
भूमिका सकारात्मक असो की नकारात्मक वा गंभीर स्वरूपाची, इरफान खानने प्रत्येक भूमिका समरसून साकारली आहे.
भूमिका जगणारा अभिनेता!
- भारती आचरेकर
भूमिका सकारात्मक असो की नकारात्मक वा गंभीर स्वरूपाची, इरफान खानने प्रत्येक भूमिका समरसून साकारली आहे. त्याचा अभिनय सहजसुंदर आणि खऱ्या अर्थाने नैसर्गिक होता. प्रत्येक भूमिकेचा तो बारकाईने विचार करायचा आणि ती भूमिका पडद्यावर लीलया साकारायचा. प्रत्येक भूमिका तो जगला. तो आपल्या भूमिकेतील भावभावना डोळ्यांतून छान व्यक्त करायचा. त्याची ती वेगळी खासियत होती आणि म्हणूनच तो सगळ्यांचा लाडका अभिनेता होता. इरफान खान जाऊन आता तीन वर्षें झाली, पण तो आजही आठवतो त्याने साकारलेल्या अजरामर भूमिकांमुळेच.
मी आणि इरफान खान आम्ही ‘द लंच बॉक्स’ या चित्रपटाचा एक भाग होतो. रितेश बत्राने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. इरफानबरोबरच नवाजुद्दीन सिद्धिकी, निमरत कौर आदी कलकारांनी या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट साधारण दहाएक वर्षांपूर्वी आला होता. या चित्रपटाचे समीक्षकांसह सगळ्यांनी कौतुक केले. त्यावेळी एक व्यक्ती म्हणून इरफानचा मला तसा फारसा परिचय झालेला नव्हता. कारण त्या चित्रपटात मी पडद्यावर कुठेच दिसलेले नव्हते. फक्त माझा आवाज त्या चित्रपटासाठी होता. त्यामुळे चित्रपटातील कुणाशीच माझे तसे बोलणे व्हायचे नाही. इरफानशीसुद्धा फारसे बोलणे झालेले नव्हते. आमचा परिचय झाला होता तो ‘द किलर'' या चित्रपटात काम केल्यामुळे!
२००६ साली आम्ही ‘द किलर’ हा चित्रपट केला होता. हसनैन हैदराबादवाला आणि रक्षा मिस्त्री हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. हा एक क्राईम थ्रिलर ड्रामा या जॉनरचा चित्रपट होता. त्या चित्रपटात मी इमरान हाश्मीच्या आईची भूमिका साकारली होती. इरफानही त्या चित्रपटात होता. या चित्रपटात त्याची निगेटिव्ह भूमिका होती आणि त्याने आपल्या वेगळ्या स्टाईलने ती साकारली होती. निगेटिव्ह भूमिका आहे म्हणून कुठेही आततायीपणा वा आक्रस्ताळेपणा त्याच्या भूमिकेत नव्हता. त्याने ती भूमिका आपल्या आगळ्यावेगळ्या संवादफेकीने आणि संयत अभिनयाने लीलया साकारली. त्याची देहबोली आणि स्टाईल यामुळे त्याची ती भूमिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्या चित्रपटात इरफान आणि माझा साधारण पाच ते सात मिनिटांचा एक सीन होता. त्यावेळी त्याची व माझी फारशी काही ओळख नव्हती. कारण मी त्याला तेव्हा पहिल्यांदाच भेटले होते; परंतु पहिल्या भेटीतच तो काय ताकदीचा कलाकार आहे, याची कल्पना मला आली.
त्याच्या कामातील साधेपणा आणि सच्चेपणा मला भावला. भूमिकेशी समरस होणे वा एखादी भूमिका चपखलपणे आणि सहजरीत्या कशी साकारावी हे त्याच्याकडून शिकण्यासारखे होते. त्याच्याबरोबर काम करताना मला एक वेगळाच आनंद झाला. सेटवर तो शांत आणि आपल्या कामाचा अधिक विचार करताना दिसायचा. जेव्हा आम्ही ‘द लंच बॉक्स’ चित्रपटाच्या प्रीमियरला आणि पार्टीला भेटलो तेव्हा तो खूप खूश आणि आनंदी दिसत होता. तोवर आमची चांगली ओळख झाली होती. ‘लंच बॉक्स’मधल्या माझ्या कामाचे बऱ्याच जणांना अप्रुप वाटले होते. तेव्हा इरफानदेखील मला म्हणाला होता की, ‘‘पडद्याच्या मागे राहून फक्त आवाजातून भावना व्यक्त करणे एका अॅक्टरसाठी किती आव्हानात्मक असेल..?’’ त्याला त्या गोष्टीचे खूप कौतुक वाटले होते. त्याने माझे खूप कौतुक केले. एक हरहुन्नरी आणि अष्टपैलू कलाकार, अभिनेता म्हणून तर तो अप्रतिम होताच. त्याच्या अभिनयाला काही तोडच नव्हती. भूमिका छोटी असो किंवा मोठी... प्रत्येक भूमिका तो समरसून करायचा. पानसिंग तोमर, द नेमसेक, लाईफ इन अ मेट्रो, मदारी, हिंदी मीडियम, हैदर, मकबूल, पिकू, तलवार असे अनेक चित्रपट त्याने केले. छोटा पडदा ते मोठा पडदा आणि थेट हॉलीवूड अशी त्याची वाटचाल झाली. प्रत्येक भूमिकेत तो वेगळा दिसला आणि त्याच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर वेगळे गारूड केले.
खरं तर तो व्यावसायिक पठडीतील चित्रपट करणारा अभिनेता नव्हता. तरीही त्याने काही व्यावसायिक चित्रपट केले आणि तिथेही आपले नाणे त्याने खणखणीत वाजविले. वेगळ्या धाटणीचे आणि पठडीतील चित्रपट करण्यात तो वाक्बगार होता. तिग्मांशू धुलिया, निशिकांत कामत, विशाल भारद्वाज, मेघना गुलजार, साकेत चौधरी, शुजित सरकार अशा कित्येक दिग्दर्शकांबरोबर त्याने काम केले. प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असली तरी त्याने आपल्या कामातून त्यांना आपलेसे केले. प्रत्येकाचा तो लाडका अभिनेता होता. तब्बूबरोबर त्याने ‘मकबुल’ नावाचा चित्रपट केला होता. तो माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा हा चित्रपट. इरफानने त्या चित्रपटात खूप कमालीचे काम केले होते. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. दिग्दर्शक शुजित सरकारच्या ‘पिकू’मधले त्याचे कामही मला फार आवडते. अमिताभ बच्चन, नसीरुद्दीन शहा, पंकज कपूर, मौसमी चॅटर्जी, तब्बू, दीपिका पदुकोन अशा अनेक कलाकारांबरोबर त्याने काम केले.
आपल्यापेक्षा अनुभवी असलेल्या कलाकारांबरोबर काम करताना त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले. भूमिका सकारात्मक असो की नकारात्मक वा गंभीर स्वरूपाची, त्याने प्रत्येक भूमिका समरसून साकारली आहे. सहजसुंदर आणि खऱ्या अर्थाने नैसर्गिक अभिनय कोणाचा असेल तर तो इरफानचा! त्याच्या अभिनयाची जातकुळीच निराळी होती. प्रत्येक भूमिकेचा त्याचा अभ्यास दांडगा होता. प्रत्येक भूमिकेचा तो बारकाईने विचार करायचा आणि ती भूमिका पडद्यावर लीलया साकारायचा. त्याने यशाचे शिखर गाठले होते; पण त्याकरिता त्याला अपार कष्ट आणि मेहनत घ्यावी लागली होती. कोणतीही भूमिका साकारताना त्याची स्टाईल आणि देहबोली निराळी असायची. तो आपल्या भूमिकेतील भावभावना डोळ्यांतून छान व्यक्त करायचा. त्याची ती वेगळी खासियत होती आणि म्हणूनच तो सगळ्यांचा लाडका अभिनेता होता.
२९ एप्रिल २०२० रोजी हा कलाकार आपल्यातून गेला, त्याला आता तीन वर्षें झाली आहेत. इरफानचे असे इतक्या लवकर जाणे हे इंडस्ट्रीचे खूप मोठे नुकसान आणि दुर्दैव आहे. त्याने चित्रपट क्षेत्रात केलेले काम, त्याचा सहज वावर आणि प्रत्येक भूमिकेशी एकरूप होऊन त्याने केलेला अभिनय इंडस्ट्रीतील कलावंतांना प्रेरणादायी ठरणार आहे.
(लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आहेत.)