मानवतेचे आधारस्तंभ

संदीप वासलेकर
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

दहशतवादी हल्ले... बोरिस जॉन्सन व ट्रम्प यांचं द्वेषाचं राजकारण...कडव्या राष्ट्रीयत्वाची कल्पना जोपासणाऱ्या पक्षांचा युरोपात उगम... अशा युगात सर्व जगच द्वेष, तिरस्कार, क्रौर्य यात संपून जाईल असं वरवर वाटतं; पण अशा स्थितीतही मानवतेचा पुरस्कार करणारे असंख्य लोक जगात सगळीकडं आहेत, याची जाणीव ठेवणं आवश्‍यक आहे.

दहशतवादी हल्ले... बोरिस जॉन्सन व ट्रम्प यांचं द्वेषाचं राजकारण...कडव्या राष्ट्रीयत्वाची कल्पना जोपासणाऱ्या पक्षांचा युरोपात उगम... अशा युगात सर्व जगच द्वेष, तिरस्कार, क्रौर्य यात संपून जाईल असं वरवर वाटतं; पण अशा स्थितीतही मानवतेचा पुरस्कार करणारे असंख्य लोक जगात सगळीकडं आहेत, याची जाणीव ठेवणं आवश्‍यक आहे.

म्युनिक ते मुंबई असा हवाईप्रवास सुरू होता. सर्व काही शांत होतं. काही प्रवासी झोपले होते. मी वर्तमानपत्रं वाचत होतो. विमानातले कर्मचारी त्यांच्या कामात मग्न होते.
वैमानिकानं अचानक घोषणा केली ः ‘‘काही आपत्ती आल्यामुळं मी हे विमान जवळच्या विमानतळावर नेत आहे.’’ सर्व प्रवासी खडबडून जागे झाले. विमानात बाँब आहे का, दहशतवादी आहेत का, इंजिनमध्ये बिघाड झाला आहे का? नाना प्रकारचे विचित्र विचार मनात येऊ लागले; परंतु हवाई कर्मचाऱ्यांना काही विचारण्याचं धैर्य झालं नाही. वरवर पाहता विमानात शांतता होती; म्हणजे विमानाचं अपहरण झालं नव्हतं.
थोड्या वेळानं वैमानिकानं पुन्हा घोषणा केली ः ‘‘आपण तुर्कस्तानच्या हवाईहद्दीत आहोत व अंकाराकडं प्रयाण करत आहोत. विमान येत्या १५-२० मिनिटांत जमिनीवर उतरण्याची अपेक्षा आहे.’’

काही वेळानं विमान अंकारा विमानतळावर दूर एका कोपऱ्यात उतरलं तेव्हा समजलं, की एका भारतीय कुटुंबातल्या लहान मुलीला श्‍वास घ्यायला पराकाष्ठेचा त्रास होत होता. तिला विमानातून प्राणवायू देण्यात आला, पण तो पुरेसा नव्हता. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्याची गरज होती.
विमान थांबल्यावर मी घड्याळ पाहिलं. तुर्कस्तानचे डॉक्‍टर विमानात आले. तिची तपासणी करून तिला त्यांनी खाली उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत नेलं. कुटुंबाच्या पाच सदस्यांकडं तुर्कस्तानचा व्हिसा नव्हता. त्यांचा पासपोर्ट तपासून त्यांना विमानाच्या पायरीवर व्हिसा देण्यात आला. तेही रुग्णवाहिकेत बसले. काही क्षणांत रुग्णवाहिका भरधाव वेगानं निघून गेली. मी पुन्हा एकदा घड्याळात पाहिलं. एकूण तीन मिनिटांचा कालावधी उलटून गेला होता. एका मुलीचे प्राण वाचवण्यासाठी लुफ्थान्सा विमान कंपनीनं व तुर्कस्तानच्या प्रशासनानं दाखवलेली कार्यक्षमता अचाट होती. त्या मुलीची तपासणी, पाच कुटुंबीयांचा व्हिसा व रुग्णवाहिकेचं प्रचंड वेगानं शहराकडं प्रयाण हे सगळं केवळ १८० सेकंदांत! मी जे पाहिलं त्यावर माझा विश्‍वास बसत नव्हता.

त्यानंतर काही दिवसांनी एका सकाळी ‘इंटरनॅशनल न्यूयॉर्क टाइम्स’ हे वृत्तपत्र वाचत होतो. पहिलं संपूर्ण पान व आतली दोन पानं एकाच मजकुरानं भरली होती. कॅनडात जस्टिन त्रुडो यांची पंतप्रधान म्हणून निवड झाल्यावर त्यांनी सीरियातून येणाऱ्या निर्वासितांसाठी कॅनडाचं दार उघडलं व त्याचबरोबर येणाऱ्या निर्वासितांना समाजात समरस होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पुढं येण्याचं आवाहन केलं. हे सरकारी धोरण झालं. ‘इंटरनॅशनल न्यूयॉर्क टाइम्स’मधलं तीन पानं भरून वर्णन नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल होतं.

कॅनडात आता अनेक कुटुंबं एकत्र येऊन एका सीरियन कुटुंबाचे पालक बनतात. ते वर्गणी काढून निर्वासितांच्या घरांचं भाडं, कपडेलत्ते याचा खर्च करतात. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. निर्वासित कुटुंबाला आळीपाळीनं आपल्या घरी बोलावतात. इंग्लिश शिकायला मदत करतात. स्थानिक संस्कृती समजावून सांगतात. आपल्या मुलांना निर्वासित कुटुंबातल्या मुलांबरोबर मैत्री करण्यासाठी प्रोत्साहन देतात. सुमारे एक वर्ष असा प्रयत्न केल्यावर सीरियातून आलेलं निर्वासित कुटुंब स्थिर होईल, अशी अपेक्षा ठेवून ते वर्षभरानं दुसऱ्या निर्वासित कुटुंबाला पालकत्व देतात. सध्या कॅनडात असे प्रयत्न करणाऱ्या इच्छुकांची संख्या एवढी मोठी आहे, की सर्वच्या सर्व निर्वासितांना कोणत्या ना कोणत्या तरी कुटुंबाचा आधार मिळाला आहे. अंकारा विमानतळावरचा अनुभव व कॅनडातल्या सर्वसामान्य लोकांचा निर्वासितांना मदत करण्याचा उत्साह काय दाखवतो?

अंकारातला अनुभव व सध्या कॅनडात होणारे बदल अपवादात्मक नाहीत. जर आमचं विमान इतर कोणत्याही देशातल्या विमानतळावर उतरलं असतं, तर तिथल्या यंत्रणेनंदेखील त्या लहानग्या भारतीय मुलीचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असती. कदाचित त्यांची कार्यक्षमता तुर्कस्तानच्या मानानं कमी पडली असती; परंतु रुग्णाला वाचवण्याची इच्छा तिळभरही कमी पडली नसती. कॅनडात जसं निर्वासितांना समाजात समरस करून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत, तसे प्रयत्न युरोपमध्ये अनेक वर्षं होत आहेत. युरोपमधल्या अनेक देशांत केवळ २०-२५ वर्षांपूर्वी आशियातून व आफ्रिकेतून आलेले लोक उच्चपदस्थ झाले आहेत. काही जण तर महापौर, खासदार व मंत्रीसुद्धा झाले आहेत.

पृथ्वीतलावरच्या सात अब्ज लोकांपैकी बहुसंख्य लोकांमध्ये मानवता अजूनही जागी आहे. काही राजकारणी मात्र द्वेष, दुसऱ्यांसंबंधी भीती, संशय या अवगुणांचं भांडवल करून स्वतःची राजकीय पोळी भाजतात व संपूर्ण समाजाचा अथवा देशाचा नाश करतात.
अनेक वर्षं इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान इथल्या राज्यकर्त्यांनी द्वेषावर आधारित समाजनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेत कोंगो, सुदान, इरिट्रिया, चाड, रवांडा, बुरुंडी या देशांमध्येदेखील द्वेषावर आधारित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न संकुचित वृत्तीच्या राजकारण्यांनी केला. त्याचा परिणाम काय झाला आहे, हे त्या देशांच्या स्थितीवरून समजतं. स्वतःचा स्वतःहून सर्वनाश करण्याच्या शर्यतीत कोंगो, बुरुंडी, चाड व सुदान यांचा सगळ्यांत वर क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ येतात इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान!

या देशांच्या यादीत ब्रिटनला बसवण्याची इच्छा एटन व ऑक्‍सफर्डमध्ये विद्याविभूषित झालेले व एका सुप्रसिद्ध नियतकालिकाचे संपादक म्हणून कार्य केलेले बोरिस जॉन्सन यांना होईल अशी अपेक्षा नव्हती.

त्यांनी ‘निर्वासितांचा द्वेष करा’, ‘ब्रसेल्समधील अधिकाऱ्यांचा द्वेष करा’, ‘परदेशी गुंतवणूकदारांचा द्वेष करा,’ अशी आवई देऊन ब्रिटनच्या जनतेला युरोपच्या समुदायाबाहेर जाण्यासाठी प्रोत्साहित केलं व सार्वमत जिंकलं. परिणामी, स्कॉटलंडनं ब्रिटनपासून फारकत घेण्याची कारवाई सुरू केली. उत्तर आयर्लंडदेखील स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करेल. शतकानुशतकं ‘ग्रेट ब्रिटन’ म्हणून ओळखला जाणारा देश जगाच्या नकाशावरून नाहीसा होऊन ‘स्मॉल इंग्लंड’ बनेल. एकेकाळी पौंडाची किंमत दोन डॉलर होती. ‘स्मॉल इंग्लंड’च्या पौंडाची किंमत डॉलरपेक्षा कमी असेल. इंग्लंडची आर्थिक घडी बिघडेल. ज्या उत्तर इंग्लंडमधून द्वेषाच्या पुरात वाहत जाऊन लोकांनी बोरिस जॉन्सन यांच्या संधिसाधू राजकारणाला पाठिंबा दिला, त्या उत्तर इंग्लंडमध्ये आर्थिक मंदी व बेरोजगारीचा सगळ्यात मोठा परिणाम होईल. अमेरिकेतही खूप मोठ्या प्रमाणात लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्यामागं जाऊन द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी घालत आहेत. त्याचा निकाल काय होतो, ते नोव्हेंबरमध्ये स्पष्ट होईल.

दहशतवादी हल्ले...बोरिस जॉन्सन व ट्रम्प यांचं द्वेषाचं राजकारण...कडव्या राष्ट्रीयत्वाची कल्पना जोपासणाऱ्या पक्षांचा युरोपात उगम... अशा युगात सर्व जगच द्वेष, तिरस्कार, क्रौर्य यात संपून जाईल असं वरवर वाटतं; पण अशा स्थितीतही मानवतेचा पुरस्कार करणारे असंख्य लोक जगात सगळीकडं आहेत, याची जाणीव ठेवणं आवश्‍यक आहे. असे लोक केवळ अंकारा विमानतळावर व कॅनडातच आहेत असं नाही. भारताच्या खेड्यापाड्यात पसरलेले सामाजिक कार्यकर्ते, अनेक पाकिस्तानी बालकांचं जीवन वाचवणारे बंगळूरच्या एका हॉस्पिटलमधले वैद्यकीय तज्ज्ञ, काश्‍मीरच्या खेड्यात काम करणारे महाराष्ट्रातले युवक, सीरिया व इराकमध्ये पसरलेले रेड क्रॉसचे कार्यकर्ते हे सगळे मूल्यांवर जगाची उभारणी करणारे शिल्पकार आहेत. मानवतेच्या शत्रूंपेक्षा मानवतेच्या या आधारस्तंभाकडं आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे!

Web Title: the backbone of humanity

टॅग्स