मोकळे व्हा : नात्यामध्ये हवी शरीर स्वच्छता

- डॉ. सागर पाठक, स्त्री रोगतज्ज्ञ
रविवार, 18 ऑगस्ट 2019

शरीराची स्वच्छता राखायला पाहिजे हे आपण जाणतो; पण शास्त्रीयदृष्ट्या ती राखायची कशी, हे कोणीच सांगत नाही. शरीराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज अंघोळ करायला पाहिजे; पण योग्य अंघोळ कशी करायची, याचे प्रशिक्षण आपल्याला कधी मिळतच नाही.

सकाळी सकाळी रोहिणीचा फोन आल्यावर मला समजले, काहीतरी अर्जंट केस आहे. रोहिणी आमच्या 4 C's कौन्सिलिंग सेंटरची एक उत्कृष्ट विवाह समुपदेशक. रोहिणी म्हणाली, ‘‘सर, माझ्याकडे चंद्रकांत व रेश्मा हे जोडपे वैवाहिक समुपदेशनासाठी येत होते. त्यांच्या नात्यांमध्ये अनेक गैरसमज होते ते सगळे समुपदेशनाद्वारे मी दूर केले. दोघे वेगळे झाले होते; पण समुपदेशनानंतर पुन्हा एकत्र राहायला लागले. एकत्र राहायला लागल्यावर जेमतेम महिना झाला आणि आता परत दोघे भांडू लागले आहेत; पण आता गैरसमजुतीचा मुद्दा काय आहे, हेच दोघे मला सांगत नाहीत. मी त्यांना आज सकाळीच तुमच्याकडे पाठवून देत आहे." 

चंद्रकांत व रेश्मा खासगी कंपनीमध्ये काम करत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील या दोघांच्या प्रेमविवाहाला एक वर्ष झाले होते. दोघांशी बोलायला लागल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली, या दोघांच्या लैंगिक सहजीवनात काहीतरी अडचण आहे. लाजेमुळे, समाजाच्या भीतीमुळे किंवा अज्ञानामुळे दोघेही त्याबद्दल बोलायला तयार नव्हते. विश्वासात घेतल्यावर दोघांनीही आमच्यात शारीरिक संबंध येतच नाहीत, याची कबुली दिली. 

‘‘चंद्रकांत तंबाखू खातो, सिगरेट पितो व याचा त्याच्या तोंडाला अतिशय उग्र दर्प येतो. या नावडत्या वासामुळे मला त्याच्याशी शारीरिक जवळीक करायची इच्छाच होत नाही’’, असे रेश्मा म्हणाली. 

हे व्यसनच आपल्या शारीरिक संबंधांना बाधा करत आहे, हे गृहीत धरून चंद्रकांतची तंबाखू सोडवण्यासाठी आपणहूनच ते अनेक जणांकडे जाऊन आले होते. व्यसनाच्या बाबतीत थोडेफार यश आले पण शारीरिक संबंध काही प्रस्थापित होऊ शकले नाहीत. 
लग्नाअगोदर चंद्रकांत तंबाखूचे व्यसन करत होता का; या प्रश्नाला रेश्माने होकारार्थी उत्तर दिले. लग्नाअगोदर व लग्नानंतर काही महिने त्यांच्यामध्ये योग्य शरीर संबंधपण आले होते. मग आताच रेश्माला चंद्रकांतच्या तोंडाचा हा दर्प का आवडत नाही, असा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नानंतरच रेश्माने त्यांच्यामध्ये शरीरसंबंध न येण्याचे खरे कारण सांगितले. 

चंद्रकांत व्यसन जरूर करत होता; पण त्याची एक अत्यंत खराब अशी सवय होती. तो आठवड्यातून फक्त दोनदाच अंघोळ करायचा. स्वतःच्या शरीराच्या स्वच्छतेबद्दल तो अतिशय उदासीन होता. त्याच्या कारखान्यातील प्रदूषण, शरीराची अस्वच्छता, घाम या सगळ्यामुळे चंद्रकांतच्या संपूर्ण शरीरालाच एक उग्र दर्प यायचा. रेश्माने अनेक वेळा सांगूनही त्याला शरीराची स्वच्छता राखायला पाहिजे, हे समजतच नव्हते. ती कशी राखायची याचे ज्ञान नव्हते. 

मी करतोय ते योग्यच आहे, असा त्याचा समज होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हेच वाटते. शरीराची स्वच्छता राखायला पाहिजे हे आपण जाणतो; पण शास्त्रीयदृष्ट्या ती राखायची कशी, हे कोणीच सांगत नाही. शरीराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज अंघोळ करायला पाहिजे; पण योग्य अंघोळ कशी करायची, याचे प्रशिक्षण आपल्याला कधी मिळतच नाही. अंघोळ करण्यासाठी कुठल्या कंपनीचा साबण वापरायचा, याबद्दल आपण जागरूक असतो, परंतु तो साबण लावताना संपूर्ण अंग घासले पाहिजे, हे आपण जाणत नाही. शरीराच्या जास्त घाम येणाऱ्या जागा जसे डोक्यावरचे केस, मान, छाती, गुप्तांगे रोजच्या रोज व्यवस्थित घासून साफ करायला पाहिजेत. गुप्तांगे साफ करताना पुरुषांनी लिंगाची कातडी मागे ओढून लिंग साफ करायला पाहिजे. तसेच स्त्रियांनी गुप्तांगाचे ओठ बाजूला करून साफ करायला पाहिजे. अंघोळ झाल्यावर सर्वांग कोरडे करायला पाहिजे. 
दरवेळेला शौचाला जाऊन आल्यावर जागा साफ धुतल्यावर ती कोरडी करणे अत्यंत गरजेचे आहे. कोरडे न करता तसेच आतील कपडे घातल्यास दमटपणा राहतो, जेणेकरून जंतुसंसर्गाला आमंत्रण मिळते. 

आतील अंतर्वस्त्रे ही सुती घातली गेली पाहिजेत. नायलॉन-लिक्रा अशा कापडांनी बनवलेली अंतर्वस्त्रे घालू नयेत. आपल्या शरीराला विशेषतः गुप्तांगांना जितका घाम येईल, तितके जंतुसंसर्ग व त्यामुळे उग्र दर्प येण्याची शक्यता वाढते. कमीतकमी घाम येण्यासाठी मुबलक प्रमाणात पावडर लावणे, अंतवस्त्रे दिवसातून दोन किंवा तीन वेळा बदलणे या गोष्टी करणे गरजेचे आहे. 

जंतुसंसर्ग झाल्यास शरीर संबंधांमधून तो एकमेकांच्या शरीरात पसरू शकतो. स्त्रियांनी विशेषतः मासिक पाळीमध्ये काळजी घेणे जरुरी आहे. मासिक पाळीमध्ये पॅड किंवा घरातील कापड हे निर्जंतुक करूनच वापरायला पाहिजे. अस्वच्छ, न धुतलेले कपडे वापरणे म्हणजे जंतूंना आमंत्रण दिल्यासारखेच होते. मासिक पाळीमध्ये पॅड पूर्ण भिजण्याच्या अगोदर बदलायला पाहिजे. 

शरीर संबंध आल्यानंतरदेखील दोघांनीही स्वतःच्या गुप्तांगाची स्वच्छता करणे गरजेचे आहे. स्वच्छता बाळगूनही जर जंतुसंसर्ग झालाच तर ताबडतोब न लाजता वैद्यकीय उपचार घेऊन तो आटोक्यात आणणे आवश्यक आहे. 

या स्वच्छतेच्या गोष्टींची सत्यता चंद्रकांतला समजल्यावर त्याने आपल्या सवयी बदलून टाकल्या. स्वच्छ शरीराचा सुवास हा कुठल्याही सेंट किंवा डिओड्रंटपेक्षा जास्त प्रभावी असतो. समुपदेशनाद्वारे स्वच्छतेची महती पटल्यावर चंद्रकांत व रेश्मा यांचे लैंगिक सहजीवन खऱ्या अर्थाने सुरू झाले. आज दोघेही स्वच्छतेच्या देवतेची पूजा करत आपल्या शरीर मंदिरांमध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: body hygiene should be in relationship