लेखनाबरोबरच समाजसेवाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baba bhand writes Social service with writing

लेखक व्हायचं हे माझं स्वप्न होतं, त्यामुळे लेखक-प्रकाशक झालो. याचबरोबर आणखी एक स्वप्न होतं - पन्नाशीत प्रकाशनाच्या व्यावसायिक जबाबदारीतून मोकळीक मिळावी.

लेखनाबरोबरच समाजसेवाही!

- बाबा भांड

लेखक व्हायचं हे माझं स्वप्न होतं, त्यामुळे लेखक-प्रकाशक झालो. याचबरोबर आणखी एक स्वप्न होतं - पन्नाशीत प्रकाशनाच्या व्यावसायिक जबाबदारीतून मोकळीक मिळावी. आतापर्यंत मी जे जे ठरवत गेलो, ते बरंचसं जुळत गेलं.

मुलगा साकेत अन् सून प्रतिमाने प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली आणि मी मानसिकरीत्या प्रकाशन व्यवहारातून मोकळा झालो. लेखन, वाचन, प्रवास आणि फोटोग्राफी यासोबत जमेल तसं इतर कामांत रंगू लागलो. प्रकाशनासोबत अठ्ठेचाळीस वर्षं चाकोरीबाहेरची अनेक कामं करताना, माझ्यातील लेखकावर मी बराच अन्यायही केला.

वेगळं काही करून पाहावं या ऊर्मीने समाजोपयोगी अन् कुटुंबाच्या जबाबदारीने केलेल्या उद्योग-उपक्रमात बरीच ऊर्जा, वेळ व पैसा खर्च झाला; पण ही स्वतःपलीकडची गुंतवणूक खूप सकारात्मक अनुभव देऊन गेली.

माझी आणखी एक सवय होती. एखादा विषय मनात शिरला की, त्याच्या पाठीमागे लागायचं, मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. हा सगळा वेळ कधी आनंद, तर कधी यातनांचा प्रवास व्हायचा.

शालेय जीवनात पिंप्री अडगावला विजय अण्णा बोराडे यांचा पाणी अडविणे प्रकल्प बघितला होता. आपल्या जन्मगावी तो करावा, या कल्पनेने लोकशिक्षण संस्था स्थापन केली. आठ गावांत पाणी अडविण्याचा प्रकल्प शासनाच्या मदतीने सुरू केला.

नदी-नाल्यांचे बांध, शेततळी, छोट्या तलावांनी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढली, फळबागा वाढत गेल्या. शेतीतील उत्पन्न वाढल्याने गावात वाहनं, ट्रॅक्टर आले. या प्रगतीसोबत अनिष्ट गोष्टीही चोरपावलांनी गावात शिरल्या. पैशांमुळे तरुणांत बेदरकारवृत्ती वाढली, कर्ती पोरं व्यसनांचे साथीदार होऊ लागली, जलधनातून विक्राळ संकट दारावर दिसू लागलं.

ग्रंथ म्हणजे ज्ञानाची सदावर्तं उघडणारं साधन आहे. हे ग्रंथ आपल्या तरुणांच्या हाती पोहोचविण्यासाठी आपलं गाव व तालुक्यातील गावांत सार्वजनिक ग्रंथालयं सुरू केली. त्या ग्रंथालयास काही ग्रंथ भेट देणं,

संस्था नोंदणीसाठी मदत करण्यासाठी धडपड सुरू केली. शासन अनुदान मंजूर झालं; पण खूप मदत केल्याने, ज्यांच्यासाठी केलं त्यांची ऊर्जा कमी पडल्याने या कामात प्रतिसाद मिळाला नाही.

पाणलोट क्षेत्रविकासाचं काम करताना वारंवार गावी येणं होई. त्या वेळी गावातील मंदिराशेजारी चार-पाच अपंग मुलं बसलेली दिसली. त्यांचे आई-वडील शेतीकाम अथवा मजुरीकामास गेलेले. या मुलांसाठी काय करता येईल, या विचारातून आपल्या शेतात पत्र्याच्या खोल्यांत शाळा सुरू केली.

कार्यकर्त्यांच्या मदतीने आजूबाजूच्या गावांतून अपंग व मूक-बधिर मुलं आणली. यातून पुढे ‘आनंद मूक-बधिर’ व ‘नाथ अस्थिव्यंग’ या दोन निवासी शाळा सुरू केल्या. आज ३४ वर्षांनी त्या शाळा गिरनेरा तांडा आश्रमाशेजारी उत्तमरीत्या सुरू आहेत.

मी विद्यार्थी असताना गावच्या वेणूआई मांगीण यांनी मदत केली. त्या वेणूआई आजारी पडल्या. मुलगा बाहेरगावी कामासाठी. वेणूआईसाठी शेतात माउली वृद्धाश्रम सुरू केला. त्यांच्यासोबत गावातील इतर आठ-दहा वृद्ध राहू लागले. अपंग मूक-बधिर शाळा व माउली वृद्धाश्रम खूप आनंद, समाधान देऊन गेलं.

आप्तस्वकीयांना आर्थिक बळ प्राप्त व्हावं म्हणून कुक्कुटपालन सुरू केलं. औरंगाबाद शहरातील सरकारी दवाखान्यातील रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरचं विकत जेवण परवडत नव्हतं. यासाठी शहरातील मित्रांच्या मदतीने या मंडळींसाठी जेवणाचे डबे

पुरविण्याचा प्रकल्प सुरू केला. यात आपलाही सहभाग म्हणून काही डब्यांची जबाबदारी उचलली. समाजाचं शरीर आणि मनःस्वास्थ्य राखणाऱ्‍या सिद्ध समाधी योग या संस्थेचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.

शहराजवळ मोठा आश्रम उभारला. शेती हा बहुतांश ग्रामीण भागातील मंडळींचा जगण्याचा मार्ग, त्यामुळे फळबाग लागवड, गटशेतीचा प्रयत्न, फळं बाहेर पाठविण्याची धडपड केली. शेजाऱ्‍याच्या मदतीने वीटभट्टीचा प्रयोग करून मातीचे पैसे मातीत गेल्याचा अनुभव घेतला.

निरक्षरांना साक्षर करणं हे राष्ट्रकार्य आहे, या राष्ट्रीय जबाबदारीचे साथीदार होण्यासाठी नवसाक्षरांसाठी ७५ हून अधिक ग्रंथ प्रकाशन केले. नवसाक्षरांसाठी ‘शब्दसंगत’ मासिकाचं संपादन केलं. लहान मुलांत वाचनगुण वाढावेत म्हणून ‘साकेत सवंगडी’ मासिक सुरू केलं.

मुलं वाचू लागली तरच उद्याचे वाचक तयार होतील, म्हणून मुलांसाठी लिहिणाऱ्‍या बालसाहित्यिकांना एकत्र आणून ‘मराठी बालसाहित्य परिषदेची’ स्थापना केली. मित्रांच्या मदतीने मराठवाड्यात सहा बालसाहित्य संमेलनं भरविण्यात पुढाकार घेतला.

देशभरातील अनेक भाषांतील बालकथा, किशोर कादंबऱ्‍या, बालकविता, नाटिकांचं मराठीत भाषांतर करून किशोर वाचकांना उपलब्ध करावं म्हणून भाषांतर-संपादनाचा प्रकल्प केला, मित्रांना सोपविला. बालकथांची जबाबदारी मी स्वीकारली. माझं ‘श्रेष्ठ भारतीय बालकथा’ पुस्तक प्रकाशित केलं. मित्रांकडून सहकार्य न लाभल्याने बाकी राहून गेलं, ही वाङ्‍मयीन खंत सलत आहे.

समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती त्या क्षेत्रात कार्य करून एकप्रकारे स्वतःची गुंतवणूक करत असते. याशिवाय स्वतःपलीकडची सोडवणूक करणारे लेखन-प्रकाशनाव्यतिरिक्त केलेले हे वरील प्रकल्प खूप समाधान, आनंद देऊन गेले.

दुसऱ्‍यासाठी झिजण्यात आनंद नक्कीच आहे; पण समाजसेवा म्हणजे लष्कराच्या भाकऱ्‍या भाजणं, हेही एक कटू वास्तव अनुभवलं. नवनवी स्वप्नं रचण्यासाठी आर्थिक-मानसिक गुंतवणूक करायची; आपलं उमेदीचं वय, तारुण्याची ऊर्जा पणाला लावायची, आपल्या छंदासाठी सारं कुटुंब वेठीला धरायचं, हा अनुभव येत होता.

ज्यांच्यासाठी हे समाजसेवेचं अन् आपणास राष्ट्रकर्तव्य म्हणून वाटणारं काम करायचं, त्यांनी मात्र त्यात स्वार्थाचा विचार पाहायचा, संधी मिळाली की दूषणं द्यायची... अशा वाळवंटात प्रयोग करण्यात काय अर्थ आहे, असं मन कधी तरी कुरकुरायचं.

पण, दुसरी बाजू सांगायची, तुला या कामात त्या वेळी समाधान मिळालं ना; या उफराट्या अनुभवाची कटुता सोडून दे. निर्मितीतला सुरुवातीचा आनंद, नवं घडविण्यात झालेली दमछाक आणि आपणच नवं काही करायचं, हे आत्मबळ गप्प बसू देत नाही,

त्यामुळे निराशा झटकून टाकायची, ज्यांनी त्रास दिला त्यांना माफ करायचं. कुणावर रागावून दुखावण्यात काही अर्थ नाही, आगपाखड करूनही उपयोग नाही. उतायचं नाही, मातायचं नाही; घेतला वसा नेकीनं पुढे न्यायचा, आवाक्याबाहेर गेला की सोडून द्यायचा.

आपण गुंतवणुकीत कमी पडलो, असा विचार करून व्याकूळ व्हायचं नाही. या सूत्राने लेखन-प्रकाशनाव्यतिरिक्त कामाचं हे काही कथन. पुणे-मुंबईबाहेर नव्यानं लिहिणाऱ्‍या लेखकाची सतत होणारी प्रकाशन, वितरणाची कोंडी बघून काही मित्रांच्या संगतीने सहकारी प्रकाशन संस्था सुरू केली. सात पुस्तकं प्रकाशित झाली.

लेखक भागीदार झाले. लेखकांची सहकारी सोसायटी केली. नामवंत कादंबरीकार अध्यक्ष व मी चिटणीस. जागा खरेदी केली. नोंदणी, अतिक्रमण, कोर्टकचेऱ्या, सदस्यांचे एक-दुसऱ्याबद्दलचे संशयाचे धागे... यातून ते काम खूप काही शिकवून गेलं.