सर्व सर्व विसरु दे... गुंतवू नको पुन्हा! (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)

bhagyashree bhosekar-bidkar
bhagyashree bhosekar-bidkar

आपलं एकमेकांत मानसिक पातळीवरचं गुंतणं नेमकं कशा प्रकारचं आहे...केवळ मैत्रीचं की त्याही पुढचं की आणखी कुठल्या प्रकारचं? दोन जीव अकल्पितपणे एकत्र आले, की त्यांच्या मनात अशा प्रश्‍नांची वलयं उमटणं अगदी साहजिक. या गुंतलेपणाचेच गहिरे रंग उलगडण्याचा प्रयत्न "इट हॅपन्ड्‌ इन हॉंगकॉंग' ही वेब सिरीज करते...

हल्ली "सोलो ट्रिप' ही गोष्ट केवळ कल्पनेतली उरलेली नसून प्रत्यक्षात खूप जणांनी ती अनुभवलेली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी इंटरनेटवर, फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर अशा सोलो ट्रिप्स करणाऱ्यांचे ब्लॉग्ज्‌ वाचले असतील, त्यांच्या अनुभवांविषयी ऐकलं असेल. त्यांचे अनुभव वाचताना आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटलं असेल, की हे किती आनंददायी आणि साहसी आहे? तर काही जणांना असंही वाटलं असेल की हे असं एकट्यानं फिरणं कितपत सुरक्षित आहे? किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर ट्रिपला जाण्यात जी मजा आहे, ती सोलो ट्रिपमध्ये येईल का? प्रत्येकाची आपापली मतं...!
तर आजची वेब सिरीज अशा "सोलो ट्रिप' या कल्पनेवरच आधारलेली असून, तिचं नाव आहे "इट हॅपन्ड्‌ इन हॉंगकॉंग'.

आहाना नावाची मुंबईकर मुलगी हॉंगकॉंग या शहरात सोलो ट्रिपचे वेगवेगळे अनुभव घेतेय. आहानाला नोकरीवरून नुकतंच काढून टाकण्यात आलंय. गेली 10 वर्षं केवळ काम आणि काम करून थकलेल्या आहानाला आता स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. जगभर फिरणं आणि आपण ज्या ज्या ठिकाणी फिरलो, त्या त्या ठिकाणांविषयी आपल्या "ट्रॅव्हल बुक'मध्ये लिहिणं हा आहानाचा छंद आहे आणि या छंदाला आपल्याला वेळ देता यावा, असा तिचा उद्देश हॉंगकॉंग या शहरात पर्यटक म्हणून येण्यामागं आहे. हॉंगकॉंगमध्ये फिरता फिरता तिला अमोल हा दिल्लीस्थित भारतीय मुलगा भेटतो. योगायोगानं अमोलही त्याच्या बिझनेसनिमित्त हॉंगकॉंगमध्ये काही दिवसांसाठी वास्तव्याला आला आहे.

आणि मग एका कॅफेमध्ये कॉफी पिता पिता अमोल आहानाला विचारतो ः ""उरलेले दिवस आपण हॉंगकॉंगची ट्रिप एकत्र अनुभवायची का?'' अमोलच्या या प्रश्नावर आहाना सुरवातीला आढेवेढे घेते; पण नंतर "हो' असं उत्तर देते आणि मग आता अमोल आणि आहाना अशा दोन दोस्तांची हॉंगकॉंगची भटकंती सुरू होते.
प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतो. तसाच आहानाचाही आहे आणि अमोलचाही आहे. ट्रिपमध्ये आहाना आणि अमोल एकमेकांचे चांगले मित्र बनतात. एकमेकांच्या गतकाळाविषयी कडू-गोड आठवणी एकमेकांशी शेअर करतात. मोकळेपणानं एकमेकांशी बोलतात. आहाना तशी गप्पीष्ट आणि मनातलं सगळं बोलून टाकणारी मुलगी आहे; पण अमोलचं तसं नाहीये. ट्रिपच्या काळात अमोल आहानापासून काहीतरी लपवत असतो आणि आहानाच्या ते लक्षात आल्यावर तिथंच आहाना आणि अमोल यांच्यात गैरसमज निर्माण व्हायला लागतात. मग पुढची ट्रिप कशी पार पडते? हे दोघं एकमेकांना परत कधी भेटतात का? त्यांच्यातले गैरसमज दूर होतात का? या प्रश्नांची उत्तरं ही वेब सिरीज पाहूनच मिळवणं उचित ठरेल.

अवघ्या चार एपिसोडची ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या बऱ्यापैकी लक्षात राहते. थोडक्‍यात; पण गोडीगुलाबीत वेब सिरीजचा शेवट केल्यानं ती फार ताणली गेल्याचा किंवा कंटाळवाणी झाल्याचा फील येत नाही. मार्च 2018 मध्ये ही वेब सिरीज आली होती. पाहण्यासाठी ती यू ट्यूबवर उपलब्ध आहे. डोएल हर्ग्युन आणि आयेशा सिद्दिकी यांनी ही वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे. मूळ कल्पना सायनी शेट्टी आणि अमोल पराशर यांची असून, कल्पनाविस्तारही त्यांनीच केला आहे. वेबसिरीजची कल्पना टिपिकल बॉलिवूड सिनेमानं प्रेरित झाल्यासारखी वाटते. शिवाय, मध्ये मध्ये कुठंतरी
"करण जोहर सिनेमा टाइप दृश्‍यं' पाहिल्याचाही फील येतो; पण शेवट योग्य वेळी आणि योग्य त्या रंजक पद्धतीनं केल्यामुळं ही वेब सिरीज लक्षात राहते.

आहानाची भूमिका केली आहे आहाना कुमरा या अभिनेत्रीनं. "लिपस्टिक अंडर माय बुरखा'सारख्या नावाजल्या गेलेल्या चित्रपटात आहानानं लक्षात राहील अशी भूमिका वठवली होती. या वेब सिरीजमधली तिची भूमिका अशीच लक्षात राहणारी आहे. अमोलशी स्वतःच्या भूतकाळाविषयी विश्वासानं बोलणारी, अमोलमध्ये नकळत गुंतत जाणारी, त्याच्या बाबतीत पझेसिव्ह होऊन विचित्र वागणारी; पण त्याच वेळी "आपल्यात केवळ मैत्री आहे,' असं अमोलला भासवणारी आहाना काहीशी गूढ वाटते. अमोलची भूमिका केली आहे या वेब सिरीजचा कल्पनाविस्तार करणारा आणि अनेक वेब सिरीजमध्ये व काही चांगल्या चित्रपटांमध्ये काम करणारा कलाकार अमोल पराशर यानं. मनातल्या मनात काही गोष्टी दडवून ठेवणारा एकाकी अमोल, आपण आहानामध्ये गुंतत चाललो आहोत, हे समजल्यावर मनातून हादरणारा अमोल प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहतो.

तुमच्याकडे चित्रपट पाहण्याइतका वेळ नसेल; पण काहीतरी मनोरंजक पाहायची इच्छा असेल, तर नक्की पाहा ही वेबसिरीज..."इट हॅपन्ड्‌ इन हॉंगकॉंग...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com