धोंडे सर म्हणजे मुक्त कृषी विद्यापीठ (अतुल देऊळगावकर)

अतुल देऊळगावकर atul.deulgaonkar@gmail.com
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा करणारी सूत्रं ऐकावीत ती त्यांच्याकडूनच. धोंडे सरांचा स्मृतिदिन येत्या मंगळवारी (ता. 30 ऑक्‍टोबर) आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याची ही ओळख...

भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा करणारी सूत्रं ऐकावीत ती त्यांच्याकडूनच. धोंडे सरांचा स्मृतिदिन येत्या मंगळवारी (ता. 30 ऑक्‍टोबर) आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याची ही ओळख...

प्रा. भागवतराव धोंडे यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल; पण सोलापूर, नगर, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतल्या प्रवासात टेकड्यांना व डोंगरांना वेढा घालणारी दाटी दिसेल. वन खातं असो, सामाजिक वनीकरण विभाग असो वा स्वयंसेवी संस्था, यापैकी कुणालाही बोडक्‍या टेकड्यांना हिरवंगार करायचं असेल तर धोंडे सरांच्या "कंटूर मार्कर'ला पर्याय नाही. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश या राज्यांतल्या हजारो अधिकाऱ्यांना समपातळीत (कंटूर) सलग चर (कंटिन्युअस ट्रेंच) काढण्याचं प्रशिक्षण धोंडे सरांनी दिलं आहे. त्यानुसार लाखो किलोमीटर लांबीचे चर खोदून त्यावर कोट्यवधी झाडं डोलत आहेत (केवळ महाराष्ट्रात सुमारे सहा कोटी). देशभरातल्या कुठल्याही शेतात बैलाच्या मदतीनं वा ट्रॅक्‍टरद्वारे वाफे (सऱ्या) पाडण्याचं काम पाहिलंय? वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचाही शोध धोंडे सरांनी लावला होता. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. या उपकरणांचा देशभर प्रसारही झाला इतकं ते उपयुक्त आहे. उपकरण एवढं सोपं व सुलभ की आपल्या डोक्‍यात का आलं नाही, असा प्रश्‍न प्रत्येकाला पडावा. त्याची नक्कल करणं सहज शक्‍य होतं. लोकगीत कुणी लिहिलं, असा प्रश्‍न आपल्याला कधीही न पडता आपण त्याचा निर्भेळ आनंद घेत राहतो. तसाच बहुमान या उपकरणांना लाभला. धोंडे सरांना मात्र त्याचा आर्थिक लाभ झाला नाही. ते अखेरपर्यंत 400 चौरस फुटांच्या भाड्याच्या घरात राहिले. विज्ञानाचं रहस्य उलगडून दाखवावं आणि प्रसार करावा, असं मानणारे ते एक विज्ञानयात्री होते. तुकाराम पादुका चौकाजवळच्या तुळपुळे वाड्यातील दहा बाय दहाची त्यांची अभ्यासिका ही सर्वांकरिता 24 तास खुली असे. धोंडे सरांचं नाव माहीत असो अथवा नसो ते अनेक पिढ्यांचं काम सोपं करून गेले आहेत.
नगर जिल्ह्यातल्या सडे या गावातल्या शेतकरी कुटुंबात ता. 23 सप्टेंबर 1937 रोजी भागवतरावांचा जन्म झाला. हलाखी, दारिद्य्र, असुरक्षितता, अस्थैर्य यांच्याशी सामना करत त्यांचं शिक्षण होत गेलं. या काळात त्यांनी गावातले मानापमान व भाऊबंदकी जवळून अनुभवली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामाऱ्या पाहिल्या. रक्ताचे सडे पाहून त्यांना कपट, लबाडी आणि हिंसा याविषयी विलक्षण तिडीक बसली. त्यांना कुठल्याही प्रकारचा क्षुद्रपणा सहन होत नसे. ते नाथमाधव, साने गुरुजी, अनंत काणेकर, कुसुमाग्रज यांच्या उदात्त साहित्यात रमून जात. कथा, कविता, कादंबरी हे त्यांचं विश्व होतं. त्यांना वास्तव सहन होत नसे, त्यामुळे वास्तव बदलणारं साहित्य त्यांना प्रिय होतं. शारीरिक हिंसा तर दूरच, त्यांना शाब्दिक हिंसासुद्धा मान्य नव्हती. त्यांनी कधीही, कुणाला दुखावलं नाही. स्वतः सहन करत, सोसत राहिले. दुःख व्यक्त करणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. व्यक्ती असो वा घटना, त्यातली चांगली बाजू कशी पाहावी, हे त्यांच्याकडून समजत असे. डॉ. अनिल अवचट यांनी "चांगुलपणा हा दोष ठरावा, असा त्यांचा उमदा स्वभाव होता' असं एका वाक्‍यात त्याचं वर्णन केलं आहे. धोंडे सरांचं गणगोतही अफाट होतं. समन्यायी पाणीवाटपाचे प्रणेते विलासराव साळुंके, शिक्षणतज्ज्ञ पु. ग. वैद्य, "बळीराजा'चे संपादक प्र. बा. भोसले, डॉ. नेरकर, डॉ. मायी, डॉ. गायकवाड, डॉ. हापसे हे कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व प्राध्यापक, शेतकऱ्यांसाठी हयात घालवणारे कॉम्रेड कुमार शिराळकर, "बळीराजा धरणा'साठी झटणारे संपतराव पवार, डॉ. अनिल अवचट, अनुवादक उमा व विरुपाक्ष कुलकर्णी, शिक्षणात नवे प्रयोहग करणारे अनिल व शोभा भागवत, "लोकविज्ञान'चे अरुण देशपांडे, "एमकेसीएल'चे विवेक सावंत, "हॅलो'चे डॉ. शशिकांत अहंकारी, शेतीवर लिहिणारे सर्व लेखक असा तो विस्तार होता. कोणाचाही लेख आवडला की पत्ता मिळवून पत्र लिहिणं, नंतर फोन मिळवून दाद देणं ही सरांची खास गुणग्राहकता होती.
"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'तून कृषी अभियांत्रिकीचं पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर भागवतराव तिथंच अध्यापन करू लागले. शेतीमधले काबाडकष्ट कमी कसे करता येतील, शेतात पाणी कसं आणता येईल, हा आणि हाच त्यांच्या चिंतनाचा, अभ्यासाचा विषय कायम राहिला. "पाणी हीच गरीब आणि श्रीमंत यांच्यातली भेदरेषा आहे. पाणी हेच दारिद्य्राचं मूळ आहे,' हे त्याचं अतिशय आवडतं प्रतिपादन होतं.
याबाबतचं मर्म त्यांनी वेळीच जाणलं.

पावसाचं पाणी कसं साठवता येईल, याचा त्यांनी ध्यास घेतला व अभ्यास केला. "पाणी अडवण्याचा सुटा विचार चुकीचा आहे. माती अडवली की पाणी आपोआप अडवलं जातं. माती व पाणी यांचं व्यवस्थापन एकत्र होणं आवश्‍यक आहे,' असं त्यांनी सांगितलं.

पावसाचा एक थेंब साधारणपणे तीन ते आठ मिलिमीटर व्यासाचा असतो; परंतु त्याचा वेग दर सेकंदाला 25 ते 30 फूट एवढा म्हणजेच तासाला 30 ते 36 किलोमीटर इतका प्रचंड असतो. तो जमिनीवर येताना असणाऱ्या या जबरदस्त गतिजन्य ऊर्जेमुळे माती जोरदार उधळली जाते. अगदी बुलडोझर माती उकरतो तशी माती खरवडून निघते. दुष्काळी भागात अर्ध्या तासात 25-30 मिलिमीटर, तर कधी रात्रीतून 100 मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे बांध फुटतात, बंधारे टिकत नाहीत. टेकड्या-डोंगरांवरची माती नावाला उरत नाही. बोडक्‍या टेकड्या वाढत जातात. हे लक्षात आल्यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी "शेतजमिनीवरच्या मातीला अटकाव करण्यासाठी छोटे बांध घातले पाहिजेत', हे ठरवलं आणि सन 1924 मध्ये "बंडिंग खातं' अस्तित्वात आलं. समपातळीत (कंटूर) बांध घेण्याची योजना आखली गेली. पाण्याची पातळी ही नेहमीच समान राहते. तळ्याची कड हे समपातळीचं उत्तम उदाहरण. पाणी आटलं तरी पातळी समान राहते. त्या कडेचे कुठलेही दोन बिंदू घेतले तरी त्यांची उंची सारखी येते. हे उंची मोजण्याचं काम महाकठीण! स्थापत्य अभियंत्यांना समपातळी मोजता येते, या एकमेव कारणामुळे "बंडिंग' हे खातं त्यांच्यावर सोपवलं गेलं. स्थापत्य अभियंत्यांची ओळख "डंपी लेव्हल' या जमिनीची उंची मोजणाऱ्या उपकरणावरून व्हायची. बंडिंग खातंही त्याचा वापर करायचं. साधारणपणे 10 ते 20 हजार रुपये किंमत असणाऱ्या या "डंपी लेव्हल' नामे दुर्बिणीचा भयंकर थाट असे. तिला अती ऊन्ह सहन होत नसे. ढगाळ हवा चालत नसे. अशी नाजूक प्रकृती असल्यामुळे जीप आल्यावरच साहेब आणि दुर्बिणी यांचा प्रवास सुरू व्हायचा. शेताला बांध घालणारा बिचारा शेतकरी येरझाऱ्यातच हताश होऊन जायचा. मृद्‌संधारण खात्याच्या "बंडिंग'मध्ये वेळ, पैसा आणि श्रम यांचं अतोनात वाटोळं झालं. उंची व समपातळी काढण्यातला ढिसाळपणा हे त्यामागचं प्रमुख कारण होतं. धोंडे सर हे "अभियंताशाही'च्या या बेदरकारपणाचे साक्षीदार होते. या नासाडीला तंत्रज्ञानातून उत्तर शोधण्याच्या मागं ते लागले. सन 1968 मध्ये दोन लाकडी पट्ट्यांमध्ये प्लॅस्टिकची नळी बसवून त्यांनी "कंटूर मार्कर' तयार केलं. (स्पिरिट लेव्हलसारखी अतिशय सोपी पद्धत) "कंटूर मार्कर' वापरून शाळेतला विद्यार्थीही जमिनीची उंची काढू शकतो. धोंडे सरांच्या उपकरणामुळे उंची मोजण्याच्या महत्त्वाच्या कामात सोपेपणा व अचूकता आली. तंत्रज्ञानाचं "विरहस्यीकरण' होऊन तज्ज्ञांची अनिवार्यता दूर झाली. याची दखल घेऊन धोंडे सरांना सन 1970 मध्ये पुण्याच्या "मराठा चेंबर'चं अतिशय प्रतिष्ठेचं उद्योजगता पारितोषिक देण्यात आलं. याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्वतःहून त्यांच्याशी संपर्क केला आणि समोर उभे राहून त्यांनी "कंटूर मार्कर'चं प्रात्यक्षिक पाहिलं. नाईक यांनी अनेकजणांकडं "कंटूर मार्कर'ची मनापासून स्तुती केली होती. हा प्रतिसाद पाहून धोंडे सरांनी "कंटूर मार्कर'चं उत्पादन, प्रशिक्षण व विक्री करण्याचा निर्णय घेतला आणि ते उद्योजक झाले. त्यांच्यासारख्या साध्या व सरळ स्वभावाला "सरकारी खरेदीची पद्धती' मानवत नव्हती. "कंटूर मार्कर' नुसतं विकून मोकळं होणं हा त्यांचा उद्देश कधीच नव्हता, तर कागदावर खरेदी दाखवावी, "बजेट संपवावं' यासाठी खरेदी करणाऱ्या सरकारी खात्यांना प्रशिक्षणामध्ये काडीचाही रस नव्हता. ही दोन विरुद्ध टोकं एकत्र येऊन व्यवहार अशक्‍यच होता. साहजिकच धोंडे सरांचा "लघुउद्योग' हा तोट्यात जाऊन "लघु' काळातच आटोपला.

त्यानंतर ते "पाणी पंचायत'चे प्रणेते विलासराव साळुंके यांच्यासमवेत "ग्रामगौरव प्रतिष्ठान'मध्ये उपसासिंचनाचं डिझाईन करू लागले. खर्चात कपात कशी करता येईल, याकडं त्यांचा कटाक्ष असे. याउलट गावात पंप वा पाइपलाइन मोठी करण्याच्या मोठेपणात हकनाक खर्च वाढत जातो. "त्याची दोन एचपीची, तर आपली पाचची मोटार,' हा बाणा देशासाठी घातक आहे, हे ओळखून धोंडे सरांनी "लिफ्ट इरिगेशन' ही पुस्तिका लिहिली. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यालासुद्धा ही पुस्तिका वाचून पाइपचा आकार व मोटार ठरवता येईल. पुढं धोंडे सर एक हजार एकरच्या कंपनी शेतीचं व्यवस्थापन करण्यासाठी नायजेरियाला गेले आणि सहा वर्षं तिथं राहिले. पुढं हीच पुंजी त्यांनी आयुष्यभर पुरवून वापरली. नायजेरियातून परतल्यावर त्यांनी नव्या जोमानं समपातळी रेषा काढायचं प्रशिक्षण सुरू केलं. पुढं त्यांची मुलं जयंत व हेमंत हेदेखील त्यांच्या सोबतीला आले. या तिघांनी, शाळेच्या विद्यार्थ्यांपासून वनाधिकाऱ्यापर्यंत अनेकांना डोंगरावर जाऊन समपातळी रेषा काढायचं प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण घ्यायला वेळ नसणाऱ्यांना कंटूर मार्कर दिलं नाही. वडिलांचा वसा मनोभावे चालवणाऱ्या जयंतचं वयाच्या तिसाव्या वर्षी व्हायरल इन्फेक्‍शनमुळे निधन झालं. या दुःखाची छाया सरांवर अखेरपर्यंत राहिली. यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा "सलग समतल चर' हेच मिशन त्यांनी हाती घेतलं. (आता हेमंत हे अर्थार्जनाकरिता महाविद्यालयात आणि हौस म्हणून ग्रामीण भागात स्थापत्य अभियांत्रिकाचे अध्यापन करीत आहे. जयंतची कन्या शलाका ही अमेरिकेत जलविज्ञानावर संशोधन करत आहे, तर सरांचे भाचे जयसिंग पवार हे देशभर सलग समतल चर करण्याचं कार्य करत आहेत).

"अभियंत्यांचे तत्त्वज्ञ' मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी पेयजल, सांडपाणी असो वा सिंचन, गुरुत्वाकर्षण पद्धतीवर भर दिला होता. धोंडे सरांनी हे तत्त्व सदैव आचरणात आणलं. सलग समपातळीत एक हेक्‍टर (अडीच एकर) जमिनीवर सलग समपातळीचर केल्यावर केवळ एक मिलिमीटर पाऊस झाला, तरी एकूण 10 टन (दहा हजार लिटर) पाणी पडतं. चरांमुळे पाच-सहा टन पाणी जमिनीत जिरेल. महाराष्ट्रात एक कोटी हेक्‍टरपेक्षा अधिक जमीन पडीक आहे. त्यावर सलग समपातळीचर घेतले आणि एक मिलिटर पाऊस झाला, तरी तीन हजार 600 कोटी टन पाणी वाचविता येईल. म्हणजेच केवळ उत्तम डिझाइन वापरून पाणी जिरवण्याची कार्यक्षमता वाढवता येणं सहज शक्‍य आहे; परंतु शासकीय पातळीवर धरणं, लघुपाटबंधारे, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, उपसा सिंचन, (सध्या "जलयुक्त शिवार') अशा योजना सुरू आहेत. पाणलोटक्षेत्र विकासाचं काम करणारे कित्येक जण दुरून दुरून सल्ला घ्यायला धोंडे सरांकडं येत असत. नद्यांच्या खालच्या भागातून पाणलोटक्षेत्र योजना करणं ही शास्त्रीयदृष्ट्या विसंगती आहे. पाणी अडवायला डोंगरमाथा ते पायथा, असंच गेलं पाहिजे. डोंगरावरच्या समपातळीरेषा म्हणजे इमारतीच्या पायऱ्या, त्यामुळे पाणी स्थिरावतं. माती वाहून गाळ साचून धरणं भरत आहेत. पाझर तलाव अजिबात पाझरत नाहीत, अशी अवस्था कोट्यवधी रुपये खर्चून झाली आहे. सोपा, शास्त्रीय मार्ग म्हणजे पाण्याचे लोंढे होऊ न देणं हाच आहे. त्यासाठी सलग समपातळीवर हाच स्वस्त, उत्तम पर्याय म्हणून जगभर स्वीकारला गेला आहे, असं धोंडे सर सांगत. मात्र, शासकीय पातळीवरची गंगा उलटी वाहणं सुरूच आहे. प्रकल्पांच्या नामकरणात बदल एवढंच काय ते नावीन्य! ऊर्जेचा कमीत कमी वापर होईल, असं विश्वेश्वरय्या यांचं डिझाईन आता नकोसं झालं आहे. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यासाठी हजारो कोटी संपवूनसुद्धा 70 तालुक्‍यांतली दहा हजार गावं सदैव तहानलेली राहतात. यामागचं "अर्थ' व "चक्र' सर्वांना माहीत असूनही ते भेदण्याचं धैर्य नसल्यामुळे महाराष्ट्राचं उजाडीकरण सुरू आहे.

धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा करणारी सूत्रं ऐकावीत ती त्यांच्याकडूनच. त्यांनी सन 1985 मध्ये "सकाळ'मधल्या लेखात, "टेलिफोनला कुठलीही बाह्य ऊर्जा लागत नाही. अन्न-वस्त्र-निवाऱ्याइतकीच फोन ही निकड आहे. ही सेवा मोफत केली तरी देशाचं उत्पन्न वाढणार आहे,' असं भाकीत केलं होतं. त्यांच्याकडून "शेती म्हणजे तोटा! कमी की अधिक एवढंच पुढं ठरतं. मनःस्ताप, हालअपेष्टा सहन करत शेती कसणारे आपल्यावर उपकार करतात. यातून उतराई होण्याकरिता शेतकऱ्यांना स्वातंत्र्यसैनिकांसारखं निवृत्तिवेतन देणं आवश्‍यक आहे,' हा सिद्धान्त ऐकला की पटून जायचा. त्यांना भेटणारा माणूस हा त्यांचा विचार घेऊनच निघत असे. धोंडे सरांच्या विराट ज्ञानाचा व अनुभवांचा महाराष्ट्र राज्यानं कसा उपयोग करून घेतला याचं उत्तर "भलं मोठं शून्य' हे आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रभर सलग समपातळीचर करून वनसंपदा उभी करण्याची जबाबदारी कधीच सोपवता आली असती. पाणीसमस्या नामशेष करण्यासाठी हा दीर्घकालीन उपाय आहे; परंतु अशी मूलभूत कामं करण्याची राजकीय इच्छाशक्ती कुठल्याच राजकीय पक्षात दिसत नाही. ज्ञानयुगात ज्ञानाची व बौद्धिक संपदेची उपेक्षा करणाऱ्या समाजाची दशा व दिशा त्यांच्या कर्तृत्वातूनच ठरत जात आहे. महाराष्ट्राच्या ऱ्हासपर्वात भर घालण्याचं कार्य अबाधित सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul deulgaonkar write article in saptarang