Happy Birthday Lata Mangeshkar : नव्वदीतला चिरतरुण स्वर !

Birthday special artcle on Lata Mangeshkar
Birthday special artcle on Lata Mangeshkar

स्वर म्हातारा इतुका न अवघे नव्वदीचे वयमान....
भारतरत्न लता मंगेशकर....
भारतीय  संगीताशी एकरूप झालेलं नाव....

आता तर, अगदी आवाजाचं परिमाण झालेलं नाव म्हटलं तरी चालेल... म्हणजे एखाद्या गोड गळ्याच्या गायिकेला अगदी लताजींसारखाच आवाज आहे असं म्हटलं की तिलाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटावं. अख्ख्या मंगेशकर कुटुंबानेच भारतीय मनामनावर आपल्या जादुई स्वरांनी गेल्या अनेक पिढया अधिराज्य गाजवलंय आणि त्यात लताजींचं नाव अग्रगण्य आहे.

आमच्या लहानपणापासून आजपर्यंत सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणांत या स्वरांनी सोबत केली आहे. त्यांची मराठी, हिंदी आणि इतरही भाषांमधली अनेक गाणी ऐकली आहेत. त्यातली बरीच आवडती गाणी तर सतत ऐकते आणि सुदैवाने गाता गळा लाभल्याने यातली बरीच गाणी गातेही. अशी गाणी ऐकण्यासाठी आता भरपूर साधनं हाताशी आहेत. पूर्वी असं नव्हतं. मोजक्याच लोकांकडे टेप रेकॉर्डर असायचा. बहुतांशी रेडिओवरच गाणी ऐकली जायची. दै. सकाळमध्ये लताजींच्या गाण्याबद्दलची आठवण लिहायची हा विषय वाचला आणि सहज मनात आलं ते लताजींच्या आवाजात मी ऐकलेलं पहिलं गाणं कुठलं तर ते ज्ञानेश्वर माऊलींची रचना असलेलं लताजींनी गायलेलं "पैल तो गे काऊ कोकताहे" लहानपणी रेडीओवर अनेकदा ऐकलेलं हे गाणं आजही ऐकलं की मनाला भूतकाळात बालपणातल्या त्या स्वच्छंद दिवसात घेऊन जात. त्यावेळी तर या गाण्याचा अर्थही कळत नव्हता. साक्षात माऊलींची रचना, लताजींचा स्वर्गीय स्वर आणि यात बरेचसे उकारांत शब्द असल्याने याचं वेगळेपण तर आहेच.

पं हृदयनाथ मंगेशकरांच संगीत असलेल्या माऊलींच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या खळे काकांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक रचना लताजींनी गायल्या आहेत. माझी आजी ज्ञानेश्वरांची निस्सीम भक्त होती. तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिने ज्ञानेश्वरीच पारायण केलं. माझे वडील देखील ज्ञानेश्वरीच नियमित पारायण करतात. आणि सगळ्याच संतांच्या रचनांचा त्यांच्या बोलण्यात सतत उल्लेख असतो. लहानपणापासून असं संत साहित्य सतत कानावर पडत असल्याने लताजींनी गायलेल्या या सगळ्याच रचना अतिशय आवडत्या आणि मनाला भिडणाऱ्या आहेत.

नकळत कुठेतरी माझ्या आजीशी आणि वडिलांशी माझा दुवा जोडणाऱ्या आहेत. मला तर वाटतं या सगळ्या संगीतकारांनी आणि गायकांनी हे खूप मोठं कार्य केलं आहे जे पिढ्यानपिढ्या लोकांपर्यंत या संत रचना पोहचवत राहील.

लता मंगेशकर नावाच्या स्वरसम्राज्ञीचा हा स्वर आज नव्वदीचा होतोय याचा आनंदच आहे. माऊलींच्याच रचनेतल्या' तयाचा वेलू गेला गगनावरी' ओळींप्रमाणे दीनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकरांच्या या कन्येच्या कर्तृत्वाचा स्वरवेल गगनाला भिडलाय. आमचे जीवन सुरेल स्वरांनी फुलवत बहरणाऱ्या या स्वरलतेचं विनम्र अभिष्टचिंतन आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com