बुकीश : बायोस्कोपच्या गोष्टी पुस्तकातून...!

Sholay
Sholay

Entertainment हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चांगल्या कादंबऱ्या व कथांवरून सिनेमे निघाले. यामध्ये शरतचंद्र चटोपाध्याय यांच्या ‘देवदास’ किंवा चेतन भगतच्या अनेक कादंबऱ्यांच्या उल्लेख वानगी दाखल करता येईल. मात्र, एखादा चित्रपट चालल्यानंतर त्याच्या ‘मेकिंग’वर आधारित पुस्तक निघण्याचं भाग्य फार थोड्या चित्रपटांना मिळतं.

भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वाधिक चाललेला गाजलेला, चर्चिला गेलेला चित्रपट म्हणजे अर्थातच ‘शोले’. चित्रपटातील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक पात्र, प्रत्येक संवाद आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहे. या चित्रपटावर बेतलेले अनेक चित्रपट त्यानंतरही प्रदर्शित झाले, मात्र त्याची सर इतर कोणत्याही चित्रपटाला आली नाही. या चित्रपटावर आधारित प्रहसन सादर करीत अनेक कलाकारांनी आपले पोट भरले, मात्र मूळ ठाकूर किंवा गब्बरच्या जवळही कोणी पोचू शकले नाही. अशा या इतिहास घडविणाऱ्या चित्रपटाची निर्मिती नक्की कशी झाली, कलाकारांची निवड कशी झाली, चित्रपटाचे लोकेशन शोधण्यापासून त्याच्या चित्रीकरणापर्यंत निर्मात्यांना काय अडचणी आल्या याची अत्यंत सुरस व तेवढीच विश्‍वासार्ह माहिती आपल्याला मिळते अनुपमा चोप्रा यांच्या ‘शोले - द मेकिंग ऑफ क्लासिक’ या पेंग्विन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातून. 

‘शोले’ प्रदर्शित होण्याआधी भारतीय चित्रपटांची स्थिती नक्की कशी होती, हे सांगत पुस्तकाची सुरवात होते व त्यानंतर सलीम-जावेद या लेखक द्वयीची पुस्तकात एन्ट्री होते. या दोघांना चार ओळीची एक कथा सुचली होती. लष्करातील एका निवृत्त अधिकाऱ्याच्या घरच्यांवर अन्याय होतो. तो सेवेत असताना सहकारी असलेल्या दोन सैनिकांना बोलावून घेतो व आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतो, अशी ती कथा होती. रमेश सिप्पी या निर्माते जी. पी. सिप्पी यांच्या मुलाचा ‘सीता और गीता’ हा चित्रपट गाजला होता. सलीम-जावेद यांनी ही कथा सिप्पींना ऐकवली व काही तरी भव्य करण्याचा इरादा असल्यानं त्यांना ही कथा आवडली.

बैठका सुरू झाल्या व रमेश सिप्पी यांनी लष्करावर आधारित चित्रपट बनवताना अडचणी येतील, त्यामुळं कथेची केवळ पार्श्‍वभूमी बदलण्याची सूचना केली. मग ही कथा निवृत्त पोलिस अधिकारी आणि दोन चोरांची झाली. कथा लिखाणात पुढं सरकत असताना कलाकारांची निवड आणि सेट नक्की कुठं बांधायचा यावर चर्चा सुरू झाली. त्या आधीच्या सर्व सिनेमांत चंबळच्या नावाखाली राजस्थानमधील वाळवंटात चित्रण उरकलं जायचं. कलादिग्दर्शक राम येडेकर यांनी बंगळूर जवळचं डोंगराळ भागातलं रामनगरम हे गाव चित्रीकरणासाठी निवडलं. कलाकारांची निवड करण्याचं कामही सुरू झालं. (त्याचेही अनेक रंगतदार किस्से आहेत आणि ते पुस्तकात छान रंगवले गेले आहेत.)

गब्बरसिंगची निवड हा मोठा टर्निंग पॉइंट होता. आधी डॅनी ही भूमिका साकारणारे होता, मात्र त्यांच्या तारखा न जुळल्यानं सलीम-जावेद यांच्या सूचनेनुसार अमजद खान या रंगभूमीवरील कलाकाराची निवड गब्बर या पात्रासाठी झाली. प्रत्यक्ष चित्रीकरण २ ऑक्टोबर १९७३ला सुरू झालं. यादरम्यान घडलेल्या घटनांचा अत्यंत रंजन लेखाजोगा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. अमिताभ बच्चन तिजोरीच्या चाव्या जया बच्चनच्या ताब्यात देतो, या प्रसंगापासून चित्रण सुरू झालं.

जया बच्चन कंदिलाच्या ज्योती विझवत जाते व त्यावेळी अमिताभ तोडांनं बाजा वाजवत असतो, हा प्रसंग चित्रित करायला तब्बल २१ दिवस लागले, कारण रमेश सिप्पी यांना योग्य तो परिणाम मिळत नव्हता इथपासून घोड्यांचे प्रसंग चित्रित करताना आलेल्या अडचणी, ‘कोई हसिना रुठ जाती है तो,’ या गाण्याच्या वेळी रेल्वे येण्याची वेळ झालेली असतानाच हेमामालिनीच्या केसांत माळलेला गजरा जागेवर नसल्यानं उडालेली तारांबळ असे अनेक किस्से या ओघात येतात. लांबलेलं शेड्युल, अनेक समस्या यांचा सामना करीत अखेर चित्रपट १५ जानेवारी १९७५ला प्रदर्शित झाला. पहिले तीन आठवडे त्याला थंड प्रतिसाद मिळाला, ७० एमएमच्या काढलेल्या प्रिंट बंदरावरच अडकून पडल्यानं अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. मात्र, त्यानंतर लोकांना पडद्यावर काहीतरी भव्य, अद्वितीय पाहत असल्याचं जाणवायला लागलं आणि इतिहास घडला. अनुपमा चोप्रा यांचं अत्यंत प्रवाही लेखन आणि कितीही वेळा वाचले तरी कंटाळा न येणारे प्रसंग यांमुळं हे पुस्तक तुम्हाला कायमच गुंतवून ठेवतं.

याच धरतीवरचं ‘लगान’ या चित्रपटाच्या निर्मितीची गोष्ट सांगणारं ‘द स्पिरिट ऑफ लगान’ हे सत्यजित भटकळ लिखित पुस्तकही वाचनीय आहे. कलाकारांच्या चरित्र व आत्मचरित्रांतून आपल्याला चित्रपटसृष्टीचा इतिहास समजतो, तसाच तो अशा पुस्तकांतूनही तुमच्या समोर येत राहतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com