आठ ते अकरा (अविनाश हळबे)

अविनाश हळबे
रविवार, 9 डिसेंबर 2018

दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे त्या आल्या. माझी नात लगेच त्यांच्याकडं झेपावली. मी डायनिंग टेबलावर ठेवलेले खाण्या-पिण्याचे पदार्थ दाखवून लगोलग रुग्णालयाकडं निघाले. पुढचे सगळे दिवस एकदम छान गेले. रोज घरी आल्यावर नात मला मालतीआज्जीबरोबर तिनं केलेल्या गमतीजमती रंगवून सांगू लागली...

दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे त्या आल्या. माझी नात लगेच त्यांच्याकडं झेपावली. मी डायनिंग टेबलावर ठेवलेले खाण्या-पिण्याचे पदार्थ दाखवून लगोलग रुग्णालयाकडं निघाले. पुढचे सगळे दिवस एकदम छान गेले. रोज घरी आल्यावर नात मला मालतीआज्जीबरोबर तिनं केलेल्या गमतीजमती रंगवून सांगू लागली...

कोणताही माणूस कमावत असतो तोपर्यंत त्याला स्वतःच्या घरातले निर्णय घेता येतात; पण हे थांबल्यावर सत्तेचं सुकाणू मुलांकडं जातं. मग मुलं नेतील तिथं त्याला आपली जीवननौका नेणं भाग पडतं. माझे यजमान जोपर्यंत नोकरीत होते आणि हयात होते तोपर्यंत घरातला प्रत्येक निर्णय यजमान किंवा मी घेत असे. निवृत्त झाल्यावर तीनच वर्षांत दुर्दैवानं यजमान गेले आणि आता मला पूर्णपणे मुलगा आणि सून यांच्या तंत्रानुसार जगण्याची वेळ आली आहे. गावातलं जुनं, अल्प भाड्याचं छोटं घर सोडून उपनगरात मोठ्या ओनरशिप फ्लॅटमध्ये जायचं हा निर्णय मुलाचा. माझी थोडीफार धुसफूस झाली; परंतु शेवटी मला त्याच्या निर्णयाला मान्यता द्यावीच लागली. पुढचे सर्व सोपस्कार पार पडून काही महिन्यांतच आम्ही आमच्या नव्या प्रशस्त फ्लॅटमध्ये राहायलाही गेलो.

हा फ्लॅट "टू बीएचके विथ टू टेरेस' असल्यानं बराच मोठा होता. घरात मी, ती दोघं आणि दोन वर्षांची नात अशी फक्त चार माणसं. मुलगा आणि सून सकाळी साडेसातलाच ऑफिसला जात आणि नंतर नातीचं सगळं करण्यात माझा वेळ जाई.
सुरवातीचे दोन-चार महिने सामान लावण्यात आणि फर्निचर यात गेल्यावर माझं लक्ष इतरत्र जाऊ लागलं. या भागात फारशी वस्ती झाली नसली तरी आमच्या परिसरात मात्र दोन-चार बिल्डिंग दिसत होत्या. त्यातली एक आमच्या बाल्कनीच्या समोर; पण रस्त्याच्या पलीकडं होती. काही दिवस जाताच एक गोष्ट मला जाणवली, की समोरच्या बिल्डिंगमधल्या साधारणपणे साठीच्या आणि सुशिक्षित दिसणाऱ्या एक बाई सकाळी आठच्या सुमारास बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसत आणि अकराच्या सुमारास परत आपल्या फ्लॅटमध्ये जात. खरंतर त्यांचं तिथं असं बसणं मला खटकायचं कारण नव्हतं; पण पावसाळा आल्यावरही त्यांचा नित्यक्रम बदलला नाही. बाहेर येताना त्या छत्री घेऊन यायच्या आणि पाऊस सुरू झाला की ती उघडून, बिल्डिंगच्या कडेला थांबून अकरानंतरच घरात जात. हे मला कसंतरीच वाटलं.

माझी बेचैनी दिवसेंदिवस वाढू लागली. एक दिवस मला राहवलं नाही. माझी सून ऑफिसला गेल्यावर मी पलीकडं गेले आणि कट्ट्यावर त्यांच्या शेजारी बसून आपणहून त्यांची ओळख करून घेतली. त्यांचं नाव मालतीबाई काळे आहे आणि त्या मुलासोबत राहतात, एवढंच कळलं. बाकी काही बोलण्याचं त्यांनी टाळलं. दोन दिवसांनी मी परत गेले आणि दुसरा विषय सुरू केला; पण बाई "हूं हूं'शिवाय काही बोलत नव्हत्या. माझी उत्सुकता आता आणखी ताणली जाऊ लागली.
***

एक दिवस त्यांच्याच बिल्डिंगमधल्या एक बाई रोहिणीताई आमच्याकडं आल्या. माझा मुलगा एका मोठ्या कंपनीत अधिकारी आहे, असं कळल्यानं त्या त्यांच्या एका भाचीच्या नोकरीबाबत चौकशी करायला आल्या होत्या. मुलगा आणि सून घरात नसल्यानं त्या परत निघाल्या. "आल्या आहात तर पाच मिनिटं बसा' असं म्हणून मी त्यांना थांबवलं आणि चहा टाकला. चहा घेता घेता मालतीताईंचा विषय मी हळूच काढला आणि आठ ते अकरा या कालावधीत त्या बाहेर कट्ट्यावर बसण्याबाबतची उत्सुकता बोलून दाखवली.

रोहिणीताईंनी एक खोल श्‍वास घेतला आणि नंतर त्यांनी जी हकीकत सांगितली त्यानं मी चक्रावून गेले. मालतीताई इथं मुलाबरोबर राहत होत्या. त्यांचे यजमान काही वर्षांपूर्वीच गेले असल्यानं एकुलत्या एका मुलाचाच त्यांना आधार होता. मुलाचं लग्न झालं होतं आणि सूनही उच्चशिक्षित होती. महत्त्वाकांक्षी होती. (दोघंही चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होते; पण करिअरिस्ट असल्यानं अजून तरी त्यांनी अपत्याविषयीचा विचार केलेला नव्हता). सुनेला मालतीबाईंची प्रत्येक गोष्टीतली लुडबूड खपत नसे. दुसरीकडं, मालतीबाईंचाही स्वभाव हट्टी आणि "मी म्हणेन तेच खरं' असा दुराग्रही होता.

हळूहळू सासू-सुनेतला बेबनाव वाढून भांडणं विकोपाला जाऊ लागली. एकीकडं आई आणि दुसरीकडं बायको अशा कात्रीत सापडलेल्या मुलाची अवस्था तर फारच बिकट होऊ लागली. बरेच वाद-विवाद होऊन शेवटी यातून तोडगा असा काढण्यात आला, की सुनेच्या सकाळच्या ऑफिस गाठण्याच्या गडबडीत मालतीबाईंची लुडबूड नको म्हणून त्यांनी आठच्या सुमारास बाहेर जाऊन बसायचं आणि सून
अकराच्या सुमारास ऑफिसला गेली की मगच घरात यायचं! रात्री साडेआठनंतरच सून घरी परत येत असल्यानं रात्रीचा फारसा प्रश्‍न नव्हता. मालतीबाईंनी आठ ते अकरा घराबाहेर कट्ट्यावर बसण्यामागचं रहस्य हे असं होतं!
***

रोहिणीताई परत गेल्यावर मला या धक्‍क्‍यातून बाहेर यायला थोडा वेळ लागला. आयुष्यातल्या तिन्हीसांजेला समाधानाचं जीवन जगू इच्छिणाऱ्या आईच्या वाट्याला स्वतःच्याच घरात विचित्र भोग आले होते. याला त्यांचा विक्षिप्त स्वभाव कारणीभूत होता हेही तितकंच खरं. मात्र, काही दिवसांनी मला वाटू लागलं, की हे सर्व विचित्र वाटत असलं तरी प्राप्त परिस्थितीत अनिवार्यही असावं. "आठ ते अकरा'च्या "फॉर्म्युल्या'नं सकाळच्या गडबडीत मालतीबाईंची लुडबूड नसल्याचं सुनेला समाधान आणि आईला कायमचं घराबाहेर जावं लागत नाही याचं मुलालाही समाधान.
***

माझं माहेर गावातच असल्यानं मधूनमधून माझं तिकडं जाणं होत असे. एक दिवस एक विचित्र समस्या उद्भवली. त्या दिवशी रविवार होता. माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना
रुग्णालयात दाखल करावं लागलं. मी लगेच तिकडं गेले. सर्व तपासण्या झाल्यावर डॉक्‍टरांनी औषधोपचार सुरू केले; पण वडिलांना आठ दिवस तरी रुग्णालयातच ठेवावं लागणार होतं.
अर्थात त्यांच्या सोबतीला घरातलं कुणीतरी असणं भागच होतं. आम्ही सगळ्यांनी विचारविनिमय करून, रुग्णालयात थांबण्याचं काम आपापसात वाटून घेण्याचं ठरवलं आणि माझ्या वाट्याला सकाळी आठ ते बारा ही वेळ आली. "उद्यापासून येते,' असं सांगून मी घरी आले.

रुग्णालयात थांबण्याला मी होकार दिला होता खरा; पण दुसरी समस्या माझ्यासमोर उभी राहिली. मी वडिलांच्या जवळ तिकडं थांबणार; पण माझ्या घरी नातीसोबत सकाळी कोण थांबणार? तिला तिथं नेणं शक्‍य नव्हतं. मुलगा किंवा सून एक-दोन दिवस रजा घेऊन थांबू शकले असते; पण प्रश्‍न आठ दहा दिवसांचा होता.
उद्या काय करावं, असा विचार मी करत असताना एकाएकी माझं लक्ष समोर गेलं. मालतीबाई नेहमीप्रमाणे कट्ट्यावर बसल्या होत्या. एका अर्थानं त्या मोकळ्याच होत्या. "उद्यापासून सकाळी माझ्या नातीसोबत थांबता का,' असं विचारावं का त्यांना? होतील का त्या तयार? प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा विचार करत आणि दुसरा काही उपायही न सुचल्यानं मी रस्ता ओलांडून त्यांच्याजवळ गेले. त्यांना मी माझी समस्या सांगितली आणि माझ्या घरी नातीसोबत थांबण्याची विनंती केली. खरंतर माझी त्यांच्याशी जवळीक नव्हती. त्यामुळे सुरवातीला त्यांनी असमर्थता दर्शवली; पण माझ्या सततच्या आर्जवामुळे शेवटी त्या तयार झाल्या.
"आजच दुपारी माझ्या घरी या,' अशी विनंती मी त्यांना केली. कारण, नातीशी परिचय झाल्यावरच ती त्यांच्यासोबत एकटी काही तास काढायला तयार होईल हे सरळ होतं. यालाही त्यांनी होकार दिला. एक मोठं ओझं उतरल्याच्या आनंदात मी घरी आले. घरातल्यांच्या कानावर ही व्यवस्था घातली. त्यांनी नकार देण्याचा प्रश्‍नच नव्हता.
दुपारी मालतीबाई आल्या. मी नातीला त्यांची ओळख करून दिली. दोघींचं कितपत जमेल यावर प्रथम मी काहीशी साशंक होते; पण आश्‍चर्य घडलं. मालतीबाईंनी काही मिनिटांतच तिच्याशी छान सूत जमवलं. तिच्याशी त्या खेळल्याही आणि तासा-दोन तासांतच तिला त्यांनी आपलंसंही केलं. माझ्यासह मुलगा आणि सून कौतुकानं बघतच राहिले. शेवटी त्या निघाल्या तेव्हा "आज्जी, जाऊ नको ना ऽ ऽ' म्हणून त्यांचा पदर धरून नात रडू लागली. मग "आता मला खूप काम आहे... उद्या सकाळी परत येईन' असं सांगून मालतीबाईंनी सुटका करून घेतली. माझी काळजी मिटली.
मालतीबाई गेल्यावर मी नातीला तिच्या पणजोबांच्या प्रकृतीविषयी सांगितलं आणि उद्यापासून "मी हॉस्पिटलमध्ये जाईन आणि मालतीआज्जी परत येईपर्यंत तुझ्याशी खेळतील,' असं सांगितलं. आजारपणाबद्दल तिला कितपत कळलं कोण जाणे; पण मालतीआज्जीशी खेळायला मिळणार यावरच बाईसाहेब संतुष्ट झाल्या!
मी विचार करू लागले... झालं ते चांगलंच झालं होतं; पण आजवर अगदी माणूसघाण्या वाटणाऱ्या मालतीबाई अचानक इतक्‍या कशा बदलल्या? विचार करताना मलाच उत्तरं सापडत गेली. पहिली गोष्ट, मालतीबाई एका शाळेतून मुख्याध्यापिकेच्या पदावरून निवृत्त झालेल्या असल्यानं मुलांना कसं हॅंडल करायचं हे ज्ञान त्यांना जास्त होतं. त्यामुळे त्यांची नातीशी लगेच गट्टी जमली. दुसरं म्हणजे, त्यांच्या मुलाचं व सुनेचं अपत्याविषयीचं नियोजन असल्यानं नातवंड खेळवण्याची त्यांची सुप्त इच्छा माझ्या नातीद्वारे का होईना पण पूर्ण होत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे त्या आल्या. नात लगेच त्यांच्याकडं झेपावली. मी डायनिंग टेबलावर ठेवलेले खाण्या-पिण्याचे पदार्थ त्यांना दाखवून लगोलग रुग्णालयाकडं निघाले.

पुढचे सगळे दिवस एकदम छान गेले. रोज घरी आल्यावर नात मला तिच्या मालतीआज्जीबरोबर तिनं केलेल्या गमतीजमती रंगवून सांगू लागली. इकडं माझ्या वडिलांचीही तब्येत सुधारून दहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आलं.

खरंतर आता मालतीबाईंची आवश्‍यकता नव्हती; पण तरी मी त्यांना तसं न सांगता "जमेल तेव्हा येत जा,' असं सांगितलं; पण झालं वेगळंच. कधी नात हट्ट करून त्यांना बोलवायला भाग पाडी, तर लळा लागलेला असल्यानं त्याही न राहवून कधी तिच्याशी खेळायला येत. तरीपण त्यांचं मधूनमधून कट्ट्यावर बसणं मला विषण्ण करत होतंच.
असेच काही दिवस गेले आणि एक दिवस एक विलक्षण कल्पना मला सुचली. आमच्या भागात वस्ती वाढत होती; पण सुविधा फारशा नव्हत्या. आसपासच्या बिल्डिंगमधले रहिवासी आमच्यासारखेच, म्हणजे एक-दोन छोटी मुलं आणि असली तर एखादी ज्येष्ठ व्यक्ती, असे होते. परवा मला जशी अडचण आली, तशी कदाचित त्यांनाही येत असेल. मग आपण सकाळच्या वेळेत छोट्या मुलांसाठी बालवाडी का काढू नये? याबाबतीत मालतीबाई अनुभवी होत्याच आणि मदतीला मीही होतेच. अर्थार्जनाची आवश्‍यकता नसली तरी दोघींचा वेळ चांगला जाणार होता. गरजूनांही मदत होणार होती आणि मुख्य म्हणजे मालतीबाईंना आठ ते अकरा या कालावधीत खालच्या मानेनं कट्ट्यावर बसावं लागणार नव्हतं. सुरवातीला आमच्या फ्लॅटमध्ये बालवाडी सुरू करण्यास हरकत नव्हती. कारण, माझीही नात त्यात असणार होती. न राहवून लगेच मी कट्ट्यावर जाऊन माझी योजना त्यांना सांगितली. त्यांनाही ती लगोलग पटली. संध्याकाळी मी मुलाला सांगून त्याचीही संमती घेतली.
दुसऱ्याच दिवशी मालतीबाईंनी सुंदर हस्ताक्षरात एक नोटीस लिहिली आणि तिच्या झेरॉक्‍स काढून आसपासच्या चारही बिल्डिंगमध्ये आम्ही त्या लावल्या. आम्हाला फार वाट पाहावी लागली नाही. कारण, आठच दिवसांत चार कुटुंबांनी आपल्या मुलांची नावनोंदणी केली आणि दहाव्या दिवशी आमची बालवाडी सुरूही झाली. महिन्याभरात ही संख्या दहावर गेली. मुलांना रमवण्यासाठी लागणारी खेळणी आणि तत्सम वस्तू पालकांनीच आणून दिल्या. बालवाडीसाठी आम्ही काही फी वगैरे ठरवली नव्हती; परंतु पालकांनी आपणहून काही रक्कम द्यायला सुरवात केली. त्या रकमेतून पुढच्या दोनेक महिन्यांत मुलांना बसायला चटया आणि मुलांना शी-शूला नेण्यासाठी एक आयाही ठेवली. मालतीबाईंबद्दल प्रश्‍नच नव्हता. मुलांना निरनिराळी माहिती सांगणं, त्यांना नव्या गोष्टी शिकवणं, त्यांचे खेळ घेणं यातलं त्यांचं कौशल्य वादातीत होतं. एकंदरीत तीनेक महिन्यांत आमची बालवाडी या भागात खूपच लोकप्रिय झाली.
***

आता या गोष्टीला वर्ष होऊन गेलं आहे. मुलांची संख्या पंधरावर पोचल्यानं आमची बालवाडी आता एका बिल्डिंगच्या कम्युनिटी हॉलमध्ये भरते. बालगोपाळांत तीन मुलं कामवाल्या बायांचीसुद्धा आहेत. त्यांच्याकडून आम्ही पैसे वगैरे घेत नसलो तरी त्या समजून-उमजून आळीपाळीनं येऊन हॉलची साफसफाई करून जातात. बालवाडीचे सुटीचे दिवस सोडले तर मालतीबाईंचा आठ ते अकराचा कट्ट्यावरचा मुक्काम आता संपल्यातच जमा आहे. त्यांच्या घरातली परिस्थिती बदलली नसली तरी आता त्या आवडीचं काम करत असल्यानं त्यांना परिस्थितीची खंत अजिबात वाटत नाही. उलट, झालं ते बरंच झालं असं त्या मधूनमधून बोलून दाखवतात.

मालतीबाईंना रोज आठ ते अकरा या कालावधीपुरतं का होईना, घरातून सक्तीनं बाहेर जावं लागणं आणि माझ्या वडिलांचं आजारपण या दोन्ही दुर्दैवी घटना होत्या; पण त्या घटनांकडं सकारात्मकतेनं पाहिल्यामुळे समस्यांचं रूपांतर एका संधीत झालं. त्या संधीला मालतीबाईंचं कौशल्य आणि माझी साथ लाभताच बघता बघता एक विधायक कार्य उभं राहिलं. रोज सकाळी तीन तास सक्तीनं घराबाहेर राहावं लागण्याची खंत पूर्वी बाळगणाऱ्या मालतीबाई आता कधी एकदा सकाळचे आठ वाजताहेत आणि मी बालवाडीसाठी कधी घराबाहेर पडतेय याची वाटही पाहत असतात! वाइटातून कधी कधी चांगलं निघतं ते हे असं!

Web Title: avinash halbe write article in saptarang