शास्त्रीय कसोटीवर तोललेलं विवेचन

शास्त्रीय कसोटीवर तोललेलं विवेचन

मानवी जीवनात दोन महत्त्वाचे प्रश्‍न प्रत्येक व्यक्तीला पडतात. पहिला प्रश्‍न - ‘ कसं जगायचं?’ दुसरा प्रश्‍न-  ‘का जगायचं?’ आपण चार पुरुषार्थ मानतो - अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष. पहिल्या प्रश्‍नाचं उत्तर ‘अर्थ’ या पुरुषार्थातून मिळतं. जीवन जगण्याकरता लागणाऱ्या सर्व मूलभूत गरजा - अन्न, पाणी, हवा, निवारा, वस्त्र मिळविण्यासाठी ‘अर्थ’ हा पुरुषार्थ आपण मानतो. कशासाठी जगायचं याचं उत्तर राहिलेले तीनही पुरुषार्थ देतात. यांतला सर्वांत महत्त्वाचा अनुभव ‘आल्हाद’ घेण्याचा. त्यालाच भारतीय परंपरेनं ‘काम’ या पुरुषार्थाशी जोडलेलं आहे.  

शतकानुशतकांतल्या भारतीय परंपरेत आनंदाचा, तृप्तीचा, समाधानाचा उपभोग घेणं हे कधीच कमी महत्त्वाचं मानलं गेलेलं नव्हतं. किंबहुना, सर्वसामान्य व्यक्तीसाठी ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास हे चार आश्रमही समाजमान्य होतेच. परकी विचारांच्या आणि (अव्यवहार्य) मूल्यांना अकारण महत्त्व दिलं गेल्यानं (विशेषत- अठराव्या-एकोणिसाव्या शतकातल्या ‘व्हिक्‍टोरियन मॉरॅलिटी’च्या पगड्याखाली), ‘अहिंसा सत्यम्‌ अस्तेय ब्रह्मचर्य अपरिगृह’ यांतल्या ‘ब्रह्मचर्य’ या शब्दाचा अव्यवहार्य (आणि चुकीचा) अर्थ लावला गेल्यामुळं आल्हाद घेणं हे ‘प्राणिमात्रांचं’ क्षेत्र असल्याची भावना समाजात रूढ होऊ लागली. कामशास्त्राचा विचार करणं हेसुद्धा एक ‘पाप’ आहे, असं प्रतिष्ठितांना वाटू लागलं. अभ्यास थांबला. चर्चा बंद झाल्या. मनमोकळ्या चर्चा आणि ज्ञानप्राप्तीची जागा छुपी संभाषणं, चुकीच्या कल्पना घेऊ लागल्या. या साच्यात बदल होणं आवश्‍यक होतं.

ज्ञानार्जनाची सुरवात कुतूहलातून होते. कुतूहलाच्या प्रेरणेतून ‘प्रश्‍न’ निर्माण होतात. प्रश्‍नांची प्रामाणिक उत्तरं काढण्याचा प्रयत्न ही ज्ञानार्जनाची पहिली पायरी असते. सुदैवानं मानवी मेंदूत (काही जनुकीय रचनांच्या प्रभावानं असू शकेल) जन्मसिद्ध कुतूहल निर्माण होण्याची क्षमता आहे. हे कुतूहल जागृत ठेवणं, आहे त्या ज्ञानावर समाधान न मानता अधिकाधिक माहिती मिळवणं, त्या माहितीतून अनुभव घेणं, आपल्या संकल्पना वास्तव आहेत ना हे सिद्ध करण्यासाठी प्रयोगांच्या योजना तयार करणं, प्रयोगानं सिद्ध झालेल्या आणि कोणत्याही सुसूत्र विचारसरणी, संकल्पना स्वीकारणं यालाच ज्ञानात होणारी प्रगती म्हटलं जातं. वैद्यकीय शास्त्र हे असंच प्रयोगांनी सिद्ध केलेलं शास्त्र आहे. शरीररचना, शरीरक्रिया, मानसिक प्रक्रिया, बौद्धिक सुसूत्रता, समाजशास्त्रातली मूल्यं आणि ध्यानाच्या स्थितीचा अभ्यास या सर्व क्षेत्रांत आता ज्ञानाचे, ज्ञानार्जनाचे मार्ग हेच आहेत. ज्या वास्तवाला ‘शास्त्रीय’ हे विशेषण लावलं जातं ते या विश्‍वात कुठंही, केव्हाही सत्य म्हणूनच मान्यता पावलं पाहिजे. तरच ते ‘शास्त्र’ या विशेषणाला पात्र होतं. कामशास्त्रदेखील या व्याख्येतच बसतं. मानवी मन, प्रेरणा, भावना, मेंदूचं कार्य, रासायनिक रेणूंचे गुणधर्म या साऱ्यांना ही ‘शास्त्रीय’ चाचणी लागू केलीच गेली पाहिजे.

डॉ. शशांक सामक यांनी ‘वैद्यकीय कामशास्त्र’ या त्यांच्या शास्त्रीय ग्रंथात ही सारी पथ्यं पाळलेली आहेत. पूर्वीच्या ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. ‘नाडी’ आणि ‘केंद्र’ या शब्दात अडकून न पडता योग्य अर्थ लावला आहे. अत्याधुनिक आयुधांची जागा निरीक्षणं, मनन, चिंतन, वैचारिक आदानप्रदान यांनी घेतल्याबद्दल त्यांनी कौतुकाचे उद्‌गार अवश्‍य काढले आहेत. त्याचबरोबर आजच्या प्रगत शास्त्रांचा आधार घेताना कुठंही हात राखून ठेवलेला नाही. त्यामुळंच हा ग्रंथ कामशास्त्रावरील पाठ्यपुस्तकाची जागा घेऊ शकतो. यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘सेक्‍शुअल फिटनेस थिअरपी’. आज खेळाडूंच्या तंदुरुस्तीचं महत्त्व सर्वच जाणतात. त्याचप्रमाणं कामानंद मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संबंधित शरीराच्या भागांची प्रकृती उत्तम ठेवणं आवश्‍यक आहे, हा तो सिद्धांत आहे. आहार ज्याप्रमाणं शास्त्रीय संकल्पनांवरच ठरावा, व्यायाम ज्याप्रमाणं प्रयोगशाळेत सिद्ध झालेल्या संकल्पनांवरच ठरवला जावा, अंतर्बाह्य स्वच्छतादेखील शास्त्राच्या सिद्धांतावरच ठरली जावी, या विचारसरणीला कामशास्त्रही अपवाद नाही. पूर्वापार चालू असणाऱ्या अज्ञानमूलक कल्पनांना त्यांनी ग्रंथाच्या शेवटच्या भागात प्रश्‍नांच्या उत्तरातून छेद दिलेला आहे. कोणतीही शक्ती सकस आणि संतुलित आहार, नियमानं केलेले योग्य व्यायाम आणि मनाच्या प्रसन्नतेवरच अवलंबून असते. औषधांच्या सेवनाचं कार्य विकार दूर करणं, विकारांचा प्रतिबंध करणं या क्षेत्रापुरतं मर्यादित असतं. औषधांच्या सेवनानं ‘शक्ती’ किंवा ‘जोम’ प्राप्त करून घेता येत नाही, हे वास्तव डॉ. सामक यांनी शास्रीय प्रमाण आणि स्वत-च्या कामशास्त्रीय वैद्यकीय व्यवसायातून मिळालेला अनुभव यांच्या आधारानं अधोरेखित केलं आहे.

माणसाची बाल, शैशव, पौगंडावस्था, युवा, प्रौढत्व आणि वार्धक्‍यात वाढ होते, तशी समाजाच्या मनाचीही होत असते. आपल्या समाजाला कामशास्त्रावरील शास्त्रीय विवेचन करणाऱ्या ग्रंथाची गरज कित्येक दशकांपूर्वीपासूनच होती; परंतु आता एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला असा ग्रंथ स्वीकारण्याची, अशा विषयाच्या अभ्यासाची वेळ आली, म्हणूनच या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या श्रोतृवृंदाच्या साक्षीनं पार पडला. याच्यापुढची पायरी म्हणजे कामशास्त्राचा महाविद्यालयीन आणि विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रम सुरू करण्याची ठरेल.

निसर्गानं मानवाला शरीर आणि मन दिलेलं आहेच. त्यातल्या पाचही ज्ञानेंद्रियांचा आणि पाचही कर्मेंदियांचा वापर करून चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार यांचा सहभाग जोडून घेऊन आल्हाद उपभोगण्याचं शास्त्र ज्ञानार्थींना उपलब्ध व्हावं. या आल्हादाच्या विविध प्रती असू शकतील. तहान, भूक, निद्रा, शरीर संबंधाची तृष्णा शरीर आणि मनात निर्माण होण्याकरता मनो-शारीरिक स्वास्थ आवश्‍यक असतं. निर्माण झालेल्या तृष्णेची पूर्तता माणसाला ‘सुख’ नावाचा आल्हाद देतं. मनाच्या काही मूलभूत गरजादेखील (बदलाची गरज, थोपटण्याची गरज आणि वेळापत्रक ठरण्याची गरज) विविध तृष्णा निर्माण करतात. त्यांची संभाव्य तृप्ती दृष्टोत्पत्तीस आली, की ‘आनंद’ नावाचा आल्हाद होतो. पडलेल्या समस्येचं उत्तर बुद्धीला उमगलं, तर ‘समाधानपूर्वक हर्ष’ होतो. सामाजिक संघटना आणि दानाच्या कृत्यातून समाधान आणि मन-शांती मिळते. मानवी जीवनाचं ध्येय मोक्षप्राप्ती असल्याचं मानणाऱ्यांना ज्ञान, योग, भक्ती आणि कर्म मार्गांनी स्थितप्रज्ञता उपलब्ध होऊ शकेल. या विविध मार्गांचा अभ्यास व्हावा. याकरता लागणारी पाठ्यपुस्तकं डॉ. सामक निर्माण करतील, अशी सदिच्छा.

पुस्तकाचं नाव - वैद्यकीय कामशास्र
लेखक, प्रकाशक - डॉ. शशांक सामक (०२०-२५४१०७६९)
पृष्ठं - ५२८ /
मूल्य - १५०० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com