माध्यमांचा 'खेळ' (सायली क्षीरसागर)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

मोबाईलवर मनोरंजनासाठी अनेक उत्तम ऍप्स विकसित करण्यात आली आहेत. एकच व्हिडिओ एकाच वेळी अनेकांनी बघण्यापासून ते एकाची कविता दुसऱ्यानं पूर्ण करण्यापर्यंत किती तरी गोष्टी या ऍप्सद्वारे साध्य होतात. अनेक माध्यमांचा हा 'खेळ' अर्थातच मन प्रसन्न करतो. 

मोबाईलवरची ऍप्स अनेकदा आपण फक्त कामांसाठीच वापरतो. मात्र, या ऍप्सद्वारे अत्यंत उत्तम प्रकारे मनोरंजनही होऊ शकतं. मोबाईल किंवा स्मार्ट फोन हे माहितीचं आणि मनोरंजनाचं भंडार आहे, त्यामुळं आपणही त्याचा पुरेपुर उपयोग करून घ्यायला हवा. स्मार्ट फोनवर अशी काही ऍप्स आहेत, ज्यामुळं आपला वेळ मस्त जातो. एखादा चित्रपट, गाणी अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून, एकाच ऍपवरून, एकाच वेळी तेही गप्पा मारत बघू शकतील, असा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना?... तर मग आता डाऊनलोड करा अशी काही मल्टिमीडिया ऍप्स.

मनोरंजनाबरोबरच आपल्या लोकांसोबत क्वालिटी टाइम घालवण्याची संधी देणारी. 
काही मल्टिमीडिया ऍप्स अशी आहेत, जिथे आपण स्वत: सहभागी होऊ शकतो. ज्यांना गाणी म्हणायची, कविता करून सगळ्यांना ऐकवायची, स्वत:चे वेगवेगळे व्हिडिओ काढून अपलोड करायची आवड असते, अशांसाठीही काही इंटरेस्टिंग ऍप्स प्लेस्टोअरवर उपलब्ध आहेत. अशी काही ऍप्स आहेत, ज्यामध्ये आपण गाणी म्हणण्याची पुरेपूर हौस भागवू शकतो, तेही म्युझिकसह... आपला आवाज कसाही असला, तरी या ऍपमध्ये गाणं म्हणताना एखाद्या गायकापेक्षा आपण कमी नसतो ही त्या ऍपचीच कमाल! अशाच काही ऍप्सची माहिती तुमच्यासाठी.. 

टुगेदरिंग (Togethring) : 
या मल्टिमीडिया ऍपमध्ये अनेक युजर्स वेगवेगळ्या स्मार्ट फोन्सवरून एकाच वेळी व्हिडिओ, फोटो, गाणी यांचा एकत्रितपणे आस्वाद घेऊ शकतात. या ऍपमध्ये ग्रुप तयार करून त्या ग्रुपमधल्या सर्वांसोबत एकाच वेळी एखादा चित्रपट, गाणी किंवा फोटो बघू शकतो. इतकंच नाही, तर त्याचवेळी त्या ग्रुपमधील सदस्यांशी चॅटवर किंवा व्हॉईस कॉलवर बोलूही शकतो. व्हिडिओ बघताना ग्रुपमधल्या कोणाचंही फॉरवर्ड, रिवाइंड, पॉझ यांवर नियंत्रण असू शकतं.

उदाहरणार्थ, एखादा चित्रपट 'टुगेदरिंग' स्क्रीनवर सुरू आहे, ग्रुपवरच्या एकानं विशिष्ट सीन पॉझ केला, तर तो ग्रुपमधल्या सगळ्यांकडे पॉझ होईल. यूट्युब, फोन गॅलरी यामधल्या सर्व गोष्टी आपण टुगेदरिंगवर बघू शकता. याशिवाय या ऍपमध्ये 'अलोन मोड' आहे, जेणेकरून आपण एकटेदेखील या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता. या ऍपमध्ये तुम्ही जे काही बघाल, ते क्‍लाऊड स्टोरेजवर सेव्ह होईल, मोबाईलची मेमरी खर्च होणार नाही. या ऍपमध्ये T-cafe नावाचं इनबिल्ट फिचर आहे, ज्यावर तुम्ही व्हिडिओ, ऑडिओ, फोटो अपलोड करू शकता. हे ऍप जाहिराती, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट मीटिंग्ज, सेलिब्रिटी, कवी या सर्वांना चर्चेसाठी माध्यम उपलब्ध करून देणारं, उपयुक्त असं ऍप आहे. 
प्लॅटफॉर्म : अँड्रॉइड 

विगो व्हिडिओ (Vigo Video) : 
या ऍपद्वारे तुम्ही स्वत: व्हिडिओ तयार करून अपलोड करू शकता. रोजच्या आयुष्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण शूट करून यावर अपलोड करू शकतो. इतकंच नाही, तर याचा मोबदला म्हणून आपल्याला बक्षीसही मिळतं. तीस सेकंदांचा व्हिडिओ आपण यावर पोस्ट करू शकतो. चांगल्या व्हिडिओंना 'फ्लेम्स' मिळतात, ज्यामुळं आपण बक्षीसरूपात पैसे कमवू शकतो. या ऍपवरच्या फिल्टर्स, ब्युटिफाय फिचर, व्हिडिओ इफेक्‍ट्‌स आणि एडिटिंग टूलचा वापर करून आपण आकर्षक व्हिडिओ तयार करू शकतो. या ऍपवर आपण टाकलेले व्हिडिओ हिप्स्टार कम्युनिटीवर वायरल होतात, ज्यावर इतर युजर्स लाइक्‍स आणि कॉमेंट्‌स करतात. या ऍपमुळं सामान्य शॉर्टफिल्ममेकर, गायक, संगीतकार, फोटोग्राफर, कलाकार यांना उपयुक्त असा प्लॅटफॉर्म मिळतो. या ऍपवर दररोज दोन लाइव्ह क्विझ घेतली जातात. ती जिंकली, तर आकर्षक बक्षिसं मिळतात. 
प्लॅटफॉर्म : अँड्रॉइड, आयओएस 

म्युझिकली (Musical.ly): 
या ऍपमध्ये नावाप्रमाणंच संगीत आणि गाण्यांना विशेष प्राधान्य आहे. या ऍपमध्ये जगभरातल्या विविध गाण्यांचे साऊंड ट्रॅक आहेत, ज्यावर आपण स्वत: गाणं म्हणू शकतो आणि ते शेअर करू शकतो. गाण्यांप्रमाणंच चित्रपटांतले संवादही आपण रेकॉर्ड करून शेअर करू शकतो. या ऍपद्वारे फनी व्हिडिओ तयार करून शेअर करणं जास्त लोकप्रिय आहे. या ऍपमधल्या व्हॅनिशिंग, स्लो मोशन, क्विक मोशन, व्हीएफएक्‍स या इफेक्‍टचा वापर करून आकर्षक गाणी आणि व्हिडिओ तुम्ही तयार करू शकता. याशिवाय तुम्ही स्वत: तयार केलेला म्युझिक ट्रॅकही या ऍपवरच्या सदस्यांना ऐकवू शकता. ही सर्व कलाकारी आपण ऍपवर शेअर करून लाइक्‍स, कॉमेंट्‌स मिळवू शकतो. यामुळं आपल्यात दडलेल्या कलाकाराला वाव मिळू शकतो. 
प्लॅटफॉर्म : अँड्रॉइड, आयओएस 

हायकूजाम (HaikuJAM - Poetry Together) : 
हे अत्यंत आगळंवेगळं आणि इंटरेस्टिंग ऍप आहे. कवीमंडळींसाठी उपयुक्त आणि त्यांना एक प्रभावी माध्यम मिळवून देणारं असं हे ऍप. या ऍपद्वारे मोठ्या प्रमाणात सुसंवाद होतो. हायकूजाम ही मूळ संकल्पना जपानी आहे. हायकूचा अर्थ जपानीमध्ये कमी शब्दांची कविता असा होतो. त्यामुळं या ऍपवर युजर्स काही लहान कविता किंवा शेर टाकतात, ज्याला जगभरातले इतर लोक त्यालाच साजेल अशा पुढच्या ओळी टाकतात. अशा प्रकारे तुम्ही टाकलेली कविता हायकूजामची जगभरातली कम्युनिटी वाचते आणि त्याला उत्तमोत्तम अशा संबंधित कविता मिळतात. याशिवाय या ऍपमध्ये तुम्ही तुमच्या कविता, शेरोशायरी पोस्ट करू शकता. ज्या प्रकारच्या कवितांची आवड आहे, तो प्रकारही या ऍपमध्ये आपण निवडू शकतो. अनेक वेळा या ऍपमध्ये कवितांची जुगलबंदीही चालते! अशा प्रकारे जगातल्या कानाकोपऱ्यातून तुम्ही हायकूजाममध्ये सहभागी होऊ शकता आणि कवितांचा आनंद लुटू शकता. 
प्लॅटफॉर्म : अँड्रॉइड, आयओएस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com