छोट्या खलनायकांची मोठी गोष्ट

‘शोले’मधील खुंखार डाकू गब्बर सिंगसोबतच घराघरांत पोचलेले नाव म्हणजे सांबा. ते साकारले होते मॅकमोहन यांनी. मॅकमोहन यांचा अलीकडेच जन्मदिन होता.
sholay movie
sholay moviesakal
Summary

‘शोले’मधील खुंखार डाकू गब्बर सिंगसोबतच घराघरांत पोचलेले नाव म्हणजे सांबा. ते साकारले होते मॅकमोहन यांनी. मॅकमोहन यांचा अलीकडेच जन्मदिन होता.

- बालाजी विट्टल, ट्विटर @vittalbalaji

‘शोले’मधील खुंखार डाकू गब्बर सिंगसोबतच घराघरांत पोचलेले नाव म्हणजे सांबा. ते साकारले होते मॅकमोहन यांनी. मॅकमोहन यांचा अलीकडेच जन्मदिन होता. बॉलीवूडमध्ये मॅकमोहनसारखे दुसऱ्या फळीतले असंख्य खलनायक होऊन गेले. हे सर्वजण हिंदी चित्रपटाचा अविभाज्य अंग होते, मात्र शेवटपर्यंत त्यांना मुख्य खलनायक होता आलं नाही. हे सर्व आपल्याला आठवतात मात्र नावाने नव्हे तर चेहऱ्याने.. अशाच बॉलीवूड फूट सोल्जर म्हणजे दुय्यम, छोट्या खलनायकांची ही कहाणी...

एका प्रदर्शित होऊ घातलेल्या चित्रपटाचं स्क्रिनिंग १९७५ च्या पावसाळ्यातील एकेदिवशी बंगळुरूमध्ये करण्यात आलं होतं. स्क्रिनिंग संपून सगळे थेटरच्या बाहेर आले. तेव्हा चित्रपटात आपल्या भूमिकेची प्रचंड काटछाट झाल्यामुळे नाराज झालेल्या एका अभिनेत्याने आपली भूमिका असलेले पात्र काढून टाकण्याची विनंती दिग्दर्शकाला केली. नाराजी व्यक्त करत तो म्हणाला, ‘‘रमेशजी, हे असं कसं होऊ शकतं? सिनेमात मी राखीव पात्र झालोय. मला खरंच काढून टाका. मला नकोय ते.’’ त्यावर दिग्दर्शक म्हणाले, ‘‘हे पिक्चर चाललं ना, तर ‘सांबा’ला (तुझं पात्र) कुणीही विसरू शकणार नाही.’’ आणि त्यांचं भाकीत खरं ठरलं. ‘पुरे पचास हजार’ या तीन शब्दांच्या एकाच संवादामुळे ‘सांबा’ हे या चित्रपटातील सर्वात जास्त आठवणीत राहील, असं पात्र ठरलं. तो नट होता मॅकमोहन आणि दिग्दर्शक होते रमेश सिप्पी!

अभिनेते मोहन मकीजनी (मॅकमोहन) यांच्या ८५ व्या जन्मदिवसानिमित्त जो आताच २४ एप्रिलला होऊन गेला, आपण त्यांना अभिवादन करू या. ते अशा अभिनेत्यांपैकी होते, जे छोट्यातल्या छोट्या भूमिकेतसुद्धा आपले शंभर टक्के द्यायचे. यानिमित्ताने आपण त्या असंख्य ‘बॅड बॉईज’ना श्रद्धांजली वाहू, ज्यांचे चेहरे आपल्या क्वचितच लक्षात असतात आणि चित्रपटाच्या श्रेयनामावलीत ज्यांना स्थान मिळत नाही. उदाहरणार्थ दिवार (१९७५) या चित्रपटातील पिटरच्या गँगचा अभिताभ बच्चनसोबतचा फाईट सिक्वेन्स पाहा. बरं तुम्हाला माहीतही नसेल की पिटरचं खरं नाव कुलजित होतं. १९६७ च्या फिल्मफेअर टॅलेंट शोमधून ज्या मोजक्या स्पर्धकांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं त्यातील एक तो होता. पण कुलजितला नशिबाने साथ दिली नाही आणि त्याला खलनायकाच्या हाताखालचा वगैरेसारख्या सहाय्यक भूमिका स्वीकाराव्या लागल्या. ‘दिवार’मधील त्याची भूमिका ही अशाच भूमिकांपैकी एक बऱ्यापैकी माहीत असलेली. नंतर अनेक वर्षांनी त्याने कोलकत्यातील चौरंगी रोड येथे खेळाडूंच्या कपड्यांचे दुकान काढले.

डाकू, गुंड, गँगस्टर्स, स्मगलर्स आणि माफिया अशा टोळीमध्ये काम करणाऱ्या खलनायकाची गरज असायची तेव्हा अशा (ज्यांना एक्स्ट्राज म्हटले जायचे) अभिनेत्यांना मागणी असायची. डझनभर घोडे खडखडाट करत जात असल्याचा अनुभव आपण डाकूपटांमध्ये घेतला आहे. काळाबाजार, तस्करी, खंडणी, अपहरण आणि सुपारी घेऊन खून करणे यांसारख्या विविध कारवाया करण्यासाठी गुंड आणि स्मगलर्सना अशा फूट सोल्जर्सची गरज असायची. या फूट सोल्जर्सना गुंड असं म्हटलं जातं, जे माफिया टोळीचे अतिशय तळातले सैनिक असतात. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांच्या नेत्यांचे ते गुलाम आहेत. आपल्याला नेमून दिलेले कार्य यशस्वीपणे पार पाडणे त्यांना अनिवार्य आहे आणि गद्दारीला माफी नाही! गळ्याभोवती रुमाल बांधून, अंगठा आणि तर्जनीच्या चिमटीत धरलेली सिगारेट ओढत ते दुबळ्या लोकांना धमकावणारे बाऊन्सर बनतात. हप्ता वसूल करणारे, राजकारण्यांचे गुंड, गरीब भाडेकरूंना घराबाहेर काढणारे जमीनदारांचे भाडोत्री किंवा दुष्ट राजकारण्यांसाठी गुंडगिरी करणारे बनतात.

मॅकमोहन, भगवान सिन्हा, हिरालाल, मोहन शेरी, भारत गोपी, बॉब ख्रिस्टो, युसूफ, डॅन धनोवा आणि शेट्टी या अभिनेत्यांनी साकारलेले जग्गू, जो, मॅक, जॅक, पिटर, दिलावर, झेबिस्को, ब्रिगॅन्झा आणि अर्थातच शेट्टी हे त्या गुंडांचे प्रतिनिधी होते, जे बाई आणि बाटली एवढ्याच कमाईवर आयुष्यभर राबायचे. फक्त दोन ते तीन दृश्यांमध्ये ते दिसायचे, पण यावरच प्रेक्षकांच्या आरोळ्या आणि जोरजोरात शिट्ट्या यायच्या. एवढा त्यांचा प्रभाव असायचा. उदाहरणार्थ ग्रेट गॅम्बलर (१९७९) मधील शेट्टीचा अमिताभ बच्चनसोबत असलेला व्हेनिसमधील फाईट सिक्वेन्स. एका कोल्ड स्टोरेजमध्ये जिथे मांस इतस्ततः विखरून पडलेले आहे, अशा ठिकाणी लालबुंद डोळ्यांचा मार्टिन (शेट्टी) आपल्या कुऱ्हाडीचे घाव नायकावर घालत आहे. हे दृश्य त्या काळात खूपच हिंसक समजले गेले होते. त्यामुळे सेन्सॉरने याला ‘फक्त प्रौढांसाठी’ हे प्रमाणपत्र दिले होते.

यातील सर्वच काही शारीरिकदृष्ट्या आडदांड नव्हते. बाजीमधील पेड्रो (राशीद खान) हा किरकोळ शरीरयष्टीचा असूनही गँगचा महत्त्वाचा भाग होता. राखाडी सूट घातलेला, अतिशय व्यवस्थित पोषाख केलेला, हातात छडी असलेला पेड्रो अतिशय आत्मविश्वासाने जुगाराच्या अड्ड्यात शिरतो. पेड्रो हा धूर्त मांडवली बादशहा आणि सौदेबाज आहे. या गुंडांकडे (कधीकधी यांना दादा म्हटले जायचे) स्वतःच डॉन बनण्याइतके नेतृत्व कौशल्य सहसा नसते. ज्याप्रमाणे हाऊस नं. ४४ (१९५५) मधील बॉस नवीनच भरती झालेल्या गुंडाला म्हणतो, ‘‘कान और आँख खुले, मुँह बंद...’’

काळाच्या ओघात या चिल्लर गुंडांना थोडा अधिक मोबदला मिळू लागला. कारण त्यांना आता ठगांसाठी मोठमोठी कंत्राटे घ्यायची होती. अर्थात इथे त्यांच्या जीवाला असणारा धोका वाढला होता. काळाबाजार करणारा किंवा बाऊन्सर म्हणून ते काम करू लागले. पण पकडले गेले तर काही महिन्यांचा तुरुंगवास निश्चित, पण अत्यंत भयाण रात्री बंदरावर टॉर्च घेऊन इशारा देणे, गनमॅन किंवा खबऱ्या म्हणून काम करणे यात पोलिस किंवा विरोधी टोळीकडून मारले जाण्याचा धोका आलाच. किंवा काही वेळा तर त्यांच्या स्वतःच्या टोळीकडूनच. त्यांचे बॉस त्यांचा वापर टिश्यू पेपरसारखा करतात. जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना गोळ्या घालून ठार मारले जाते किंवा जिवंत जाळले जाते. मग कसला विश्वास आणि कसली निष्ठा?

हे गुंड दुःखद आयुष्य जगतात आणि तसाच मृत्यू पत्करतात. दुर्दैव म्हणजे शेट्टी, मॅकमोहन, बॉब ख्रिस्टो, युसूफ, डॅन धनोआ आणि सलीम घौस यांसारख्या अभिनेत्यांनाही मुख्य खलनायकाची भूमिका साकारायला मिळाली नाही. ते आपल्या हयातभर जी हुजुरी करणाऱ्या दुय्यम खलनायकाच्या भूमिकाच करत राहिले, पण या विस्मृतीत गेलेल्या खलनायकांशिवाय आपण ॲक्शन मूव्हीजची कल्पना करू शकतो का?

(लेखक पुरस्कारप्राप्त लेखक असून, ‘प्यूअर इव्हिल - द बॅड मॅन ऑफ बॉलिवूड’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com