एका वाह्यात कारकीर्दीचा अस्त

ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले लुला डी सिल्व्हा हे तिथले डाव्या विचारसरणीचे नेते
 Lula de Silva
Lula de Silva sakal

ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले लुला डी सिल्व्हा हे तिथले डाव्या विचारसरणीचे नेते...पूर्वाश्रमीचे कामगारनेते...कल्याणकारी योजनांवर भर असलेले नेते...कधीतरी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात दिवस काढलेले नेते...सन २००८ च्या जागतिक महामंदीच्या वेळी ‘हे संकट निळ्या डोळ्यांच्या श्वेतवर्णीयांच्या बेजबाबदारपणामुळे ओढवलं आहे,’ असं विधान करून वाद ओढवून घेणारे नेते...अशा नेत्याचं ब्राझीलच्या सत्तेतील पुनरागमन तमाम भांडवलशाही देशांच्या नेत्यांना स्वागतार्ह वाटतं.

युरोपात उजवं वळण स्थिरावताना दक्षिण अमेरिकेत डावीकडे झुकलेल्या नेत्याची सरशी साजरी करावीशी वाटते; याचं कारण, त्यांनी पराभूत केलेल्या जैर बोल्सोनारो यांची धरबंद नसलेली उटपटांग कारकीर्द. त्यांच्यापेक्षा सामाजिकदृष्ट्या डावीकडचे; मात्र खासगी भांडवलाला विरोध नसलेले लुला आर्थिक उजव्यांसाठी अधिक स्वागतार्ह. व्हेनेझुएलाचे व्हिक्‍टर ह्यूगो आणि तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यात मध्यस्थी करणारे, दक्षिण अमेरिकी देशांत बंधुभाव वाढवण्याचा प्रयत्न करणारे लुला जागतिकीकरणाच्या समर्थकांसाठी स्वागतार्ह, तर ‘ॲमेझॉनचं जंगल वाचलं पाहिजे,’ असं म्हणणाऱ्या लुलांचं पुनरागमन हवामानबदलांविषयी चिंतेत असलेल्यांसाठी स्वागतार्ह. लुलांचा विजय ही अस्वस्थ जागतिक वातावरणात दिलासा देणारी निवड बनते आहे, याची अशी अनेक कारणं आहेत. दोन वेळची झळाळती कारकीर्द असलेल्या लुलांसाठी ही अध्यक्षपदाची तिसरी खेप दुभंगलेलं ब्राझीलचं सामाजिक अवकाश सांधण्याची कसोटी पाहणारी असेल.

***

एक नेता देशाचा अध्यक्ष होतो...भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात जातो...सारी राजकीय कारकीर्द संपली असं वाटत असताना पुन्हा लोकांत जातो आणि नव्यानं निवडणुका जिंकून पंतप्रधानपदी येतो... या बदलाचं बहुतांश जग स्वागत करतं असा एक गुंतागुंतीचा प्रवास करत ब्राझीलच्या निवडणुकीतून लुला डी सिल्व्हा किंवा लुला अध्यक्षपदी आले आहेत. जगभर कणखर नेतृत्वाचा विभाजनवादी अजेंडा आणि लोकांच्या जटील समस्यांवर सोपी उत्तरं सांगणारा लोकानुनय यांची छाया पसरत असताना आणि त्यात अनेक ठिकाणी उजव्या शक्ती उचल खात असताना ब्राझीलनं अशाच कणखरपणाची झूल पांघरलेल्या आणि सभ्यतेचे संकेतही मान्य नसलेल्या बोल्सोनारो यांना घरी बसवून डावीकडे झुकलेल्या लुला यांना सत्तेत आणलं हा लक्षणीय बदल. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना नाकारून ज्यो बायडेन यांना तिथल्या लोकांनी स्वीकारणं आणि बोल्सोनारो जाऊन लुला येणं हे जवळपास सारखंच. म्हणूनच लोकशाही, सर्वसमावेशकता, उदारमतवाद मानणाऱ्या वर्तुळातून ब्राझीलच्या निकालाचं स्वागत होतं आहे. या शतकातलं खणखणीत राजकीय पुनरागमन म्हणून लुला यांच्या प्रवासाकडे पाहिलं जातं.

बोल्सोनारो यांना ब्राझीलच्या जनतेनं वाजत-गाजत सत्तेत आणलं होतं. याचं कारण त्यांनी जागवलेल्या आशा. आणि, विरोधकांवर म्हणजे लुला यांच्या पक्षावर केलेले भ्रष्टाचाराचे वारेमाप आरोप. यात लुला यांची चौकशी होऊन ब्राझीलमधील खालच्या कोर्टानं त्यांना सजाही सुनावली; मात्र, बोल्सोनारो हे अध्यक्ष असताना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं, शिक्षा देणारे न्यायाधीशच एका बाजूकडे झुकलेले असल्याचा निर्वाळा देत लुला यांना सोडलं होतं. मात्र, मागच्या निवडणुकीत बोल्सोनारो यांनी भ्रष्टाचार हा मुद्दा बनवला होता. त्याचाही वाटा त्यांच्या विजयात होता. प्रत्यक्षात बोल्सोनारो यांचा कारभार एककल्ली आणि एकाधिकारशाहीवादीच राहिला. सातत्यानं ध्रुवीकरणावर भर राहिलेल्या या नेत्याला कंटाळलेल्या लोकांनी ब्राझीलच्या मागच्या ३४ वर्षांच्या वाटचालीत पहिल्यांदाच सत्तेत असलेल्या अध्यक्षाला दुसरी टर्म नाकारली आहे.

अर्थात्, सर्व अहंमन्य नेत्यांप्रमाणे बोल्सोनारो यांनीही पराभव स्वीकारण्याऐवजी, निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सुरू केले आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरायची धमकी द्यायला सुरुवात केली. एकाधिकारशाही वृत्तीच्या नेत्यांना, लोकशाहीत आपला पराभव होऊ शकतो, हे मान्यच होत नाही. त्यात खोट काढणं, पराभव नाकारणं हे त्यातूनच येतं, जे अमेरिकेत ट्रम्प यांनीही केलं होतं.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही औपचारिकपणे तो स्वीकारायची सभ्यताही त्यांना दाखवता आली नाही. उलट, अखेरच्या काळात त्यांच्या समर्थकांनी ‘कॅपिटॉल हिल’वर हल्ला करून, अमेरिकेसारख्या लोकशाही मुरलेल्या देशातही एखादा नेता कसा अराजकवादी होऊ शकतो हे दाखवून दिलं होतं. त्याचंच आवर्तन ब्राझीलमध्ये साकारतं आहे. ट्रम्प काय किंवा बोल्सोनारो काय, पराभूत झाले तरी त्यांना मानणारा समर्थकवर्ग मोठा आहे. लोकानुनयवादातून साकारलेला हा वर्ग नियम, कायदा यापेक्षा भावनेवर सहज स्वार होऊ शकतो. हेच अशा मंडळींचं बलस्थानही असतं. समाजासमाजात भिंती घालायच्या, फूट पाडायची, त्यातून हमखास मतपेढी बनवायची हे या प्रकारच्या नेत्यांचं तंत्र असतं.

लोकशाहीत मतविभागणी अटळ असते. मात्र, निवडणुकीनंतर कोणती बाजू घ्यायची हे त्या त्या निर्णयावर ठरावं हे अभिप्रेत असतं. लोकशाहीमार्गानं निवडून आलेले; पण ध्रुवीकरणावर पोसलेले नेते मात्र आपल्या कोणत्याही निर्णयाचं, कृतीचं समर्थन - मग ते कितीही अतार्किक असो - करणारा वर्ग तयार करतात, यातून समाज दुभंगला जातो. असं घडतं तेव्हा असं करणारा नेता पराभूत झाला तरी त्याच्या मागं उभं राहणारा संप्रदाय संपत नाही. म्हणूनच अमेरिकेत ट्रम्प पराभूत झाले तरी ट्रम्पवाद संपलेला नाही आणि तो पुनःपुन्हा डोकं वर काढू शकतो, तसंच ब्राझीलमध्ये बोल्सोनारो सत्तेतून गेले तरी त्यांना मतं देणाऱ्यांचं प्रमाण ४९ टक्क्यांहून अधिक आहे; म्हणजेच, ज्याला जगातले विचारी लोक वाह्यातपणा मानतात, तो पसंत असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांच्या पक्षाला दोन्ही सभागृहांत लक्षणीय बळ मिळालं आहे. तेव्हा, जगाच्या अनेक भागांत जे उजवं वळण येतं आहे ते एखाद्या निवडणुकीतील जय-पराजयापुरतं पाहण्यासारखं नाही. ‘तूर्त ॲमेझॉनचं जंगल पेटल्यानं काही फरक पडत नाही; किंबहुना ते पेटणं आणि जागा रिकामी होणं यातच ब्राझीलचं भलं आहे,’ असं मानणारा एक नेता सत्ताभ्रष्ट झाला एवढाच जगासाठी दिलासा.

कडव्या नेत्यांचा फॉर्म्युला

स्वप्रेमात असलेला विभाजनवादी नेता विजयासाठी काय काय करू शकतो याचं ब्राझीलची निवडणूक हे उदाहरण होतं. बोल्सोनारो आणि त्यांच्या समर्थकांनी, आपला पाठिंबा आटतो आहे हे दिसल्यानंतर निवडणूकव्यवस्थेवर आगपाखड सुरू केली. इतकी की, त्यांचा पराभव हा निवडणूकव्यवस्थेतील त्रुटींमुळेच झाला, असं वाटणारा एक मोठा वर्ग तिथं तयार झाला आहे. लोकशाही तोलणाऱ्या संस्थांची प्रतिष्ठा आणि विश्‍वसनीयता संपवणं, त्या दावणीला बांधायचा प्रयत्न करणं हे एकाधिकारशाहीवादी नेत्याचं वैशिष्ट्य असतं, ते बोल्सोनारो यांचंही आहे. त्यांचा भर कायमच देशातील वांशिक विभाजनाला, धर्मवादी राजकारणाला खतपाणी घालण्यावर राहिला. या निवडणुकीतही त्यांनी कडव्या ख्रिश्र्चन गटांना चुचकारण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही. यासाठीचा फॉर्म्युलाही जगभर सारखाच असतो. तो म्हणजे, ‘मला निवडून नाही दिलं तर तुमचा धर्मच संकटात येईल,’ असं वातावरण तयार करणं. ब्राझीलच्या निवडणुकीत बोल्सोनारो सांगत होते : ‘‘डाव्या विचारसणीचे लुला विजयी झाले तर देशातील सगळी चर्च बंद होतील. मुळातच लुला हे सैतानी शक्तीचं प्रतीक आहेत.’’ बोल्सोनारो यांच्या प्रचारमोहिमेचं सूत्रचं होतं - ‘देव, मातृभूमी आणि कुटुंब.’ अशा नेत्यांची म्हणून एक भांडवलदारांची प्रभावळही असते.

आपल्या कर्मचाऱ्यांनी बोल्सोनारो यांनाच मतं द्यावीत, यासाठी अनेक उद्योजकांनी दबाव आणला होता, हेही तिथल्या निवडणुकीत समोर आलं. म्हणजेच, प्रतिस्पर्ध्याला सैतानी ठरवणं, धर्मविरोधी ठरवणं, भांडवलदार दोस्तांच्या मदतीनं निवडणुकीवर प्रभाव टाकू पाहणं असं सारं काही बोल्सोनारो करू पाहत होते. लष्कराचं उदात्तीकरण हा कणखर म्हणवणाऱ्या नेत्यांचा आणखी एक आवडता खेळ असतो. तोही बोल्सोनारो करत राहिले. या साऱ्यानंतरही लुला विजयी झाले; याचं कारण, बोल्सोनारो यांनी अत्यंत गचाळपणे हाताळलेली कोरोनाची स्थिती, देशाच्या अर्थकारणातील घसरण, आणि रोजच्या ध्रुवीकरणाला कंटाळलेले लोक.

लुला यांचं विकासपर्व

ब्राझीलची निवडणूक अनेक अर्थांनी दुभंगलेल्या देशाचा कौल सांगणारी होती. लुला आणि बोल्सोनारो हे दोघं तिथले मोठी लोकप्रियता असलेले नेते आहेत. मात्र, दोघांचा देशाच्या भविष्याकडे पाहायचा दृष्टिकोन पूर्णतः वेगळा आहे. ब्राझीलनं लोकशाही स्वीकारली ती १९८५ मध्ये, तिथली लष्करशाही हटवून. या लष्करशाहीला विरोध करणारे लुला हे कामगारनेते होते, तर त्या लष्करात बोल्सोनारो हे कॅप्टनपदावर होते आणि त्यांना त्या व्यवस्थेचं कौतुक,

लोकशाहीमार्गानं ते अध्यक्ष झाल्यानंतरही कायम होतं. लुला अल्पशिक्षित आहेत. अवघं पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या लुला यांनी कारखान्यात मजूर म्हणून काम केलं होतं. त्याही आधी बूटपॉलिशचं कामही ते करत. टोकाच्या गरिबीचा सामना करणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी आहेत. कामगारनेता म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली. सत्तरच्या दशकात ते ‘कामगारांसाठी झगडणारा आक्रमक नेता’ म्हणून प्रसिद्धीस आले. अनेक संपांत त्यांनी कामगारांचं नेतृत्व केलं. याच कामगारसंघटनांनी ऐंशीच्या दशकात ब्राझीलमधील लष्करी हुकूमशाहीला विरोध केला. ब्राझीलमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी करणाऱ्यांत लुला आघाडीवर होते. लष्करशाहीच्या विरोधातील आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला. सन १९६७ पासून ब्राझीलमध्ये तिथल्या संसदेची दोन सदनं अध्यक्ष निवडत असत; मात्र, ही निवडणूक नावापुरती होती. लष्करी अधिकाऱ्यांचं कोंडाळं ठरवेल तो एखादा लष्कराचाच प्रतिनिधी अध्यक्षपदी निवडला जायचा. ही पद्धत बदलायला भाग पाडणाऱ्यांत लुला आघाडीवर होते.

लुला यांनी ‘वर्कर्स पार्टी’ या नावानं कामगारांचा पक्ष स्थापन केला. राजकारणातील त्यांचा प्रवासही सरळ नव्हता. तीन वेळा ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले.

सन २००२ च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा ब्राझीलचे अध्यक्ष बनले. तेव्हापासून ‘ब्राझीलचे सर्वात लोकप्रिय अध्यक्ष,’ अशी त्यांची ख्याती राहिली. लुला डाव्या विचारसरणीचे; मात्र, अध्यक्ष झाल्यानंतर एकीकडे उद्योग-व्यापाराला बळ देणारी धोरणं राबवत, दुसरीकडे गरिबांना मदत करणाऱ्या योजनांचा अवलंब ते करत होते. त्यांच्याच काळात ब्राझीलनं सर्वाधिक विकासाचं पर्व अनुभवलं. दक्षिण अमेरिकेत ब्राझीलचा दबदबा तयार करण्यात लुला यांच्या कारकीर्दीचा वाटा मोठा आहे.

सरकारी कंपन्यांना भरभराटीला आणण्यातही त्यांना यश आलं. तो काळ चीन-ब्राझील-भारत यांच्या जागतिक अर्थकारणातील उदयाचा मानला जात असे. तिन्ही देशांची वाटचाल पुढं निरनिराळ्या दिशेनं गेली. दोन वेळा लुला ब्राझीलच्या अध्यक्षपदी विजयी झाले. या काळात ब्राझीलमधील कोट्यवधी लोक

दारिद्र्यरेषेतून बाहेर आले. त्यांच्याच कारकीर्दीत ब्राझील भुकेनं ग्रासलेल्या देशांच्या यादीतून बाहेर पडला. ‘भुकेच्या विरोधातील लढ्याचा जागतिक विजेता’ असा त्यांचा गौरव संयुक्त राष्ट्रांनी केला. सार्वजनिक कर्जांचा बोजा आटोक्‍यात ठेवणं, महागाईला लगाम ही त्यांच्या कारभाराची वैशिष्ट्यं होती. गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, बालमजुरी या आघांड्यावरही ब्राझील चमकदार कामगिरी करत होता. त्यांच्या काळातच नाणेनिधीचं कर्ज ब्राझीलनं मुदतीपूर्वी फेडलं. बॅंका नफा कमावू लागल्या. त्यांनी अध्यक्षपद सोडलं तेव्हा ते देशातील सर्वात लोकप्रिय नेते होते. ८० टक्के लोकांचा कौल लुला यांच्या बाजूनं होता. बराक ओबामा यांनी त्यांचा उल्लेख ‘पृथ्वीवरचा सर्वात लोकप्रिय नेता’ असा केला होता. त्यांच्यानंतर अध्यक्षपदी आलेल्या त्यांच्याच पक्षाच्या दिल्मा रूसेफ यांना मात्र धडपणे देशाची अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही. भ्रष्टाचाराचे आरोप नित्याचे बनू लागले. या आरोपांची राळ लुला यांच्यावरही उडाली. ज्या काळात देशानं भरभराट पाहिली, नवा प्रचंड आकाराचा मध्यमवर्ग उभा राहिला, त्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी झाल्याचे आरोपही झाले. त्याचा परिणाम म्हणून लुला यांच्या कारभाराची चौकशी झाली. ‘ऑपरेशन कार वॉश’ या नावानं गाजलेल्या या चौकशीतून लुला यांना अटक झाली आणि २०१८ च्या निवडणुकीतून ते बाहेर पडले. त्या निवडणुकीत तोवर बोलभांड म्हणून नावा-रूपाला आलेले बोल्सोनारो यांनी बाजी मारली. पुढं सर्वोच्च न्यायालयात लुला यांच्यावरील खटला चुकीच्या रीतीनं चालवल्याचं स्पष्ट झालं. त्यांना सोडण्याचे आदेश न्यायालयानं दिले. ५८० दिवस तुरुंगात घालवलेले लुला पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले तेव्हा बोल्सोनारो यांची कारकीर्द बहरात होती.

बोल्सोनारो : ‘ब्राझीलचे ट्रम्प’

बोल्सोनारो यांना ‘ब्राझीलचे ट्रम्प’ असं म्हटलं जात होतं. कोरोनाची अत्यंत विक्षिप्त हाताळणी हे त्याच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य. त्याचा परिणाम म्हणून सुमारे सात लाख जणांचा जीव गेला. कोरोनाच्या महामारीला ते ‘केवळ एक किरकोळ फ्लू’ म्हणून ते दुर्लक्षित करत होते. लसीकरणाला त्यांचा विरोध होता. कोरोनाविषयीच्या त्यांच्या भूमिकेवर जागतिक आरोग्य संघटनेपासून साऱ्यांनी ताशेरे ओढले तरी बोल्सोनारो यांना काही फरक पडत नव्हता. त्यांचा मताधार प्रामुख्यानं परंपरावादी समुदायातून आलेला आहे. त्याला खूश करताना ते कसलीही कसर सोडत नव्हते. यातूनच गर्भपाताला संपूर्ण विरोध,

बंदूकसंस्कृतीचं उघड समर्थन, स्थलांतरितांना विरोध ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्यं बनली. अशा नेत्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची मतं मान्य नसलेले प्रतिस्पर्धी हे विरोधक न राहता शत्रू बनतात. बोल्सोनारो हे राजकीय विरोधक, प्रश्‍न विचारणारे पत्रकार, वैज्ञानिक भूमिका घेणारे विद्वान, आपल्याहून भिन्नवंशीय, आपल्यातीलच; पण एककल्लीपणा न मानणारे अशा सर्वांना शत्रू ठरवत राहिले. निवडणूकयंत्रणा ते न्यायव्यवस्था अशा सर्व स्वायत्त व्यवस्थांची विश्‍वसनीयता संपवण्याचा प्रयत्न करत राहिले. ‘लष्करी राजवटीत ती मान्य नसणाऱ्यांचा केवळ छळच झाला, त्यांना ठार केलं नाही ही चूकच’ हे या निवडून आलेल्या अध्यक्षाचं जाहीर मत होतं. कृष्णवर्णीयांविषयीचा तिरस्कार त्यांनी अनेकदा व्यक्त केला. हा माणूस इतका घाणेरड्या पातळीवर गेला होता की, एकदा त्यांनी आपल्या प्रतिनिधिगृहातील सहकारी महिलेविषयी ‘ती तर अत्याचारासाठीही पात्र नाही,’ असं विधान करून धक्का दिला होता.

‘मला पाच मुलं आहेत, त्यातील चार मुलगे. पाचव्या खेपेस मी कमजोर पडलो,’ असं विधान जाहीर सभेत करणाऱ्या या अध्यक्षाच्या विरोधात महिलांनी निवडणूककाळात ‘नॉट हिम’ अशी मोहीमच चालवली. महिला, आफ्रो-ब्राझिलियन, तिथले मूळ निवासी, लैंगिक अल्पसंख्य अशा सर्वांविषयी अत्यंत अपमानास्पद वर्तणूक बोल्सोनारो यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत ब्राझीलनं अनुभवली. विज्ञानाशी त्यांचं भांडण जगजाहीर होतं. जागतिक तापमानवाढीची फिकीर त्यांना कधीच करावीशी वाटली नाही. त्यांच्या काळात विज्ञानावरचा खर्च निम्म्यावर आला. त्यांची सर्वाधिक गाजलेली भूमिका राहिली ती पर्यावरणाविषयीची. ॲमेझॉनच्या जंगलाचा बराचसा भाग ब्राझीलमध्ये आहे आणि हे जंगल ‘जगाचं फुफ्फुस’ म्हणून गणलं जातं. तिथली जंगलतोड हे जगासाठी चिंतेचं कारण आहे; मात्र, बोल्सोनारो यांनी निवडणुकीतच आश्‍वासन दिलं होतं की, पर्यावरण मंत्रालयाचीच गरज नाही. प्रत्यक्षात त्यांनी हे मंत्रालय बंद केलं नाही, तरी ते पंगू राहील याची दक्षता घेतली. मोठ्या प्रमाणावर जंगलतोडीकडं दुर्लक्ष केलं. या काळात दरसाल १० ते १२ हजार वर्ग किलोमीटर या गतीनं ॲमेझॉनचं जंगल नष्ट होत राहिलं. तिथल्या आगीच्या घटना जगाला घोर लावणाऱ्या होत्या. त्यावर बोल्सोनारो यांचा युक्तिवाद होता, ‘या आगी तर पर्यावरणवादीच लावताहेत.’ जगातील २० टक्के ऑक्‍सिजन निर्माण होणाऱ्या, अब्जावधी झाडं आणि लाखो प्रजातींचं आश्रयस्थान असलेल्या या वर्षावनाची इतकी आबाळ कधीच झाली नव्हती.

जंगलतोड, प्रचंड प्रमाणातलं खाणकाम, तसंच तिथल्या मूळ रहिवाशांना हुसकावून लावण्याचे उद्योग या काळात गाजत राहिले. कोरोनानंतर ब्राझीलची अर्थव्यवस्थाही मूळ पदावर आलेली नाही. महागाईचा दर दोनअंकी बनला. हे सगळं मागं टाकण्यासाठी स्वच्छ प्रतिमा, परंपरावाद्यांची साथ आणि भ्रष्टाचारविरोधी असल्याचा गाजावाजा पुरेसा ठरेल हा त्यांचा अंदाज मात्र चुकला.

असा एक वादग्रस्त वारसा बोल्सोनारो यांनी मागं सोडला आहे, ज्यात ब्राझीलचा दुभंगलेला सामाजिक अवकाश हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. लुला यांच्यासमोरचं ते आव्हान आहे. लुला सर्वसमावेशकतेची भाषा करताहेत, तसंच ‘शून्य जंगलतोड’ हे त्यांनी जाहीर केलेलं धोरण आहे. ते त्यांनी अमलात आणलं तरी जगाला तो मोठा दिलासा असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com