गुढी सुखाची उभवी

मृणालिनी नानिवडेकर
शुक्रवार, 31 मार्च 2017

पाच वर्षांनी परिस्थिती उजवीकडून डावीकडे जावी अशी इच्छा असेल तर तळतळाट करून भागत नसते पर्याय उभा करायची तयारी ठेवायची असते. त्या तयारीसाठी तथाकथित विचारवंत मंडळींना नववर्षाच्या विशेष शुभेच्छा

नववर्षाचे ढोल वाजताहेत.. त्या आवाजाचे पार्श्‍वसंगीत सुरू आहे. लिहिताना कंठाळी, आवाजी; पण तरीही अस्सल भारतीय ढोलताशे वाजताहेत.. पण या पारंपरिक वाद्यांमागे काही बदल घडले आहेत. ढोल बडविणारे हात आता केवळ पुरुषांचे नाहीत.. तरुणीही तेवढ्याच ताकदीने आपला स्वर ऐकायला लावत आहेत. त्यांच्या सफाईने अवाक झालेले तमाम बांधव 'मेरा देश बदल रहा है'ची जाणीव स्वत:लाच करून देताहेत.. समाजात वावरताना तरी या समानतेचे कौतुक आहे, वातावरण उत्सवी आहे.. दिसण्यात डौल असावा, अशी या गर्दीतील प्रत्येकाची इच्छा आहे. उत्तम आयुष्य जगण्याची असोशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाचता येते आहे. या समूहाचे जर काही एकत्रिक मानसशास्त्र असेल, तर ते उत्तम असण्याचे, उत्तम वागण्याचे आणि उत्तम होण्याचे आहे. जगातल्या कुठल्याही समूहाला असेल त्याचप्रमाणे या गटांनाही त्यांच्या संस्कृतीचा अभिमान आहे. 'ही संस्कृती जागतिकीकरणात टिकेल काय,' या भीतीने त्यातल्या शहाण्यांना ग्रासले असले, तरीही ती काहीही होऊन टिकावी, हा या समूहमनाचा लसावि आहे.

हा समूह तसा मनाने साधा, वागायला नेक! 'नतमस्तक व्हावे, असे पाय आता उरलेच नाहीत' या पुलंच्या वाक्‍याला उरीपोटी बाळगून 'सारेच काही मंदावले आता'ची खंत बाळगणारा.. आपण देशाचा मुख्य स्वर असलो, तरीही 'धर्म ही घरात जपायची गोष्ट आहे' अशी मध्यमवर्गीय भावना मनात जपणारा.. इथल्या मुख्य राजकीय पक्षाचा-कॉंग्रेसचा एकेकाळचा खरा आधार आपणच होतो, हे माहीत नसल्याने 'जाऊ द्या' म्हणत धार्मिक भावना घरातच ठेवणारा.. अयोध्येतल्या घटनेचे वाईट वाटून घ्यायचे की झाले ते होणारच होते, या द्वंद्वात फसलेला.. मात्र सध्या राजकीय वास्तव बदलले आहे.

गेल्या तीन वर्षांत या समूहाला, 'अपवर्डली मोबाईल' होण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या या जनतेला नेता मिळाला आहे. 'भारत बदलू शकतो, महासत्ता होऊ शकतो' या स्वप्नाची कधीही पूर्ती होणार नाही, अशी खंत बाळगणारा हा वर्ग गेल्या चार वर्षांत भारावला आहे. गुजरातच्या साहसवादाला अधिक व्यावसायिक करत देशवासीयांना 'अच्छे दिन'ची आस लावणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे गारूड हा वर्ग अनुभवतो आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊन पाकिस्तानी कुरापतखोरांना कंठस्नान घालणे असेल किंवा काळा पैसा निखंदून बाहेर काढण्यासाठी चलनी नोटा एका क्षणात रद्दबातल करण्याचे धोरण असेल.. मोदी धाडसाने निर्णय घेताहेत आणि ते या 'अपवर्डली मोबाईल' जनतेला भावताहेत..

'नोटाबंदीने नेमके काय साधले' हा प्रश्‍न पडावा अशी निवडणुकांत वाहणाऱ्या पैशाची स्थिती.. पण जनता अजून वेळ द्यायला तयार आहे. नव्या नेत्याला परिस्थिती बदलायला वेळ द्यावाच लागतो, यावर या जनतेची श्रद्धा आहे. कित्येक वर्षांच्या स्थितीप्रियतेबद्दलच्या द्वेषातून ही श्रद्धा जागवली आहे की सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रखर विचाराने, ते सांगणे कठीण असले, तरीही 'श्रद्धा आहे' हे लक्षात घेणे महत्त्वाचे. या श्रद्धेला सध्या बळ मिळते आहे ते अत्यंच चिवट, चाणाक्ष नियोजक असलेल्या अमित शहा यांच्या कामगिरीने! त्यांनी मोदीपर्वाला 'चार चॉंद' लावले आहेत. अपवादात्मक राज्ये सोडली, तर भाजपचा सर्वत्र विजय होत आहे. पूर्वी केवळ राममंदिराच्या घोषणा असत. आता राष्ट्रवादवाली मंडळी अधिक चाणाक्ष आहेत, 'पॉलिटिकली करेक्‍ट' आहेत. 'गर्व से कहो..' काळाच्या पडद्याआड गेले आहे. 'सब का साथ, सब का विकास' हा सध्याचा नारा आहे. बौद्धिकांच्या शाब्दिक कसरतींमध्ये गुंतून न राहता वायूमंडलाऐवजी जमिनीवर काम करणे गरजेचे असल्याची प्रखर जाणीव भाजपच्या आताच्या पिढीला आहे.

गरीबाच्या घरी गॅसची जोडणी देणारी 'उज्ज्वला' योजना सरकारने तयार केली आहे. शेवटच्या घटकाचा विचार करणारे 'जन धन' कमालीचे लोकप्रिय होऊ लागले आहे. 'विकासात प्रत्येकाला सहभागी केल्याशिवाय परिवर्तन होणार नाही' याचे भान मोदी-शहा यांना आहे. त्यामुळे बदल वेगाने घडताहेत.. ते लोकाभिमुख असायला हवे, याची जाणीव भाजपच्या प्रत्येक राज्यकर्त्याला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या यशाचे आवर्तन झाल्यानंतर कुठल्याही विचारात न पडता गोरखपूरच्या मठाधीशाला मुख्यमंत्री करणारा साहसवाद या दुकलीच्या रक्तात आहे. जगाच्या नव्या सुखवस्तू मांडणीत स्वत:ला शोधणाऱ्या मध्यमवर्गाला हे सारे भावणारे आहे. ' मोदी तारणहार'चा विचार 'ट्रिकल डाऊन थिअरी'प्रमाणे निम्न-मध्यमवर्गीयांना आणि उपयुक्ततावादामुळे गरीबांनाही पटला आहे.. सध्यातरी..!

जन हे बदल स्वीकारत असताना बहुतांश अभिजन आक्रसले आहेत (इथे वैचारिकतेच्या आधारावर जन-अभिजन ठरविले आहेत. जात किंवा पैसा मला इथे अभिप्रेत नाही). सध्याचे हे वास्तव स्वीकारायला तथाकथित विचारवंत लोक ठाम नकार देत आहेत. रामाचे नाव घेतले आणि गुढी पाहिली, की भारतीयांच्या भावना उचंबळून येतात, याची जाण नसलेली ही मंडळी आहेत. देशातल्या गल्लीगल्लीत धार्मिक सण उल्हासाने साजरे होत असतात, याचे भान या मंडळींना कधी नव्हतेच.. अगदी लोहियांनी रामाला पूजले तरीही! 'या देशाचा मुख्य स्वर हा धर्म आहे,' या वास्तवाला प्रथमत: नाकारत आणि नंतर 'या प्रकाराशी आम्हाला काहीही घेणे-देणे नाही' म्हणत ही मंडळी जगली. भूपाळ्यांचे स्वर, गंगा किनाऱ्याची प्रसन्नता भारतीयांच्या जनुकात आहे, याची जाणीव नसलेली ही मंडळी काळ बदलल्याने कमालीची अस्वस्थ आहेत. आता लपून-छपून आरत्या करण्याची किंवा एखाद्या धर्माच्या सामूहिक उपासनेला उत्तर देण्यासाठी महाआरती नाक्‍या-नाक्‍यावर घेण्याची आता गरज राहिलेली नाही. याचा अर्थ, 'ही मंडली निधर्मी रचनेवर वरवंटा फिरवायला निघालेली आहेत' असा सोयीस्कर अर्थ विचारवंत मंडळी लावत आहेत. योगी आदित्यनाथांनीही मुख्यमंत्री होण्यापूर्वीच भाषा बदलली, याची नोंद या मंडळींनी घेतली काय? 'राज्यघटना हाच अंतिम शब्द आहे' असे त्यांनी प्रणय रॉय यांच्याशी गप्पा मारत असताना 'एनडीटीव्ही'च्या कार्यक्रमात सांगितले. मुख्यमंत्री होण्यापूर्वीच हे शहाणपण आलेला नेता फारतर अवैध कत्तलखाने बंद करेल; पण युगानुयुगे चालत आलेल्या भारताच्या सहिष्णू परंपरेला नख लावून चालणार नाही, हे कसा विसरेल? 'अजेंडा कुठवर राबवावा' याची या मंडळींना निश्‍चित जाणीव असणार. नसेल, तर ती जाणीव भारतीय मतदार वेळप्रसंगी करून देईलच.. 'जिंकणे' ही ज्या पक्षाची गरज आहे, त्याला सर्वसमावेशकतेची चटक लागणार, हे उघड आहे. राजकीय पक्ष कमालीचे हुषार असतात. ते स्वत:ची काळजी घेतील. नाही घेतली, तर आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांना जे काही भोगावे लागले ते यांच्याही भाळी येईल. त्यामुळे त्यांची चिंता करायची गरज नाही. खरी चिंता करायची असेल, तर ती करावी लागणार आहे या देशाचे वास्तव ज्ञात नसलेल्या मेकॉलेपंथाचे शिक्षण घेतलेल्या मंडळींची!

गुढीपाडव्याचा उत्सव त्यांना कानठळ्या बसविणारा वाटत आहे. तसा आहेही; पण ज्या समाजाला उत्सवाची गरज आहे, त्यांची मानसिकता समजून घेणे आवश्‍यक नाही? हिंदू धर्मही काळाच्या प्रवाहात नारळ सोडून नारळाच्या करवंटीची पूजा करणारा झाला आहे. तसे ते सर्वच धर्मांचे होत असते. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या या उत्साही मंडळींच्या नावे बोटे न मांडता त्यांच्या या उत्साहाला वळण देण्याची गरज आहे. धार्मिक वृत्तीला काम देण्याची गरज आहे. ते मोदींना कळत आहे. रंगबिरंगी कपड्यांतील तरुणाईला 'स्वच्छ भारतासाठी हातात झाडू घ्या' हे मोदी स्वच्छ भाषेत सांगत आहेत. 'मन की बात'मध्ये 'परीक्षेचा ताण घेऊ नका' असा संवाद पंतप्रधान प्रथमच साधत आहे. ही धरून-बांधून आणलेली नाटकी शैली आहे का, याचे उत्तर आज देता येणार नाही; पण समाजात काय घडत आहे, याची नाडी ओळखण्याचे कसब या नेत्यात आहे. लोकांना उत्सव आवडतात, हे नेत्यांना कळत असतेच. त्यामुळेच नेते देवदर्शनाला जातात, नवरात्रीचा आनंद घेतात, गणेशोत्सवात परस्परांकडे जऊन अभिष्ट चिंततात.

ईद अन नाताळाला त्या धर्माच्या मित्रांकडे जाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. समाज असाच आहे ,तो असाच वागणार हे लक्षात घेत मोदी पुढे जात आहेत. या उत्सवातल्या उर्जेचे भान त्यांना आहे; आपण ते नाकारून नेमके काय करतो आहोत ? पाडव्याच्या मिरवणुकीचे आवाज बंद झाले आहेत. ढोल शांतावले आहेत. मात्र पुन्हा थाप देण्यासाठी कित्येक हात मोक्‍याच्या शोधात आहेत. या तरूणाईला स्वप्ने दाखवणे, त्यांना काम देणे हे मोठे शिवधनुष्य आहे. "मिलियन म्युटीनीज नाउ,' असे नायपॉलने म्हटलेय भारताबद्दल. त्या तरूण भारताची स्पंदने मोदींना कळताहेत. विचारवंतांनाही ती कळली; नेमके काय होते आहे, याचे उत्तर कदाचित सापडेलही. ढोलताशे विकासाच्या परीघाबाहेर असलेल्या भारतात बदल घडवण्यासाठी कुणी साद घातली तर तिकडे जातीलही; गरज आहे नेतृत्व देण्याची, दिशा दाखवण्याची. नानासाहेब धर्माधिकारी, स्वाध्यायी, पांडुरंगशास्त्री आठवले अशी मंडळी या शक्‍तीचा वापर करताहेत, सामाजिक कामे उभी करीत आहेत. धर्म हा भारताचा मुख्य स्वर आहे, विवेकानंद म्हणाले होते. आजचेही वास्तव तेच आहे. ते मान्य केले तर सध्या काय होतेय, त्याची सुभग चिकित्सा करता येईल अन नरोटीची उपासना करणाऱ्यांना नारळ काय असतो ते समजावूनही सांगता येईल. प्रचंड उर्जेने सक्रिय झालेल्या या तरूणाईला हाताशी धरुन गुढी सुखाची उभवी म्हणत प्रतिज्ञारत होणे आवश्‍यक झाले आहे. प्रत्येकाच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत. स्वत:ला सुखी करायची, अशी असोशी कदाचित या आधीच्या कोणत्याही शतकाने पाहिली नसेल. आताच्या व्यवहारी अध्यात्माची सिध्दी कर्मयोग आहे अन साधन प्रयत्न. जागतिकीकरणात स्वत:ला शोधणाऱ्या भारताच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडला रस्ता दाखवणारे हवे आहेत. हे काम मोदीयोगींच्या निंदेत गुंतलेल्या समाजातल्या जागल्यांनी केले नाही मोदींचे नुकसान होणार नाही, त्यांच्या भक्‍तमंडळींच्या हाती कोलित तेवढे मिळेल. लोकशाही व्यवस्था एकदा का मान्य केली की त्याचे निकालही खुल्या दिलाने स्वीकारायचे असतात. हे का घडले आहे याचे चिंतन करायचे असते. प्राप्तकाळाच्या विशाल भूधरावर लेणी कोरण्याचे काम कुठल्याही परिस्थितीत सोडायचे नसते. भौतिक आकांक्षांना सर्वाधिक महत्व देणाऱ्या या काळात सुखाची गुढी उभवण्याचे ज्ञानेश्‍वर महाराजांना अभिप्रेत असलेले काम न संतापता ,ढोलाच्या आवाजाने विचलित न होता करायचे असते.

पाच वर्षांनी परिस्थिती उजवीकडून डावीकडे जावी अशी इच्छा असेल तर तळतळाट करून भागत नसते पर्याय उभा करायची तयारी ठेवायची असते. त्या तयारीसाठी तथाकथित विचारवंत मंडळींना नववर्षाच्या विशेष शुभेच्छा.

Web Title: blog regarding modi and intellectuals