परफेक्ट फिटिंगचा ‘डिझायनर’ व्यवसाय

Pallavi-Gadgil
Pallavi-Gadgil

बिझनेस वुमन - पल्लवी गाडगीळ, संस्थापक-संचालक, पल्लवी क्रिएशन
आपल्या राहणीमानाकडे हल्ली प्रत्येकजण विशेष लक्ष देत असतो. व्यक्तिमत्त्वाची पहिली छाप ही तुमच्या कपड्यांवरून पडत असते. अशा कपड्यांचे डिझाइन करणे, हे काम कोणाला सोपे वाटू शकेल, मात्र परफेक्ट फिटिंग येणे ही यातील महत्त्वाची आणि तेवढीच किचकट बाब! या अशा किचकट व्यवसायामध्ये ‘पल्लवी क्रिएशन’ या नावाने पल्लवी गाडगीळ गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. 

पल्लवी म्हणाल्या, ‘‘विविध कपड्यांची आवड असल्याने मी नागपूरहून फॅशन डिझाइनिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर लग्न होऊन मी पुण्यात आले. स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा, असे मला सुरुवातीपासूनच वाटत होते. लग्नानंतर मूल झाल्यावर मला हे स्वप्न पूर्ण करणे थोडे अवघड वाटू लागले. तरीही मुलाला घेऊन मी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. माझ्याकडे सुरुवातीला फक्त एक मशीन आणि एक टेलर होता. आता हा व्यवसाय १५ टेलरपर्यंत वाढवला आहे.’’

आपण बरेचदा आठवण राहावी म्हणून एखादी जुनी साडी जपून ठेवतो, मात्र या साडीचे नंतर करायचे काय, हा प्रश्‍न असतो. किंवा अनेकदा वापरात नसलेल्या साड्या चांगल्या अवस्थेत असूनही त्या पुन्हा नेसणे किंवा फेकून देणेही आपल्याला शक्य नसते. या सर्व प्रश्‍नांवर पल्लवी यांनी आपल्या पद्धतीने उत्तर शोधले. या साड्यांपासून कधी आई-मुलीसाठी ड्रेसची जोडी तर कधी घागरा, ड्रेस असे विविध प्रकार तुमच्या मागणीनुसार त्या डिझाइन करून देतात. 

लग्नसोहळा असो वा रिसेप्शन किंवा एखादा पारंपरिक कार्यक्रम; यामध्ये साडीला एक विशेष स्थान आहे. त्यातच फक्त साडीच नव्हे; तर तुमचा ब्लाऊजही कसा डिझाइन केला आहे, यालाही महत्त्व असते. फॅशन डिझाइनिंगमध्ये ‘ब्लाऊज डिझाइनिंग’ ही पल्लवी यांची स्पेशालिटी आहे. आपण एखाद्या साडीवरचा ब्लाऊज शिवायचा असल्यास फक्त ब्लाऊज पीस घेऊन टेलरकडे जातो आणि आपल्या आवडीनुसार शिवून घेतो. मात्र पल्लवी या ब्लाऊज सोबत साडीही पाहतात. साडी, त्यावरील रंगसंगती, पदर या सगळ्यांचा अभ्यास करून मगच त्या ब्लाऊज कसा डिझाइन करायला हवा, याचे पर्याय सुचवतात. पदरावर असलेल्या नक्षीकामाच्या रंगसंगतीमध्येच ब्लाऊजच्या मागच्या बाजूला मोर, नथ, दुर्गा अशी डिझाइन करून घेण्याला त्यांच्याकडे सर्वाधिक मागणी आहे. ‘चिनू’ या मराठी चित्रपटामध्ये अभिनेत्री तेजस्विनी लोणारीसाठीही त्यांनी कपडे डिझाइन केले आहेत. 

फॅशन डिझाइनिंगच्या क्षेत्रात असूनही पल्लवी या समाजसेवेमध्येही तेवढाच पुढाकार घेतात. कपडे शिवून राहिलेल्या कापडामधून त्यांनी गरीब मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन केले आहेत; तसेच ज्या महिलांना कपडे शिवून घेणे जमत नाही, अशांसाठी त्यांनी ब्लाऊजही शिवून दिले आहेत. पल्लवी म्हणाल्या, ‘‘वृद्धांनादेखील त्यांच्या काही आवडीनिवडी असतात. त्यामुळे मी ‘मातोश्री’ या वृद्धाश्रमात जाऊन तेथील आजी-आजोबांना त्यांच्या आवडीप्रमाणे मोफत ब्लाऊज, कुर्ते शिवून दिले. समाजसेवा ही माझी आवड आहे.’’ 

ज्या मुलींना महागडे फॅशन डिझाइनिंगचे कोर्स करणे जमत नाही, अशा मुलींसाठी फॅशन इन्स्टिट्यूट काढून त्यांना तिथे प्रशिक्षण देण्याची पल्लवी यांची इच्छा आहे. जेणेकरून या गरीब मुलींना रोजगार मिळू शकतो. 
(शब्दांकन - सुवर्णा येनपुरे-कामठे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com