Happy Birthday : 'सामाजिक कार्यकर्त्या ते विधान परिषद उपसभापती' असा आहे डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रवास

Dr-Neelam-Gorhe
Dr-Neelam-Gorhe

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर तब्बल 57 वर्षांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या रूपाने महिलेला संधी मिळाली. महिलांसह सामाजिक प्रश्‍नावर आक्रमकपणे बाजू मांडून प्रश्‍न धसास लावेपर्यंत लढत राहणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख. 12 सप्टेंबर रोजी गोऱ्हे या पासष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्‍न : सामाजिक कार्यकर्त्या ते विधान परिषद उपसभापती या प्रदीर्घ प्रवासाकडे तुम्ही कसे पाहता ?
नीलम गोऱ्हे :
 समाजात प्रबोधन घडवणे व त्यानुसार कृती करणे याची सातत्याने मला गरज वाटली. त्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महिलांशी चर्चा सुरू केली, पण फक्त बोलून उपयोग नाही, तर कृती आवश्‍यक असल्याने त्यासाठी पाऊल टाकले. 'निरंतर कृती' हे ध्येयवाक्‍य घेऊन सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय या सर्व क्षेत्रांत प्रबोधनातून व सामाजिक न्यायाची भूमिका घेतल्याने हा त्यामुळेत कार्यकर्त्या ते उपसभापती या काळ प्रवाही होता.

प्रश्‍न : पूर्वीच्या समाजवादी नीलम गोऱ्हे आणि त्यानंतर कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेत काम करता, हे वैचारिक स्थित्यंतर तुम्ही कसे हाताळले?
नीलम गोऱ्हे :
 शिवसेना ही प्रबोधनकारी हिंदुत्वाची भूमिका मांडणारी संघटना आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी हुंडाबंदी, बालविवाह याला विरोध केला होता. शिवसेना ही महिला धोरण, सुरक्षा यावर कायम काम केले आहे. 1992 ला बाबरी मशिद पाडल्यानंतर द्विध्रुवीकरण झाले. त्यात जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान हे समाजवादी नेते एनडीएसोबत आले. समान नागरी कायदा ही समाजवादी विचार सरणीतून पुढे आलेली मागणी आहे. अनेक मुद्दे राष्ट्रहिताचे आहेत, त्यामुळे मला फार मोठे मतपरिवर्तन करावे लागले नाही. शिवसेनेत प्रवेश केल्याने पूर्वी ज्यांच्यासोबत काम केले, ते नाराज होऊन संवाद कमी झाला होता, पण माझ्या कामाच्या स्वरूपात बदल झालेला नसल्याने पुन्हा संवाद दृढ झाला.

प्रश्‍न : राजकारण व समाजकारणात महिला सामर्थ्यवान झाली आहे का?
नीलम गोऱ्हे :
 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना संधी मिळाल्याने त्या सामर्थ्यवान झाल्या आहेत, पण सायबर क्राईम, व्यसनाधीनतेतून होणारे बलात्कार यामुळे नवे प्रश्‍न निर्माण होत आहेत. उपसभापती झाल्यानंतर हे प्रश्‍न सोडविण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम तयार करून त्यावर काम करावे, यासाठी सरकारला निर्देश दिले, प्रशासनही याची गांभीर्याने अंमलबजावणी करत आहे. महिलांसाठी केलेले काम, आदित्य ठाकरे यांनी महिलांना संरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम राबविला. यातून महिलांचा आत्मविश्‍वास वाढला आहे.

महिलांना पुरुष वर्गाकडून मदतीचा हात अपेक्षित आहे, त्यातून विकास घडविण्याचा त्यांचा हेतू आहे. शहरी व ग्रामीण भागात करणाऱ्या महिलांना अभ्यास, धाडस, परिश्रम, कृतीशीलता व पक्षाचा पाठिंबा आवश्‍यक आहे. यातील एखादा मुद्दा खिळखिळा झाला तर तिची प्रगती खुंटते. 2030 पर्यंत शाश्‍वत विकासाठी स्त्री-पुरुष समानता येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघातही यावर चर्चा झाली, याचा आराखडा तयार आहे.

प्रश्‍न : राजकारणात कुरघोडी असतेच; पण त्यात न अडकता स्वतःचा ठसा उमटविण्यामागचे सूत्र काय?
नीलम गोऱ्हे :
 राजकारण म्हटले की स्पर्धा, मतभेद आलेच; पण काम करण्याची क्षमता, आवड, गुणवत्ता, प्रामाणिकपणा, परिश्रम करण्याची तयारी हे लक्षात घेऊन पक्षाकडून संधी दिली जाते. या प्रगती पुस्तकावरून पक्षाने तीन वेळा आमदार, प्रवक्ता, उपनेते व आता उपसभापती करून संधी दिली. महिलांचे प्रश्‍न मांडताना त्यामध्ये न्याय मिळवून दिला, त्यामुळे पक्षाला मानणाऱ्या स्त्रियांसह ज्यांची कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नाही, अशा महिलांच्या मनातही शिवसेनेचे स्थान निर्माण झाले. यात मोठा समूह मदत करण्यासाठी आला की विरोधाची धार कमी झाली. मला स्वीकार करण्याचे प्रमाण वाढले, कामे होतील, अशी अपेक्षाही वाढली आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे असे समाजसुधारक नसते तर आमच्यासारख्या महिला राजकारणात दिसल्या नसत्या.

प्रश्‍न : बदलत्या शिवसेनेकडे तुम्ही कसा बघता ?
नीलम गोऱ्हे :
 कलम 370, बांगलादेशी घुसखोर, तीन तलाक, राममंदिर, जातींच्या पलीकडचे हिंदुत्व, सर्व घटकांना सामावून घेणे, अखंड महाराष्ट्र या भूमिका तशाच आहेत. शिवसेना बदललेली नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाची शैली वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षामध्ये अधिक व्यवस्थापन केले, शेतकरीभिमुख शिवसेना केली, तर आदित्य ठाकरे यांनी प्लॅस्टिक बंदी, महिला संरक्षण असे मुद्दे घेतले. हे काम लोकांशी नाते जोडण्यासाठी हे उपक्रम असतात; पण भूमिका ही तीच आहे.

प्रश्‍न : राजकारणात महिला आणि शिवसेनेत नीलम गोऱ्हे यांचे स्थान काय आहे?
नीलम गोऱ्हे :
 अनेक पक्ष त्यांच्यातील महिलांना कुवतीप्रमाणे संधी देतात; पण त्यांना त्यातून किती समाधान मिळते, अनेक महिला विधान परिषदेमध्ये आल्या; पण कामाची संधी ठेवली नाही. या उलट मला विधान परिषदेत आल्यानंतर मला पक्षात उपनेता, प्रवक्ता, विधिमंडळ प्रतोद, विशेष हक्क समितीचे अध्यक्षपद दिले. हे सर्व मला आरक्षण म्हणून मिळाले नाही तर गुणवत्तेवर पक्षाने दिले आहे. कोणत्याही प्रश्‍नांवर केवळ इव्हेंट करून उपयोग नाही, तर त्यांनी सतत 24 तास त्यावर काम केले पाहिजे, कधी अपयश आले तर ना उमेद न होता, काम सुरू ठेवले पाहिजे. राजकारण व समाजकारणात 'श्रद्धा आणि सबुरी' या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com