‘मुलायमभूमी’वर भारतीय जनता पक्षाचा डोळा

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने रिक्त मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रणकंदन पेटले आहे.
‘मुलायमभूमी’वर भारतीय जनता पक्षाचा डोळा
Summary

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने रिक्त मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रणकंदन पेटले आहे.

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने रिक्त मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रणकंदन पेटले आहे. मैनपुरी जिंकून ‘समाजवादी’ला धक्का द्यायचा या निर्धाराने भाजपने नेत्यांचा मोठा फौजफाटा मैदानात उतरवला आहे; तर कुटुंबातील अभेद्यता दाखवत अखिलेश यादव रिंगण मारण्याच्या तयारीत आहेत.

- शरत् प्रधान

उ त्तर प्रदेशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने राज्यातील तीन मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकण्यासाठी आकाश पाताळ एक करणे चालवले आहे. यातील समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. मतदारसंघावर त्यांचा अखेरपर्यंत प्रभाव होता. त्याचा ‘मुलायमभूमी’ असा उल्लेख केला जातो. भाजपनेही हा प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने लढत जोरदार होईल. याआधी समाजवादी पक्षाने बालेकिल्ला असलेल्या अझमगड आणि रामपूर या दोन लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांत सपाटून मार खाल्ला होता. त्यातच या पक्षाचचे एक नेते आझमखान यांना दोषी ठरवून तुरुंगात डांबलेले आहे. दोन वर्षे ते तुरुंगातच आहेत. द्वेषमूलक वक्तव्यामुळे त्यांना झालेल्या शिक्षेमुळे विधानसभेची रामपूरची जागा रिक्त झाल्याने तेथेही मतदान होत आहे. भाजपने अझमखान यांचे विश्वासू आणि स्थानिक प्रवक्ते फसाहैत अली खान यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे.

तिसरी पोटनिवडणूक ही पश्चिम उत्तर प्रदेशातील खटौली विधानसभा मतदारसंघासाठी होत आहे. तेथे समाजवादी पक्षाचा सहयोगी राष्ट्रीय लोकदलाचा उमेदवार रिंगणात आहे. भाजपने मैनपुरी आणि रामपूर यांच्यावरच लक्ष केंद्रित केल्याने त्यांचे खटौलीकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. भाजपचे वजनदार नेते विक्रम सैनी यांच्या अपात्रतेमुळे ही जागा रिक्त झाली आहे, तिथे भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तथापि त्यांना पक्षातून पाठिंबा किंवा मतदारातून सहानुभूती मिळताना दिसत नाही.

काहीही झाले तरी मैनपुरी जिंकायचीच, हा चंग भाजपने बांधला आहे. समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांची पत्नी आणि मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई डिम्पल यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपने नेत्यांची फौजच येथील विजयासाठी मैदानात उतरवली आहे. यामध्ये दोन उपमुख्यमंत्री, वीसवर मंत्री, दोन डझनांवर आमदार असा भलामोठा फौजफाटा मैनपुरीतील गल्ली-मोहल्ला आणि घरन् घर पिंजून काढत आहे. ६ डिसेंबर रोजी मतदान असून, त्या आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दोन जाहीर सभाही होणार आहेत. भाजपने मैनपुरीतून डिम्पल यांच्याविरोधात अखिलेश यांचे चुलते शिवपाल यादव यांचे निकटवर्ती असलेले रघुराज सिंह शाक्य यांना उतरवले आहे.

भरवसा जातीय गणितांवर

भारतीय जनता पक्षाकडून पराभवाची नामुष्की वाट्याला येऊ नये या भूमिकेतून यादव चाचा-भतिजा एकत्र आले आहेत, असा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी सांगतात, ‘‘यादव कुटुंबिय कितीही एकत्र आले तरी ते समाजवादी पक्षाचा मैनपुरीतील पराभव टाळू शकत नाहीत.’’ समाजवादी पक्ष मुलायमसिंह यादव यांचे सहानुभूतीचे कार्ड वापरून मतदारांना आपलेसे करत असताना भाजपला त्याला तोंड देणे कठीण जाताना दिसत आहे. भाजपचा सगळा भर मतदारसंघातील जातीच्या गणितांवर अवलंबून आहे.

भाजपच्या नेतृत्वाच्या मते समाजवादी पक्षाचा पाठिंबा यादव आणि मुस्लिम मतांपुरताच मर्यादित राहील. अन्य मतदार भाजपच्या पाठिशी राहतील, असे त्यांना वाटते. भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे सदस्य विजय पाठक सांगतात की, २०१४ मध्ये मुलायमसिंहांना तीन लाख वीस हजारांचे मताधिक्य होते, ते घटून २०१९मध्ये ९४ हजार मतांवर आले होते. आजच्या घडीला मुलायमसिंह स्वतः हयात नाहीत. त्यामुळे समाजवादी पक्षाचा जनाधार घटू शकतो. मात्र भाजपचा हा दावा अवास्तव असल्याचे मत काही विश्लेषक मांडतात.

सहानुभूती महत्त्वाची

बिगर यादव ओबीसी मते, ब्राह्मण आणि ठाकूर या उच्चवर्णीयांची मते आपल्याला मिळतील, असे भाजपला वाटत आहे. बहुजन समाज पक्षाचा प्रभाव ओसरत असल्याने त्यांचीही मते भाजपला मिळतील, असे त्या नेत्यांना वाटते, असे या भागातील प्रसिद्ध पत्रकार दिनेश शाक्य सांगतात. ते पुढे सांगतात की, मुलायमसिंह यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झालेली आहे, हे विसरून चालणार नाही. त्यांच्या निधनाने सहानुभूती निर्माण झाली आहे. अशीच भूमिका आणखी एक पत्रकार सुभाष त्रिपाठी यांनीदेखील मांडली. अखेर डिम्पल मुलायमसिंह यादवांच्या स्नुषा आहेत, त्या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यादव आणि मुस्लिम मते डिम्पल यांच्या पारड्यात जातील; शिवाय शाक्य मतांचे भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात विभाजन होईल. त्यामुळे डिम्पल यांचे पारडे जड वाटते आहे, असे मत या दोघांनीही व्यक्त केले.

मैनपुरीतील जातीय गणित असे आहे ः यादव - चार ते पाच लाख, शाक्य - तीन लाख, बिगर शाक्य ओबीसी - पावणेचार लाख, ठाकूर - दोन लाख, ब्राह्मण - एक लाख, दलित - दीड लाख, मुस्लिम - नव्वद हजार, इतर - पन्नास हजार.

यादव कुटुंबातील मतभेदांना मूठमाती

पक्षनेतृत्वावरून अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहे. या कौटुंबिक मतभेदाचा फायदा उठवायचा निर्धार भाजपने केला आहे. तथापि, भाजपच्या या व्यूहनीतीला उत्तर देताना समाजवादी पक्षाने ‘आम्हां चाचा-भतीजा नात्यांत कोणतीही दरी नाही, संबंध सौहार्दाचे आहेत’, असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. डिम्पल यांनी शिवपाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, त्याची छायाचित्रेही माध्यमे आणि सोशल मीडियावर व्हायरल केली गेली. यादवांच्या मूळ गावी सफईमध्ये झालेल्या जाहीर सभेत अखिलेश यांनी शिवपाल यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्याचेही जगजाहीर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com