अथर्ववेदाचं वेगळेपण...

अथर्वसंहिताकालाबाबत आता काही पुरावे मात्र असे सापडतात की, त्यांवरून अथर्ववेदसंहिता ही ऋग्वेदसंहितेच्या नंतरची आहे हे निर्विवादपणे सिद्ध होतं.
Atharvaveda Overview Significance Hindu Literature
Atharvaveda Overview Significance Hindu Literaturesakal
Summary

अथर्वसंहिताकालाबाबत आता काही पुरावे मात्र असे सापडतात की, त्यांवरून अथर्ववेदसंहिता ही ऋग्वेदसंहितेच्या नंतरची आहे हे निर्विवादपणे सिद्ध होतं.

- श्रीकृष्ण पुराणिक

अथर्वसंहिताकालाबाबत आता काही पुरावे मात्र असे सापडतात की, त्यांवरून अथर्ववेदसंहिता ही ऋग्वेदसंहितेच्या नंतरची आहे हे निर्विवादपणे सिद्ध होतं. असा पहिला पुरावा म्हणजे, ऋग्वेदातील व अथर्ववेदातील भौगोलिक ज्ञान व संस्कृती यांच्याकडे लक्ष दिलं असता अथर्ववेदसंहितेचा काळ ऋग्वेदकाळाच्या नंतरचा आहे असं दिसून येतं.

अथर्ववेदातील सूक्तांची भाषा व वृत्ते ही मुख्यतः ऋग्वेदसंहितेप्रमाणेच आहेत. तथापि, अथर्ववेदात काही रूपे निःसंशय ऋग्वेदकाळाच्या नंतरची आहेत, तसंच यांतील भाषेत लोकभाषेतील शब्द व प्रयोग ऋग्वेदापेक्षा अधिक आढळतात व याखेरीज या वेदात ऋग्वेदाप्रमाणे वृत्ताकडे बारकाईनं लक्ष पुरवण्यात आलेलं दिसत नाही.

संपूर्ण पंधरावं कांड व सोळाव्या कांडाचा बहुतेक भाग गद्यात्मक आहे, हे पूर्वी सांगितलंच आहे. याशिवाय, इतर कांडांमधूनही मधून मधून गद्य भाग आलेला आहे. पुष्कळ ठिकाणी तर अमुक एक भाग हा रचना नीट न साधलेलं पद्य आहे की उत्तम गद्य आहे, याचा निर्णय करणं कठीण होतं.

कधी कधी असंही दिसून येतं की, मुळातील वृत्त निर्दोष असून त्याचा प्रक्षेप किंवा विक्षेप यामुळे भंग झालेला आहे. काही काही ठिकाणी भाषा व वृत्त यांवरून ते भाग अलीकडचे आहेत हे थोडंफार ओळखता येतं. तथापि, भाषा व वृत्त यांवरून सूक्तांच्या कालाबद्दल निश्चित सिद्धान्त बांधता येत नाही व त्यामुळे अर्थातच संहितेचाही कालनिर्णय करता येत नाही.

ऋग्वेदसूक्ते व अथर्ववेदमंत्र यांत जो फरक अथर्ववेदांतील भाषावैचित्र्य व वृत्तस्वातंत्र्य यामुळे पडलेला आहे, तो फरक या दोहोंतील कालभेदामुळे आहे की याज्ञिक व सामान्य लोकांच्या प्रबंधांत साहजिक पडणारं अंतर याच्या मुळाशी आहे, हा मोठा वादाचा प्रश्न आहे.

त्या वेळी आर्य लोकांनीं आग्नेयेकडे पुढं सरकत सरकत गंगा नदीकाठचा प्रदेश व्यापला होता. दलदलीच्या अरण्यांतून राहणाऱ्या वाघाचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही; पण अथर्ववेदात त्याचं वर्णन आढळतं. तो हिंस्र पशूंमध्यें सर्वात बलाढ्य व भयप्रद आहे व राज्यभिषेकाच्या वेळी अतुल राजबलदर्शक चिन्ह म्हणून राजाच्या पायांखाली व्याघ्रचर्म अंथरतात व राजा त्यावर पदन्यास करतो, असं हे वर्णन आहे.

अथर्ववेदकाली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण होते; इतकंच नव्हे तर, ब्राह्मणांना त्यात उच्च स्थानी बसवण्यात आलं आहे व त्यांना ‘भूदेव’ असं म्हटलेलं आहे. अथर्ववेदाच्या अभिचारऋचांतील विषयांकडे पाहिलं असता त्या फार प्राचीन असून सामान्यजनांत प्रचलित होत्या असं स्पष्ट दिसतं.

मात्र, अथर्ववेदसंहितेतच त्यांना ब्राह्मणी स्वरूप प्राप्त झालेलं आहे. इतर देशांतील लोकांना ज्याप्रमाणे आपले अभिचारमंत्र, मोहिनीमंत्र वगैरेंचा निर्माता कोण हे माहीत नसतं; परंतु ते मंत्र सामान्यतः सर्व लोकांच्या प्रचारात असतात, त्याप्रमाणेच अथर्ववेदातीलही होते; परंतु या वेदाच्या संहिताकालातच ते बरेचसे सामान्यजनांच्या कक्षेबाहेर गेले होते.

हा संग्रह ब्राह्मणांनी केला असून पुष्कळशी सूक्तेही ब्राह्मणांनीच रचलेली आहेत, असं वाचकांना पदोपदी दिसून येतं. विशेषणं व उपमा देण्याच्या कामी तर वारंवार अथर्ववेदसूक्तांच्या संग्रहकारांची व थोड्याबहुत प्रमाणात लेखकांची ही ‘ब्राह्मणी दृष्टी’ चांगलीच दिसून येते.

उदाहरणार्थ : क्षेत्रकृमींविरुद्ध जो मंत्र आहे त्यांत संस्कारानं शुद्ध न केलेल्या अन्नाला ज्याप्रमाणे ब्राह्मण शिवत नाही, त्याप्रमाणे क्षेत्रकृमींनी क्षेत्रांतील धान्यास स्पर्श करू नये असं म्हटलेलं आहे. ब्राह्मणांना जेवू घालणं, यज्ञांत त्यांना दक्षिणा देणं वगैरे ब्राह्मणांच्या हिताच्या गोष्टी असलेला असा जो एक सूक्तांचा भाग अथर्ववेदात आहे, तो ब्राह्मणांनीच रचला असला पाहिजे यांत संशय नाही.

जसं जुन्या अभिचारमंत्रांना ब्राह्मणी स्वरूप प्राप्त होणं हे नंतरच्या कालाचं दर्शक आहे, तसं अथर्ववेदात वैदिक देवतांच्या कृतीचं जे वर्णन आहे त्यावरूनही ही संहिता ऋग्वेदसंहितेनंतर तयार झाली हे स्पष्ट होतं. अग्नी, इंद्र वगैरे ऋग्वेदांतील देवता अथर्ववेदातही दिसून येतात; पण त्यांचं वैशिष्ट्य नष्ट झालं असून त्या सर्व इथं

जवळजवळ सारख्याच दिसतात. निसर्गातील शक्ती या नात्यानं मूळ जे त्यांना महत्त्व होतं, ते पुष्कळ अंशी नष्ट होऊन अथर्ववेदातील मंत्र राक्षसांचं निरसन व नाश यासाठीच असल्याकारणानं, या कामासाठी मात्र देवतांना आवाहन करण्यात येतं. म्हणजे, अथर्ववेदात देवता या निवळ राक्षससंहारक बनल्या आहेत.

सरतेशेवटी, अथर्ववेदातील देवविषयक व जगदुत्पत्तीविषयक कल्पनांवरूनही त्यातील मंत्र हे ऋग्वेदानंतरचे आहेत हे सिद्ध होतं. या वेदात तत्त्वज्ञानपरिभाषेचा चांगलाच विकास झालेला आहे व ईश्वर सर्वव्यापी आहे या कल्पनेचं जे परिणत स्वरूप उपनिषदांमध्ये आढळतं तेच जवळजवळ इथंही आढळतं.

तत्त्वज्ञानविषयक सूक्तेसुद्धा अभिचारमंत्र म्हणून उपयोगात आणण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ : तत्त्वविद्येतील ‘असत्’ची मूळ कल्पना, राक्षस, शत्रू आणि अभिचारी यांचा नाश करण्याच्या कामी योजिलेली दिसून येते. यावरून या वेदात जे अभिचार, मंत्र, तंत्र इत्यादी अंतर्भूत झालेले आहेत, ते जुन्या काळी सामान्यजनांत प्रचलित असलेल्या साध्या जादूटोण्याची नंतरच्या कल्पना जोडून तयार केलेली कृत्रिम आवृत्ती होत हे स्पष्ट होतं.

अथर्ववेदाचं स्थान : पुष्कळ काळपर्यंत भारतीय लोक अथर्ववेदाला पूज्य व पवित्र मानत नव्हते व अजूनसुद्धा याविषयी अनेक वेळा विवाद झडतात...पण म्हणून काही हा वेद नंतरचा आहे, असं काही निश्चित म्हणता येणार नाही. या वरील गोष्टीला कारण म्हणजे, अथर्ववेदातील विषयच होत. या वेदाचा हेतू (शांतिपौष्टिकाभिचार कर्म) अनिष्टशांती, इष्टपूर्ती व शत्रुपीडा हे आहेत. अभिशाप व भूतापसारण यांसंबंधीं मंत्रविधी अपवित्र मंत्रवर्गात येत असल्यानं ब्राह्मणांनीं आपल्या ब्राह्मणधर्मापासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्‍न केला.

एकंदरीत पाहू जाता, परमार्थसाधन व जादूविद्या यांत तत्त्वतः मुळीच फरक नाही. दोन्ही अतींद्रिय सृष्टीवर ताबा चालवू पाहतात. शिवाय, आचार्य आणि जादूगार मुळांत एकच आहेत; परंतु प्रत्येक देशातील लोकांच्या इतिहासात असा एक काल येतो की, त्या वेळी परमार्थसंप्रदाय व मंत्रविद्या एकमेकांपासून विभक्त होऊ पाहतात. त्यांत सर्वस्वी यश येत नाही ही गोष्ट निराळी.

देवांशी सख्य ठेवणारा पुरोहित, पिशाच्चाशी संबंध ठेवणाऱ्या जादूगाराचा अनादर करतो आणि त्याला आपल्यापेक्षा कमी प्रतीचा लेखतो. भारतातसुद्धा हे दोघांतील अंतर वाढत गेलेलं आहे.

अथर्ववेदातील अभिचारांपासून व मंत्रविद्येपासून अलिप्त राहण्याविषयी बौद्ध व जैन भिक्षूंना सक्त ताकीद असते; इतकंच नव्हे तर, ब्राह्मणी धर्मशास्त्रांतूनसुद्धा चेटूक हे पाप मानलेलं आहे व चेटूक करणाऱ्याला दगाबाज व पाखंडी यांच्या पंक्तीला बसवून त्यांना शिक्षा करण्याची या शास्त्रानं राजाला आज्ञा केली आहे.

उलटपक्षी, ब्राह्मणांच्या धर्मशास्त्रातून काही ठिकाणी, शत्रूविरुद्ध अथर्ववेदातील अभिचारमंत्रांचा उपयोग करण्याविषयी स्पष्ट परवानगी दिलेली आहे आणि मोठमोठ्या यज्ञांचं वर्णन असलेल्या सूत्रग्रंथांतून पुष्कळसे भूतापसारणमंत्र आणि शत्रूंचा (योऽस्मान् द्वेष्टि यं च वयं द्विष्मः) नायनाट करण्यास समर्थ अशा मंत्रविधींची वर्णनं आढळतात.

तरीपण या अभिचारवेदाविषयी त्रैविद्य पुरोहितवर्गात एक प्रकारचा तिटकारा उत्पन्न झाला. हा वर्ग अथर्ववेदाला सत्य व प्राचीनत्व या दृष्टीनं कमी प्रतीचा लेखत असे म्हणून पवित्र धर्मग्रंथांत त्याचा समावेश करण्याचं पुष्कळ वेळा टाळलेलं आढळतं. मुळापासूनच पवित्र धार्मिक वाङ्मयात याचं स्थान अनिश्चित असून त्यासंबंधीच्या कल्पना काहीशा चमत्कारिक दिसतात.

जिथं जिथं म्हणून जुन्या ग्रंथांतून पवित्र धार्मिक विद्येचा उल्लेख आलेला आहे, तिथं तिथं ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद या ‘त्रयीविद्ये’चा प्रथम नामनिर्देश केलेला आढळतो. या ‘त्रयीविद्ये’नंतर अथर्ववेदाचा उल्लेख सापडला तर सापडतो.

कधी कधी असंही होतं की, वेदांगे व इतिहासपुराणे हीसुद्धा धार्मिक ग्रंथमालिकेत दृष्टीस पडतात; पण अथर्ववेद मात्र वगळला जातो. शांखायनाच्या गृह्यसूत्रामध्ये (१.२,४,८) एक संस्कार वर्णन करण्यात आलेला आहे, तो नवीन जन्म पावलेल्या मुलांच्या ठायी वेदाधिक्षेपण करण्याचा होय.

हे अधिक्षेपण विधियुक्त करण्यात येतं व त्या वेळी म्हणायचा मंत्र असतो तो असा - ‘मी तुझ्या ठिकाणी ऋग्वेदाधिक्षेपण करतो, मी तुझ्या ठिकाणी यजुर्वेदाधिक्षेपण करतो, मी तुझ्या ठिकाणी सामवेदाधिक्षेपण करतो, मी तुझ्या ठिकाणी कथापुराणाधिक्षेपण करतो, मी तुझ्या ठिकाणी सर्ववेदाधिक्षेपण करतो.’ या ठिकाणी तर अथर्ववेदाला मुद्दाम वगळलेलं दिसतं. जुन्या बौद्ध ग्रंथांतूनसुद्धा विद्वान ब्राह्मणांविषयी उल्लेख करताना ते तीन वेदांत पारंगत आहेत असं म्हटलेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com