अचंबित करणारं ‘वाघावलोकन’!

महेश बर्दापूरकर
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

आर. के. नारायण ‘मालगुडीचा संन्यासी वाघ’ या कादंबरीमध्ये एक आध्यात्मिक संदेश देऊ पाहतात. त्यासाठी लेखक परकाया प्रवेश करत मनुष्य प्राण्याला चिमटे घेत, खुसखुशीत शैलीत त्याच्या जगण्यातल्या चुका दाखवून देतो. एक श्‍वापद इच्छा असल्यास सर्व इच्छा त्यागून साधू बनू शकतं; माणसाला हे का अवघड जावं, असा प्रश्‍न विचारत लेखक विचार करायला भाग पाडतो.

आर. के. नारायण या सिद्धहस्त लेखकाच्या अनेक कथा-कादंबऱ्या आपण वाचल्या आहेत. छोट्यात छोटं पात्र जिवंत करण्याची त्यांची हातोटी विलक्षणच. याचा प्रत्यय आपल्याला ‘मालगुडी डेज’पासून ‘गाइड’पर्यंतच्या अनेक कादंबऱ्यांतून आला आहे. मनुष्याच्या आशा-आकांक्षा, त्याची स्वप्नं यांबद्दल अत्यंत मोजक्‍या शब्दांत व मार्मिक विवेचन ही त्यांची खासियत. ‘मालगुडीचा संन्यासी वाघ’ ही कादंबरी याच विवेचनाचा उत्कर्षबिंदू गाठते. एक वाघ त्याच्या जन्मापासूनची कथा त्याच्याच शब्दांत मनुष्याला ऐकवतो आणि त्यातलं प्रत्येक प्रसंग, पात्र, संवाद वाचकाला अंतर्मुख करतो, विचार करायला भाग पाडतो. नारायण यांनी मांडलेलं हे ‘वाघावलोकन’ अचंबित करणारंच आहे. नंदिनी उपाध्ये यांनी केलेला अनुवाद प्रवाही झाला आहे.

लेखकाला एका कुंभमेळ्यात वाघाबरोबर राहणारा साधू दिसला होता. याच प्रसंगातून कथाबीज तयार झाल्याचं ते प्रस्तावनेत सांगतात. जंगलात फिरणारं वाघाचं पिल्लू जन्मापासूनची त्याची कथा सांगायला सुरवात करतं. जंगलात हुंदडणं, आईच्या कुशीत झोपणं असं त्याचं मजेशीर आयुष्य असतं. मात्र, एके दिवशी त्याची आई त्याला सोडून निघून जाते. आता या वाघाला (नंतर त्याला राजा असं नाव मिळतं.) स्वतःचं आयुष्य स्वकष्टावरच जगावं लागतं, शिकार करावी लागते, धोका पत्करावा लागतो. तो जंगलातल्या इतर प्राण्यांबद्दलचे त्याचे विचार मांडतो. (अत्यंत ‘आळशी’ अशा सिंहाला केवळ त्याच्या आयाळीवर ‘जंगलचा राजा’ हे पद बहाल करण्यात आलं आहे; ‘खरं तर बेधडक शिकारी करणारा मीच खरा ‘जंगलचा राजा’ आहे,’ असं त्याचं स्वतःबद्दलचं मत. माकडं, चित्ता, हत्ती या प्राण्यांबद्दलही त्याचं खास असं एक मत आहे.) तारुण्यात पदार्पण केल्यावर तो एका वाघिणीच्या प्रेमात पडतो, त्याला पिल्लं होतात. मात्र, इथं कथेत मोठा ‘ट्विस्ट’ येतो. राजाला जंगलाच्या जवळ असलेल्या गावातील लोकांशी वैर पत्करावं लागतं. सूड घेण्यासाठी त्यांचे पाळीव प्राणी मारावे लागतात. यातून एका सर्कशीचा कॅप्टन त्याच्या मागावर जंगलात येतो आणि राजाची रवानगी सर्कशीच्या तंबूत होते.  

राजाचं इथलं आयुष्य फारच कष्टप्रद ठरतं. मांस आणि पाण्याच्या बदल्यात त्याच्याकडून अनेक कसरती करून घेतल्या जातात. जाळातून उड्या मारण्यासारख्या वाघालाही घाबरवणाऱ्या अनेक कसरती त्याला कराव्या लागतात. या कसरतींमुळं राजाला मोठी प्रसिद्धी मिळते व त्याला चक्क एका चित्रपटात काम मिळतं, मात्र सर्कशीच्या कॅप्टनचा अत्याचार राजाच्या सहनशक्तीपलीकडं जातो आणि कथेत पुन्हा एक ट्‌विस्ट येतो. इथं राजाची ओळख एका साधूशी होते आणि त्याचं आयुष्य अंतर्बाह्य बदलून जातं. आपण या जगात का आलो, या जगण्याचा खरा अर्थ काय, आपली गरज किती, रागावर नियंत्रण कसं मिळवावं, याचे धडे या जंगली श्‍वापदाला मिळतात. तो चक्क एक ‘माणूस’ बनतो. राजाच्या कहाणीचा शेवट उच्च आध्यात्मिक पातळीवर जाऊन लेखक करतो.

आर. के. नारायण या कादंबरीमध्ये एक आध्यात्मिक संदेश देऊ पाहतात. त्यासाठी लेखक परकाया प्रवेश करत मनुष्य प्राण्याला चिमटे घेत, खुसखुशीत शैलीत त्याच्या जगण्यातल्या चुका दाखवून देतो. सर्कशीचा कॅप्टन आणि त्याच्या सर्कशीमध्ये विविध खेळ करणाऱ्या पत्नीतली भांडणं यावर अत्यंत मार्मिक भाष्य वाघाच्या तोंडी येतं. शिकार सोडून संन्यासी जीवन जगू पाहणाऱ्या वाघाच्या मनातली आंदोलनं पाहून साधू त्याला म्हणतात, ‘‘जे अशक्‍यप्राय आहे त्याची इच्छा धरू नकोस. तुला हे ज्ञान, ही जाणीव झाली तेवढं पुरेसं आहे. प्रत्येक वाढ त्या त्या वेळीच घडते. तुझ्यातील उणिवांपेक्षा तुझ्यात होत असलेल्या सुधारणांचा विचार केल्यास तू जास्त आनंदी राहशील....’’ अशा अनेक प्रसंगातून लेखक जगण्याचे धडे देत वाचकांना अंतर्मुख करतो.

एक श्‍वापद इच्छा असल्यास सर्व इच्छा त्यागून साधू बनू शकतं; माणसाला हे का अवघड जावं, असा प्रश्‍न विचारत लेखक विचार करायला भाग पाडतो. हेच या कादंबरीचं  यश.

Web Title: book review in saptarang

फोटो गॅलरी