विनोदी साहित्याची चमचमीत मेजवानी

विनोदी साहित्याची चमचमीत मेजवानी

दर्जेदार विनोदी साहित्याची निर्मिती सध्या कमी होत चालली असताना सु. ल. खुटवड यांचा ‘नस्त्या उचापती’ हा कथासंग्रह आलेला आहे. प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, हलकीफुलकी शैली, नाट्यपूर्ण घडामोडी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विनोदाची पातळी कुठंही खालावणार नाही, याची घेतलेली काळजी ही या कथासंग्रहाची वैशिष्ट्यं. सर्वसामान्य माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण या कथासंग्रहात जाणवतं. धमाल उडवून देणारी इरसाल पात्रं हे या संग्रहाचं प्रमुख बलस्थान. समृद्ध, दर्जेदार आणि निखळ विनोद नेमका कसा असतो, याचं प्रत्यंतर देणाऱ्या या कथा.

यातली पहिलीच कथा ‘चप्पलचोर’ आहे. पुण्यात राहणारे जनुभाऊ दांडेकर चप्पलचोरीमुळं हैराण झाले आहेत. त्याचा राग ते शेजारीपाजारी, कुटुंबीय, सोसायटीचे अध्यक्ष, पोलिस यांच्यावर काढत असतात. अखेर चप्पलचोराला धडा शिकविण्यासाठी ते सीसीटीव्ही बसवतात. मात्र, सूनबाईंच्या वडिलांचीच चप्पल चोरण्याची त्यांच्यावर वेळ येते. हा घटनाक्रम लेखकानं मोठ्या खुबीनं मांडला आहे. ही कथा प्रसंगनिष्ठ विनोदाचा उत्तम नमुना आहे.

‘कुत्र्याचं जिणं’ या कथेत तर लेखकानं मोठी धमाल उडवून दिली आहे. श्रीमंत ठिकाणचा घरजावई म्हणून राहण्याचा योग येण्यासाठी कशा तडजोडी कराव्या लागतात, याचं गंमतीशीर चित्रण या कथेत आहे. फॅंटसीच्या वाटेनं जाणारी ही कथा हसता-हसता डोळ्यांतून पाणी आणण्यात यशस्वी ठरते. आपला नवरा आजारी पडावा आणि त्याची आपल्याला मनोभावे सेवा करता यावी, अशी इच्छा एक महिला बाळगते. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या पतीनं केलेले प्रयत्न, मात्र सातत्यानं येत असलेलं अपयश आणि त्यातून होणारी बायकोची चिडचिड वाचकांची छान करमणूक करतात. धक्कातंत्राचा वापर करत साधलेल्या शेवटामुळं कथेनं वेगळी उंची गाठली आहे. ‘जावईबापू! काय हे!’ ही अशीच एक खुमासदार कथा. सासरेबुवांना असलेली अध्यात्माची आवड, त्यांना आवडणाऱ्या अळुवड्या, विसरलेली शाल घेऊन आलेल्या सातपुते वहिनी आणि त्यामुळं निर्माण झालेला संशयकल्लोळ असे विविध गंमतीशीर प्रसंग विनोदाची उंची वाढवतात.

वधूसंशोधन करताना मुलीवर इंप्रेशन पाडण्यासाठी काय-काय करावं लागतं, याची उत्तम मांडणी म्हणजे ‘न ठरणाऱ्या लग्नाची गोष्ट’ ही कथा. त्याचबरोबर ‘बाईलवेडा’, ‘छडी लागे छमछम’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘चोराच्या उलट्या बोंबा’, ‘टोपीखाली दडलंय काय’ आदी एकूण १७ कथा या संग्रहात आहेत. या कथांचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे कथांना लाभलेली हास्यचित्रांची जोड. देविदास पेशवे, ज्ञानेश बेलेकर आणि खलील खान यांची चित्रं कथांची खुमारी आणखी वाढवतात.

पुस्तकाचं नाव - नस्त्या उचापती
लेखक - सु. ल. खुटवड
प्रकाशक - मेनका प्रकाशन, पुणे (९५९५३३६९६०)
पृष्ठं - १५८ / मूल्य - १७५ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com