ग्राहकांना समर्थ बनवण्यासाठी कानमंत्र

प्रा. क्षितिज पाटुकले
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

ग्राहक संरक्षण क्षेत्रात काम करणारे विवेक वेलणकर यांचं ‘ग्राहक राजा, सजग हो!’ हे पुस्तक फक्त ग्राहकालाच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला सजग करतं. दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचा ज्ञानपूर्ण आणि यशस्वी मुकाबला कसा करायचा, याचं व्यावहारिक प्रशिक्षण हे पुस्तक देतं. आकर्षक मुखपृष्ठ आणि उत्तम बांधणी ही राजहंसची वैशिष्ट्ये पुस्तकाची शोभा वाढवतात. सुरवातीलाच माहिती अधिकाराच्या कायद्याबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या स्वरूपामध्ये मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी ग्रामीण भागातल्या लिहिता-वाचता येणाऱ्या नागरिकालाही हा माहिती अधिकार सहज समजेल.

ग्राहक संरक्षण क्षेत्रात काम करणारे विवेक वेलणकर यांचं ‘ग्राहक राजा, सजग हो!’ हे पुस्तक फक्त ग्राहकालाच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला सजग करतं. दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचा ज्ञानपूर्ण आणि यशस्वी मुकाबला कसा करायचा, याचं व्यावहारिक प्रशिक्षण हे पुस्तक देतं. आकर्षक मुखपृष्ठ आणि उत्तम बांधणी ही राजहंसची वैशिष्ट्ये पुस्तकाची शोभा वाढवतात. सुरवातीलाच माहिती अधिकाराच्या कायद्याबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या स्वरूपामध्ये मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी ग्रामीण भागातल्या लिहिता-वाचता येणाऱ्या नागरिकालाही हा माहिती अधिकार सहज समजेल. माहिती अधिकारात कोण, कसा, कुठं, कधी अर्ज करू शकतो, त्यासाठी येणारा खर्च, माहिती शुल्क इत्यादी सविस्तर माहिती, त्याचबरोबर माहिती अधिकारात करायच्या अर्जांचा, अपीलाचा नमुना आणि शासन निर्णयच पुस्तकामध्ये समाविष्ट केले असल्यामुळं प्रत्येक नागरिक माहिती अधिकाराचा परिणामकारकपणे वापर करू शकेल. माहिती अधिकाराबाबतच्या यशस्वी लढ्यांच्या कथांनी या पुस्तकाची रंगत आणि उपयुक्तता वाढवली आहे. माहिती अधिकाराच्या दणक्‍यामुळे पुणे महापालिकेला आयडिया कंपनीनं २२ लाख रुपयांची बिलांतून वजावट कशी दिली आणि महाराष्ट्र बॅंकेच्या अध्यक्षांची गच्छंती कशी झाली, अशा सत्यकथा उल्लेखनीय आहेत. सर्वसामान्य नागरिक कशा प्रकारे बलाढ्य कंपन्यांना आणि भ्रष्टाचारी नोकरशहांना ताळ्यावर आणू शकतात, याचे हे जिवंत दाखले आहेत.

ग्राहक संरक्षण कायदाही वेलणकर यांनी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये सोपा करून सांगितला आहे आणि यशस्वी ग्राहक लढ्यांच्या सांगितलेल्या कथाही प्रेरणादायी आहेत. वीज, दूरध्वनी, मोबाईल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादींचे ग्राहक, रेशनकार्डधारक यांच्यापासून ते अगदी बॅंक आणि विमा ग्राहकांचे हक्क आणि अधिकार आणि त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी केलेलं मार्गदर्शन अफलातून आहे. सुशिक्षित आणि जागृत नागरिकांनाही यातील ऐंशी टक्‍क्‍यांहून अधिक माहिती नवीन असण्याचीच शक्‍यता आहे. कायद्यानं जे अधिकार दिलेले आहेत, ते समजून घेऊन त्यांच्या केवळ अंमलबजावणीचा आग्रह जरी नागरिकांनी धरला, तरी अनेक समस्यांचं निराकरण होऊ शकेल. ‘विलंबास प्रतिबंध.. दप्तर दिरंगाईस चाप’, ‘अधिकाऱ्यांना तुरुंगवास’, ‘कालबद्ध शासकीय सेवेची हमी’ ही प्रकरणं मुळापासूनच वाचायला हवीत. ग्राहकांनी तक्रार कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठीचे तक्रार केंद्राचे पत्ते, फोन क्रमांक आणि वेबसाइट दिल्यानं पुस्तकाचा प्रत्यक्षात उपयोग होईल. ज्या लोकशाहीमध्ये प्रजा ही राजा आहे, तिथंच ती असहाय आणि हतबल झाली आहे, हे वास्तव आपण रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो आहोत. ‘ग्राहक राजा, सजग हो!’ ही प्रजेला राजा बनवणारी पहिली पायरी आहे. त्यावर आता नागरिकांनी खंबीरपणे वाटचाल करून लोकशाहीला समर्थ करणं आणि देशाला महासत्ता बनवणं आवश्‍यक आहे. विवेक वेलणकर यांचं पुस्तक हे त्या दिशेनं टाकलेलं प्रबोधनाचं
पाऊल आहे.
पुस्तकाचं नाव - ग्राहक राजा, सजग हो!
प्रकाशक - राजहंस प्रकाशन,
पुणे (०२०-२४४७३४५९)
पृष्ठं -  १२४, मूल्य - १५० रुपये

Web Title: book review in saptarang

फोटो गॅलरी