एका चटणीची चविष्ट कहाणी (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)

भाग्यश्री भोसेकर-बीडकर bhagyashreebhosekar@gmail.com
रविवार, 15 एप्रिल 2018

"चटनी' ही शॉर्टफिल्म विवाहबाह्य संबंधाचा विषय एका अगदी वेगळ्या प्रकारे उलगडते. यातल्या नायिकेनं सांगितलेली चटणीची ही गोष्ट केवळ एका पदार्थाची नाही. संसार वाचवण्यासाठी तिनं केलेल्या युक्तीची, नाती टिकवण्याच्या प्रयत्नाचीही ती चविष्ट गोष्ट आहे.

"चटनी' ही शॉर्टफिल्म विवाहबाह्य संबंधाचा विषय एका अगदी वेगळ्या प्रकारे उलगडते. यातल्या नायिकेनं सांगितलेली चटणीची ही गोष्ट केवळ एका पदार्थाची नाही. संसार वाचवण्यासाठी तिनं केलेल्या युक्तीची, नाती टिकवण्याच्या प्रयत्नाचीही ती चविष्ट गोष्ट आहे.

मानवी नातेसंबंध ही म्हटलं तर सर्वांत सोपी, म्हटलं तर अनेक क्‍लिष्ट बाबींपैकी एक. प्रत्येकाच्या नात्याच्या व्याख्या वेगळ्या, नातं निभावण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या. मात्र, कुठल्याही नात्याचा पाया म्हणजे "विश्वास.' मग पती-पत्नीच्या नात्यातला हा विश्वासच हरवला तर? "चटनी' ही हिंदी शॉर्टफिल्म पती-पत्नीच्या या नात्याबद्दल भाष्य करते. चटणी हा आपल्या ताटातला महत्त्वाचा पदार्थ. चटणीला भाजीइतका मान नाही; पण तिच्याशिवाय जेवणही अधुरंच. चटणी म्हणजे आंबट, गोड, तिखट सगळ्या चवीचं मिश्रण. अर्थात पती-पत्नीच्या नात्याचा या चटणीशी काय बादरायण संबंध जोडला जातोय, असा प्रश्न अनेकांच्या मनात येईल. या प्रश्नाचं उत्तर हळूहळू उलगडून बघू.

कथा घडते एका छोट्याशा शहरात. बक्कळ पैसा कमावणारा, उत्तम पदावर असणारा एक पती आणि संसार, घर व लेडीज असोसिएशन समर्थपणे सांभाळणारी, चालवणारी त्याची पत्नी. हे त्या शहरातलं प्रसिद्ध जोडपं. लेडीज असोसिएशन चालवत असली, तरी राहणीमान अतिशय साधं असलेली विचारांनी भोळसट अशी ती. तिच्या यशावर जळणारे, तिच्या पाठीमागं कुजबुजणारे लोक तिला माहीत आहेत; पण ती त्यांना प्रत्युत्तर करत नाही. दुसरीकडं तिच्याच मैत्रिणीसोबत विवाहबाह्य संबंध असलेला तिचा पती. याविषयीही शहरात कुजबुज सुरू आहेच.

आपल्या पतीचे आपल्याच मैत्रिणीसोबत संबंध आहेत, हे कटू सत्य समजल्यावर एखाद्या स्त्रीची साधारणपणे काय प्रतिक्रिया असेल? राग येणं, चिडचिड, त्रागा होणं किंवा मग असहायतेचा, दुर्दैवी असल्याचा फील येणं वगैरे? मात्र, या कथेतली स्त्री नेमकी याच बाबतीत वेगळी आहे. ती सत्य परिस्थिती जाणून आहे; पण तिला रडत बसण्यात, हातपाय गळण्यात रस नाहीये. तिला धडा शिकवायचाय पतीला आणि त्याही आधी स्वतःच्या मैत्रिणीला. असं म्हणतात, की बऱ्याचदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हेच धोरण "चटनी'मधली नायिका अवलंबते.

नेमकी कोणती युक्ती कथेतली नायिका वापरते? नायिकेच्या मैत्रिणीला नायिकेकडून स्वयंपाक शिकायचा असतो. आदल्या दिवशी पार्टीत पतीची मैत्रिणीसोबत चाललेली सलगी नायिका पाहते आणि मग स्वयंपाक शिकवण्याचं निमित्त साधून नायिका मैत्रिणीला घरी येण्याचं निमंत्रण देते. ठरल्याप्रमाणं नायिकेची मैत्रीण नायिकेच्या घरी पोचते. आता मैत्रीण घरी आली, की खाणंपिणं, गप्पाटप्पा आल्याच. नायिकेचा इथं "पकोडे' आणि "चटनी'चा बेत आहे. आता ही चटणी खूप महत्त्वाची आहे. ही चटणी घरच्या मिरच्या आणि कोथिंबीर वापरून बनवली गेलीय. नायिकेनं आपल्या मैत्रिणीला जी चटणी खायला दिली आहे त्यामागं एक कहाणी आहे. ती अर्थपूर्ण आहे आणि नायिकेच्या मैत्रिणीच्या पर्यायानं प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. या चटणीमागची कहाणी काय आहे, एका साध्याशा चटणीमागची कहाणी काय एवढी विशेष असू शकते, अशा प्रश्नांची उत्तरं शॉर्टफिल्म पाहून मिळवणं जास्त सयुक्तिक ठरेल. मात्र, नायिकेची मैत्रिणीला अद्दल घडवण्याची युक्ती आणि पद्धत दोन्हीही छानच.

या शॉर्टफिल्ममध्ये नायिकेचा हा प्रवास पाहताना राहूनराहून व. पु. काळे यांची एक कथा सतत आठवत होती. त्या कथेतल्या नायिकेच्या घरी काही कार्यक्रमानिम्मित तिची मैत्रीण काही दिवसांकरता वास्तव्यास येते. या काळात नायिकेचा पती आणि तिची मैत्रीण एकमेकांकडे आकर्षिले जातात. ही परिस्थिती नायिकेच्याही ध्यानात येते; पण ती कोणताही आततायी निर्णय न घेता, शांतपणे युक्तीनं आणि प्रेमानं पतीला अप्रत्यक्षपणे त्याची चूक दाखवून देते. "चटनी' या शॉर्टफिल्ममधली ही नायिका आणि वपुंच्या कथेतली नायिका या दोघीही मार्ग अवलंबण्याच्या बाबतीत सारख्या आहेत.

या शॉर्टफिल्ममधल्या नायिकेची भूमिका साकारली आहे टिस्का चोप्रा या कसलेल्या अभिनेत्रीनं. अनेक चित्रपटांत काम केलेल्या टिस्कानं या फिल्ममध्ये मूळची गाझियाबाद (उत्तर प्रदेश) या शहराच्या असणाऱ्या बाईची भूमिका साकारलीय. टिस्काच्या बोलण्यात उत्तर प्रदेशीय लहेजा जाणवतो. नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका साकारलीय रसिका दुगल हिनं. ठसकेबाज बोलणारी, नजाकतीत चालणारी नखरेल मैत्रीण रसिकानं खूप छान निभावलीय. प्रसंगानुरूप रसिकाच्या चेहऱ्यावर येणारे धूर्त आणि बिलंदर भाव कौतुकास्पद. नायिकेच्या बाहेरख्याली पतीची भूमिका केलीय आदिल हुसेन यांनी. पदाचा, पैशाचा माज असणारा, पत्नी गाझियाबादसारख्या छोट्याशा शहरातून आलीय म्हणून तिला पदोपदी कमी लेखणारा, घालूनपाडून बोलणारा पती हुसेन यांनी पडद्यावर छान साकारला आहे. या शॉर्टफिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन एकाच व्यक्तीनं केलंय म्हणजेच ज्योती कपूर-दास यांनी. या शॉर्टफिल्ममध्ये भोला या नोकराचं एक पात्र आहे. त्याला शॉर्टफिल्ममध्ये संवाद नाहीत; मात्र केवळ चेहऱ्याच्या हावभावाच्या जोरावर संबंधित कलाकारानं ही भूमिका छान साकारली आहे. तर अशी वरवर पाहता साधी वाटणारी; पण खूप काही शिकवून जाणारी आणि मुख्य म्हणजे एका पत्नीच्या आपला संसार वाचवण्यासाठी लढलेल्या लढाईची गोष्ट. नक्की पाहावी अशी शॉर्टफिल्म "चटनी.'

Web Title: bhagyashree bhosekar write article in saptarang