आवडीच्या क्षेत्रात संधीचे सोने!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

बिझनेस वुमन - धनश्री हेंद्रे, संचालक, मृगनयनी मेहंदी आर्ट 
कोणताही व्यवसाय लहान नसतो किंवा छंदाचे देखील एका मोठ्या व्यवसायात सहज रूपांतर करता येते हे ‘मृगनयनी मेहंदी आर्ट’च्या संचालिका धनश्री हेंद्रे यांच्याकडे बघूनच कळते.

धनश्री म्हणतात, ‘‘ज्यांच्या कला किंवा छंदाचे व्यवसायात रूपांतर होते, ते खरे नशीबवान. मी त्यांपैकी एक! मेंदीसारख्या छंदाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर करून सणासुदीच्या दिवसांत महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करून मी ते सिद्ध केले आहे.’’ मेंदीसारख्या कलेत नाजूक नक्षीकाम करण्यास तासन् तास लागतात; पण लहान वाटणारे हे काम करून धनश्री यांनी थेट मेंदी काढण्याच्या विश्‍वविक्रमाला गवसणी घातली आहे. चारशेपेक्षा अधिक हातांवर मेंदीच्या रेखाटनाची किमया साकारताना धनश्री यांनी ३२ तासांमध्ये केवळ दोनदा दहा मिनिटांची विश्रांती घेतली. सर्वाधिक काळ मेंदी रेखाटण्याचा विक्रम यापूर्वी अहमदाबाद येथील एका महिलेच्या नावावर होता. त्यांनी २८ एप्रिल २०११ रोजी २४ तास ४५ मिनिटे या वेळात १७० हातांवर मेंदी काढली होती. मेंदीबाबत या विक्रमाची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली होती. हा विक्रम मोडण्याच्या उद्देशातून धनश्री यांनी सलग ३२ तास मेंदी काढण्याचा संकल्प केला. एका बैठकीत २२० हातांवर मेंदी काढण्याचे लक्ष्य साध्य करून त्यांनी हा विश्‍वविक्रम केला. 

छंद म्हणून सुरू केलेल्या मेंदी कलेचे धनश्री यांनी ‘मृगनयनी मेहंदी आर्ट अँड क्लासेस’ सुरू करून त्याला व्यावसायिक रूप दिले. आजवर हजारो तरुणींना मेंदीचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहेच, शिवाय गरजूंना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून दिला. सुरवातीला ओळखीतून मेंदी काढायला सुरवात केली; पण कुटुंबीयांच्या मदतीने त्याला टेक्नॉलॉजीची जोड देऊन सोशल मीडिया आणि ॲपच्या माध्यमातून व्यवसाय परदेशात पोचवला. 

धनश्री म्हणतात, ‘‘प्रत्येकाने आपल्या छंदाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. मेंदीमध्ये देखील पूर्ण वेळ करिअर होऊ शकते.

पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये समारंभ, लग्नकार्ये किंवा आता फॅशन म्हणून देखील वर्षभर मेंदी काढली जाते. त्यामुळे अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी मागणी आहे. मुलींना या कलेला आणि क्षेत्राला व्यावसायिक दृष्टिकोनातून कसे बघता येईल, याचे मार्गदर्शन मी करते.

बऱ्याचदा सामाजिक दबावाखातर, मित्र-मैत्रीणींच्या आग्रहाखातर, कुठल्या तरी स्नेहींच्या यशस्वी कारकिर्दीकडे पाहून आपण डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगची वाट धरतो. मात्र, आपल्याकडे असलेल्या कलेविषयी आत्मविश्‍वास बाळगला पाहिजे. कारण आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने नक्कीच करता येते. कारण छंदात किंवा कलेमध्ये खूप मोठी ताकद असते. तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःला आपण किंमत दिली, की इतरांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो, हे छंदातून व्यवसायाकडे वळालेल्या प्रत्येक व्यावसायिकाने लक्षात घेतले पाहिजे.’’
(शब्दांकन - गौरव मुठे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business Women Dhanashri Hendre maitrin supplement sakal pune today