इलेक्ट्रिक वाहनांना उज्ज्वल भविष्य

sulajja firodia
sulajja firodia

बिझनेस वुमन - सुलज्जा फिरोदिया, संस्थापिका, कायटेनिक ग्रीन एनर्जी अॅंड पॉवर सोल्युशन्स
सुलज्जा फिरोदिया या आघाडीच्या आणि धडाडीच्या उद्योजिका म्हणून उद्योगजगताला परिचित आहेत. जगभरात आज ग्रीन एनर्जी, पर्यावरण, 
इलेक्ट्रिक वाहने यांची चर्चा सुरू असताना प्रत्यक्षात पावले उचलणाऱ्या उद्योजकांपैकी त्या एक आहेत. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ग्लोबल इकॉ़नॉमिक फोरम, फिक्की आणि इतर प्रतिष्ठित संस्थांकडून पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. सुलज्जा यांनी अमेरिकेत एमबीए केले आहे. विद्यार्थी दशेतील एक हुशार विद्यार्थिनी ते एका कंपनीची संस्थापिका, संचालिका असा अत्यंत आव्हानात्मक प्रवास त्यांनी आत्मविश्वासाने केला आहे. त्यानंतर फिरोदिया समूहाचे कामकाज सांभाळत असतानाच त्यांनी २०१५मध्ये कायटेनिक ग्रीन एनर्जी अॅंड पॉवर सोल्युशन्सची स्थापना केली. अलीकडेच सुलज्जा यांच्या कायटेनिक ग्रीन एनर्जी अॅंड पॉवर सोल्युशन्सकडून इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली. त्यानिमित्त ‘सकाळ’शी त्यांनी केलेली खास बातचीत.

इलेक्ट्रिक सायकल आणण्यामागची नेमकी भूमिका काय ?
इलेक्ट्रिक सायकल पर्यावरणपूरक व आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. यात बॅटरी आणि मोटर असल्यामुळे या सायकलचा वापर मोटरसायकलप्रमाणे होऊ शकतो. पॅडलचा वापर करूनही सायकल चालवता येते. त्यामुळे पर्यावरणाचीही हानी टाळता येते. फक्त व्यायामही करता येतो.

या नव्या ई-सायकलची वैशिष्ट्ये काय?
यात लिथियम आयन बॅटरी आहे. २५ किमी प्रति तास हा कमाल वेग सायकल गाठते. तिची पोर्टेबल बॅटरी मोबाईलप्रमाणेच कोठेही चार्ज करता येते व चार्जिंगसाठी फक्त दोन तास लागतात. चार्ज झाल्यानंतर तीस किमीचे अंतर सायकल कापते. कायटेनिक ग्रीनचे ‘ग्रीन मोबिलिटी’ हे व्हिजन आहे. त्यानुसारच हे वाहन विकसित करण्यात आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागांत ही सायकल वापरता येईल. 

कायनेटिक ग्रीन सुरू करताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?
मी आजपर्यंत जे काही करून दाखवले आहे त्याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांना आणि आजोबांना आहे. त्यांच्या पाठबळामुळेच मी अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर मी विविध जबाबदाऱ्या हाताळू शकले. सर्वच पालकांनी आपल्या मुलींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कायनेटीक समूह नेहमीच इनोव्हेशनवर भर देत आला आहे. अगदी कायनेटिक लुना, कायनेटीक होंडापासून ही परंपरा आजपर्यत सुरू राहिली आहे. व्यवसायात आघाडीवर राहायचे असल्यास तंत्रज्ञानाची व्यवसायाची सांगड घालता आली पाहिजे. जगभर आज सर्वत्रच ग्रीन एनर्जी, पर्यावरणपूरकता, प्रदूषणमुक्त वातावरण हे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. पारंपरिक वाहनांमुळे प्रदूषण होते व ते तुलनेने खर्चिक असते. मी २०१५मध्ये काळाची गरज ओळखून कायटेनिक ग्रीनची स्थापना केली. त्यावेळेस हे तंत्रज्ञान नवीनच असल्यामुळे अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागले. मात्र आम्ही विविध प्रकारची इलेक्ट्रिक वाहने विकसित करून बाजारात आणली, त्यात इलेक्ट्रिक तीनचाकीचासुद्धा समावेश आहे. आमची सर्वच उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. ई-सायकल हे त्याचेच पुढचे पाऊल आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचे भवितव्य आणि  वाहन क्षेत्रासमोरील आव्हानांनाबद्दल आपल्याला काय वाटते?
हा एक संक्रमणाचा काळ आहे. इलेक्ट्रिक वाहनांसंबधी पायाभूत सुविधा आणि ग्राहकाभिमुख तंत्रज्ञान टप्प्याटप्प्याने विकसित होत आहे. बाजारात इलेक्ट्रिक वाहने येत असतानाच पायाभूत सुविधाही निर्माण होत आहेत. येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचीच गरज असणार आहे. ही वाहने स्वस्तही होत जातील. सर्वच तीनचाकी वाहने इलेक्ट्रिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी गुंतवणूक केली जाते आहे. भारतात या क्षेत्रात दमदार पावले उचलणाऱ्यांमध्ये आमचा समावेश आहे. सरकारची धोरणेही इलेक्ट्रिक वाहनांना पूरक आहे. येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचाच असेल. वाहन उद्योगाबाबत, मागणीत घट झाल्याने आणि एनबीएफसी संकट, रोकडचा अभाव या गोष्टींचा परिणाम झाला आहे. मात्र हा अर्थव्यवस्थेतील चक्राचाच भाग आहे. पुढील काही महिन्यांत यात नक्की सुधारणा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com