माझा बहावा (बिपीन सांगळे)

bipin sangle
bipin sangle

"ते काही नाही. झाड लावायचं म्हणजे लावायचं. गुड्डी, कुठलं झाड लावू या?'' आजीनं मला विचारलं.
मला माझ्या शाळेच्या वाटेवरचा फुलल्यानंतरचा डेरेदार बहावा आठवला. पिवळ्या फुलांचा. ब्राईटलेमन यलो कलरचा. परीक्षा जवळ आली की फुलणारा.
"आजी, बहावा,'' मी म्हणाले.

बस निघाली. वारं लागू लागलं, तसे मी आनंदानं डोळे मिटले. शेजारी आई-बाबा होते. त्यांची बडबड सुरू होती. सनी नव्हता. त्याला कामामुळं जमलं नव्हतं. गाडीनं वेग घेतला तसा विचारांनीही वेग घेतला. गावाला जायचं हा सुटीतला ठरलेला कार्यक्रम असायचा. माझ्या लहानपणाला गावाची एक संपन्न, नक्षीदार किनार होती. त्या नक्षीमध्ये काय नव्हतं...? आता तशी मी खूप मोठी झाले आहे. माझी आणि गावचीसुद्धा परिस्थिती बदललेली आहे आता; पण मी गावाला निघालेय. आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या वळणानंतर. बसमध्ये बसल्यानंतर मन नकळत लहानपणीच्या काळात गेलं...

गावातल्या मोकळ्या हवेची आणि वातावरणाची काय मजा असते!
बस धावत होती. रस्ताही मोकळा होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनाही दूर दूरवर मोकळं मोकळं. कडेची मोठी झाडं आणि पसरलेली शेतं. आता गाव जवळ आलं होतं. माझे केस वाऱ्यावर भुरूभुरू उडत होते...अन्‌ त्या वाऱ्यावर स्वार होऊन माझं मन कधीच गावात पोचलं होतं. ते शेतात हुंदडणं, त्या विहिरीतल्या उड्या, आंबे-करवंदं आणि अंगणातल्या रात्री. किती धमाल! पण एवढंच नाही. गावाला आजी असते. माझी आजी...! प्रेमळ आजी कुणाला आवडत नाही? माझं नाव खरं तर "मोहिनी' आहे; पण अजूनही ती मला कुक्कुलं बाळ समजून "गुड्डी'च म्हणते. मला ते नाव आता आवडत नाही; पण आजीच्या तोंडून ऐकताना ते गोडही वाटतं. माझी आजी आहेच तेवढी गोड. मधासारखी.
आजीचा माझ्यावर खूप जीव आहे. गावाला आमचं मोठ्ठं शेत आहे. तिथं आजी-आजोबा दोघंच राहतात; पण मला शहरात राहावं लागतं असल्यानं मला त्यांच्याजवळ राहता येत नाही.
***

आम्ही घरी पोचलो. आजीनं आमच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला आणि माझी धमाल सुरू झाली. मला वाटतं, मी आता मोठी आहे आणि तिला वाटतं मी अजून छोटीच आहे. तिला ते तसं वाटणं हेही मला आवडतं!
आमचं गाव तसं छोटंसंच आहे. गावात मारुतीचं एक फार फार जुन देऊळ आहे. त्याचं नाव रोकडोबा. त्याच्यावरून गावाचं नाव पडलंय "रोकडोली.' दुसऱ्या दिवशी शनिवार होता. आजी मला देवळात घेऊन गेली. देऊळ पण काय भारी...दगडात बांधलेलं. देवळाच्या पलीकडं एक बांधीव तलाव. खाली उतरायला पायऱ्या. त्या पायऱ्यांच्या जवळच बकुळीचं एक डेरेदार झाड. हे झाड म्हणजे त्या देवळाचा जणू काही आडदांड रक्षकच! बकुळफुलं वेचताना, त्यांचा वास घेताना मला नेहमी वाटायचं, की हे झाड त्या देवळाच्या सुरवातीच्या काळापासूनच इथं असावं. खरं काय ते रोकडोबालाच माहीत!
दर्शन झालं. दोन वेळा प्रसाद खाऊन झाला. मी निघाले तलावाकडं. आजी माझ्यामागं. ती बसली बकुळीखाली. मी दडादडा पायऱ्या उतरून पाण्याजवळ गेले. तशी, काठावरच्या चिखलातून एका बेडकानं पाण्यात लॉंग जम्प मारली. मी दचकले. मग डोळे ताणून, वाकून पाहिलं, तेव्हा पाण्यातले मासे दिसले. पलीकडं पाण्याबाहेर तोंड काढलेलं एक कासव दिसलं. हे असं पाहणं दरवेळचं.
मग मी परत वर आले. आजीला म्हणाले ः ""आजी, हे झाड मला आवडतं. तुझ्यासारखंच आहे... ऐसपैस, जुनं, सावली देणारं, वातावरण सुगंधित करणारं.''
त्यावर आजी खुदकन्‌ हसली. तिचे प्रेमळ डोळे चमकले. घरी आल्यावर आजी म्हणाली ः ""अहो, ऐकलंत का? मला एक गंमत सुचलीये.'
आजोबा म्हणाले ः ""हूं! तुला अन्‌ गंमत सुचतीये? तू काय गुड्डीएवढी आहेस का आता? अशा गमतीजमती सुचायला?''
आजोबा पण ना...भारीच आहेत!
""ऐका तर खरं. आपण गुड्डीचं झाड लावू या...'' त्यावर आई म्हणाली ः ""हं ऽऽ म्हणजे झाडाला गुड्ड्याच गुड्ड्या येतील आणि डोकं भंडावून सोडतील! एक आहे तीच पुरे आहे.''
""अगं, ऐक तरी, आपण ना एक खास झाड लावू या. तिच्या हातानं तिचं झाड.''
-माझं झाड...वॉव! मला खूप मजा वाटली हे ऐकून.
""जी झाडं आहेत ना, तीच तुला बघायला होत नाहीत. मलाही शेतीच्या कामांमुळं वेळ होत नाही आणि गुड्डी? ती इथं कायम राहणार आहे का? तिच्या झाडाचं बघण्यासाठी?'' आजोबा म्हणाले.

आजोबा ना आजीला नेहमी आडवंच लावत असतात; पण तसं त्यांचंही खरं आहे. इथं दोघंच राहतात. आजोबांना शेतीची शंभर कामं! गडीमाणसं असली तरी लक्ष हे द्यावंच लागतं. आजीलाही एक काम असतं का? बिचारी दिवसभर बिझी असते. तिलाही वेळ मिळत नाही. आजीला झाडांची एवढी आवड, फुलांची एवढी आवड; पण अंगणात एक पारिजातक आणि जास्वंद...एवढी दोनच झाडं.
आजोबांनी असं बोलण्याची आणखी एक बाजू म्हणजे, त्यांना वाटतं की माझ्या बाबांनी गावीच राहावं. या मोठ्या माणसांचा सगळा घोळच असतो. मला काही नाही बाई... गावात राहायचं तर गावातही राहता येईल. गावात शाळा आहेच की! आणि शाळा सुटली की "आजी की पाठशाला!'
पण आजी काय आजोबांना जुमानते होय!
""ते काही नाही. झाड लावायचं म्हणजे लावायचं. गुड्डी, कुठलं झाड लावू या?''
मला माझ्या शाळेच्या वाटेवरचा फुलल्यानंतरचा डेरेदार बहावा आठवला. पिवळ्या फुलांचा, ब्राईटलेमन यलो कलरचा. परीक्षा जवळ आली की फुलणारा.
""आजी, बहावा...'' मी म्हणाले.
-""मस्त गं गुड्डे. आपण बहावाच लावू या. स्वैपाकघरातून मला दिसेलसा लावू या. आपल्या गावात कुठ्ठेच बहावा नाही बघ.''
बहाव्याचं रोप गावात कुठलं मिळायला; पण आजीनं ती व्यवस्था केली. मग माझ्या हातानं ते रोप लावण्याचा कार्यक्रम झाला. आजी मिश्‍किल. आजोबांना म्हणते कशी ः ""जमाना बदललाय म्हणून बरं. डझनभर नातवंडं असती तर? डझनभर झाडं झाली असती!''
रात्री झोपताना माझ्या मनात बहावा, स्वप्नात बहावा...पहावा तिकडे बहावा!
सकाळी उठल्याबरोबर मी अंगणात गेले. झाड मोठं झालंय का ते पाहायला...खुळी मी! झाड एका दिवसात कुठलं वाढायला? पण माझं मन...!
आजी होतीच मागं. कोवळ्या उन्हात, शीतल वाऱ्यात प्राजक्ताची फुलं वेचत. ती जवळ आली तसा त्या फुलांचा मंदसा सुवास आला.
""अहो गुड्डाबाई, झाड असं लगेच वाढत असतं का हो? तुम्ही पण ना! तसं असतं तर तुम्हीही पटापट मोठ्या झाल्या नसतात का? अगं, वेळ लागेल याला बहरायला. चार-पाच वर्षं लागतात...पण एक आहे, छान फुलेल हो बहावा, तुझ्यासारखा. गंमत म्हणजे, तू जेव्हा जेव्हा सुटीत येशील ना तेव्हा तेव्हा तो बहरलेलाच असेल. सुटीत तू येणार म्हटल्यावर माझं मन बहरतं ना तस्सा. त्याच कालावधीत, म्हणजे वसंत ऋतूत फुलू लागतो तो उन्हाळाभर. त्याला उन्हाळी सुटी नसते काही तुझ्यासारखी!''
मी हसत सुटले. मग म्हणाले ः ""ओके...पण तरी कधी फुलणार?''
""ते मी कसं सांगू?''
***

सुटी संपली. आम्ही पुन्हा शहरात आलो...पण शाळेत जाता-येता बहाव्याचं ते ठराविक झाड दिसलं की मला तो गावाकडचा बहावा आठवायचा. अजून फुलायला खूपच अवकाश असणारा...
पुढच्या उन्हाळ्यात आपण कधी एकदा गावी जातोय, असं मला होऊन गेलं. मी गेल्या गेल्या त्या झाडाकडं पळाले. झाड मोठं झालं होतं; पण त्याचा तो तेजस्वी पिवळा रंग नावालाही नव्हता. अशी चार-पाच वर्षं गेली.
एकदा आजी कधी नव्हे ती यात्रेला गेली होती. आजोबांनी तिला जाऊ दिलं हेच विशेष; पण...पण ती तिकडंच देवाघरी गेली. मी एव्हाना तशीही मोठी झालेच होते; पण आजी गेल्यावर, या जगातूनच गेल्यावर, मला आणखीचं मोठं झाल्यासारखं वाटलं...!
***

गाडी थांबली, तसे विचार थांबले. बाबा चहासाठी खाली उतरले. मग आई आणि मीही उतरले. चहा पांचट होता. आजीच्या हातचा चहा आठवला. मस्त...घट्ट, घरच्या दुधाचा. मनात आलं - आजीची आठवण कशाकशात भरून राहिलीये!
गाडी निघाली पुढं आणि मन गेलं मागं. पुन्हा. माझी कॉलेजची परीक्षा संपली होती. सुटी लागली आणि आम्ही गावी निघालो. बसमध्ये भरारा वारं तोंडावर येऊ लागलं. मी डोळे मिटून घेतले आणि मला आजीची आठवण आली. माझ्या मिटल्या डोळ्यांत पाणी आलं. आता गावी गेल्यावर? माझी प्रेमळ आजी नसणार होती. बाकी सगळं सगळं असलं तरी...! मी तिला मिस करणार होते आणि हे फर्स्ट टाईम होणार होतं.
अचानक मला तिची हाक ऐकू आली ः "गुड्डी!' आणि मी एकदम डोळे उघडले. आता आजी कधीच दिसणार नव्हती. ती कधीच मला गुड्डी म्हणून हाक मारणार नव्हती. आता कुणीच मला गुड्डी म्हणणार नव्हतं...
कुणीच...?
मी पुन्हा डोळे मिटले. मला पुन्हा हाक ऐकू आली ः "गुड्डी!' हा आवाज सनीचा होता. तो मला लाडानं गुड्डी म्हणतो. त्यानं मला अशी हाक मारली की एकदम "स्पेशल' वाटतं आणि एक म्हणजे, तो मला सगळ्यांसमोर या नावानं हाक मारत नाही.
सनी पलीकडच्या सोसायटीत राहतो. त्याची आणि माझी फ्रेंडशिप झाली ती एका कारणामुळं, त्याच्या रूमच्या खिडकीतूनही थेट खालचा बहावा दिसतो.
माझ्या अगदी घराजवळ बहावा आहे, हे मला ठाऊकच नव्हतं. शाळा संपली. कॉलेज सुरू झालं, तसा शाळेचा रस्ता बदलला आणि वाटेवरचा बहावा भेटायचा बंद झाला.
त्याच्या खिडकीजवळचा तो बहावा "कोवळा' आहे... आजी म्हणाली होती, "तू पटपट मोठी झाली नसतीस का?' पण मुलं पटपट नसली तरी हळूहळू का होईना मोठी होतच असतात!
मी डोळे उघडले आणि एकदम मनाला जाणवलं, की सनी खूप दिवस दिसणार नव्हता...कसंतरीच झालं तेव्हा. वाटलं, काही दिवसांचाच तर प्रश्‍न आहे...पण आजी? ती तर कायमचीच गेलीये... मग आजोबांना काय वाटत असेल...?
मला एकदम अंगणातलं पारिजातकाचं झाड आठवलं. ते झाड तिथंच वाढणार, तिथंच फुलणार आणि त्याची खाली पडणारी फुलं वेचायला आजी नसल्यानं ते तिथंच मातीला मिळणार...!
***

गावी पोचलो. भाकर-तुकडा ओवाळून टाकायला आता आजी नव्हती.
आजोबांचा तरतरीतपणा हरवलेला. जिगसॉ पझलचे सगळे सगळे तुकडे जसेच्या तसेच जागेवर; पण त्यातला एक तुकडा हरवलेला.
घरात सतत आजी आहे असं वाटत राहिलं. आता तिची हाक येईल ः ""गुड्डाबाई, चला जेवायला.'' ती नंतर म्हणेल ः "चल गं, अंगणात जाऊ,' नाहीतर, "रोकडोबाला जाऊ...' पण नाही.
आणि बहावा? नुसताच वाढलेला. त्याचा तो पिवळा दिमाख नसलेला. का नाही बहरला? कुणास ठाऊक! की तोही आजीच्या आठवणीमध्ये बहरायचंच विसरला...
या वेळी आमचा गावचा मुक्काम लवकर संपला.
जायच्या दिवशी सकाळी मी उठून अंगणात गेले. बहाव्यापाशी. त्या पानांकडं पाहिल्यावर आजी आठवली...आणि...?
बहाव्याला किंचित फुटवा आला होता. मन आनंदून गेलं.
पण का असं? हे आजीला का पाहायला मिळालं नाही? की ती गेलीये म्हणून हे पिवळेपण फुटायला लागलंय?...
-मी ओरडले ः ""आईऽऽ''
सगळे जण बाहेर आले. सगळं वातावरणच बदललं त्या पिवळ्या फुटव्यानं.
आजोबांनी थरथरता हात झाडाला लावला. मग झाडाच्या आधारानं उभं राहून त्यांनी डोळे पुसले.
हवेची एक झुळुक आली. झाड सळसळलं.
त्यानंतरच्या उन्हाळ्यात मी गावी गेले, तेव्हा बहावा बहरलेला होता. दिल खोल के! यलो कलरची बाटली अंगावर सांडून घेतलेल्या खोडकर मुलीसारखा...लहानपणीच्या गुड्डीसारखा!
मी त्या झाडाला मिठी मारली, त्याच्याशी बोललेसुद्धा. सनीबद्दल! आणि वर हेदेखील सांगितलं की त्यालासुद्धा बहावा आवडतो म्हणून.
नंतर, बराच काळ लोटला. दरवर्षीचं जाणं कमी झालं. पुढं माझं आणि सनीचं लग्नही झालं. त्यानंतर मी आजच गावी जात होते.
बसला गचका बसला. बस थांबली. गाव आलं होतं. जुन्या आठवणींचा पट गुंडाळला गेला.
स्टॅंडपासून घरी चालत जावं लागतं.
आम्ही चालू लागलो. घर जवळ आलं आणि डोळ्यांवर विश्‍वास बसेना. बहावा प्रचंड वाढलेला...तरारलेला. त्याच्या त्या पिवळ्या गारुडासहित. ऐश्‍वर्यसंपन्न! घराच्या आधी दर्शन देणारा.
मी झाडावळ गेले. आजीच्या कुशीत शिरल्यासारखं वाटलं. झाडाची सावली म्हणजे तिच्या मायेची पाखरच की!
झाड आनंदानं झुललं. त्याला आधीच कळलं होतं की काय कुणास ठाऊक! कारण मी त्याच्या कानात कुजबुजले ः ""आज्जे, तू ना आता पणजी होणारेस, थोड्याच दिवसांत...!
ते झाड माझं? की ते झाड म्हणजे माझी आजी?
रोकडोबालाच माहीत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com