भाषेतून जगण्याचा जल्लोष करणारी कविता

भाषेतून जगण्याचा जल्लोष करणारी कविता

साठोत्तरी कवितेतील महत्त्वाचे कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा ‘एकूण कविता - ४’ हा नवा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. चित्रे अखेरपर्यंत कविता लिहीत होते. ‘एकूण कविता - ३’नंतर लिहिलेल्या सर्व आणि त्याआधीच्या असंकलित कविता या नव्या संग्रहात आहेत. चित्रे यांच्या दृष्टीनं ‘स्वत-चं काव्यरूप चरित्र आणि चारित्र्य निखळपणे, पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे वाचकांपुढं ठेवणं’ ही गोष्ट सर्वांत मूलभूत आणि महत्त्वाची होती. त्यांच्या या धारणेनुसारच त्यांची उर्वरित कविता आपल्यासमोर ठेवण्यात आली आहे. चित्रे हे पहिल्यापासूनच स्वत-चे वेगळेपण जपत आलेले कवी होते. मात्र या नव्या संग्रहातल्या कविता वाचताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की १९९८नंतरही चित्रे कविता लिहित असले, तरी त्यात त्यांच्या आधीच्या कवितांहून ‘नवं’, ‘वेगळं’ असं काही नव्हतं. त्यामुळं आशय, भाषा आणि शैली यात आधीच्या कवितेचंच आवर्तन दिसतं. तरीही या संग्रहाचं मोल आहे. कारण यामुळे चित्रे यांचं काव्यरूप पूर्ण आत्मचरित्र आपल्यासमोर आलं आहे.

चित्रे यांच्यातला मनस्वी अहंवादी कवी इथंही भेटतो. त्यांच्या कवितेतले गुणावगुण इथंही कमी अथवा जास्त झालेले नाहीत. पण ते पुन्हा नव्यानं भेटण्याचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो. चित्रे यांची कविता नेहमीच जीवनाच्या सर्व स्तरांवर धांडोळा घेत राहते. त्यात वैयक्तिकता येते आणि भवतालातलं परिवर्तनही टिपलेलं असतं. मात्र, त्यात भाबडेपणा अजिबात नसतो. समूहाच्या स्तरावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया विशिष्ट जाणिवेनंही ते कधी टिपत नाहीत. त्यामुळंच समूहाचं आकलन ते व्यक्तिगत अस्तित्वशोधाशी जुळवताना दिसतात.

चित्रे यांच्या कवितेत लैंगिकतेचं संवेदन, मृत्युसंवेदन, भक्ती, माणूस आणि निसर्ग यातील गोवणूक, आत्मचरित्रपरता आणि आत्मभान यांना महत्त्व आहे. साठोत्तरी कवितेला लैंगिक संवेदनेचं अर्थपूर्ण परिमाण चित्रे यांच्या कवितेनं दिलं आहे. त्यांच्या कवितेत लैंगिक प्राकृतिक अनुभवांसकट स्त्री भेटते.
‘पापण्यांप्रमाणेच घट्ट जुळलेल्या बोटांइतकाच
स्वतंत्र आणि अलग हा जननेंद्रियवजा एकांत’


चित्रे यांच्या कवितेतलं हे लैंगिक संवेदन एका व्यापक सर्जनशील आत्मभानाचा घटक आहे, हे विसरता येत नाही. त्यांच्या आधीच्या कवितेत जी समागमचित्रं आली, ती पुढे उरली नाहीत. तरीही ‘कितीक ओल्या व्यभिचारांची अजून गाणी गाऊ?’ हा त्यांचा प्रश्न कायमच राहिला. मग तो अनुभव
‘रतिसांद्र रस्सीखेचीचं
अंदाधुंद चांदणं उपभोगत
भोगून जे तेच त्यागून
पुन्हा पुन्हाच्या
छंदाच्या भोवऱ्यात
परम होऊन’

आपल्यासमोर येतो. नंतरच्या काळात चित्रे अधिकाधिक भक्तिमार्गी झालेले दिसतात. ज्ञानेश्वर-तुकारामांच्या काव्याच्या अनुवादांनंतर ते अध्यात्मसन्मुख होत गेले असावेत. या संग्रहातही विठोबा-तुकोबांच्या सगुण रुपांची भक्ती दिसते. अर्थात ती पारंपरिक रूपातली भक्ती नाही, की त्यात मर्ढेकरांसारखी शरणताही नाही.
‘आता फक्त तू-मी
करू चुकते हिशेब एकांतात’

असं रोखठोक नातं ईश्वरी अस्तित्वाशी त्यांनी जोडलेलं आहे. तुकाराम किंवा मर्ढेकर यांच्याप्रमाणे सर्वसमर्पणशील आस्तिक्‍य चित्रेंमध्ये नाही. ते शंकेखोर स्व-अस्तित्व जागं ठेवत आस्तिक्‍यभाव सांभाळतात.

चित्रे भाषेबाबत सजग असतात. आपल्या प्रतिमांकित भाषेविषयी, शब्दयोजन, वाक्‍समूह, अनुप्रास, यमकं साधणाऱ्या लकबी आणि त्याचे परिणाम यांची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच ‘आत्मभावाच्या कडेला शब्द रांगडा’ असं ते स्पष्ट करतात. त्यांच्या या आधीच्या कवितेत दिसलेल्या भाषेच्या लकबी इथंही विपुल आहेत. त्यांच्यातला कवी, चित्रकार, जाहिरात संहितालेखक, अनुवादक, फिल्ममेकर सतत जागा असतो. या सर्व रूपांनी सर्जनशील भान जागं असतं. ते केवळ अस्तित्वाचं रुप शोधत नाही, तर भाषेच्या, सर्जनाच्या मुळाशी जाऊ पाहतं. त्यात संगीताची तरल अनुभूती पकडण्याचा प्रयत्न असतो. या सगळ्यातून कवीचा कवीशी झगडा सुरू आहे. ‘समग्र गद्यात उरते फक्त कवितेची शिल्लक, आपण गर्दीतही शेलकेच’ ही जाणीव ठेवून आयुष्यभर कविता जपल्यानंतर मनात आत भान असतंच :
‘धड ना कवी झालो ना संत
मी राहिलो कायम दरम्यान’

तरीही जगण्याचे सगळे जल्लोष भाषेद्वारे कवितेत आणण्याचा प्रयत्न चित्रे आयुष्यभर करत आले. हा जल्लोष अनुभवण्यासाठी ‘एकूण कविता - ४ ’ या नव्या संग्रहाकडं वळायलाच हवं.

पुस्तकाचं नाव - एकूण कविता - ४  
कवी - दिलीप पुरुषोत्तम चित्रे
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (०२२- २२७३०६७९)
पृष्ठं - १५१ / मूल्य - २६५ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com