कर्तृत्वशिखराचं विलोभनीय दर्शन

प्रा. मिलिंद जोशी
रविवार, 25 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

भारतीयांना महासत्तेचं स्वप्न दाखवणारे आणि त्यांच्या मनात सकारात्मक विचारांची दिवेलागण करणारे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होतं. ‘एरॉनॉटिकल इंजिनिअर’, ‘रॉकेट सायंटिस्ट’, ‘मिसाईल मॅन’, अशा अनेक रूपांत वावरणारे डॉ. कलाम हे आदर्श शिक्षक आणि भविष्याचा वेध घेणारे विचारवंत होते. त्यांचं सबंध जीवन ही स्फूर्तीची गाथा आहे. मरगळलेल्या मनांना नवचैतन्य देण्याचं विलक्षण सामर्थ्य त्यांच्या जीवनचरित्रात आणि तत्त्वज्ञानात आहे. अशा या कर्तृत्वशिखराचं विलोभनीय दर्शन ‘ए. पी. जे. अब्दुल कलाम संपूर्ण जीवन’ या पुस्तकात अरुण तिवारी यांनी घडवलं आहे. त्याचा अनुवाद आ. श्री. केतकर यांनी केला आहे. 

हैदराबाद विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसमध्ये ‘ॲडजंक्‍ट प्रोफेसर’ म्हणून कार्यरत असणारे अरुण तिवारी हे भारतात संरक्षण तंत्रज्ञानासाठी भक्कम औद्योगिक पाया निर्माण करण्यासाठी सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी करत आहेत. त्यांना कलाम यांच्या चमूतील सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनीच १९९९ मध्ये कलाम यांच्याबरोबर त्यांचं आत्मचरित्र ‘विंग्ज ऑफ फायर’ शब्दबद्ध केलं. अनेक पुस्तकांसाठी त्यांनी कलाम यांच्या सहलेखकाची भूमिका पार पाडली; त्यामुळं या चरित्रात त्यांनी रेखाटलेलं कलाम यांचं व्यक्तिचित्र कलाम यांच्या अनेक अज्ञात पैलूंवर नेमकेपणानं प्रकाश टाकणारं आहे. वाचकांना कलाम यांच्याविषयीच्या किती तरी नव्या गोष्टी या पुस्तकातून समजतात. कलाम यांच्याविषयीची अनेक पुस्तकं आजवर प्रकाशित झाली. लेखकाला कलाम यांचा अतिशय जवळून घडलेला सहवास, सततचा संपर्क आणि त्यांच्याबरोबर सहलेखन करण्याची मिळालेली संधी यांमुळं त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक इतर सर्व पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ आहे. या पुस्तकात केवळ कलाम यांचं जीवनचरित्र नाही. ज्या महापुरुषांच्या विचारांतून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडलं त्याचं चिंतन आहे, माणूस म्हणून घडलेलं दर्शन आहे. वैयक्तिक आठवणी आणि किस्से आहेत. अनेक घटना-प्रसंगातल्या कलाम यांच्या उत्कट भावना या पुस्तकात शब्दबद्ध झाल्या आहेत. त्यामुळे कलाम यांना समग्रपणे समजून घेण्यासाठीचं परिपूर्ण जीवनचरित्र म्हणून या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल.

‘नांदी’, ‘निर्मिती’, ‘जाणीव’ आणि ‘विस्तार’ अशा चार भागांतल्या ३२ प्रकरणांतून कलाम यांचा जीवनप्रवास उलगडत जातो. सर्वसामान्य कुटुंबात जन्मास आलेल्या कलाम यांना त्यांच्या मनात आशेचं नंदनवन निर्माण करणारे शिक्षक शालेय जीवनातच भेटले. त्यांचे शिक्षक सुब्रमणिया अय्यर यांनी पक्ष्यांच्या उड्डाणाबाबत वर्गात शिकवताना फळ्यावर पक्ष्याचं चित्र काढलं. पक्षी आधी उड्डाण करून नंतर कसे उडू लागतात, हे सांगितलं. ते कलाम यांना समजलं नाही, तेव्हा त्यांचे शिक्षक त्यांना उडणारे पक्षी दाखविण्यासाठी समुद्रकिनारी घेऊन गेले. तिथं उडणारे पक्षी पाहून कलामांना कळून चुकलं, की पक्ष्याला त्याच्या जीवनापासूनच भरारी घेण्याची ऊर्जा मिळते आणि त्याची तीव्र इच्छाच त्याला उडण्याची प्रेरणा देते. या धड्याचा कलाम यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या धड्यानं त्यांना केवळ पक्ष्यांच्या उडण्यामागचं भौतिकशास्त्र समजावून सांगितलं नाही, तर पक्ष्यांचं उड्डाण हे त्यांच्या इच्छाशक्तीचे प्रतीक बनलं. ऐहिक मर्यादांवर स्वार होत आणि संकटांशी दोन हात करत झेपावून जाण्याचं स्वप्न त्यांच्या मनात पेरलं. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कलाम अहोरात्र प्रयत्नशील राहिले. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये या एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी कलाम यांनी अर्ज केला तो स्वीकारला गेला; परंतु या मानाच्या संस्थेत प्रवेश घेणं हे खर्चिक काम होतं. त्या वेळी कलाम यांची बहीण जोहरा त्यांच्या मदतीला धावून आली. त्यांच्या प्रवेशासाठी तिनं आपल्या सोन्याच्या बांगड्या आणि साखळी गहाण ठेवली. या कृतीनं कलामांना खरा त्याग म्हणजे काय, हे शिकवलं. अशा अनेक प्रसंगांनी कलामांना जीवनदर्शन घडवलं आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं अधिक परिपक्व होत गेलं, या संस्कारांविषयी लेखकाने खूप नेमकेपणानं या पुस्तकात लिहिलं आहे.

एमआयटीमध्ये शिकत असताना प्रा. स्पाँडर, प्रा. के. व्ही. ए. पंडलई, प्रा. नरसिंह राव, प्रा. श्रीनिवासन यांच्यासारखे अधिकारी प्राध्यापक त्यांना गुरू म्हणून लाभले. त्यांनी कलामांमधल्या जिज्ञासू कृतीला नव्या वाटा दाखविल्या. आपल्या महत्त्वाकांक्षांना जीवनसिद्धीत साकार करण्याच्या खेळातले दोन प्रतिस्पर्धी आहेत- ते म्हणजे भीती आणि अज्ञान. या विषयावर ज्ञान हाच उतारा आहे, हा संस्कार दिला. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी एमआयटीतून पदविका घेऊन बाहेर पडलेले कलाम आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज होते. एमआयटीतून बंगळूरच्या हिंदुस्थान एअरक्राप्ट लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून झालेली निवड, डीटीडी अँड पी (एअर)मध्ये वैज्ञानिक सहायक म्हणून केलेलं काम, भारतीय अंतराळ संशोधक समितीत अग्निबाण अभियंता म्हणून झालेली नेमणूक, नासात प्रशिक्षणासाठी जाण्याची मिळालेली संधी आणि डॉ. विक्रम साराभाई यांचा घडलेला सहवास यातून कलाम यांच्यातला संशोधक फुलत गेला. भारताच्या पृथ्वीभोवतीच्या आणि त्यापलीकडच्या वातावरणाच्या संशोधन (एरोस्पेस) कार्यक्रमाची सुरवात झाली, त्याला डॉ. कलाम कारणीभूत होते. केंद्र सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागाराचं कार्यालय १९९९मध्ये निर्माण करण्यात आलं आणि कलाम यांची या उच्चपदावर नेमणूक झाली. नवीन संशोधकांसाठी धोरणं, कृतीयोजना आणि वेगवेगळे कार्यक्रम तयार करून विविध कामांसाठी उपयुक्त ठरेल, अशी साह्यभूत यंत्रणा निर्माण करणं हे त्यांचं काम त्यांनी चोख पार पाडलं. हा सारा प्रवास अनेक तपशीलांसह या पुस्तकात आहे. 

देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांची प्रचंड बहुमतानं निवड झाली. भारतीय प्रजासत्ताकाचे ते पहिलेच शास्त्रज्ञ- जे राष्ट्रपती बनले. शपथग्रहण समारंभानंतर राष्ट्रपती कलाम यांना एकवीस तोफांची सलामी देऊन सहा घोड्यांच्या बग्गीतून घोडदळाच्या पथकातील घोड्यावर स्वार असलेल्या शरीररक्षकासह राष्ट्रपतीभवनात नेण्यात आले. हा सारा प्रसंग लेखकानं विलक्षण रेखाटला आहे. कलाम यांचा नेहमीचा आवडता वेश म्हणजे निळा शर्ट आणि स्पोर्ट शूज, यापुढं बंद गळ्याचा सूट हा त्यांचा नवा पोशाख असणार होता. अतिशय साधेपणानं आयुष्य जगणारे कलाम यांना राष्ट्रपतीभवनातले शिष्टाचार पाळताना कशी कसरत करावी लागली आणि राष्ट्रपतीभवनातल्या मंडळींना त्यांच्या संतवृत्तीचे दर्शन कसं घडलं, हे वाचण्याजोगं आहे.

कलाम हे मुलांना आणि तरुणांना भेटण्यासाठी कायम उत्सुक असत. सौराष्ट्रातील सारंगपूर या लहानशा गावात एका युवा परिषदेत भाषण करून थकलेले कलाम विश्रांती घेत होते. एक सहा वर्षांचा मुलगा त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धडपडत होता. सुरक्षारक्षक अडवत होते. त्यांच्या सुरक्षा कड्यातून आत येण्यास कलाम यांनी त्याला परवानगी दिली. त्याला स्वाक्षरी दिल्यानंतर कलाम हसले आणि म्हणाले, ‘‘लहान मुलांना कधीही निराश करू नका- कारण ते आपल्या आयुष्यातली सुरवातीची वर्षं जगत आहेत.’’ त्यानंतर काही मिनिटांतच ते त्यांच्या मोटारीकडे जात असताना एका नव्वद वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्यानं हात उंचावला. डॉ. कलाम त्याच्या दिशेनं चालत गेले. त्या वृद्धाच्या पणतूला कलाम यांच्याबरोबर छायाचित्र हवं होते. कलाम यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि म्हणाले, ‘‘वृद्ध माणसाला कधीही निराश करू नका. कारण तो आपल्या आयुष्याची अखेरची वर्षं जगत असतो.’’ अशा अनेक प्रसंगातून कलाम यांच्यातल्या माणूसपणाचं दर्शन लेखकानं घडवलं आहे. कलाम यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान साधं-सोपं होतं. या पृथ्वीतलावर एकही दुःखी चेहरा नसावा, असं त्यांना वाटत होतं.

अनेकदा जे विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादी असतात, त्यांच्या भावनांना मोहोर येत नाही, असं म्हटलं जातं; पण कलाम यांच्याबाबतीत असं घडलं नाही. ते अध्यात्म मानणारे वैज्ञानिक होते. ‘धर्म हे अंतरंगाचं विज्ञान आणि विज्ञान हा बाह्यसृष्टीचा धर्म’, या विचाराशी ते सहमत होते. हे सारं स्वीकारताना ‘भारतीयत्वाला’ त्यांचं नेहमीच सर्वोच्च प्राधान्य होतं. आपल्या जगण्यातून आणि विचारांतून जनसामान्यांची मनं प्रज्वलित करणाऱ्या कलाम यांना जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. एका कर्तृत्वशिखराला प्रदक्षिणा घातल्याचा आनंद हे पुस्तक आवर्जून देतं.

Web Title: Book review by Milind Joshi