आवाजाच्या दुनियेत पुस्तकांची एन्ट्री! (सायली क्षीरसागर)

आवाजाच्या दुनियेत पुस्तकांची एन्ट्री! (सायली क्षीरसागर)

पुस्तकं म्हणजे अनेकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक...काहींना रिकाम्या वेळात, तर काहींना अगदी झोपण्यापूर्वीही पुस्तक वाचायची सवय असते. ज्यांना पुस्तकं वाचायची असतात, ते कसेही, कुठंही पुस्तकं वाचू शकतात. काही पुस्तकप्रेमींच्या घरात पुस्तकांसाठी खास ग्रंथालयस्वरूप अशी मोठी जागा असते. काहीजणांसाठी पुस्तक हा ‘एकटेपणातला आवडता सोबती’ असतो, तर काही जणांसाठी पुस्तक म्हणजे ‘गर्दीतही खिळवून ठेवणारा मित्र’ असतो. याच पुस्तकांचं स्वरूप आता तांत्रिकदृष्ट्या बदलत चाललं आहे. आता पुस्तकं वाचण्याऐवजी ‘ऐकण्याचा’ ट्रेंड रुजत आहे. याच हातातल्या पुस्तकांपासून, हेडफोनपर्यंत पोचलेल्या पुस्तांविषयीचा प्रवास जाणून घेऊ या...

पुस्तकं म्हटलं की डोळ्यासमोर येतो मोकळा वेळ, चहा-कॉफीचा कप आणि खिळवून ठेवणारं कथानक. हवं ते पुस्तकं विकत घ्या किंवा कुणाकडं असेल, तर ते मागून ‘लवकरच परत देतो’ या बोलीवर अनेक आठवडे आपल्याकडंच ठेवा! पण जसजसा काळ बदलत गेला, तंत्रज्ञान बदलत गेलं तसतसा पुस्तकांचाही चेहरामोहरा बदलला. वर म्हटल्याप्रमाणे, आधी खास वेळ काढून पुस्तकं वाचावी लागायची; पण कालांतरानं पुस्तकातही तंत्रज्ञानानुसार बदल होत गेले व लोक पुस्तकं ऐकू लागली...

ऑडिओ कॅसेट : टेपरेकॉर्डर आणि कॅसेटच्या जमान्यात पुस्तकं ही कॅसेट्‌सद्वारे ऐकता येऊ लागली. त्यामुळं घरातली मंडळी इतर कामं करता करता ही पुस्तकं ऐकत असत. आई-आजीसाठी तर टीव्हीव्यतिरिक्त पुस्तकं कॅसेटमधून ऐकणं म्हणजे रोजचा दुपारचा कार्यक्रमच असायचा. या कॅसेटमधल्या आवाजातून त्या कथानकातलं हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं. पु. लं. देशपांडे यांचं ‘असा मी असामी’, ‘निवडक पुलं’, ‘म्हैस’, ‘अंतू बर्वा,’ ‘बटाट्याची चाळ’ ही पुस्तकं-व्यक्तिचित्र-कथा कॅसेटमधून ऐकताना जणू पुलं स्वतः या गोष्टी आपल्याला सांगत आहेत, असा भास व्हायचा. राम नगरकरांचं ‘रामनगरी’ ऐकूनही हसून हसून पोटात दुखायचं, तर ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित ‘मुंगी उडाली आकाशी’ हे पुस्तक कॅसेटमधून एकून बरेच जण भावनिक व्हायचे. त्या वेळी अत्यंत लोकप्रिय असलेलं चंद्रशेखर गोखले यांचं ‘मी माझा’ ऐकताना विनय आपटे व भक्ती बर्वे यांचे आवाज मनाचा ठाव घ्यायचे व ‘या चारोळ्यांशिवाय प्रेमच नाही,’ असं वाटायचं. या सगळ्या भावना परिपक्व होण्यामागं, त्या पुस्तकांचं अभिवाचन केलेले कलाकार असायचे व कॅसेटद्वारे आपल्यासमोर हुबेहूब चित्र उभं करणारं तंत्र असायचं.

अभिवाचन : यादरम्यान पुस्तकांचं तंत्रज्ञान बदलत असलं, तरी ‘पुस्तक अभिवाचना’चे प्रत्यक्ष कार्यक्रम आणि शाळांमध्ये अभिवाचनाच्या स्पर्धा सुरूच आहेत. यातूनच एखादा आवाज भविष्यात पुस्तकं ‘ऐकताना’ आठवतो. आपण पुस्तक वाचताना त्यातले हावभाव हे वाचनाच्या ओघात हरवून जातात; पण हेच हावभाव अभिवाचनात किंवा पुस्तक ऐकताना कानाला अत्यंत सुंदर वाटतात व हाच विचार करून पुढं पुस्तक ऐकण्याचं तंत्रज्ञान विकसित झाले असावं.

सीडी : कॅसेटनंतर काही दिवसांत संगणक आले व त्यापाठोपाठ सीडी आल्या. चित्रपटांच्या सीडीप्रमाणे पुस्तकांच्याही ऑडिओ सीडी आल्या. यात मोठ्या प्रमाणात बालगीतं व बालकथांच्या सीडी लोकप्रिय झाल्या. त्यामुळं आता लहान मुलंही पुस्तकं आवडीनं ‘ऐकू’ लागली. या काळात व्हॉईसओव्हर आर्टिस्टनी आपल्या गोष्टी सांगण्याच्या पद्धतीनं लहान मुलांची मनं जिंकून घेतली व यानंतर वारं वाहू लागलं ते इंटरनेटचं.

ई-बुक : इंटरनेट, लॅपटॉप व स्मार्ट फोन या गोष्टी सहज उपलब्ध झाल्यावर तांत्रिक गोष्टी विकसित व्हायला वेळ लागतच नाही. आता कोणतंही पुस्तक जवळ बाळगायची गरज नव्हती. कारण, पुस्तकं आपल्या स्मार्ट फोनवर व लॅपटॉपवर सहज उपलब्ध होऊ शकत होती. ई-बुक स्वरूपात कोणतंही पुस्तक कोणत्याही क्षणी आणि कुठंही वाचता येऊ लागले. अगदी मोबाईलवरही अखंड कादंबऱ्या वाचता येऊ लागल्या. प्रवासात, रिकाम्या वेळात अगदी सहजपणे हे ई-बुक वाचता येऊ लागलं. मोठमोठ्या प्रकाशन संस्थांनी प्रथम लोकप्रिय पुस्तकांचं रूपांतर ई-बुकमध्ये केलं. त्यानंतर मागणीनुसार असं विविध साहित्य, वेगवेगळ्या भाषांमध्ये ई-बुकद्वारे वाचकांसमोर येऊ लागलं. साहित्याबरोबरच वृत्तपत्रं, मासिकंही ई-बुकच्या रूपात प्रसिद्ध होऊ लागली, तसंच ही ई-बुक्‍स मोबाईल ॲप्स व संकेतस्थळांवर एका क्‍लिकमध्ये उपलब्ध झाली.

ऑडिओ बुक : ई-बुकनंतर आताचा जमाना सुरू आहे तो ‘ऑडिओ बुक’चा! ऑडिओ बुक म्हणजेच ‘टॉकिंग बुक’. ही एक इंटरेस्टिंग आणि वेगळी संकल्पना व्यवसायाच्या दृष्टीनं १९९४ मध्ये प्रथम परदेशात अस्तित्वात आली व कालांतरानं भारतातही रुजली. एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा ते हावभावांसह ऐकणं कुणालाही आवडतं, याचाच विचार करून ऑडिओ बुक ही संकल्पना सत्यात उतरली. कॅसेटच्या धर्तीवरच तांत्रिकदृष्ट्या पुढारलेली ही संकल्पना ऑडिओ बुकच्या माध्यमातून वाचकांसमोर आली व आता वाचक हीच पुस्तकं कुतूहलानं ऐकू लागले. ऑडिओ बुकचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की, वाचकाला कुठंही, कोणत्याही वेळी, कितीही गर्दीत आपल्या स्मार्ट फोनवर ॲपद्वारे किंवा संकेतस्थळावरून पुस्तकं ऐकता येऊ लागली.  

ऐकण्याबरोबरच पुस्तकातल्या हावभावांमुळं ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर त्या कथेचं हुबेहूब वर्णन उभं राहू लागलं. पुस्तकातला पाण्याचा आवाज, लाटांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, जंगलातल्या गर्द झाडीचा आवाजही ऐकता येऊ लागला. याचं श्रेय जातं ते व्हॉईसओव्हर आर्टिस्टना. त्यांच्या आवाजामुळं दिग्गज साहित्यिकांच्या कादंबऱ्यांना श्राव्यरूप मिळालं. यापूर्वी ज्यांची पुस्तकं प्रकाशित झाली, त्यांनी त्याचं ई-बुक व कालांतरानं ऑडिओ बुक तयार करून घेतलं, तर काहींनी नव्या कथेसह ऑडिओ बुकची निर्मिती केली. परदेशातल्या अनेक कंपन्या भारतात खास हिंदी व प्रादेशिक भाषांमधली ऑडिओ बुक बनवण्यासाठी येऊ लागल्या. ही ऑडिओ बुक्‍स कधी ऑनलाईन खरेदी करावी लागतात, तर कधी मोफत उपलब्ध असतात. 

ऑडिओ बुक या संकल्पनेमुळं आता अनेक पुस्तकं आपल्या कथा ‘ऐकवण्यासाठी’ सज्ज झाली आहेत. पुस्तक-तंत्रज्ञानाच्या वाटचालीतला पुढचा टप्पा काय असेल व आणखी काय अभिजात संकल्पना आपल्याला पाहायला मिळतील, हे पाहणं पुस्तकप्रेमींसाठी विलक्षण असेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com