स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

‘श्रीमंत गुंतवणूकदार’ होण्यासाठीचं सखोल मार्गदर्शन

‘श्रीमंत गुंतवणूकदार’ होण्यासाठीचं सखोल मार्गदर्शन
श्रीमंत व्हायची इच्छा कोणाला नसते? ‘अर्था’विना जग अर्थहीन आहे, असं अनेकांना वाटत असतं. प्रत्येक जण आपापल्या कल्पनेनुसार, ज्ञानानुसार श्रीमंत होण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसतो; पण त्यात प्रत्येकाला यश मिळतंच असं नाही. काहींना कमी प्रमाणात अर्थार्जन होतं, काहींना गरजेपुरतं होतं, तर फारच थोड्या लोकांना खऱ्या अर्थानं ‘श्रीमंती’ दिसते. ज्ञानाबरोबरच वैयक्तिक क्षमता, कौशल्य, कसब अशा गुणांच्या बळावर प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात यश मिळताना दिसतं. अर्थार्जनाच्या बरोबरीनं योग्य रितीनं ‘गुंतवणूक’ करणं हा श्रीमंतीच्या वाटेवरचा महत्त्वाचा घटक आहे. त्याचं गांभीर्य, महत्त्व जितक्‍या कमी वयात समजेल, उमजेल तितकं उत्तम. बऱ्याच जणांना याची जाणीव वयाच्या उत्तरार्धात होऊ लागते; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते म्हणूनच योग्य वेळी किंवा योग्य वयात गुंतवणुकीचे फंडे समजले, तर श्रीमंत होणं फार दूर राहत नाही. यासाठी हवा असतो तो गुंतवणुकीचा सच्चा मार्गदर्शक! ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध लोकप्रिय पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी ‘रिच डॅड्‌स गाईड टू इन्व्हेस्टिंग’ या पुस्तकाच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या अशा मार्गदर्शकाची उणीव भरून काढली आहे. डॉ. सुधीर राशिंगकर यांनी अनुवादित केलेली या पुस्तकाची मराठी आवृत्ती आता उपलब्ध झाली आहे, त्यामुळे अधिकाधिक सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या पुस्तकातल्या मार्गदर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.
‘गुंतवणूक’ या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा असतो. खरं तर श्रीमंत, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी असतात. ज्याला ‘श्रीमंत’ गुंतवणूकदार व्हायचं आहे आणि श्रीमंत ज्यात गुंतवणूक करतात, त्यात गुंतवणूक करायची आहे, त्या कुणाहीसाठी हे पुस्तक दीर्घकालीन मार्गदर्शक आहे. पुस्तकाच्या नावाप्रमाणं हे एक गाईड, मार्गदर्शक आहे. ते कशाचीही हमी देत नाही, देतं ते केवळ मार्गदर्शन! ‘तात्पुरती मलमपट्टी’, ‘शेअर बाजारातील टिप्स’, ‘सोपी उत्तरं’ शोधणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच नाही.
लोकांना ‘गुंतवणूक’ या शब्दामधली सुप्त शक्ती आता कळू लागली आहे. अनेकांना ती शक्ती कशी प्राप्त करून घेता येईल, हे शोधून काढायचं असतं. कियोसाकी म्हणतात, ‘‘चाळीस वर्षांपूर्वी माझ्या ‘रिच डॅड’नी गुंतवणूक विषयाची माझी उत्सुकता जागृत करण्याचं काम केलं. ‘रिच डॅड’कडे जी पैशाची ताकद आहे, ती माझ्या वडिलांकडे नाही, हे माझ्या लक्षात आलं होतं, तेव्हा मलाही ती ताकद आपल्यात यावी, असं वाटू लागलं. बरेच लोक या ताकदीला घाबरतात आणि त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात; पण माझं कुतूहल जागं झालं होतं आणि ही ताकद मिळवण्याची माझी दुर्दम्य इच्छा मला शिक्षणाच्या जीवनमार्गावर आणून सोडते.’’
‘गुंतवणूक’ हा शब्द उच्चारला, की अनेक जणांचे प्रश्‍न ठरलेलेच असतात. त्यात ‘माझ्याकडे पैसेच नसताना मी गुंतवणूक कशी करू?’, ‘स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड वा शेअर यापैकी कशात गुंतवणूक करावी?’, ‘गुंतवणुकीत धोका नाहीये का?’, ‘कमी धोक्‍याच्या गुंतवणुकीतून मोठा परतावा कसा मिळवता येईल?’ अशा काही प्रश्‍नांचा हमखास समावेश असतो. अशा काही प्रश्‍नांची उत्तरं या पुस्तकात सापडतील आणि अन्य प्रश्‍नांची उत्तरं कुतूहलापोटी या ना त्या मार्गानं स्वतःच इतरत्र शोधायचा प्रयत्न केला जाईल, एवढा आशावाद हे पुस्तक जागवतं. अर्थात गुंतवणूकदारांच्या मनातल्या सर्वच्या सर्व प्रश्‍नांची तांत्रिक उत्तरं या पुस्तकात कदाचित मिळणार नाहीत, मात्र स्वकष्टानं श्रीमंत झालेल्या किती लोकांनी पैसे कमावले आणि प्रचंड संपत्ती कशी जमवली, याची माहिती यात दिसून येते. गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात का, मी कशात गुंतवणूक करावी, गुंतवणूक ही गोंधळात टाकणारी का असते, तुम्ही श्रीमंत होण्यासाठी योजना आखत आहात की गरीब राहण्यासाठी, गुंतवणूक करणं धोक्‍याचं कसं नाही, तुम्हाला कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार व्हायचं आहे, कसलेला गुंतवणूकदार कसा विचार करतो, श्रीमंत होण्याची किंमत काय, धीम्या गतीनं श्रीमंत कसं व्हावं अशा प्रत्येकाच्या मनातल्या प्रश्‍नांची उकल हे पुस्तक वाचत जाताना होत राहते.
पैशांबाबतचा ९०-१० चा नियम हे पुस्तक अधोरेखित करतं. चित्रपटजगतात, क्रीडाजगतात १० टक्के लोकांकडे ९० टक्के धन असते, हे ‘रिच डॅड’नं दाखवून दिलं आहे. ९०-१० चा हाच नियम गुंतवणुकीच्या क्षेत्रातही लागू पडतो म्हणून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना तुम्ही कोणता सल्ला द्याल, या प्रश्‍नावर ‘रिच डॅड’ यांचं उत्तर होतं, ‘सर्वसामान्य राहूच नका!’ कियोसाकी यांच्या पुस्तकाचं हेच सार आहे आणि त्याचसाठी हे पुस्तक सर्वांनी वाचायला हवं.

मुकुंद लेले

-----

महाराष्ट्राच्या शेती-मातीचा दस्तावेज
शेती, पाणी आणि शब्द या तिन्ही क्षेत्रांत अधिकारवाणीने मुशाफिरी करणारे ‘महाराष्ट्राचे रानकवी’ ना. धों. महानोर. महानोर यांनी शेती आणि पाण्याच्या बाबत केलेले अनेक प्रयोग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उभारी देणारे ठरले. त्यांच्या कवितेतल्या शब्दांनी निराश मनावर फुंकर घातली, जगण्याची नवी उमेद जागवली आहे. महानोर विधिमंडळाचे सदस्य असताना (१९९७४-८४, १९९०-९६) त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून महाराष्ट्रातल्या शेती-मातीचा दस्तावेजच जणू सादर केला. त्यांच्या भाषणातली असंख्य उदाहरणं, प्रयोग आजही मार्गदर्शक आहेत. महानोर यांची भाषणं ‘विधिमंडळातून...ना. धों. महानोर’ या पुस्तकातून वाचकांच्या भेटीला आली आहेत.
राज्याच्या विधान परिषदेवर दोन वेळा साहित्यिक-कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून महानोर यांची कारकीर्द गाजली. अनेकविध क्षेत्रांतल्या प्रश्‍नांचा खोलवर अभ्यास करून महत्त्वपूर्ण ठराव त्यांनी मांडले. महत्त्वाची बाब म्हणजे या ठराव-प्रस्तावांना सभागृहानं मान्यता दिली. रानाशी, शेतीशी नाळ जुळलेल्या महानोर यांचा अमृतमहोत्सव त्यांच्या पळसखेडे या गावात नुकताच साजरा करण्यात आला. माजी कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. याच सोहळ्यात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. सोहळ्यात पवार यांनी महानोरांच्या विधिमंडळातील भाषणावेळच्या आठवणींचा उजाळा दिला. ‘‘विधिमंडळात दीड तप काम केलेल्या महानोर यांनी जलसंधारण, फलोद्यान, पाणी प्रश्‍न, कला, अकादमी, साहित्य-संस्कृती क्षेत्र आदी विषय मांडले. दिशा देण्याचं मोठं काम त्यांनी केलं. विधिमंडळात महानोर भाषणाला उभे राहिल्यानंतर सभागृहाबाहेर गेलेले सभासदही काही तरी चांगले ऐकायला मिळेल, यासाठी तातडीनं आत येऊन बसायचे,’’ अशी आठवण त्यांनी सांगितली आणि या पुस्तकातून त्याचं प्रत्यंतर येतं.
महानोर आणि जळगावच्या जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल जैन यांचं मैत्र जगावेगळं. दोघांची नाळ शेती, शेतकरी आणि निसर्गाशी जुळलेली. महानोरांनी विधिमंडळात केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांवर आधारित पुस्तक काढावं, जेणेकरून महाराष्ट्राला ते मार्गदर्शक ठरेल, अशी भंवरलाल जैन यांची इच्छा होती. आज भंवरलाल जैन या जगात नाहीत, मात्र महानोरांच्या संकलित भाषणांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात दुष्काळ, शेतमाल ते बाजारभाव, जलसंधारण, कला, संस्कृती, साहित्य, सामाजिक यांसारख्या विषयांवर महानोर यांनी केलेल्या भाषणांतले महत्त्वाचे मुद्दे आहेत. या भाषणांना वीस वर्षांचा काळ लोटला असला, तरी ते विचार आजही ताजेतवाने आहेत; मार्गदर्शक आहेत, उपयुक्त आहेत.

दिनेश दीक्षित

Web Title: book review in saptaranga