तरल शब्दांतून उमलली व्यक्तिपुष्पं!

तरल शब्दांतून उमलली व्यक्तिपुष्पं!

मराठी साहित्यात व्यक्तिचित्र हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. लेखकांमध्येही आणि वाचकांमध्येही. लिहिणारा आणि वाचणारा या दोघांनाही या प्रकारामध्ये आनंद मिळतो. लेखकाला आपल्या निकटच्या किंवा त्याला प्रेरणादायी ठरणाऱ्या माणसांबद्दल लिहिताना त्याला जे भावलं ते लिहिता येतं आणि वाचकाला त्या व्यक्तीची ओळख तर होतेच; पण त्या लेखकाच्या माध्यमातून त्या व्यक्तीकडं पाहता येतं. तो माणूस अशा लेखनातून नेमका कळत जातो, जरी ती व्यक्ती त्याच्या परिचयाची नसली, तरी त्या व्यक्तीसारख्या व्यक्ती तो आपल्या पर्यावरणात शोधायला लागतो. अशा साम्य असणाऱ्या मिळाल्या, की त्याला ते व्यक्तिचित्र अधिकच भावतं. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवरचं ते लेखन असेल, तर कधी नवी माहिती मिळते किंवा व्यक्तिचित्रातल्या मांडणीमुळे किंवा त्यातल्या एखाद्या मुद्यामुळं किंवा त्या लेखकाला त्या व्यक्तीचा आलेला अनुभव वाचून वाचकांची त्या व्यक्तीबद्दलची मतंही बदलतात.

व्यक्तिचित्रांची ही लोभस दुनिया वाचकाला भुरळ घालते आणि त्यातल्या काही अफलातून व्यक्तींमुळं त्या त्याच्या स्मरणातही राहतात. त्यामुळे पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधली माणसं अनेकांच्या लक्षात राहतात. व. पु, काळे यांचा टी. टी. टिळक किंवा भदेही असाच स्मरणात राहतो. ललितलेखनातल्या या प्रकाराचं सर्वच लेखकांना आकर्षण वाटलं आहे. दिवगंत लेखक रव्रीद्र पिंगे असोत की रहस्यकथा आणि कादंबरीकार दिवंगत सुहास शिरवळकर असोत की अत्यंत कमी लेखन करणाऱ्या सुनीताबाई देशपांडे असोत. अनेकांनी हा प्रकार समर्थपणे हाताळला आहे. मात्र मराठी कवितांमधून हा प्रकार हाताळला गेलेला नाही. एकतर असा प्रयोग कुणाला करावासा वाटला नसेल किंवा संपूर्ण व्यक्तिचित्रांसाठी कविता हे माध्यम अपुरं वाटलं असेल. गद्य लेखनात ज्या सहजतेनं आणि सविस्तरपणानं एखादी व्यक्ती उभी करता येते तसं कवितेत करता येत नाही. कारण इथं मामला अल्प शब्दांचा आणि बऱ्याचदा प्रतिमांचा असतो. कवितेतून एखादा माणूस उभा करताना एकतर ते स्तुतीकाव्य किंवा विडंबनगीत होण्याची भीती असते. मात्र कविता या साहित्यप्रकाराची ताकद आणि मर्यादा नेमकेपणाने ओळखून विश्‍वास वसेकर यांनी या काव्यसंग्रहात ५६ लोकांची व्यक्तिचित्रं रेखाटली आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, देशाचे माजी पंतप्रधान आणि कवी विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्यापासून ते हिंदी कवयित्री अमृता प्रीतम यांच्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या नामवंतांची ओळख करून दिली आहे.

वसेकर ही व्यक्तिचित्रं रेखाटताना त्या व्यक्तीबद्दल जी सर्वपरिचित माहिती आहे त्यापेक्षा वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळंच अण्णा भाऊ साठे यांनी ‘फकिरा’ कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली होती, असं सागून जातात, दिवंगत ज्येष्ठ कविवर्य बा. भ. बोरकर यांचं व्यक्तिचित्र रेखाटताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या वेगळ्या बाबी आणि गोव्यातल्या दोना पावला शिल्पाचा उल्लेख करताना त्याचं महत्त्व  सांगतात. ज्येष्ठ गझलकार, माजी कुलगुरू, माजी साहित्यसंमेलनाध्यक्ष; तसेच वसेकरांच्या निकटच्या वर्तुळातली अनेक मंडळी या काव्यसंग्रहातून वाचकांसमोर येतात. त्या मंडळींचं पर्यावरण आणि वसेकर यांच्याशी असलेलं नातं आणि त्याच्याबरोबरचे त्यांचे भावबंध अगदी मोजक्‍या शब्दांत विलक्षण ताकदीनं वसेकर मांडतात. मग ती ‘राजकुमार’ किंवा डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावरची ‘दरबार’ कविता असो. ही माणसं वाचकांला माहीत असण्याची गरज पडत नाही. ते एक ग्राफ तुमच्यासमोर उभा करतात आणि त्याला चिंतनाचीही जोड देतात. प्रसिद्ध व्यक्तींची रेखाचित्रं मांडताना वसेकर इतिहासातल्या व्यक्तिरेखा व काही महत्त्वाच्या घटनांची जोड देत त्या व्यक्तींबद्दलचं निरीक्षण चपखलपणानं नोंदवतात.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिंदीतले साहित्यिक केदारनाथ साहनी यांनी समर्थपणाने हा काव्यप्रकार हाताळला आहे. इंग्रजीमध्ये अनेकांनी हा प्रकार हाताळलाय. वसेकर यांचा हा प्रयोग यशस्वी तर झालाच आहे; पण या वेगळ्या प्रकाराला हात घातलाना वसेकर यांनी या कविता रुक्ष होऊ दिलेल्या नाहीत की त्यातलं काव्य संपुष्टात आलेलं नाही. या संग्रहातली एखाद दुसरी कविता फसलेली आहे मात्र त्याला इलाज नाही. या काव्यसंग्रहाची अभ्यासपूर्ण प्रस्तावना वसंत केशव पाटील यांची असून, ती वाचल्यावर हा काव्यसंग्रह कसा वाचला पाहिजे आणि हा प्रकार आहे तरी कसा याची कल्पना येते. एकुणातच या वेगळ्या प्रयोगाचा आस्वाद घेताना वाचक खूप मोठ्या कालखंडाचा फेरफटका करतो आणि अनेक विषयांची ओळख करून घेतो. कवितेसारख्या कमी शब्दांच्या माध्यमात ही अनुभूती येणं, हेच त्या कवीचं त्यातल्या कवितांचं यश मानावं लागेल.

पुस्तकाचे नाव : पोट्रेट पोएम्स
कवी : विश्‍वास वसेकर
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे
(०२०- २४४९७३४३, ९८२३०६८२९२)
पृष्ठं : १४६ मूल्य : १५० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com