महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद

महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद

महाराष्ट्रात खाद्यपदार्थांची रेलचेल आणि तितकीच विविधता पाहायला मिळते. कोकण, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या भागांमध्ये तिथल्या निसर्गानुसार वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. अशाच लज्जतदार महाराष्ट्रीय पदार्थांचा खजिना विनय घोणसगी यांनी ‘द एक्‍झॉटिक मराठी क्‍युझिन’ या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडला आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेले घोणसगी खवय्ये आहेत. कामानिमित्त अमेरिकेत गेल्यावर पहिल्यांदाच एकट्यानं स्वयंपाक करण्याची वेळ आली. तिथंच त्यांना त्यांच्यातल्या बल्लवाचार्याचा शोध लागला. रिकाम्या वेळात आईकडून शिकलेल्या रेसिपी; तसंच त्यात थोडे प्रयोग करून नव्या चवीचे पदार्थ बनवणं हा त्यांचा छंदच बनला. वेगवेगळे पदार्थ बनवणं आणि त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करून सजवणं यात त्यांचा हातखंडा आहे. या पुस्तकात रेसिपींसोबत असलेली छायाचित्रं आणि त्यातल्या पदार्थांची मांडणी घोणसगी यांचीच! केवळ छायाचित्रांवरूनदेखील त्या पदार्थांतले घटक, बनवण्याची पद्धत आणि त्याचं अंतिम स्वरूप आणि खाद्यसंस्कृतीही आपल्या लक्षात येते.

कांदा-लसूण चटणी, गोडा मसाला ते उन्हाळ्यातल्या वाळवणाचं पदार्थ अशा अनेक महाराष्ट्रीय पदार्थांचा या पुस्तकात समावेश आहे. कांदेपोहे, भजी, मटार करंजी, तिखटमिठाच्या पुऱ्या, दडपे पोहे, काकडीचे धपाटे, वरणफळं, पिठलं, अख्खा मसूर, शेवग्याची आमटी, पावट्याचा रस्सा, गोळ्याची आमटी, खोबऱ्याची चटणी, कैरी चटणी, उकडीचे मोदक; त्याचबरोबर उपवासासाठी साबुदाणा खिचडी, रताळ्याचा कीस, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, उपवासाची बटाटा भाजी अशा किती तरी महाराष्ट्रीय पदार्थांची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून चाखता येऊ शकेल. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतींसोबतच आणखी काय वेगळे प्रयोग त्यात करता येतील, याचेही कानमंत्र द्यायला घोणसगी विसरले नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसांत घरोघरी होणारे पापड, कुरडई, सांडगे यांच्या रेसिपी वाचताना आणि त्यांच्याशी सबंधित छायाचित्रं पाहताना मन आठवणींत रमल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच चुरमुरे लाडू, खानदेशी शेवभाजी, घरी कढवलेलं तूप, दिवाळी फराळ, रानमेवा, गुऱ्हाळात तयार होणारा गूळ, स्वयंपाकघरात वापरली जाणारी पारंपरिक साधनं, फोडणीचा डबा, दगडी जातं, पाटा-वरवंटा, सूप, मापटं अशा मराठी घरांत हमखास आढळणाऱ्या गोष्टींचा सुंदर छायाचित्राच्या माध्यमातून त्यांनी आढावा घेतला आहे. देशोदेशींच्या चवी आवडीने चाखल्यानंतर आपल्या महाराष्ट्रीय पदार्थांचा वैशिष्ट्यपूर्ण अस्सलपणा त्यांना जाणवला. त्यातूनच हे पदार्थ अमराठी भाषकांसह सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट या पुस्तकातून दिसतात. पुस्तक इंग्रजी भाषेतून असल्यामुळं एखाद्या खाद्यभ्रमंतीची आवड असलेल्या एखाद्या परप्रांतीय मित्राला किंवा मराठीचा फारसा गंध नसलेल्या आपल्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांसाठीदेखील हे पुस्तक एक खास भेट ठरू शकतं.

पुस्तकाचं नाव - द एक्‍झॉटिक मराठी क्‍युझिन
लेखक - विनय घोणसगी
प्रकाशक - पॉवर पब्लिशर्स (power-publishers.com)
पृष्ठं - १५६/ मूल्य - ८०० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com