
ब्रेबॉर्न टू वानखेडे व्हाया मराठी अस्मिता
धोनीने षटकार मारून भारताला २८ वर्षांनी जिंकून दिलेला २०११ चा विश्वकरंडक असो की सचिन तेंडुलकरचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना... भारतीय क्रिकेट इतिहासातील अशा अनेक सोनेरी क्षणांचा सोबती असलेल्या वानखेडे स्टेडियमच्या उभारणीचा इतिहाससुद्धा तितकाच रंजक आहे.
भारताचे लॉर्ड्स म्हणून ओळखले जाणारे मुंबईतील ‘ब्रेबॉर्न स्टेडियम’ अवघ्या ७५० मीटरवर असताना ‘वानखेडे स्टेडियम’ का बांधलं गेलं असावं? मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या या स्टेडियमची कहाणी जाणून घेऊ या.
मुंबई म्हणजे भारतीय क्रिकेटचे माहेरघर. मुंबईत १८७५ साली ‘बॉम्बे जिमखाना ग्राउंड’ हे तत्कालीन बॉम्बेच्या फोर्ट परिसरात बांधण्यात आले. मुंबईतले क्रिकेट सामने याच मैदानावर खेळवले जायचे. त्या काळात भारतात क्रिकेट खेळाच्या प्रसाराचा वेग फार संथ होता. मैदानांचीही कमतरता होतीच.
आज जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून मिरवणाऱ्या ‘बीसीसीआय’ची स्थापना डिसेंबर, १९२८ मध्ये झाली. त्यानंतर १९३० मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची ( तत्कालीन बॉम्बे क्रिकेट असोसिएशन/बीसीए) स्थापना झाली. भारतात पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना बॉम्बे जिमखाना ग्राउंडवर १५-१८ डिसेंबर १९३३ मध्ये झाला.
क्रिकेट स्टेडियमसाठी लागणारी जागा मुंबईत मिळविणे कठीण होते. यासाठी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि तत्कालीन बॉम्बे गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्यात वाटाघाटी झाल्या. लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्यासमोर ‘तुम्हाला पैसे हवेत की अमरत्व’
अशी ऑफर ठेवण्यात आली. ब्रेबॉर्न यांनी अर्थातच अमरत्व स्वीकारले, असे सांगण्यात येते. त्यानंतर गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांचा वरदहस्त असल्यामुळे समुद्रात भर घालून मिळालेली (बॉम्बे रिक्लेमेशन स्कीमअंतर्गत) ९० हजार स्क्वेअर यार्ड जमीन १३.५ रुपये प्रतिस्क्वेअर यार्ड या भावाने ‘सीसीआय’ला देण्यात आली.
त्या जागेवर ‘सीसीआय’चा मालकीहक्क प्रस्थापित झाला. टाटा ग्रुपचे चेअरमन नौरोजी सकलतवाला, महाराजा ऑफ इडर, महाराजा ऑफ पटियाला यांनी येथे स्टेडियम उभारण्यात आर्थिक हातभार लावला आणि १९३७ मध्ये ‘भारतात स्वतःचे लॉर्ड्स मैदान असावे’ या उद्देशाने या स्टेडियमची निर्मिती करण्यात आली.
बॉम्बेचे पूर्व गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांचे या स्टेडियमला नाव देण्यात आले. त्यानंतर ‘बॉम्बे पेंटाँग्युलर’ सामने बॉम्बे जिमखाना ग्राउंडवर न होता ब्रेबॉर्न स्टेडियमवर होऊ लागले. ३५ वर्षे बॉम्बे क्रिकेट म्हणजे ब्रेबॉर्न असंच समीकरण होऊन बसलेलं. आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, रणजी ट्रॉफी सामने, इंटर झोनल टूर्नामेंट, सिंगल विकेट क्रिकेट असे अनेक सामने या मैदानात खेळवण्यात आले. १९३७-७३ हा ब्रेबॉर्न मैदानाचा सुवर्णकाळ होता.
मुंबईमध्ये क्रिकेट भरवण्याचे अधिकार बॉम्बे क्रिकेट असोसिएशनकडे होते, पण त्यांचे स्वतःचे क्रिकेट स्टेडियम नव्हते. ज्या काही मॅचेस व्हायच्या, त्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरच व्हायच्या. त्यात बऱ्याच वेळा ‘बीसीए’ आणि ‘सीसीआय’ यांच्यात तिकिटांच्या संख्येवरून व नफ्याच्या भागीदारीवरून वाद होत असे.
‘जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम मेंटेन करायला बराच खर्च येतो व सीसीआय आधीच तोट्यात आहे,’ असे उत्तर त्या वेळी ‘सीसीआय’कडून दिले जात असे. १९७३ मध्ये या मैदानावरील भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यानंतर हा वाद विकोपाला गेला. त्यामुळे मुंबईतल्या क्रिकेटमध्ये ‘सीसीआय’ची एकाधिकारशाही होती, हे मान्यच करावे लागेल.
महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री राहिलेले बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे त्या वेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. अत्यंत हुशार राजकारणी, क्रिकेटप्रेमी अशी त्यांची ओळख होती. क्रिकेटवर शेषरावांचं प्रचंड प्रेम होते. १९६३ ला ते बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे सर्वेसर्वा बनले होते. त्यांच्या या क्रिकेटप्रेमामुळेच त्या वेळचे काही आमदार त्यांच्याकडे आमदारांचा चॅरिटी क्रिकेट सामना खेळविण्याचा प्रस्ताव घेऊन गेले.
वानखेडे यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. पण सामन्यासाठी लागणाऱ्या ब्रेबॉर्न मैदानाची मालकी ‘सीसीआय’कडे होती. त्या वेळी भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट हे ‘सीसीआय’चे अध्यक्ष होते. आपल्या प्रस्तावाबद्दल एकदा ‘सीसीआय’वाल्यांना कल्पना द्यावी म्हणून वानखेडेंसह काही आमदार विजय मर्चंट यांच्याकडे गेले. घरी आलेल्या आमदारांचे मर्चंट यांनी चांगले आदरातिथ्य केले खरे, पण चॅरिटी मॅचचा विषय काढल्यावर आमदारांच्या सामन्यासाठी मैदान देण्यास त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला.
राजकारणात काम करणाऱ्या आमदारांचे क्रिकेट सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर घडवून आणण्यात विजय मर्चंट यांना काहीच रस नव्हता. त्या वेळी शाब्दिक चकमक वाढल्यावर वानखेडे म्हणाले की, तुमची अशीच मनमानी सुरू राहिली,
तर आम्हाला नवीन स्टेडियम बांधावे लागेल. त्यावर मर्चंट यांनी, ‘‘तुम घाटी लोग क्या स्टेडियम बनाओगे?’’ असं उर्मट आणि कोणत्याही मराठी माणसाला राग येईल, असे उत्तर दिले. हे शब्द वानखेडे आणि इतर आमदारांच्या प्रचंड जिव्हारी लागले. आता मर्चंट यांनी मराठी माणसाच्या केलेल्या अपमानाला उत्तर देणं गरजेचं होतं.
शेषरावजी वानखेडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला आणि मुंबईत नवीन स्टेडियम बांधण्याची इच्छा व्यक्त केली. पण स्टेडियम बांधायचा खर्च उचलण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्या वेळी वानखेडे यांनी ‘तुम्ही फक्त परवानगी द्या, पैशांचे आम्ही बघतो,’ असे सांगितले.
चर्चगेटजवळ १३ एकर जमीन ‘बीसीए’च्या मालकीची होती. तिथे स्टेडियम उभारण्यास परवानगी देण्यात आली. मैदान, बसण्याची व्यवस्था, पार्किंग आणि इतर सोयी सुविधांना साधारण २० एकर एवढी जागा लागते. पण येथे फक्त १३ एकर जागा होती, ज्यात जवळ जवळ अर्ध्या भागात गरवारे क्लब होते. प्रत्यक्ष स्टेडियम उभारण्यासाठी फक्त ७.५ एकर जागा मिळाली.
या जागेवर स्टेडियम बांधण्याची जबाबदारी एक तरुण मराठी आर्किटेक्ट शशी प्रभू यांना देण्यात आली. त्या जागेच्या एका बाजूला समुद्र व दुसऱ्या बाजूला रेल्वे ट्रॅक होता. आजूबाजूला उंच बिल्डिंग्ज होत्या. मुंबईच्या या भागात आणखी एक क्रिकेट स्टेडियम बांधायला लोकांचाही विरोधही होता. शिवाय वानखेडे यांना या जागेवर ब्रेबॉर्न स्टेडियम पेक्षाही भव्य असे स्टेडियम उभारायचे होते. शशी प्रभू यांनी जगभरातील अनेक बड्या स्टेडियमचा अभ्यास केला आणि स्टेडियमच्या कामाचे भूमिपूजन झाले.
सर्व अडथळ्यांवर मात करत दिवस-रात्र एक करून फक्त ११ महिने आणि २३ दिवसांत या जागेवर ‘ब’ प्रेक्षक क्षमता असलेले एक भव्य स्टेडियम उभे राहिले. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या मर्चंट यांना दिलेला शब्द वानखेडेंनी पूर्ण केला, तोही ब्रेबॉर्नपेक्षा भव्य स्टेडियम बांधून. हे स्टेडियम बांधण्याचा विडा उचललेल्या शेषराव वानखेडेंचे नाव या स्टेडियमला देण्यात आले. हे स्टेडियम बांधायला साधारणतः १.८७ कोटी रुपये इतका खर्च आला,
ज्यासाठी ‘बीसीए’ने ८० लाखांचे कर्ज घेतले होते. पण स्टेडियमची लोकप्रियता, त्यावर भरवण्यात आलेले सामने यामुळे पुढील चार वर्षांतच ‘बीसीए’ने हे कर्ज चुकते केले. १९७४ ला वानखेडे स्टेडियम सुरू झाले आणि ‘सीसीआय’ला उतरती कळा लागली. बॉम्बेत होणारे सर्व सामने ब्रेबॉर्नऐवजी वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येऊ लागले.
१९७५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज हा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला गेला. रवी शास्त्री यांनी बडोद्याच्या तिलक राजला ह्याच मैदानात एकाच एका षटकात सहा षटकार मारले. पुढे भारताने २०११ मध्ये जिंकलेला विश्वचषक, सचिनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असे भारतीय क्रिकेटमधील अनेक सुवर्णपाने याच वानखेडे स्टेडियमवर लिहिली गेली. दुसरीकडे मात्र १९७३ नंतर ब्रेबॉर्नला आपली पुढची कसोटी आयोजित करायला तब्बल ३६ वर्षे वाट पाहावी लागली.
वानखेडे स्टेडियम म्हणजे एक मराठी माणूस काय करू शकतो, याचं जिवंत उदाहरण आहे. त्याकाळी सोशल मीडिया असती तर #नाद_करा_पण_आमचा_कुठं, # विजय हारला_मराठी माणूस जिंकला अशा हॅशटॅग्सने धुमाकूळ घातला असता. अर्थात दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचे भारतीय क्रिकेटसाठी असलेले योगदान नाकारता येणार नाही. त्यामुळेच वानखडे स्टेडियमवर ‘सचिन तेंडुलकर स्टँड’, ‘सुनील गावसकर स्टँड’ सोबतच ‘विजय मर्चंट स्टँड’ दिसते.
मुंबई क्रिकेटच्या जडणघडणीत जर कुणाचा मोठा वाटा असेल तर तो आहे क्लब क्रिकेटचा. मुंबई क्रिकेटमधील या क्लब संस्कृतीला दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. मुंबईतील अग्रगण्य क्लबमधील क्रिकेटच्या मैदानावरील ‘वैर’ ही मुंबईच्या क्रिकेटची एक ओळख होती. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी अशाच एका क्लबची ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची (सीसीआय)’ स्थापना झाली आणि त्याचे हेडक्वार्टर दिल्लीला ठेवण्यात आले.
तत्कालीन ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष आर इ ग्रांट गोवन हे ‘सीसीआय’चे प्रथम अध्यक्ष झाले आणि ‘बीसीसीआय’चे सचिव अँथनी डिमिलो हे ‘सीसीआय’चे सचिव झाले. मुंबई हे भारतातील क्रिकेटचे माहेरघर असल्यामुळे ‘सीसीआय’ने एक नवीन क्रिकेट स्टेडियम मुंबईत बांधण्याचा निर्णय घेतला.
(लेखक क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक तसेच एका माध्यमसंस्थेचे संचालक आहेत.)