स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

निमित्त...जिप्सी शिवाजी पार्क

निमित्त...जिप्सी शिवाजी पार्क
मुंबईतल्या शिवाजी पार्कजवळच्या ‘जिप्सी’ या प्रसिद्ध हॉटेलचे संस्थापक राहुल लिमये यांच्या आठवणींचा हा संग्रह. लहानपणीच्या व्रात्यपणापासून ते या हॉटेलच्या उभारणीपर्यंतचा प्रवास त्यांनी सविस्तरपणे लिहिला आहे. त्यांच्या कारकिर्दीतले टप्पे, हॉटेल उभारण्याचा प्रवास, त्यातल्या अडचणी अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. हॉटेलच्या निमित्तानं अनेक दिग्गज राजकीय नेते, कलाकार आणि इतर किती तरी मंडळी त्यांच्या आयुष्यात आली. त्यांच्याबद्दलही लिमये यांनी लिहिलं आहे. हॉटेलशी संबंधित अनुभवांचं पुस्तक असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकरणांचे त्यांनी ‘स्टार्टर’, ‘मेन कोर्स’, ‘गोडधोड मिठाया’, ‘मसाले-काही गोडे, काही गरम’, ‘मसाला पान’ असे भाग करून आणि अनुक्रमणिकेलाही ‘मेनू कार्ड’ असं नाव देऊन त्यांनी पुस्तकातली ‘लज्जत’ वाढवली आहे.
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९) / पृष्ठं - १४२ / मूल्य - २५० रुपये

ते दोन क्षणसुद्धा
गौरी आनंद पाटील या कलासक्त, आनंदयात्री मुलीनं लिहिलेल्या डायऱ्यांमधल्या मजकुराचं हे संकलन. ‘एक्‍स्टेंटिव्ह ड्रग रेझिस्टंट टीबी’मुळं वयाच्या २२वर्षी तिचं निधन झालं. या आजाराच्या बऱ्याच मोठ्या काळात गौरीनं लिहिलेल्या डायऱ्या तिच्या आईला (रश्‍मी पाटील) सापडल्या आणि त्यांनी गौरीच्या वेगवेगळ्या लेखनाचं, तिच्या कलाकृतींचं संकलन करून हे पुस्तक सादर केलं आहे. अतिशय वेदना सहन करत असतानासुद्धा सकारात्मक जगायचं कसं याचा आदर्शच गौरीच्या लेखनातून उलगडतो. तिला मृत्यूची कल्पना होती आणि त्यामुळंच तिला प्रत्येक क्षण जगायचा होता. ते तिचं जगणं आपल्याला या पुस्तकातून भेटतं. हेलावून टाकणारं, अस्वस्थ करणारं आणि उमेदही देणारं हे पुस्तक. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी त्याचं संपादन केलं आहे. प्रसिद्ध स्तंभलेखक शोभा डे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
प्रकाशक - इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई (०२२-२४१२२७५५) / पृष्ठं - १२० / मूल्य - २५० रुपये

हॅम्लेट (डेन्मार्कचा युवराज)
विल्यम शेक्‍सपिअरच्या हॅम्लेट नाटकानं अनेकांना भुरळ घातली आहे. परशुराम देशपांडे यांनी केलेला या नाटकाचा संपूर्ण अनुवाद यापूर्वी प्रकाशित झाला आहे. तेच नाटक दोन अंकांत बसवण्याची कल्पना पुण्याच्या जागर या संस्थेनं मांडली आणि देशपांडे यांनी या नाटकाची दोन अंकी संक्षिप्त रंगावृत्ती तयार केली आहे. प्रसिद्ध स्वगतं आणि मूळ साच्याला धक्का न लावता आणि काही ठिकाणी स्वतंत्र संवाद लिहून देशपांडे यांनी ही रंगावृत्ती तयार केली आहे.
प्रकाशक - काँटिनेंटल प्रकाशक, पुणे (०२०-२४३३७९८२) / पृष्ठं - ६६ / मूल्य - ८० रुपये  
सिंगल मिंगल

नव्या पिढीचे लेखक श्रीरंजन आवटे यांची ही कादंबरी. सध्याच्या फेसबुकच्या जमान्यातली ही प्रेमकहाणी. कैवल्य आणि रेवा या दोघांचं प्रेम जमण्याची आणि त्यानंतर इतर गोष्टी घडत जाण्याची ही कथा. त्या दोघांशी संबंधित इतर पात्रं, वेगवेगळ्या घटना यांची गुंफण करत ही कहाणी पुढं सरकते. रोखठोकपणा, भावनांचा हळवेपणा, वस्तुस्थितीची जाणीव अशा सगळ्या गोष्टी कादंबरीत आहेत. शारीरिक, मानसिक अशा कोणत्याही भावना मांडायला न लाजता आवटे यांनी ही कादंबरी लिहिली आहे.
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९) / पृष्ठं - २०८/ मूल्य - २०० रुपये

न सांगितलेली गोष्ट
सफाई कामगारांचं विश्‍व चितारणाऱ्या कथांचा हा संग्रह सिद्धार्थ देवधेकर यांनी लिहिला आहे. एकीकडे शहर स्वच्छतेला महत्त्व येत असताना तीच कामगिरी पार पाडणाऱ्यांचं वैयक्तिक आयुष्य किती अंधारानं भरून गेलेलं असतं, त्यावर देवधेकर यांनी प्रकाश टाकला आहे. साधीसुधी स्वप्नं असणारे, मुक्तीसाठी धडपडणारे; पण त्याऐवजी अपेक्षाभंगाचं दु-खच सतत सहन करणारे, अगतिक असे या कथांचे नायक सुन्न करून टाकतात. खूप निरीक्षण करून, अभ्यास करून आणि या लोकांचा माणूस म्हणून विचार करून देवधेकर यांनी या कथा लिहिल्या आहेत. मराठी कथा विश्‍वातला हा निश्‍चितपणे उल्लेखनीय असा प्रयत्न आहे.
प्रकाशक - लोकवाङ्‌मय गृह, मुबई / पृष्ठं - १६०/ मूल्य - २०० रुपये

कार्यालयीन कार्यपद्धती - मार्गदर्शक तत्त्वे
उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांनी वेगवेगळ्या सरकारी कामकाजासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देणारं हे पुस्तक संकलित केलं आहे. अनेक सरकारी नियम, कायदेशीर बाबी, प्रशासकीय बाबी विशेषत- सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच माहीत नसतात. सगळ्या गोष्टींची एकत्रित माहिती देणारं, नेमके संदर्भ देणारं साहित्यही कुठं उपलब्ध नाही. ही त्रुटी हे पुस्तक नक्कीच भरून काढेल. कार्यालयीन कार्यपद्धती, विधिमंडळ कामकाज, राजशिष्टाचार, माहितीचा अधिकार, शासकीय विभागांनी करायच्या कार्यालयीन खरेदीची कार्यपद्धती, कर्मचाऱ्यांच्या दायित्व आणि लाभाच्या बाबी अशा वेगवेगळ्या गोष्टींबाबतचे नियम, मार्गदर्शक तत्त्वं, वेगवेगळे तक्ते अशा गोष्टींचा पुस्तकात समावेश आहे.
प्रकाशक - अश्‍विनी वाघ, पुणे (७०६६०१९००५) / पृष्ठं - ४५८ / मूल्य - ५०० रुपये

स्वातंत्र्ययोद्धा हिंदुराव अप्पा - गाथा आणि गीते
‘प्रतिसरकार’च्या काळात क्रांती लढा तीव्र करण्यात महत्त्वाचा सहभाग असलेले गीतकार हिंदुराव अप्पा यांनी लिहिलेल्या ओजस्वी गीतांचा हा संग्रह. स्वातंत्र्याची ज्योत जागवण्याचं, समाजमन प्रज्वलित करण्याचं हे काम हिंदुराव अप्पा यांच्या या गीतांनी केलं. अनेक वर्षं अप्रकाशित राहिलेली त्यांची ही गाथा त्यांचे चिरंजीव अशोक पाटील यांनी प्रकाशात आणली आहे. साहेबराव ठाणगे यांनी संपादन केलं आहे. १९४२मधला स्वातंत्र्यसंग्राम डोळ्यांसमोर उभा करणारी, जोशपूर्ण; तसंच इतरही अनेक भावना व्यक्त करणारी ही शब्दकळा मराठी कविता विश्‍वात भर घालणारी आहे. वेगवेगळ्या विषयांवरची १७५ गीतं, हिंदुराव अप्पा यांची छायाचित्रं यांचाही पुस्तकात समावेश आहे.
प्रकाशक - जाणीव प्रकाशन, नवी मुंबई (९९६७०७२५१७) / पृष्ठं - २९० /
मूल्य - २५० रुपये

एक होता वाडा
बी. एम. देशमुख यांनी लिहिलेला हा दीर्घ कथासंग्रह. एक होता वाडा आणि पाझर या दोन दीर्घकथांचा त्यात समावेश आहे. लोप पावत चाललेली वाडा संस्कृती, गावाकडे बदलत असलेलं वातावरण, लोकांच्या मानसिकतेत होत असलेले बदल अशा गोष्टी त्यांच्या या कथांमधून प्रतिबिंबित होतात. गावाकडून शहराकडे होत असलेलं स्थलांतर, पाण्याचा प्रश्‍न, वाढलेला ईहवाद अशा गोष्टीही ठळक करणाऱ्या या कथा आहेत.
प्रकाशक - सायन पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२४४७६९५४) / पृष्ठं - १४४ / मूल्य - १७० रुपये

मोकळा
प्रभाकर आचार्य यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. जे. कृष्णमूर्ती, डॉ. हेडगेवार, शंकराचार्य अशा अनेक व्यक्तींपासून व्हर्टिगो, जातीपातींची निर्मिती, पुनर्जन्म, राष्ट्रीयत्व अशा विषयांवर केलेल्या चिंतनपर लेखनाचा पुस्तकात समावेश आहे. इंग्रजीचा वरचष्मा, मेरिटमध्ये येणाऱ्या मुलांचं आवाजवी कौतुक, ज्येष्ठ नागरिकांची स्थिती अशा विषयांवरही त्यांनी विचार मांडले आहेत.
प्रकाशक - प्रभाकर आचार्य, नागपूर (९६६५३०११७२) / पृष्ठं - २०० / मूल्य - २०० रुपये   

उत्तरपूर्वेचे इंद्रधनू
ईशान्य भारतातल्या राज्यांच्या भटकंतीचं वर्णन करणारं हे पुस्तक. राधिका टिपरे यांनी ते लिहिलं आहे. त्रिपुरा, मणिपूर, नागालॅंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि मेघालय या ‘सप्तभगिनी’ या नावानं ओळखलेल्या राज्यांमध्ये त्यांनी प्रवास केला. तिथला सुंदर, घनगर्द निसर्ग, संस्कृती, लोकजीवन, आहारासह इतर सवयी अशा सगळ्या गोष्टी टिपरे पुस्तकातून उलगडतात. त्यांनी एकट्यानं प्रवास केल्यामुळे अनेक गोष्टींची पहिल्यांदाच झालेली माहिती, त्यांची निरीक्षणं, भौगोलिक संदर्भ अशा गोष्टीही पुस्तकात आल्या आहेत. ईशान्येचा निसर्ग आणि तिथलं जीवन टिपणारी अतिशय सुंदर छायाचित्रं असल्यामुळे ती आशयाला पूरक ठरली आहेत.
प्रकाशक - कृष्णा प्रकाशन, पुणे (०२०-२२९४९२२५) / पृष्ठं - २३२ / मूल्य - ३०० रुपये

----------------------------------------------------------------------------------------------
श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा
(अध्याय बारावा- भक्तियोग)

श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या बाराव्या अध्यायाचं श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केलेल्या निरूपणाचं हे संकलन. भारतीय संस्कृतीचा सखोल विचार मांडत आणि त्याच वेळी एकविसाव्या शतकाचा संदर्भ ठेवून मांडलेला गीतेचा अर्थ हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये आणि मन-स्थितीमध्ये सुखशांती देणारी आणि अंतिम कल्याणाची विद्या देणारी ‘ब्रह्मविद्या’च डॉ. श्री बालाजी तांबे गीतेच्या चिंतनातून आपल्याला समजावतात. एकेक शब्द, संज्ञा, संकल्पना उलगडत, विविधांगी दाखले देत गीतेतलं अध्यात्म त्यांनी या पुस्तकात सुलभ करून सांगितलं आहे. ‘साम टीव्ही’ वाहिनीवर ‘श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा’ या कार्यक्रमातून डॉ. श्री बालाजी तांबे यांनी सध्याच्या जीवनपद्धतीला उपयोगी पडेल अशा रितीनं गीतेविषयीचं चिंतन मांडलं. त्यात बाराव्या अध्यायाविषयीचं केलेल्या निरूपणाचं हे पुस्तक चिंतनासाठी, अभ्यासासाठी प्रवृत्त करणारं ठरेल.
प्रकाशक - बालाजी तांबे फाउंडेशन, कार्ला. निर्मिती व वितरण - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८) / पृष्ठं - १७२ /
मूल्य - १६५ रुपये

सकाळ करंट अपडेट्‌स
केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्फे घेण्यात येणाऱ्या; तसंच इतर स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१६ या तीन महिन्यांतल्या राजकीय घडामोडी, केंद्र आणि राज्य सरकारनं घेतलेले निर्णय, न्यायालयीन निर्णय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक घडामोडी; तसंच कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा या क्षेत्रांतील घडामोडींची माहिती या पुस्तकात आहे. या काळात जाहीर झालेले पुरस्कार, महत्त्वाच्या निवडी; तसंच निधन झालेल्या व्यक्तींची माहिती अशा गोष्टींचाही पुस्तकात समावेश आहे.
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १२५ रुपये

कम लागत की चारा उत्पादन तकनिक हायड्रोपोनिक
हायड्रोपोनिक या चारा उत्पादक तंत्रज्ञानाविषयी हिंदी भाषेतून ऊहापोह करणारं हे पुस्तक. डॉ. एस. पी. गायकवाड यांनी ते लिहिलं आहे. वातावरणात, जमिनीच्या उत्पादकतेत होत असलेले बदल, जमिनीचं कमी होत जाणारं क्षेत्र, पाण्याची कमतरता अशा सगळ्या त्रुटींवर हे ‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञान उपयोगी पडतं. केवळ आठ दिवसांत पौष्टिक चारा उपलब्ध करून देणाऱ्या या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या या पुस्तकात आनुषंगिक छायाचित्रं, रेखाचित्रं, तक्ते यांचाही समावेश आहे.
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८) / पृष्ठं - १०२ /
मूल्य - १७० रुपये
----------------------------------------------------------------------------------------------
साभार पोच

  •      हरिपाठ रसायन / आध्यात्मिक / लेखक - दत्तात्रय गायकवाड (९९२२१०२१३७) / प्रकाशक - सुरेखा एजन्सीज, पुणे (९९२२१०२१३७) / पृष्ठं - २२८ / मूल्य - १०० रुपये
  •      शिवार वलांडून जाताना / कवितासंग्रह / कवी - सोमनाथ जाधव (९९७५९८९६१६) / प्रकाशक - मंजुळा प्रकाशन, चांदूस. जि. पुणे (९०४९३१८६५६) / पृष्ठं - ८०/ मूल्य - १०० रुपये
  •      मध्यंतर / कथासंग्रह / पूनम ससाणे / प्रकाशक - ज्ञानतरंग प्रकाशन, वाई, जि. सातारा (०२१६७-२२१४१४) / पृष्ठं - ८० / मूल्य - ९० रुपये
  •      अक्षय-अनाम नाती / कवितासंग्रह / कवयित्री - नीलिमा थिटे (९३७०२७३७१४) / प्रकाशक - नीहारा प्रकाशन, पुणे (०२०-२४४९१२९२) / पृष्ठं - ६४ / मूल्य - ७० रुपये
  •      साने गुरुजींच्या छान छान गोष्टी / बालवाङ्‌मय / लेखक - नागेश शेवाळकर, इंग्रजी अनुवाद - उद्धव भयवाळ / प्रकाशक - इसाप प्रकाशन, नांदेड (९८९००९९५४१) / पृष्ठं - २४ / मूल्य - ४२ रुपये
  •      माणसाच्या सोयीचा देव / कवितासंग्रह / कवयित्री - प्रियंका काकडे (९९६०४५५५२२) / प्रकाशक - यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे (९८५०८८४१७५) / पृष्ठं - ११२ / मूल्य - १४० रुपये

----------------------------------------------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: book review in saptarang

फोटो गॅलरी