
भ्रामक जाहिरातींना बळी पडू नका
- डॉ. अविनाश सुपे
आरोग्य क्षेत्रात औषधे किंवा उपचार हे दुधारी शस्त्रासारखे असते. त्याचा जसा फायदा होतो, तसे वाईट परिणामसुद्धा होऊ शकतात. दीर्घकालीन समस्येने त्रस्त असलेल्या मनाचा ठाव घेऊन काही जाहिराती त्यांना महागडी औषधे घेण्यास भाग पाडतात. जाहिरातदार, प्रसारमाध्यमे, नट-नट्या, वितरक, औषध निर्माते अशा सर्वांनीच सामाजिक जाणीव आणि नैतिकता सांभाळली तरच आपण समाजाला भ्रामक जाहिरातींपासून व त्यांच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवू शकू.
गेल्या आठवड्यात माझ्याकडे एक तरुण मुलगी आली होती. चेहरा काळवंडला होता. इतर काही लक्षणे होती. तिने एका जाहिरातीत प्रसिद्ध नटीने पापणीचे केस दाट करण्यासाठी एक लोशन लावण्यास सांगितले. तरुणीने हे लोशन वापरायला सुरुवात केली. काही दिवसांतच दुष्परिणाम दिसू लागले. मी तिला त्या औषधाचे दुष्परिणाम सांगितले. उपचार क्षेत्राबाहेर केसांची वाढ, डोळ्यांचा रंग कायमचा काळवंडणे आणि बॅक्टेरियाचे संक्रमण यामुळे अंधत्व येण्याची शक्यता, असे ते दुष्परिणाम होते. त्या जाहिरातीत या दुष्परिणामांचा उल्लेखच केला नव्हता. तिला ते औषध बंद करायला सांगितले; परंतु हे दुष्परिणाम जाण्यास काही महिने लागणार आहेत.
आपण सर्वच रोज वेगवेगळ्या माध्यमांत विविध विषयांच्या जाहिराती बघतो. त्या माणसांना भुरळ घालतात. त्यांना वाटते हा सोपा आणि तात्काळ गुण देणारा उपाय आहे. काही जाहिराती इतक्या अतिरंजित असतात, की आपण उघड्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले तरी त्यातील फोलपणा लक्षात येईल. केस गळणे ही स्त्री-पुरुष दोघांनाही अत्यंत जिव्हाळ्याची आणि त्रास देणारी समस्या आहे. त्याची कारणे कामाचा ताण, आजारपण, खाण्याच्या चुकीच्या सवयी, हार्मोन्सचे असंतुलन, परीक्षांचा ताण अशी विविध असू शकतात.
या सामान्य पण चिंता करायला लावणाऱ्या समस्येमुळे होणाऱ्या कमकुवत मनाचा फायदा करून घेत अनेक कंपन्यांचे तेल बाजारात येते. केस गळाले असतानाचा फोटो आणि नंतर भरघोस केस आलेले दाखवणारा फोटो आणि मग त्या ट्रिक फोटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफीला बळी पडून तेल विकत घेतले जाते. जाहिरातीच्या या १० सेकंदांसाठी लाखो रुपये मोजले जातात. आपल्या देशात वजन वाढणे ही मोठी समस्या आहे. अशा वेळी तरुणीचा एक फोटो स्थूल असतानाचा आणि एक फोटो सुडौल, बांधेसूद असा आणि मग झटपट बारीक होण्यासाठी आपण त्यांनी सुचवलेले औषध घेऊ लागतो.
माझे एक प्राध्यापक डॉ. मेहेंदळे यांनी १९८१-८२ मध्ये मेडिकल फोटोग्राफीची एक कार्यशाळा घेतली होती. त्यात त्याची विविध पारदर्शिका स्लाईडस्द्वारे दाखवून दिले, की एकाच व्यक्तीचा आपण वेगवेगळ्या अँगलमधून फोटो घेतला तर वेगवेगळे परिणाम मिळतात. एका व्यक्तीची मान झुकवून फोटो काढला आणि नंतर मान वर करून फोटो काढला तर केसांचा भार कमी-जास्त दाखवता येतो. तसेच एखाद्या व्यक्तीचा सरळ आणि तिरपा फोटो काढला तर स्थूलपणा लपवता येतो. आपण अनेक जाहिराती बघतो, की हे क्रीम वापरले तर त्वचेचा रंग उजळत जातो. चेहरा तजेलदार, तेजपुंज आणि गोरापान दिसू लागतो. ही सर्वच फोटोग्राफीची कमाल आहे. क्रीमचा फायदा किती यापुढे प्रश्नचिन्ह आहे. सरसकट अशी औषधे घेण्यापेक्षा आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने त्यातील सर्व त्रुटी समजून घेऊन वापर करावा. उगाचच आपल्या शरीरावर प्रयोग करू नयेत.
आरोग्य क्षेत्रात औषधे किंवा उपचार हे दुधारी शस्त्रासारखे असते. त्याचा जसा फायदा होतो, त्याप्रमाणे त्याचे वाईट परिणामसुद्धा होऊ शकतात. कठीण व दीर्घकाळ समस्येशी लढत असणाऱ्या सामान्यांच्या त्रासलेल्या मनाचा ठाव घेऊन अशा जाहिराती त्यांना महागडी औषधे घेण्यास भाग पाडतात. त्याच्या दुष्परिणामांबाबत योग्य माहिती किंवा कल्पना दिली जात नाही, हे काळजीचे कारण आहे. जाहिरातदार, प्रसारमाध्यमे, नट-नट्या, वितरक, औषध निर्माते अशा सर्वांनीच सामाजिक जाणीव आणि नैतिकता सांभाळली तरच आपण समाजाचे भले करू शकू. समाजाला भ्रामक जाहिरातींपासून व त्याच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवू शकू.