इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची ‘नाडी’परीक्षा

अभय सुपेकर
रविवार, 10 सप्टेंबर 2017

नेहरू-गांधी घराण्याबाबत, या घराण्यातल्या व्यक्तिमत्त्वांबाबत अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत, होत आहेत. तथापि, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव आणि सोनिया गांधी यांच्यासोबत वावरलेल्या मंडळींची पुस्तकं त्यांच्याबद्दल प्रत्यक्षदर्शी माहिती देत असतात. त्यांची निरीक्षणं मांडत असतात. घटनांचे साक्षीदार असल्यानं प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित माहिती पुरवतात. त्यामुळं त्यांना दस्तावेज म्हणून महत्त्व येत असतं. याच पठडीतलं पुस्तक आहे : ‘दृष्टीआडच्या इंदिरा गांधी’. भारताच्या अनेक वर्षं पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांचे कमी-अधिक सुमारे तीन दशके वैद्यकीय अधिकारी राहिलेले डॉ. के. पी.

नेहरू-गांधी घराण्याबाबत, या घराण्यातल्या व्यक्तिमत्त्वांबाबत अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत, होत आहेत. तथापि, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव आणि सोनिया गांधी यांच्यासोबत वावरलेल्या मंडळींची पुस्तकं त्यांच्याबद्दल प्रत्यक्षदर्शी माहिती देत असतात. त्यांची निरीक्षणं मांडत असतात. घटनांचे साक्षीदार असल्यानं प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित माहिती पुरवतात. त्यामुळं त्यांना दस्तावेज म्हणून महत्त्व येत असतं. याच पठडीतलं पुस्तक आहे : ‘दृष्टीआडच्या इंदिरा गांधी’. भारताच्या अनेक वर्षं पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांचे कमी-अधिक सुमारे तीन दशके वैद्यकीय अधिकारी राहिलेले डॉ. के. पी. माथूर यांनी लिहिलेले हे पुस्तक इंदिराजींच्या व्यक्तिगत जीवनातले अनुभव कथन करत असताना त्यांच्यातलं माणूसपण, त्यांच्या कौटुंबिक जीवनातली आंदोलनं, सार्वजनिक जीवनापलीकडं असलेलं त्यांचं घरामधलं व्यक्तित्व यांचा वेध घेतं. मुळात इंदिराजींसाठी वैद्यकीय अधिकारी नेमायचं ठरलं आणि डॉ. माथूर यांची निवड झाली, तेव्हा त्यांनी ज्या नर्मविनोदी शैलीत स्वत:चे वर्णन करत ‘अशी गरज आहे का,’ अशी विचारणा केली, तिथूनच डॉ. माथूर यांना त्यांच्या स्वभावाचा परिचय होत गेला. इंदिराजी कुटुंबातल्या व्यक्ती, नातेवाईक; तसंच परिचित मंडळी यांच्या आरोग्याबाबत दक्ष असत. त्यांची काळजी घेत. सुना आणि नातवांवर त्यांचा विशेष जीव होता. सोनिया असोत, किंवा मनेका, त्यांच्यासाठी इंदिराजी कशा दक्ष असत, देशाच्या पंतप्रधान असल्या, तरी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा पार पाडत, याचे तपशीलही वाचताना स्वाभाविकपणे इंदिराजींच्या कौटुंबिक आयुष्याची पानं उलगडत जातात.

दौऱ्यात असताना सोबत असलेले डॉक्‍टर, कर्मचारी यांनी पंतप्रधानांची काळजी घ्यायची असते. त्यांना हवं नको ते पाहायचं असतं. मात्र, इंदिरा गांधी अनेकदा स्वत:हून आपल्या ताफ्यातले अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय तर होत नाही ना, याबाबत काळजी घ्यायच्या. त्यांच्या बारीकसारीक गरजाही पूर्ण झाल्यात की नाही, हे पाहायच्या. शास्त्रज्ञांसोबत असताना इंदिराजींनी दाखवलेली तडफ पाहून डॉ. राजा रामण्णा यांच्यासारखे महान शास्त्रज्ञही अचंबित कसे झाले, त्यांच्या ऊर्जेचं गुपित ते डॉ. माथुरांना विचारू लागले, हा प्रसंग वाचताना नकळतपणे पंतप्रधानांच्या कार्याचा परिचय होतो. लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर इंदिराजी पंतप्रधान झाल्या, तेव्हा अनेक बड्या आणि ज्येष्ठ काँग्रेसजनांना त्या कशा कारभार करतील, असा प्रश्‍न पडला होता. त्यामुळं कामकाज करताना येणाऱ्या दबावाला इंदिराजींनी तोंड कसं दिलं, अर्थसंकल्प मांडताना झालेल्या विचित्र अवस्थेवर त्यांनी स्वत: मात कशी केली आणि उत्तरोत्तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला कणखरपणा बहरत कसा गेला, हे विविध प्रकरणांत स्पष्ट होते. हिंदीविरोधी आंदोलनाच्या काळात इंदिराजी मद्रासला (चेन्नई) गेल्या असताना हिंदीविरोधी घोषणा देणाऱ्या युवकांना त्यांनी सकारात्मकतेनं आपलं म्हणणं मांडण्यास सांगून आपला परिपक्वपणा दाखवून दिल्याचं दिसतं. बांगलादेश निर्मितीवेळी इंदिराजींनी कठोर आणि ठोस भूमिका घेतल्यानं पाकिस्तानला गुडघे टेकून शरण यावं लागलं; तथापि सिमला करारासाठी आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या अंत:करणातली बोच त्यांच्या हालचालीतून व्यक्त होत होती. तरीही इंदिराजी त्यांना आणि त्यांच्या शिष्टमंडळाला मोकळ्या वातावरणात चर्चा करता यावी, यासाठी कशा खबरदारी घेत होत्या, हे माथूर यांनी छान टिपलं आहे. न्यायालयाच्या निकालानं बसलेला हादरा, आणीबाणी आणि त्या काळातले निर्णय, संजय गांधी यांचं वर्तन आणि त्यावरची टीका, त्याच वेळी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालचं आंदोलन आणि सत्तांतर या सर्वांचा पट पुस्तकात आहे. तथापि, अनेक ठिकाणी ‘लोकनायक’ असा अवतरणात येणारा शब्द आणि इंदिराविरोधकांबद्दलचं भाष्य पाहता माथूर हे व्यक्तिस्तोमाकडे काहीसे झुकले होते, हे जाणवतं. १९६९मध्ये काँग्रेसमधल्या दुफळीमुळं इंदिराजींनी काँग्रेस (आय) पक्ष स्थापन केला, हे नमूद केलेलं विधान चुकीची नोंद करून जातं. प्रत्यक्षात आणीबाणीनंतर २ जानेवारी १९७८ रोजी काँग्रेसमधल्या निष्ठावंतांची मोट बांधत इंदिराजींनी काँग्रेसची फेरबांधणी केली, त्याला काँग्रेस (आय) म्हणतात, ही वस्तुस्थिती आहे.

आणीबाणीनंतर सत्ताविहीन झालेल्या इंदिराजींची काळजी डॉ. माथूर नेहमीप्रमाणं घेत होते. शिरस्त्याप्रमाणं त्यांची दररोज सकाळी भेट घेऊन चौकशी करत होते. त्या काळातही अविचल, विचारी, धैर्यानं प्रसंगाला सामोरे जातानाच त्या मनात पुढचं नियोजन कशा करत होत्या आणि सत्तेपासून दूर असतानाही गृहकलहाला चार भिंतीतच ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कसा होता, त्याला अपयश येत असताना त्यावर मात करण्यासाठी त्या जिवाचं रान कशा करत होत्या, हे नमूद करताना लेखक एका आईची कुटुंबाविषयीची तळमळ सहज मांडून जातो. जनता पक्षाच्या प्रयोगानंतर पुन्हा सत्तेवर आलेल्या इंदिराजी संजय गांधी यांच्या अपघाती निधनानं सावरून पूर्ववत कार्य करत होत्या; तरीही संजय यांच्या नसण्याची सल त्यांना बोचत होती. भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे यांना पवनारच्या आश्रमात भेटायला गेल्यानंतर गैरसोयी असतानाही विनोबांविषयीच्या तळमळीतून इंदिराजी तिथं राहिल्या, हे मांडताना माथूर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू उलगडून दाखवतात. पंजाबात अमृतसरमधल्या सुवर्णमंदिरातल्या कारवाईनंतर काही महिन्यांतच इंदिराजींचा सुरक्षारक्षकांनी बळी घेतला. त्या दिवशीही सकाळी डॉ. माथूर यांनी त्यांची घेतलेली भेट अखेरची ठरली. सुजाता गोडबोले यांनी पुस्तकाचा मराठीत केलेला अनुवाद ओघवत्या शैलीत आहे. चपखल मराठी शब्दयोजनांमुळं हा दस्तावेज अधिक वाचनीय झाला आहे.

पुस्तकाचं नाव : दृष्टीआडच्या इंदिरा गांधी
लेखक : डॉ. के. पी. माथूर
अनुवाद : सुजाता गोडबोले
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)
पृष्ठं : १४२, मूल्य : १६० रुपये

Web Title: book review in saptarang