समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा प्रत्ययकारी शोध

समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा प्रत्ययकारी शोध

अथांग समुद्राच्या चकाकणाऱ्या वाळूवर एका व्यक्तीच्या पावलांचे दूरवर गेलेले ठसे दिसतात. लहानशा पावलांना कुतूहल वाटतं, कुठं गेली असेल ही व्यक्ती? कशाच्या शोधात? आणि काय असेल तिकडे पलीकडं?... या कुतूहलानं अस्वस्थ होऊन ही पावलंसुद्धा मागोवा घेत चालू लागतात. त्या व्यक्तीची भेट होते आणि विचारांचा एक प्रवास सुरू होतो. या सोबतीनं समृद्ध झालेलं जगणं समजून घेता-घेता सोबत संपते आणि अपूर्ण राहिलेल्या अनंताचा शोध आता एकट्यानं घ्यायचा असतो. मन जुन्या आठवणींचा नव्यानं संदर्भ लावू लागतं. मनात अस्वस्थ कल्लोळ दाटून येतो. याच कल्लोळाचा शोध घेतला आहे लेखिका वसुंधरा काशीकर-भागवत यांनी.

शरद जोशी शेतकरी आंदोलनाचे अखिल भारतीय नेते. युनोची नोकरी सोडून स्वित्झर्लंडहून परतले आणि भारतीय शेतकऱ्यांच्या दु-खाशी नातं जोडलं ते शेवटपर्यंत. सतत सभा, आंदोलनं, मोर्चे आणि शिबिरं असं वादळी आयुष्य जगणारं बहुआयामी व्यक्तिमत्त्व. जनसंसदेच्या निमित्तानं लेखिकेचा परिचय थोर कर्तृत्व असणाऱ्या या नेत्याशी झाला आणि बौद्धिक, वैचारिक गप्पा, चर्चा झाल्या. त्यातून ती या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेत राहिली. लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्याचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न अनेक जीवन-प्रसंगांतून, प्रश्नोत्तरांतून लेखिकेनं केला. तेच हे पुस्तक.

स्वत- लेखिका राज्यशास्त्र विषयाची द्विपदवीधर आणि पत्रकार, निवेदक, लेखिका आहे. अशी स्त्री शरद जोशी यांच्या निमित्तानं राजकारण आणि अर्थशास्त्र, अर्थकारण आणि समाज या विषयावर चिंतन करते, तेव्हा स्त्री साहित्याच्या दृष्टीनं मला ते मोलाचं वाटतं. तत्त्वज्ञान आणि जगणं समजून घेताना अध्यात्माची सूक्ष्म जाणीवसुद्धा तिच्या लेखनातून दिसते. भारतीय; तसंच पाश्‍चात्य साहित्याचे संदर्भ, लेखकांचे उल्लेख लिखाणात दिसतात. त्यावरून लेखिकेच्या समृद्ध वाचनाची, साहित्याच्या अभ्यासाची जाणीव होते. स्वरचित कविता सुरेख आहेत आणि अनुभव, प्रसंगांच्या मांडणीत चपखल बसलेल्या आहेत.

चांदवड इथलं १९८६ चं शेतकरी महिला अधिवेशन, १९८९ मधलं ‘लक्ष्मी मुक्ती अभियान’ हे शरद जोशी यांचं कर्तृत्व स्त्री म्हणून लेखिकेला मोलाचं वाटलं आणि त्यांचं कार्य वाचकांसमोर अक्षरश- चित्रपट दिसावा अशा शब्दांत लेखिकेनं मांडलं आहे. एका व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास कसा असावा, सूक्ष्म निरीक्षण कसं असावं आणि माणूस समजून घेण्याचा अभ्यास कसा करावा, याचा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे. शरद जोशी यांचं निव्वळ गुणगान करणं या हेतूनं हे चरित्र लिहिलं गेलेलं नसून जोशी असामान्य होते, याची जाणीव झाल्यामुळं त्यांना समजून घेण्याचा अभ्यासू प्रयत्न पुस्तकात दिसतो.

चरित्र आणि आत्मचरित्र असा दुहेरी वाचनाचा अनुभव देणारं हे पुस्तक आहे- कारण शरद जोशी यांच्या आठवणी, या लेखिकेच्या स्वत-च्या आयुष्यातील घटना-प्रसंग यांचा हा कोलाज आहे. लेखिकेनं एका माणसाच्या निमित्तानं जगण्याचा अर्थ, प्रयोजन शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र इत्यादी क्षेत्रांतील व्यक्तींना समजून घेताना मूलभूत व्याख्या, तत्त्वं, वाद, इतिहास माहीत असावा लागतो. नाही तर चरित्राचं नीट आकलन होत नाही, हे खरं आहे; पण हे पुस्तक वाचल्यावर शरद जोशी यांचं कार्य समजून घ्यावं, शेतकरी समजून घ्यावा, ग्रामीण जीवन समजून घ्यावं, असे वाटायला लागतं, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य.

व्यासपीठावर संगीत सुरू असतं आणि जवळच एखादा कसलेला चित्रकार त्या सुरांवर, लयीवर मुक्तपणे चित्र रेखाटत असतो. पाहता-पाहता एक सुंदर डोळे दीपवणारी कलाकृती तयार होते आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ती कला अनुभवतो. तसा काहीसा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो. शरद जोशी यांचा जीवनपट आणि लेखिकेचं मुक्त, समृद्ध जीवनचिंतन असा दुहेरी आनंद पुस्तक वाचताना येतो. घटना, प्रसंग आणि चिंतन या लयीत पुस्तक कधी वाचून पूर्ण झालं, तेच कळत नाही. चरित्र लेखनाचा हाच सर्वांत मोठा हेतू असतो आणि लेखिका वसुंधरा काशीकर-भागवत यांनी हा प्रयत्न यशस्वी केलेला आहे.

पुस्तकाचं नाव -  
शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा

लेखिका - वसुंधरा काशीकर-भागवत
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)
पृष्ठं - १५४ / मूल्य - २०० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com