रणात आहेत झुंजणारे अजून काही...

सुनील माळी 
रविवार, 29 डिसेंबर 2019

'पानिपत'साठी मला तुमची मदत मिळतीये, पण तुम्ही पुढचे आठ महिने शूटिंग होईपर्यंत आमच्याबरोबर राहा. प्रत्येक महिन्याचे पाच लाख रुपये मानधन तुम्हाला देतो.'

'पानिपत'साठी मला तुमची मदत मिळतीये, पण तुम्ही पुढचे आठ महिने शूटिंग होईपर्यंत आमच्याबरोबर राहा. प्रत्येक महिन्याचे पाच लाख रुपये मानधन तुम्हाला देतो.' आशुतोष गोवारीकर मला म्हणाले. मी म्हटलं "शक्‍यच नाही, माझी व्याख्यानं-इतर कामं आहेत, पण तुम्ही माझ्या आवडीच्या विषयावर, पहिल्या बाजीरावावर चित्रपट काढतायं, मीच तुम्हाला मदत केली पाहिजे. माझी बचत, नोकरीतला थोडा फंड काढून मी पाच लाख रूपये तुम्हाला देतो.' मी असं म्हटल्यावर गोवारीकर उठून उभेच राहिले... बहुधा त्यांच्याकडं न मागणारा, न ओरबाडणारा आणि मुख्य म्हणजे स्वतःहून थोडीफार का होईना, पण मदत देणारा असा पहिलाच माणूस त्यांना भेटला असावा...'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

""राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरचे ते पुस्तक करायला मी मदत केली होती. पुस्तक बाहेर आलं अन प्रकाशक लाटकर यांनी पन्नास हजार रूपयांचा चेक माझ्या हाती दिला. मी तो नाकारला. म्हटलं, "संघाच्या कामाचे मी पैसे घेत नाही, ते काम माझी जबाबदारी, कर्तव्य म्हणून मी करतो.' लाटकर चकित झाले.'' 

रोकड्या व्यवहाराचा, केवळ आपल्याच फायद्याचा, कधीकधी दुसऱ्यापेक्षा अधिक मिळावं, असं वाटणाऱ्या स्वार्थाचा विचार करणाऱ्यांची अन तसंच वागणाऱ्यांची भाऊगर्दी आजूबाजूला असताना असं बोलणारे भेटल्यानं मनात समाधान खोलवर झिरपत जातंय, असं वाटलं. त्यातही ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली वगैरे असते त्यांच्याकडून अशा गोष्टी घडतातही, पण या दोन व्यक्ती अशा मध्यमवर्गातल्या आहेत की ज्या वर्गात उत्पन्नाचा एखादा नवा मार्ग खुला झाला की दोन्ही हातांनी त्याचं स्वागत करण्यावाचून तरणोपायच नसतो. अशा या दोघांकडनं केलेल्या कामाचा मोबदला नाकारण्याची झालेली कृती, त्याबाबत दाखवलेली उदासीनता चकित करून गेली. 
इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे तुमच्यापैकीही अनेकांचे मित्र आहेत. केंद्र सरकारची आपली नोकरी सांभाळून त्यांनी इतिहासाच्या अभ्यासाचा छंद जोपासला. कॅम्पातील पेशवे दप्तर म्हणजे पेशवेकाळातील कागदपत्रे असलेली अर्काइव्हज इमारत हा त्यांच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग. त्यातून त्यांनी सगळीकडे भ्रमंती केली, आता भारत इतिहास संशोधक मंडळामध्येही ते सक्रिय आहेत. शिवाजी महाराज, पहिले बाजीराव यांच्याबाबतच्या इतिहासाच्या साधनांचा त्यांनी अभ्यास केला.

Image may contain: 1 person, glasses and hat

बाजीरावाच्या त्यांच्या अभ्यासाची माहिती त्यांच्यावर चित्रपट काढण्याचा विचार असलेल्या गोवारीकर यांच्या कानी गेली. त्यांना केवळ रंजक बाबीच न दाखवता इतिहासाशी इमान राखण्याचा प्रयत्न करून चित्रपट करायचा होता, त्यामुळं ते माहिती जमवत होते. तशातलीच एक भेट म्हणून ते बलकवडे यांच्या भेटीकडं पाहात होते. ही भेट झाली मात्र, बलकवडे यांच्याशिवाय आपलं पान हलू शकणार नाही, याची खात्री त्यांना पटली. बलकवडे यांचा बाजीरावांवरचा अभ्यास पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी लागलीच ऑफर दिली. 

""तुम्ही पुढचे आठ महिने आमच्याबरोबर राहा, महिना पाच लाख रूपये मानधन.'' 
""आठ महिने तुमच्या बरोबर फक्त चित्रपटाच्या निर्मितीसाठी ? शक्‍यच नाही. माझी व्याख्यानं आहेत, इतर उपक्रम आहेत, अभ्यास आहे. पण बाजीराव माझी आवडती व्यक्तिरेखा आहे, बाजीरावाची जीवनकथा पडद्यावरून लोकांपर्यंत पोहोचतेय, त्यामुळं मी तुम्हाला मदत करीन. अगदी पैशांचीही. माझ्या बचतीतनं, फंडातनं पाच लाख रूपये मी तुम्हाला देईन.'' 
बलकवडे सांगतात, ""माझ्या या वाक्‍यानं गोवारीकर उठून उभेच राहिले. त्यांना तो धक्काच होता, पण मी त्यांना माहितीची मदत केली. ते म्हणाले, "तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल.' त्यावर मी "एक हजार एकशे अकरा रुपये द्या,' असं म्हटलं. त्यांनी चार लाखाच्या आसपासच्या रकमेचं पाकीट मला पाठवलं तसंच माझ्या मुलीच्या लग्नातही थोडी मदत केली.'' 
पांडुरंगरावांकडं पाहातच राहिलो. आम्ही चहाच्या टेबलावर बसलो होतो. मी नजर खाली केली.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज:दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांनाही दिलासा?

कुठंही काहीही अस्सल पाहिलं, ऐकलं की डोळ्यांत टचकन पाणी येण्याचा जुना आजार असल्यानं गालापर्यंत काही थेंब पोहोचले. बहुधा पांडुरंगरावांनी ते पाहिलं असावं आणि मला पुरतचं रडवायचा विचार केला असावा. ते पुढं बोलत गेले... ""आपल्याला काय लागतयं... आता मी तळेगावच्या शाळेत व्याख्यान देऊन आलो, काल इथंच एक व्याख्यान होतं... तीन दिवसांपूर्वी घातलेला हा झब्बा आहे.'' 

"पण... तुम्हाला मदत करायची होती तर तुम्ही आठ महिने का नाही गेलात ?, तुम्ही दोन्ही सांभाळू शकला असतात...'' (पाच लाख महिन्याला असे आठ महिने म्हणजे आठा पंचे चाळीस म्हणजे चाळीस लाख मिळाले असते, घसघशीत पंचवीस-तीस हजारांचं कायमस्वरूपी मासिक उत्पन्न सुरू झालं असतं, या मध्यमवर्गीय विचारात मी अजूनही अडकून पडलो होतो...!) 
""अहो, आतापर्यंतचे अनेक चित्रपट आपण पाहिलेत.

काय वास्तव दाखवतात का कधी ? त्या बाजीराव-मस्तानीमध्ये तर केवळ मस्तानीच्या प्रेमात बुडून गेलेला बाजीरावच दाखवला. त्यानं केलेला पराक्रम, त्याची युद्धनिपुणता, बुद्धिमत्ता, चातुर्य कुठं दाखवलं ? एक जण पन्नास जणांना मारतो, ती मस्तानीही गरागरा शस्त्र फिरवते. खऱ्या इतिहासात असं नव्हतं. अशा काल्पनिक गोष्टींसाठी आपला वेळ खर्च का करायचा ?'' 

बलकवड्यांच्या या शब्दांनी मला आठवण आली ती दोनच दिवस आधी भेटलेल्या प्रा. शरद खरे यांची. खरे राज्यशास्त्राचे प्राध्यापक. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त झाले, त्यालाही आता सतरा-अठरा वर्षे उलटून गेली असावीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक (अर्थात स्वयंसेवक म्हटलं की कट्टर हे ओघानं आलंच...) मात्र खऱ्यांचं वैशिष्ट्य असं की संघाचे असूनही ते संघावर टीका करू शकतात, संघाकडं तटस्थतेनं पाहू शकतात, छापातून काढलेल्या मूर्तींप्रमाणं वाटत नाहीत. ते अभ्यासक आहेत, त्यांचं वाचन प्रचंड आहे, राज्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून त्यांनी अनेकविध विषयांची सर्वेक्षणं केली आहेत, अनेक इंग्रजी-मराठी पुस्तकांच्या निर्मितीत त्यांचं योगदान आहे, विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी उभी करून ती स्वतःच्या खांद्यावरून चालवून दाखवण्याची धमक त्यांच्यात आहे... 

प्रा. खरे यांच्याबाबतची एवढी माहिती मिळाल्यावर मध्यमवर्गीय मन सहज विचार करते... सुखवस्तूच म्हणायचे खरे. छान पेन्शन असणार, वेगवेगळ्या पुस्तकांच्या रॉयल्ट्या सुरू असणार, विवेकानंद इन्स्टिट्युटचा पगारही घेत असणार... 
पण वस्तुस्थिती आणि आपली कल्पना यांत जमीनअस्मानाचं अंतर असू शकतं... प्राध्यापकमहाशयांच्या बाबतीतही तसंच आहे. ते जेव्हा "टिमवि'तून निवृत्त झाले, तेव्हा त्यांना पेन्शन नव्हतं. विवेकानंद इन्स्टिट्युटमधून त्यांना स्वतःला काहीही मिळत नाही. त्यांनी बॅंकांमध्ये केलेल्या दहा-पंधरा लाखांच्या बचतीव्यतिरिक्त त्यांच्याकडे आर्थिक व्यवस्था काहीच नाही. 
उदरनिर्वाह कसा चालतो ?... 

""अरे सुनील, जगायला किती लागतं... ? माझा महिन्याचा खर्च सात ते आठ हजारांचा आहे. त्यातले अडीच हजार माझ्या औषधांचे जातात. त्याशिवाय मी जिवंतच राहू शकणार नाही. पाच हजारांत आम्हा दोघांचं भागतं... दूध-किराणा-भाजी... बाकी खर्च काय आहे ? मी गेल्या दहा वर्षांत नवा शर्ट शिवलेला नाही. मला कपड्यांना इस्त्री लागत नाही.'' 

""पत्नी वकील आहे, ''... खऱ्यांच्या या वाक्‍यानं मी पुन्हा पुटपुटलो, "मग बरोबर आहे, तिची वकिली चालत असेल...' पण त्यांच्या पुढच्या वाक्‍यानं पुन्हा खलास झालो. 
""ती गेली छत्तीस वर्षे भारतीय मजदूर संघाची वकील म्हणून विनामोबदला काम करतेय... पूर्ण दिवसभर..., तिला रिक्षाचे म्हणून दीड हजार रूपये मिळतात, ते येण्याजाण्यावरच खर्च होतात...'' 

""माझ्या घरातला टीव्ही माझ्या लग्न झालेल्या मुलीनं घेऊन दिलायं... मला जावई भला मिळाला. तो आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करतो अन काही लाख रूपये मिळवतो. त्यानं आणि मुलीनं सांगितलं, "टीव्हीवाला येऊन आज टीव्ही बसवेल, तुम्ही काही बोलायचं नाही.' मुलीनं अशीच नॅनो घेऊन दिली मला... ती मी कधीकधी चालवतो, पण आता थोडा पार्किन्सन्सचा त्रास सुरू झालाय...'' 

संघाविषयीचं एक पुस्तक मध्यंतरी खऱ्यांनी केलं. प्रकाशक लाटकर यांनी त्याचा पन्नास हजार रूपयांचा चेक खऱ्यांच्या हातात दिला. त्यांनी तो परत केला. ""संघाच्या कामाचे मी कधीही पैसे घेत नाही, असं कारण सांगितल्यावर लाटकर चकित झाले. वास्तविक पुस्तकाच्या कामासाठी माझ्या खिशातले पैसे खर्च झाले होते, तरीही माझं तत्त्व होतं ते मी पाळलं,'' हे सांगताना आपण काहीतरी वेगळा पराक्रम केल्याचा भाव खऱ्यांच्या चेहऱ्यावर नव्हता तर ते शांतपणानं सांगत होते. 
""सर, पण तुम्ही तो चेक घ्यायला हवा होता.

तुम्हाला आत्ता सात-आठ हजार रुपये पुरतात, पण वस्तुंच्या किमती अशा वाढतात की दर पाच वर्षांनी आत्ताच्या सात हजारांच्या वस्तू घेण्यासाठी त्यात आणखी पाच हजार टाकावे लागतात...''

"मला त्याची काळजी नाही, आणि पाच-दहा वर्षांनंतरची काळजी कशाला करायची ? आत्ताच माझं वय सत्त्याहत्तर आहे, मी अजून किती जगणार आहे, कुणाला माहिती ?'' हे सांगताना प्राध्यापकमहाशयांचा चेहरा निराशेने नव्हे तर मिश्‍किलतेने फुलला होता. स्वतःविषयीची ही माहिती मी विचारली म्हणून सहज जाताजाता त्यांनी सांगितली होती, त्यांच्या परिस्थितीचे तुणतुणे त्यांनी स्वतःहून वाजवले नव्हते. त्यांना रस होता माझ्याशी इतर गोष्टी बोलण्यातच. ""मागे गुजरातेतल्या बदलांबाबतचं पुस्तक मी केलं होतं ना, तेव्हा नरेंद्रभाईंना म्हटलं होतं...''

त्यांचं पुस्तकउपक्रमाचं आख्यान सुरू झालं... (हां, नरेंद्रभाई म्हणजे आताचे पंतप्रधान) ""सुनील, मी श्रीपती शास्त्री यांच्या जीवनावरचे दोन खंड करतोय..., काम पूर्ण झालंय, पण कुणीतरी सुचवलं त्यात त्यांचं अल्पचरित्र असावं. हे खंड वाचून पंचवीस-तीस पानी अल्पचरित्र लिहिणारा कुणी पत्रकार आहे का, आम्ही चार-पाच हजार रूपयांपर्यंतचं मानधन मिळवून देऊ. तू करशील का ?'' 

प्राध्यापक त्यांच्या प्रकल्पाच्या विषयातच गुंतले होते, त्याबाबत उत्साहानं बोलत होते... मी मात्र त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्येच अडकलो होतो. तशी सरांची माझी ओळख मी पत्रकारितेचा विद्यार्थी असतानाची. मी शिकत असताना त्यांच्या एका प्रकल्पासाठी राजकीय नेत्यांच्या मुलाखती घ्यायच्या काम होतं, ते त्यांनी मला दिलं अन तेव्हापासून माझा त्यांचा स्नेह जुळला तो आतापर्यंत. त्यांच्या घरच्या स्पेशल कोकोची चव मला आवडायची. मी अनेक तास त्यांच्याशी त्यांच्या घरी गप्पा मारल्या आहेत, संघाच्या न पटणाऱ्या गोष्टींबाबत उंच आवाजात वादही घातलायं... पण या वादानं आमच्यातला स्नेह कधीही आटला नाही, "मी त्यांचा विद्यार्थी' अशी माझी भावना कायमच राहिली. 

विचार करू लागलो... इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक शरद खरे यांच्यातील साम्य आणि फरकाबाबत. दोघेही सरस्वतीचे उपासक, पण धनमातेबाबत उदासीन. आपापल्या क्षेत्राची नशा त्यांना चढलीये, त्यात ते बेभान झालेत. आपल्या विषयाचा व्यासंग वाढवायचा, काहीतरी काम उभं करायचं..., मग स्वतःच्या आर्थिक स्थितीकडं ढुंकूनही पाहायचं नाही की त्याची चिंता करायची नाही. दोघंही विलक्षण कलंदर...बेफिकीर...अभ्यासू आणि वंदनीय... 

"माणसांमध्ये आता खरेपणा उरलेला नाही... कसदार-अस्सल काम करणारी माणसं दुर्मीळ होताहेत,' अशी तक्रार केली जाते. ते खरंही आहे. सगळीकडनंच असे अनुभव येताहेत. अत्याचार, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, राजकारणापासून ते शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात खाबूगिरीची वृत्ती... माध्यमांच वृत्तांकनही अशाच दलदलीनं भरून जातं. मग माणसाचा माणसावरचा विश्‍वास उडू लागतो. भेटलेला माणूस आपल्याला फसवणारच, तो चांगला असणारच नाही, अशी भावना बळावते.

मग कवींच्या तोंडून शब्द बाहेर पडतात..."कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही...' सामाजिक काम करणाऱ्या सगळ्यांमध्ये केवळ फायद्यासाठीच काम करणारे असणार, इथलं चांदणंही भ्रष्ट-तापट, इथल्या फुलांचा वासही कृत्रिम सुगंधाचा असणार, असंच वाटू लागतं... 

... पण मग बलकवडे-खऱ्यांसारखी खरी, तत्त्वासाठी जगणारी, त्यासाठी कोणतंही आमिष-कोणतंही प्रलोभन-कोणतीही ऑफर मस्तीत धुडकावणारी माणसं दिसतात तेव्हा इथलं चांदणं अजूनही शीतल असल्याची खात्री पटते, इथली फुलं अजूनही नैसर्गिक सुगंधच पसरवताहेत याचा प्रत्यय येतो. 
बलकवड्यांवर समाजवादी परंपरेचे संस्कार झालेले तरीही ती समाजवाद्यांना असलेल्या दुफळीच्या शापावर कडकपणं बोलतात, खरे संघाचे असले तरी संघाच्या सुधारणेची भाषा करतात. चांगली माणसं सर्व प्रकारच्या विचारसरणीत आढळतात, त्यामुळं कोणतीही विचारसरणी बाजूला सारण्यापेक्षा त्यातील चांगल्या माणसांच्या जवळ जावं, असं वाटत राहतं... 

कधीकधी जगण्याची इच्छाच मरून जाते... अशा वेळी या माणसांमुळं आपल्या जगण्याचं कारण समजतं आणि आजूबाजूला स्वार्थाचं, काटाकाटीच्या-खुनाच्या राजकारणाचं प्रदूषण धुमाकूळ घालत असतानाही या युद्धभूमीत काही सच्च्या मावळ्यांच्या राहुट्या शिल्लक असल्याचं जाणवतं. कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ओळी मग आठवतात... इतक्‍यात करू नका चर्चा पराजयाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blog about pandurang balkawade