नावीन्याचा पुरस्कार करणारी प्रेरक मांडणी

डॉ. जी. पी. माळी
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी अधिकारवाणीने लिहू शकणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे. बालवाडी ते पदव्युत्तर वर्गांना अध्यापन करण्याचं कौशल्य आणि भाग्य लाभलेले उपक्रमशील शिक्षक म्हणून संपूर्ण राज्यात त्यांचा लौकिक आहे. ‘नवे शिक्षण, नवे शिक्षक’ हे नावीन्याचा ध्यास घेऊन त्यांनी लिहिलेलं नवं पुस्तक. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर सर्वांगीण प्रकाश टाकणारं आणि बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार वाटचाल करण्यासाठी दीपस्तंभ ठरणारं पुस्तक म्हणून सर्वांनीच याकडे पाहण्याची आणि अगत्यपूर्वक वाचन आणि चिंतन करण्याची गरज आहे.

वेगवेगळ्या निमित्तानं अलीकडच्या काळात शिक्षणविषयक झालेलं लेखन डॉ. लवटे यांनी दोन भागात मांडलं आहे. पहिल्या भागात नव्या शिक्षणावरचे १९ लेख आहेत. त्यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठीय शिक्षणाबरोबरच त्यानुषंगिक विविध बाबींवर अभ्यासपूर्ण मतं मांडली आहेत. हे करताना जागतिक पातळीवरच्या शिक्षणाचा वेध घेत आपल्या देशातल्या आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेचं वस्तुनिष्ठ दर्शन घडवलं आहे. तपशीलवार विवेचन करताना आधार आणि आकडेवारी नमूद करून लेखकानं चिकित्सक वृत्तीनं मांडणी केल्याचं प्रत्येक लेखातून जाणवत राहतं.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात नवे शिक्षक कसे हवेत, याविषयीच्या १२ लेखांचा समावेश आहे. हे लिहिताना अंगणवाडी शिक्षिका ते विद्यापीठाचे कुलगुरू असा व्यापक शिक्षक आपल्यापुढं असल्याचं त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केलं आहे. ‘जागतिक पातळीवरच्या बदलांच्या पार्श्‍वभूमीवर आपला शिक्षक ‘ऑनलाइन’ आणि ‘कनेक्‍ट’ असला पाहिजे- म्हणजेच तो परिवर्तनाशी ‘कनेक्‍ट’ होईल. शिक्षणात गुणवत्ता येण्याचं महाद्वार म्हणजे अध्यापक शिक्षण अत्याधुनिक असणं होय. हार्वर्ड विद्यापीठ वर्षानुवर्षे अव्वल का, या प्रश्‍नानं शिक्षक बेचैन झाला पाहिजे. शिक्षकाच्या अंगी संयम, सोज्वळता, सेवाभाव, समर्पण, सुहास्यवदन, साधेपणा इत्यादी गुण असावेत. संगणक, इंटरनेट, सीडीज, डीव्हीडीज, स्क्रीन, लॅपटॉप, मोबाइल्स, फिल्म्स, क्‍लिप्स, व्हर्चुअल क्‍लास, रोबो टीचर, ऑनलाइन टीचिंग-लर्निंग, ब्लॉग्ज, लिंक्‍स इत्यादींशी तो जोडला गेला पाहिजे,’ हे सर्वच लेखांतलं समान सूत्र आहे. नव्या काळाला अनुसरून नवी साधनं वापरणारा, नवतेचा ध्यास घेणारा आणि त्या दृष्टीनं अभ्यास, लेखन, वाचन, चिंतन, संशोधन आणि अध्यापन करणारा शिक्षक निर्माण व्हावा, या तळमळीपोटी डॉ. लवटे यांनी हा लेखनप्रपंच केल्याचं पानोपानी जाणवतं.

वास्तव मांडत असतानाच बदल किंवा सुधारणा कशा आणि कोणत्या असाव्यात, हेही मांडण्याची भूमिका उराशी बाळगून लिहिलं गेलेलं हे पुस्तक सर्वांनी वाचावं, त्यावर विचार करावा, चिंतन करावं आणि ते संग्रही ठेवावं. भूतकाळाचा वेध घेऊन, वर्तमान वास्तवाचं भान ठेवून, उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवण्याचं सामर्थ्य या पुस्तकात आहे. ‘आधी केले मग सांगितले’ ही उक्ती प्रत्यक्षात आणणारे कृतिशील विचारवंत लवटे सर यांच्या या पुस्तकाचा ‘नवप्रकाश’ सर्वदूर पोचावा आणि जुनेपणाचा अंध-कार नष्ट व्हावा, अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरणार नाही.
पुस्तकाचे नाव - नवे शिक्षण, नवे शिक्षक
लेखक - डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशक - अक्षरदालन, कोल्हापूर
पृष्ठं - २१२, मूल्य - २२५ रुपये.

Web Title: book review in saptarang

फोटो गॅलरी