प्रेरक आत्मकथा अन्‌ टेलिकॉम-युगाचा दस्तावेजही

सुरेंद्र पाटसकर
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

टेलिफोन आणि मोबाईल ही आता लहान मुलांच्याही हातातली खेळणी झाली आहेत; ३५-३६ वर्षांपूर्वी या ‘खेळण्यां’चा उपयोग विकासासाठी होऊ शकेल, असा विचारही भारतात फारसं कुणी करत नव्हतं. याला अपवाद होता तो दोन व्यक्तींचा एक म्हणजे राजीव गांधी आणि दुसरे म्हणजे दूरसंचार क्रांती भारतात घडवणारे सॅम पित्रोदा! परदेशात उभारलेल्या उद्योगांच्या अनुभवाच्या जोरावर पित्रोदा यांनी भारतातलं संवादविश्व मुळातून बदललं.

टेलिफोन आणि मोबाईल ही आता लहान मुलांच्याही हातातली खेळणी झाली आहेत; ३५-३६ वर्षांपूर्वी या ‘खेळण्यां’चा उपयोग विकासासाठी होऊ शकेल, असा विचारही भारतात फारसं कुणी करत नव्हतं. याला अपवाद होता तो दोन व्यक्तींचा एक म्हणजे राजीव गांधी आणि दुसरे म्हणजे दूरसंचार क्रांती भारतात घडवणारे सॅम पित्रोदा! परदेशात उभारलेल्या उद्योगांच्या अनुभवाच्या जोरावर पित्रोदा यांनी भारतातलं संवादविश्व मुळातून बदललं.

खरंतर ‘सत्यनारायण गंगाराम पित्रोदा’चा ध्येयवेडा कोट्यधीश उद्योगपती आणि भारतातल्या दूरसंचारक्रांतीचा निर्माता असलेला ‘सॅम पित्रोदा’ होण्याची ही चित्तरकथा. ओडिशातल्या एका छोट्या गावातला तरुण स्वप्नभूमी अमेरिकेत जातो काय आणि तिथल्या दूरसंचार क्षेत्रातल्या डिजिटल क्रांतीत अग्रभागी राहतो काय आणि ती ऐश्वर्यभूमी सोडून भारतात येतो काय...इथं आल्यावर दूरसंचारक्रांती घडवतो काय....या सगळ्याच गोष्टी सर्वसामान्यांना अशक्‍यप्राय वाटतात. ज्ञान, अनुभव आणि जबरदस्त इच्छाशक्ती यांच्या जोरावर सॅम पित्रोदा यांनी त्या प्रत्यक्षात आणल्या.

सत्यनारायणची गोष्ट सुरू होते ती राजस्थानातल्या टिकार गावातून. हातावर पोट असलेलं आणि मोठा कुटुंबकबिला असलेलं एक ‘विश्वकर्मा’ कुटुंब या गावात राहत असतं. खायची भ्रांत पडल्यानं या कुटुंबातल्या गंगाराम या तरुणानं पत्नीसह ओडिशातल्या तितिलगडमध्ये स्थलांतर केलं. या तितिलगडमध्येच सत्यनारायण आणि त्याच्या सात भावंडांचा जन्म झाला. स्वत-चं शिक्षण झालं नसलं तरी आपल्या मुलांना गुजराती व इंग्लिश शिकवण्याचा ध्यास गंगारामनं घेतला होता. त्यातूनच त्यानं सत्यनारायण आणि त्याचा मोठा भाऊ माणेक या दोघांना गुजरातमधल्या निवासी शाळेत पाठवलं. आठ-दहा वर्षांच्या या मुलांना तितिलगड सोडताना अश्रू अनावर झाले होते. ओडिशातून पुन्हा गुजरातकडं झालेला हा प्रवास सत्यनारायणचं आयुष्य बदलणारा ठरला. शारदा मंदिर बोर्डिंग स्कूलमध्ये सत्यनारायण व माणेकनं शैक्षणिक धड्यांबरोबरच गांधीविचारांचेही धडे गिरवले. गांधीविचारांचा पगडा हा आयुष्यभर सत्यनारायणच्या प्रत्येक कृतीत राहिला. पुढं बडोद्यातल्या शाळेत उच्चशिक्षण आणि नंतर महाराजा सयाजीराव विद्यापीठात एम.एस्सीपर्यंतचं उच्च शिक्षण सत्यनारायणनं घेतलं. महाराजा सयाजीराव विद्यापीठानं सत्यनारायणला व्यापक दृष्टिकोनाचे दरवाजे उघडून दिले. त्याच वेळी सोनेरी अमेरिका सत्यनारायणला खुणावत होती. ‘अमेरिका लवकरच चंद्रावर माणूस पाठवणार,’ अशी बातमी एक दिवस वर्तमानपत्रात आली आणि अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याच्या सत्यनारायणच्या इच्छेनं पुन्हा उचल खाल्ली.

बडोदा ते अमेरिका हा प्रवास, तिथलं वास्तव्य, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरची पदवी मिळवण्यापर्यंतची धडपड सॅम पित्रोदा यांनी या आत्मचरित्रातून मांडली आहे. सत्यनारायणला बडोद्यातल्या वास्तव्यात आपलं प्रेम गवसलं होतं. या प्रेमाचा ‘जीवनसाथीदार’ होण्याचा प्रवासही रुळलेल्या वाटांवरचा नव्हता. सत्यनारायणला अमेरिकेत पहिली नोकरी मिळाली ती ‘ओक इलेक्‍ट्रिक’मध्ये. ‘ओक इलेक्‍ट्रिक’मधला सचिव आणि तो जिथं राहत होता त्या घराच्या मालकीण यांनी ‘सत्यनारायण’चा ‘सॅम’ केला. पुढं पित्रोदा यांचं तेच नाव कायम झालं.

तो काळ १९६६-६७ चा होता. अमेरिकेतल्या दूरसंचारक्षेत्रात डिजिटल-युगाची सुरवात होत होती. या क्रांतीत सहभागी होण्याची संधी सॅमला मिळाली. सॅमनं तिचं सोनं केलं. डिजिटल स्विचिंगमधल्या अनेक शोधांचं पेटंट या काळात सॅमनं मिळवलं. सॅमच्या आयुष्याला दुसऱ्यांदा कलाटणी मिळाली, तीही वडिलांमुळंच. ‘दुसऱ्यांसाठी एवढं काम का करतोस? स्वत-साठी कर!’ असा सल्ला त्यांनी त्याला दिला. यातूनच पुढं कोट्यधीश उद्योपती सॅम घडायला सुरवात झाली. वेस्कॉम कंपनीचा पाया या सल्ल्यातच दडला होता.
पीबीएक्‍सचं ‘कटिंग एज’ तंत्रज्ञान विकसित करण्याचं श्रेयही पित्रोदा यांच्याकडंच जातं.

वेस्कॉम कंपनीची भरभराट, तिच्या विक्रीतून मिळालेले लक्षावधी डॉलर, नव्या कंपनीची पायभरणी अशी प्रगती होत असताना सॅमला भारत खुणावत होता. भारतात परतण्यासाठी एक गोष्ट कारणीभूत ठरली. वेस्कॉम विकल्यानंतर सॅम भारतात आले. ‘होतकरू सॅम’चा आता ‘जागतिक पातळीवरचा उद्योगपती’ झाला होता. दिल्लीत हॉटेलमधल्या खिडकीतून त्यांनी ‘टेलिफोनची अंत्ययात्रा’ पाहिली. ‘मी टेलिकॉममधला तज्ज्ञ असताना माझ्या देशातच अशी स्थिती का असावी,’ असा विचार पित्रोदा यांना अस्वस्थ करत होता. या अस्वस्थतेच ते भारतात परतले. इथून त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. लोकांची मानसिकता बदलण्याचं आव्हान मोठं होतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोचणं, राजीव गांधी यांची भेट, टेलिकॉम-क्रांतीचा आराखडा तयार करणं, सी-डॉटची निर्मिती हा त्यांचा सगळा प्रवास उत्कंठावर्धक तर आहेच; परंतु त्याहीपेक्षा तो प्रेरक आहे. तीन वर्षांत त्यांनी सी-डॉट यशस्वी केलं. गावागावांत टेलिफोन बूथ दिसायला लागले होते, त्यामुळं हजारो कुटुंबांना रोजगार सुरू झाला. याच प्रवासात त्यांची राजीव गांधी यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले व त्यांच्या मैत्रीचा पाया विस्तारत गेला.
सी-डॉटच्या यशानंतर ‘पंतप्रधानांचा सल्लागार’ म्हणून तंत्रज्ञान मिशनचं काम नंतरच्या काळात पित्रोदा यांनी यशस्वी केलं. या मिशनअंतर्गत पिण्याचं पाणी, लसीकरण, साक्षरता, तेलबिया, टेलिकॉम आणि दुग्धउत्पादनं यांचा समावेश होता. भारतातल्या प्रवासातला आणखी एक टप्पा टेलिकॉम आयोगाचा होता. लाल फितीचा कारभार बाजूला सारून प्रगतिपथावर जाण्याचीच ही वाटचाल होती. राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर तर पित्रोदा अक्षरश- उद्‌ध्वस्त झाले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप झाले. जवळजवळ कफल्लक स्थितीत ते पुन्हा अमेरिकेला कुटुंबाकडं परतले. या अडचणीच्या काळात त्यांना त्यांच्या ‘पेटंट’नं साथ दिली. राखेतून ‘फिनिक्‍स’नं पुन्हा भरारी घेतली. ‘राष्ट्रीय ज्ञान आयोगा’च्या माध्यमातून भारतातलं काम पुन्हा सुरू झालं.

एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी. अमेरिकेत रोनाल्ड रेगन यांचं सरकार असताना त्यांनी भारताला महासंगणक देण्याचं नाकारलं होतं, तेव्हा ‘आपणच महासंगणक का तयार करू नये?’ असा सल्ला सरकारला देणाऱ्यांमधले पहिले पित्रोदा होते. त्यानंतरचा सी-डॅकचा आणि परम महासंगणकाचा प्रवास सगळ्यांना माहीतच आहे. पित्रोदा यांची भारतातली दुसरी इनिंगही ‘डिजिटल इंडिया’साठी पावलं टाकण्यातून पुढं गेली. फायबर ऑप्टिकचं जाळं गावागावात पोचवण्याचं महत्त्वाचं काम सुरू झालं. डॉ. मनमोहनसिंग सरकारबरोबर भारताच्या विकासाची स्वप्न पुन्हा रंगू लागली.

तब्बल १०० पेटंटचा मालक, टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ दोन रुपये वार्षिक वेतनावर काम करणारे, विविध उच्च पदांवर काम करूनही भारतीय मातीशी नातं न तोडणारे, राजीव गांधींच्या हत्येनंतर कोलमडलेले...नंतर पुन्हा उभे राहिलेले, भारतीयांची मानसिकता बदलणारा संप्रेरक...अशी स्वत-ची कितीतरी रूपं पित्रोदा यांनी या आत्मचरित्रातून उलगडली आहेत. हा केवळ एक जीवनप्रवास नसून, प्रेरक आत्मकथा आहे. मात्र, ‘केवळ आत्मकथा’ एवढ्यापुरतंच या पुस्तकाचं महत्त्व सीमित नाही, तर गेल्या ४० वर्षांतला भारतीय टेलिकॉम-युगाचा हा आढावाच आहे. ‘ड्रीमिंग बिग’ या इंग्लिशमधल्या आत्मकथेचा अनुवाद शारदा साठे यांनी केला असून, मूळ पुस्तकातल्या भावना त्यांनी मराठीतूनही अतिशय प्रभावीपणे पोचवल्या आहेत.

पुस्तकाचं नाव - टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न
लेखक - सॅम पित्रोदा
सहलेखक - डेव्हिड चनॉफ
अनुवाद - शारदा साठे
प्रकाशक - रोहन प्रकाशन, पुणे (०२० २४४८०६८६)
पृष्ठं - ४०८,  मूल्य - ३७५ रुपये.

Web Title: book review in saptarang