गावाच्या अस्तित्वाचा कथारूप शोध (बाबाराव मुसळे)

book review
book review

डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या कथांमध्ये कोंबून बसवल्यासारखे वाटतात. ते लधुकथांचे नाही, तर दीर्घकथांचे वा कादंबऱ्यांचे विषय आहेत. सोनवणे यांनी या बाबतीत अधिक गंभीर होऊन विचार करायला हरकत नाही.

या संग्रहात एकूण तेरा कथा आहेत. यातल्या काही कथा निमशहरी, शहरी वळणाच्या आहेत. नगरपालिकेचं गलिच्छ राजकारण, कापूस जिनात काम करणाऱ्या बायकांची ससेहोलपट, कॉलेजातलं प्राध्यापक प्रकरण, त्यासाठी केलं जाणारं जातीय राजकारण, हार्बर लाईनचा मेगाब्लॉक, त्यातून उद्‌भवलेली एकेरी प्रेमसमस्या हे प्रश्न निश्‍चितच गावाचे प्रश्न नाहीत. अशा या कथा वेगळ्या संग्रहात आल्या असत्या तर बरे झाले असते.

गावात काय काय असतं? गावाचेही स्वत:चे खास असे काही प्रश्न असतात. ग्रामपंचायतीचं राजकारण. त्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे नानाविध प्रकार. विशेषत: महिलांना सामाजिक आणि कौटुंबिक पातळ्यांवर दडपण्याचा प्रयत्न. त्याविरुद्ध महिलांचा आक्रोश. कथित "महाराज' आणि त्यांचे परमभक्त. कुटुंबातला दुबळेपणा झाकण्यासाठी "बाबा', "महाराजां'चा ध्यास, ध्यान. विशिष्ट वर्णाचा पती नको म्हणून मग लग्नबाह्य संबंध ठेवणं, अनौरस अपत्यप्राप्ती, अवहेलना आणि अपमानास्पद जगण्याची कसरत, गरीब, श्रीमंत या पातळीवरचं स्त्रीचं लैंगिक शोषण, निव्वळ मजुरीवर जगणाऱ्या महिलांची मजुरी उपलब्ध नसल्यानं होणारी असहाय अवस्था, शेतीसंबंधानं निसर्गाचं लहरीपण, उपासमार, हताशा, अगतिकता, वेड लागण्यात परिणती, असं बरंच काही असतं. अर्धवट शिक्षण, नोकरी उपलब्ध नसणं, कामासाठी भटकंती, राजकारणात पडणं हा हितचिंतकीय सल्ला, त्यातून रोजगार मिळण्याचा शक्‍यतांचा शोध हेही कथांमधून दिसतं. पहिलीला पोरं होत नाही म्हणून मग दुसरी करून आणणं, पुढं लेकरांचं लेंढार, पुढं त्या पोरांचेही जीवन मरणाचे प्रश्न, दारुची व्यसनं, हाणामाऱ्या, ते असह्य होऊन आत्महत्या... सारंच भयाण.

गावाकडच्या माणसांच्या भल्या-बुऱ्या प्रवृत्तीचा शोध या कथा समरसून घेण्याचा प्रयत्न करतात. जी माणसं इथं अवतरतात ती आपापली व्यक्तिविशेषं यथार्थपणे व्यक्त करतात. घटना, घटितांच्या संदर्भात गावपातळीवर कोणताही भेदभाव संभवत नाही. त्यामुळं काही प्रश्नांच्या संदर्भात सगळं गाव एका समान पातळीवर येतं. व्यक्तिगत समस्या या सामूहिक कधी बनतात ते कळत नाही. गावाचा शोध हा व्यक्तीसापेक्ष तसाच गावसापेक्ष ठरतो तो याचमुळं. सोनवणे असा शोध घेण्याचा कसोशीनं प्रयत्न करतात. कथा मांडण्याची त्यांची हातोटी वाचकाला मोहित करणारी आहे. त्यांच्या कथांतल्या काही व्यक्तिरेखा कायम भुरळ घालतात. अहिराणी बोलीचा संवादासाठी वापर हे या कथांचं फार मोठं बलस्थान आहे. या बोलीचा गोडवा हवाहवासा वाटणारा आहे. तिची हेलयुक्त लय ओळखीची असली, तर मग दुधात साखरच समजावी. शहरी, निमशहरी, ग्रामीण अशा वेगवेगळ्या अवकाशातल्या या कथा या एकाच संग्रहात आल्यानं संग्रहाचं स्वरूप मात्र ना धड ग्रामीण ना धड नागरी असं झालं आहे. कथासंग्रहाचं शीर्षक मात्र प्रामुख्यानं गावाकडंच निर्देश करतं.

पुस्तकाचं नाव : गाव कुठे आहे?
लेखक : डॉ. संजीवकुमार सोनवणे
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई (022-24216050)
पानं : 92, किंमत : 120 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com