एका अभिनेत्याच्या मनस्वीपणाचा आलेख

महेश बर्दापूरकर
रविवार, 7 मे 2017

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचं ‘आणि मग एक दिवस...’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. अभिनय कलेचा आवाका उलगडून दाखवणारं, त्यातील धोके स्पष्ट करणारं, नाटक आणि चित्रपट यांतलं वेगळेपण स्पष्ट करण्याबरोबरच सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांबद्दलच्या आठवणी सडेतोडपणे मांडत गुंतवून ठेवणारं हे आत्मचरित्र. सडेतोड अनुभवकथनाबरोबरच नाटक आणि चित्रपटांतल्या अभिनयाच्या मार्गदर्शकाचं कामही हे आत्मचरित्र करतं. नसीरभाई आपल्या आत्मचरित्राच्या सुरवातीच्या काही प्रकरणांमध्ये बालपण, वडिलांशी (शेवटपर्यंत) न जुळलेले सूर, स्वत-मध्ये असलेला प्रचंड न्यूनगंड आणि त्यातून बाहेर पडण्याची धडपड मांडतात.

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचं ‘आणि मग एक दिवस...’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. अभिनय कलेचा आवाका उलगडून दाखवणारं, त्यातील धोके स्पष्ट करणारं, नाटक आणि चित्रपट यांतलं वेगळेपण स्पष्ट करण्याबरोबरच सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांबद्दलच्या आठवणी सडेतोडपणे मांडत गुंतवून ठेवणारं हे आत्मचरित्र. सडेतोड अनुभवकथनाबरोबरच नाटक आणि चित्रपटांतल्या अभिनयाच्या मार्गदर्शकाचं कामही हे आत्मचरित्र करतं. नसीरभाई आपल्या आत्मचरित्राच्या सुरवातीच्या काही प्रकरणांमध्ये बालपण, वडिलांशी (शेवटपर्यंत) न जुळलेले सूर, स्वत-मध्ये असलेला प्रचंड न्यूनगंड आणि त्यातून बाहेर पडण्याची धडपड मांडतात. वडिलांच्या बदल्यांमुळं विविध शहरांमध्ये झालेलं वास्तव्य आणि प्रत्येक ठिकाणी स्वत-ला सिद्ध करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न विस्तारानं येतात. क्रिकेट आणि इंग्रजी चित्रपट पाहण्याच्या छंदातून मिळत गेलेल्या आत्मविश्‍वासाबद्दल सांगत ते तारुण्यापर्यंत येतात. यामध्ये नैनितालमधील वास्तव्यातल्या आठवणी अधिक रंजक आहेत. लहानपणी बोलण्यात असलेला तोतरेपणा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी भराभर बोलण्याची लागलेली सवय, शाळेतल्या नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी आणि अभिनेता होण्याची निर्माण झालेली इच्छा हा भागही मनोरंजक आहे. ‘कमी मळलेली वाट’ या भागामध्ये नसीरभाई चक्क मुंबईला पळून येतात व एक्‍स्ट्रॉचं कामही करतात. अभिनेते दिलीपकुमार यांच्या बहिणीशी ओळख आणि त्यांच्या घरात जाऊन दिलीपकुमार यांची फिल्मफेअर पुरस्काराची बाहुली उचलून घेतल्याच्या भागाचा संदर्भ पुस्तकाच्या शेवटी छान जोडण्यात आला आहे.

अलिगड मुस्लिम विद्यापीठातले दिवस आणि तिथं नाटकांत केलेली कामं हा भाग विस्तारानं मांडण्यात आला आहे. इथंच १८ वर्षांचे नसीर परवीन या ३४ वर्षांच्या पाकिस्तानी महिलेच्या प्रेमात पडतात आणि घरच्यांचा रोष पत्करून विवाहबद्धही होतात. त्यांना हिबा नावाची एक मुलगी होते आणि काही वर्षांतच दोघांत बिनसल्यानं परवीन लंडनला निघून जाते. दरम्यान, नसीर दिल्लीतल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) दाखल होतात आणि अभिनेता म्हणून त्यांना ओळख मिळू लागते. मात्र, एका टप्प्यावर त्यांना अभिनयातल्या कृत्रिमपणाचा उबग येतो. नसीर लिहितात, ‘‘अभिनय हे कसब असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जात नाही. पूर्वी घडलेल्या प्रसंगांच्या आधारे बळजबरीनं हसायला, रडायला भाग पाडलं जातं. यातून स्मृतींच्या लहरींवर तरंगण्याचा क्षणिक कैफ साध्य होण्यापलीकडं नटाला फारसं काही गवसत नाही.’’ इथंच त्यांना ओम पुरी भेटतात आणि दोघांत मैत्रीही होते. एनएसडीमध्ये असतानाच त्यांना मोठ्या पडद्यावर काम करायचं असल्यास पुण्यात जाऊन फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये (एफटीआयआय) दाखल होऊन प्रशिक्षण घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं जाणवतं आणि नसीर पुण्यात दाखल होतात. अभिनेत्याचं शिक्षण घेणाऱ्यांना डिप्लोमा फिल्ममध्ये काम मिळावं म्हणून संस्थेत आंदोलन होतं आणि त्याचं नेतृत्व नसीर यांच्याकडं येतं. त्यातून त्यांची ओळख गिरीश कारनाड यांच्याशी होते. कारनाडच नसीर यांची ओळख श्‍याम बेनेगल यांच्याशी करून देतात आणि नसीर यांना त्यांचा पहिला चित्रपट ‘निशांत’ मिळतो.

आत्मचरित्राच्या यानंतरच्या भागात ‘निशांत’ किंवा ‘मंथन’सारखे चित्रपट करताना आलेले अनुभव, सहकलाकारांशी असलेले संबंध, चित्रपटनिर्मिती या प्रक्रियेतील बारकावे याचं नेटकं आणि थेट वर्णन नसीर करतात. प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होत जातं, मात्र पैशांसाठीच स्वीकारलेल्या काही भूमिकांमुळं त्यांना नैराश्‍यही येतं. याच काळात ते रत्ना पाठक यांच्या प्रेमात पडतात आणि विवाहबद्ध होतात. रत्ना एनएसडीच्या विद्यार्थिनी असल्यानं दोघं मिळून नाट्यसंस्था स्थापन करतात आणि काही नाटकंही बसवतात. जसपाल या सहकलाकाराशी त्यांचा झालेला वाद आणि त्यातून निर्माण झालेले दुर्दैवी प्रसंग, अनेक पडलेली नाटकं, घोड्यावरून पडून झालेला अपघात, निवडण्यात चूक झालेले चित्रपट अशा अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं. या सर्वांचं वर्णन नसीरभाई कोणताही आडपडदा न ठेवता करतात. ग्रोटॉव्हस्की या दिग्दर्शकाच्या कार्यशाळेसाठी वॉरसॉला जाण्याचा प्रसंग अंगावर काटा आणतो. ओरडून संवाद म्हणण्याची पद्धत आणि त्याच्या स्वरयंत्रावर झालेल्या परिणामांबद्दलही ते स्वत-ची चूक मान्य करून लिहितात. ‘‘मला प्रसिद्धी व पैसा हवा होता, मात्र ते मिळू लागल्यावर मी संकोचानं मिटू लागलो, माझ्या सुमार कामांचीही स्तुती होऊ लागली. कधी-कधी सही घेतल्यावर माझं नाव विचारण्यात येई. या अर्थहीन खटाटोपाचा मला तिरस्कार वाटू लागला,’’ असं नसीर कबूल करतात.

एनएसडी आणि एफटीआयआयमधील प्रशिक्षणातील फरक, अभिनय म्हणजे नक्की काय, दिग्दर्शक महत्त्वाचा की अभिनेता, काम महत्त्वाचं की पैसा अशा अनेक प्रश्‍नाचा ऊहापोह नसीर उदाहरणांसह करतात. त्यामुळंच हे आत्मचरित्र अभिनय कलेचा वस्तुपाठही ठरतं. ज्येष्ठ दिग्दर्शिका-लेखिका सई परांजपे यांनी केलेलं अत्यंत प्रवाही भाषांतर हे या चरित्राचं आणखी एक वैशिष्ट्य. नसिरुद्दीन शाह यांचा प्रवास आणि मुख्य; तसंच समांतर चित्रपटांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी हे चरित्र आवर्जून वाचावं.  

पुस्तकाचं नाव - आणि मग एक दिवस...
लेखक - नसिरुद्दीन शाह
अनुवाद - सई परांजपे
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
पृष्ठं - २९०/ मूल्य - ६५० रुपये

Web Title: book review in saptarang