकाला भावकीतल्या भावकीत संबंध न ठेवणाऱ्या, कुणाला वानवळा न पाठवणाऱ्या, दारातल्या भिकाऱ्यावर कुत्रं सोडणाऱ्या, फुकट फौजदारी करत फिरणाऱ्या आजच्या संस्कृतीची विलक्षण चीड येते. "खेड्यातल्या बायका अशिक्षित होत्या; पण त्यांना कलेची विलक्षण जाण होती. हाती पैसा नव्हता, पण माणसामाणसांत आपुलकी होती. गांजलेल्यांच्या मदतीला धावणारी माणसे होती. घरात आल्यागेल्यांना खाऊ घालणाऱ्या म्हाताऱ्या होत्या. आता गॅस आला, डायनिंग टेबल, स्टीलची ताटं, चपात्या गरम ठेवणारी भांडी आली, पण टीव्ही बघत जेवण्यात जेवणातलं काव्यच हरवलं, संवाद संपला. मुलं आई-बापांशी बोलतच नाहीत. मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतात,' लेखकाचं हे निरीक्षण अगदी वर्मावर बरोबर बोट ठेवणारं आहे.

गरिबी आणि अज्ञानात असणारा आनंद लेखकाला मोह पाडतो. लेखकाला वाटतं, जीवनाशी झगडतानाही आनंदी वृत्ती शाबूत ठेवणारी ती माणसं होती. मिळेल त्या अन्नात सुख मानणारी ती माणसं होती. त्यांची सांस्कृतिक भूक जबर होती, असं ते सांगतात. भाषा हे संस्कृतीचं महत्त्वाचं अंग आहे आणि याची पूर्ण जाणीव बोधे यांना आहे. त्यामुळे ग्रामीण बोलीवर त्यांनी एक पूर्ण प्रकरण लिहिलं आहे. ग्रामीण भाषेतले शब्द, वाक्‌प्रचार, म्हणी, गाणी, हुमाण (कोडी) या शब्दधनांतून दिसणारं लोकसंस्कृतीचं धन त्यांनी पुरेपूर विशद केलं आहे. पुस्तकाच्या पानापानात ग्रामीण भाषेतल्या अनेक शब्दांची रेलचेल आहे. आजच्या पिढीचे वाचक त्यांच्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ आहेत. ती संस्कृती गेली, त्याबरोबर ते शब्दही विस्मृतीत गेले आहेत.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या गतजीवनाबद्दल रम्य स्मृती असतात. मग ते जीवन कितीही दु:खमय, कष्टाचं, हालअपेष्टांचं असो. गतकाळाशी जुळलेली नाळ तोडणं अवघड असतं. याच प्रचंड ओढीतून खेड्यांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशातली सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची ग्रामीण संस्कृती कालौघाबरोबर संपून गेली. नव्या काळाबरोबर नव्या संस्कृतीचा उदय झाला. प्रत्येक संस्कृतीतच काही गोष्टी चांगल्या, काही वाईट असतात. जे लोक जुन्या काळात जगले, त्यांना जुना काळ सोनेरी वाटतो आणि या संस्कृतीतल्या काळ्या प्रवृत्तींकडे आणि अभावग्रस्ततेकडे त्यांचं साहजिकच दुर्लक्ष होतं. प्रा. बोधे हेसुद्धा गतग्रामीण संस्कृतीच्या इतके प्रेमात आहेत, की त्यांना सतत हल्लीच्या संस्कृतीशी त्याची तुलना करावीशी वाटते, हे साहजिक आहे; पण त्याचा अतिरेक टाळायला हवा. काही वेळा ते आजच्या सुनांवर, मुलांवर झोंबणारी टीका करतात. लेखकानं ते टाळायला हवं, कारण ही पिढी तरी मागच्या पिढीनंच घडवली आहे. मग ती तशी निपजण्यात आपणही वाटेकरी आहोत हे समजून घ्यायला हवं. शिवाय काळ बदलतो, तसे चांगले-वाईट बदल होतातच. कालच्या लोकसंस्कृतीचा जागर करताना आजच्या संस्कृतीतल्या चांगल्याचं भान ठेवायला हवं, असं वाटतं. ही काही आक्षेपार्ह मतं सोडली, तर लोकसंस्कृतीचं अंतरंग हळुवारपणे उलगडून दाखवणारं हे पुस्तक संस्कृतीच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरावा इतकं लक्षणीय आहे.

पुस्तकाचं नाव : लोकसंस्कृतीचे अंतरंग
लेखक : प्रा. व. बा. बोधे
प्रकाशक : अक्षरबंध प्रकाशन, नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे (9822808025)
पृष्ठं : 144/ मूल्य : 200 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com